Monday, April 1, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २१

    आता अर्जुनाची प्रतिज्ञा खरी करण्याची जबाबदारी सुद्धा श्रीकृष्णांवरच होती. अर्थात त्यांनी पांडवांचा भार उचललेलाच होता. श्रीकृष्णांनी रात्री अर्जुनाकडून शंकराची पूजा करवून घेतली व नंतर आपल्या शिबिरात गेले. पांडवांच्या शिबिरात मात्र त्या रात्री कोणीही झोपू शकले नाही. सर्वांना अर्जुनाची चिंता लागून राहिलेली होती. कारण पांडवांचा विजयाचा सर्व भार भीम व अर्जुन यांच्यावरच होता. श्रीकृष्णांनाही अर्जुनाच्या त्या भीषण प्रतिज्ञेमुळे रात्री जाग आली. ‘अर्जुन म्हणजे आपले अर्धे शरीर’ अशी त्यांची भावना होती.  ते आपला सारथी दारुकाला म्हणाले, ‘शोकाच्या आवेगात अर्जुनाने प्रतिज्ञा केली आहे. पण कौरव महारथी अर्जुनाला जयद्रथापर्यंत पोहोचू देणार नाहीत. मला स्त्री, मित्र व कुटुंबी जनांमधे अर्जुन अतिशय प्रिय आहे. मी अर्जुनाशिवाय या जगाची कल्पनाच करू शकत नाही. तेव्हा मीच त्याच्यासाठी कर्ण दुर्योधनासहित सर्व सेनेचा संहार करीन. उद्या सर्व त्रैलोक्य माझा पराक्रम पाहील. मी सव्यसाची अर्जुनाचा हितैषी मित्र आहे हे उद्या सर्व लोकांना कळून येईल.” असे म्हणून त्यांनी दारुकाला आपला रथ सर्व शस्त्रास्त्रांनी तयार ठेवण्यास सांगितला व पांचजन्य शंखाचा भयंकर ध्वनी ऐकताच तो रथ घेऊन आपल्याकडे येण्य़ास सांगितले. श्रीकृष्णांनाही त्या प्रतिज्ञेची भीषणता जाणवली होती. म्हणूनच त्यांनी वेळप्रसंगी स्वत:ची प्रतिज्ञा मोडून सुद्धा स्वत: युद्धात उतरायचे ठरवले होते. 

    सकाळी युद्धास बाहेर पडायच्या आधी युधिष्ठिरानेही अर्जुनाची प्रतिज्ञा सफल करण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या पराक्रमावर विश्वास ठेवण्यास सांगितले व अर्जुन जयद्रथाचा नक्की वध करेल असे आश्वासन दिले. 

    द्रोणांनी चक्रशकटव्यूह रचला होता. सकाळ होताच दोन्ही सैन्ये एकमेकांशी भिडली. जयद्रथापर्यंत पोचण्याचा अर्जुनाचा मार्ग कौरवांनी अवरुद्ध केला होता. श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन शकटव्य़ुहामधे घुसण्याचा प्रयत्न करत होते. द्रोणाचार्य, कृतवर्मा यांचे सैन्य ओलांडून पुढे जाण्यात अर्जुनाला यश मिळाले. पुढे त्यांना दुर्योधनाने अडवले. त्य़ाचाही पराभव करण्यात अर्जुनाने यश मिळवले. अर्जुनाच्या मदतीसाठी सात्यकी सुद्धा धावून आला. कौरवही जयद्रथाचे रक्षण करण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. अखेर अर्जुन जयद्ररथापर्यंत पोचला. सूर्य अस्ताचलाला जाण्य़ाची वेळ निकट आली होती. आणि सहा महारथी जयद्ररथाला घेरून उभे होते. त्यांचा पराजय केल्याशिवाय जयद्रथाचा वध करणे शक्य नव्हते. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, “अर्जुना, या सहा महारथींचा पराजय केल्याशिवाय जयद्रथाला मायेशिवाय जिंकता येणे शक्य नाही. म्हणून मी सूर्याला मायेने झाकून टकतो. त्यामुळे एकट्या जयद्रथालाच सूर्याचा अस्त झाला आहे असे वाटेल. तेव्हा तो तू अग्निप्रवेश करशील म्हणून व आता तुझ्याकडून काहीही भीती नाही असे वाटून त्या सहा महारथींचे कोंडाळे फोडून बाहेर येईल त्याच क्षणी तू सूर्यास्ताकडे लक्ष न देता जयद्रथाचा वध कर. तसेच जयद्रथाला ठार मारतांना त्याचे मस्तक पृथ्वीवर पडणार नाही याची काळजी घे. कारण जो याचे मस्तक कापून पृथ्वीवर पाडेल त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील असा याच्या पित्याने शाप देऊन तो वनात तपस्येसाठी गेला आहे. तेव्हा तू याचा शिरच्छेद कर व याचे मस्तक त्याचा तपस्या करत असलेला पिता वृद्धक्षत्र याच्या मांडीवर पडेल असे कर.” असे सांगून श्रीकृष्णांनी सूर्याला लपवण्य़ासाठी मायेने अंधकार केला. व अर्जुन घमासान युद्ध करत कौरववीरांवर तुटून पडला. व जेव्हा जयद्रथाला सूर्य अस्ताचलाला गेला आहे असे वाटले व तो जयद्रथ स्वत:ला निर्भय मानू लागला. तो त्या सहाजणांच्या कोंडाळ्यातून बाहेर येताच अर्जुनाने त्याचे मस्तक उडवले. त्याचे ते मस्तक आकाशात उडाले. अर्जुन ते मस्तक बाणांच्या सहाय्याने वरच्यावरच उडवत  होता व त्याचबरोबर त्या सहा महारथींबरोबर युद्धही करत होता. अर्जुनाने ते मस्तक वरच्यावर उडवत अखेर वृद्धक्षत्राच्या मांडीवर नेऊन पाडले. वृद्धक्षत्रांना तपस्येत मग्न असल्यामुळे ही गोष्ट कळलीच नाही व ते जप समाप्त करून उठले तेव्हा मस्तक पृथ्वीवर पडले व वृद्धक्षत्रांच्याच मस्तकाचे शेकडो तुकडे झाले. 

    जयद्रथाचा अर्जुनाने वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी रचलेली माया नाहीशी केली. तेव्हा सूर्य पुन्हा दिसू लागला. अशाप्रकारे श्रीकृष्णांनीच अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्णत्वास नेली.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment