रावणाच्या महालात अशी टीचभरही जागा नव्हती की जेथे हनुमानांनी सीतेचा शोध घेतला नाही. सीतेच्या शोधकार्यात जसजसे यश मिळत नव्हते तसतसे हनुमान निराश होऊ लागले. प्रायोपवशेन करावे, वानप्रस्थ स्वीकारावा की सरळ रावणाचाच वध करावा, असे अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. नंतर आपण अशोकवाटिकेत सीतेला शोधले नाही हे लक्षात येताच हनुमान अशोकवाटिकेत सीताशोधास निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी सर्व देव-देवतांना, श्रीरामचंद्रांना आपल्या कार्यात सफलता प्राप्त होण्यासाठी नमस्कार केला आणि अशोकवाटिकेच्या तटबंदीवर चढले. अशोकवाटिकेचे निरीक्षण करत ते एका शिंशपा वृक्षावर चढून बसले.
तेथे थोड्या दूर अंतरावर हनुमानांनी एक उंच गोलाकार मंदिर पाहिले. व जवळच मलीन वस्त्र धारण केलेली व अलंकाररहित एक स्त्री त्यांच्या दृष्टीस पडली. तिने केसांची एक लांब वेणी घातलेली होती. त्या स्त्रीला राक्षसस्त्रियांनी घेरलेले होते. उपवासामुळे ती स्त्री अत्यंत कृश दिसत होती व वारंवार सुस्कारे टाकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते व निरंतर ती दु:खात बुडून गेलेली होती. ती असहाय दिसत होती. रावण सीतेचे हरण करून घेऊन जात असता त्या दिवशी ज्या रूपात तिचे दर्शन झाले होते तशीच ही स्त्री दिसत होती. त्रिकूर्ण नावाची कर्णफुले, पोवळी जडवलेली कंकणे, वगैरे तिच्या ज्या आभूषणांची चर्चा त्यांनी रामांबरोबर केली होती तेच अलंकार सीतेच्या अंगावर होते. पण सीतेने खाली टाकलेले अलंकार मात्र तिच्या अंगावर यावेळी दिसत नव्हते. तिने अलंकार खाली टाकते समयी ज्या वस्त्रात गुंडाळलेले होते तसेच वस्त्र तिच्या अंगावर होते. वाल्मीकी म्हणतात -
तां समीक्षय विशालाक्षीं राजपुत्रीमनिंदिताम् ।
तर्कयामास सीतेति कारणैरुपपादयन् ॥५-१५-४०॥
आता मात्र हनुमानांनी युक्तायुक्त कारणांच्या द्वारे हीच सीता आहे असे अनुमान केले.
राम व सीता या दोघांचेही मन एकमेकांच्या ठिकाणी जडलेले आहे म्हणूनच दोघेही जिवंत आहेत असेही त्यांना वाटून गेले. ही सीताच आहे असा मनाशी निश्चय झाल्यावर त्यांना आनंद झाला. पतिव्रता सीतेला सुद्धा ज्याअर्थी असे दु:ख भोगावे लागते त्याअर्थी ‘कालो हि दुरतिक्रम:’ असे त्यांना वाटू लागले. जिच्या साठीच रामांनी विराध, कबंध, वाली, त्रिशिरा, खर, दूषणासह १४ हजार राक्षस यांना ठार मारले; सुग्रीवाशी सख्य केले व आपणही समुद्रोल्लंघन केले तीच ही सीता आज अशा प्रकारे दु:खी झालेली पाहून त्यांना वाईट वाटले. तिच्या भोवती अक्राळ विक्राळ राक्षसिणी हातात नानाविध शस्त्रे घेऊन उभ्या होत्या. इतक्यात पहाटेच रावण अशोकवनात आलेला त्यांना दिसला. त्याचे बोलणे नीट ऐकू यावे म्हणून हनुमान थोडे जवळ आले व वृक्षांच्या पानात लपून बसले.
त्या रावणाला पहाताच भीतीने सीता थर थर कापू लागली. रावण तिचा अनुनय करत होता, तिला ऐश्वर्योपभोगांचे व पट्टराणीपदाचे आमीष दाखवत होता हे हनुमानांनी पाहिले व ती स्त्री सीताच असल्याची त्यांची खात्री पटली. सीता त्याची मागणी धुडकावून आपल्या पातिव्रत्य धर्मावर स्थित होती. ‘रावण ज्याप्रमाणे आपल्या पत्नींचे रक्षण करतो त्याप्रमाणे त्याने परस्त्रियांचेही रक्षण केले पाहिजे, त्याने स्वस्त्रियांच्या ठिकाणी अनुरक्त होऊन आपली अभिलाषा त्याने सोडून द्यावी, सदाचाराने वागावे व आपल्याला रामांकडे सन्मानाने परत पाठवावे, नाहीतर श्रीराम येथे असा काही बाणांचा वर्षाव करतील की लंकेत तिळभरही जागा रहाणार नाही’ वगैरे सीतेचे भाषणही हनुमानांनी ऐकले व तिच्या शुद्ध चारित्र्याविषयी हनुमानांची खात्री पटली.
सीतेला दोन महिन्यांची मुदत देऊन रावण तेथून निघून गेल्यावर इतर सर्व राक्षसी तिला रावणाची पत्नी होण्याचा सल्ला देत होत्या. कोणी तिला प्रेमाने तर कोणी धाकदपटशाने सांगत होत्या व सीता त्यांना असले निंद्य कर्म करण्यास नकार देत होती. आपला पती रावणाचा नाश करण्यास समर्थ आहे असे तिला अजूनही वाटत होते. परंतु इतके दिवस उलटून गेले तरी राम अजूनही लंकेत का येत नाहीत हे मात्र तिला कळत नव्हते. सीतेचा शोक पाहून व प्राणत्याग करण्याचा निश्चय ऐकून हनुमानांचे हृदय द्रवले. हनुमानांनी सीतेचा विलाप, रावणाचे व राक्षसिणींचे तिला धमकावणे वगैरे सर्व प्रसंग व्यवस्थित ऐकले होते. अशा परिस्थितीत राक्षसिणींच्या नकळत सीतेशी वार्तालाप कसा करावा, तिचे सांत्वन कसे करावे, काय केले म्हणजे आपण श्रीरामांचे दूत म्हणून येथे आलो आहोत या विषयी तिची खात्री पटेल, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. ज्याप्रमाणे रामांना सीतेचा संदेश ऐकवून सांत्वना देणे उचित आहे त्याप्रमाणे सीतेलाही त्यांचा संदेश ऐकवून आश्वासन देणे योग्य ठरेल असे त्यांना वाटत होते पण राक्षस्त्रियांच्या समोर तिच्याशी संभाषण तरी कसे करणार ? असा त्यांचा मनाशी संवाद चालला होता.
हनुमानांनी ठरवले की राक्षसी इकडेतिकडे पहात आहेत अशी संधी साधून सीतेशी संवाद करावा. आपण वानर असलो तरी संस्कृत भाषेतच बोलावे. पुन्हा त्यांना शंका आली की आपली संस्कृत भाषा ऐकून सीतेला वाटेल की रावणच वेष बदलून आला आहे की काय. आपण जर एकदम समोर गेलो तर ती जनकनंदिनी घाबरून जाईल. तिच्या ओरडण्यामुळे राक्षसीही सावध होतील व मलाच मारण्याचा प्रयत्न करतील. मग मी समुद्राच्या परतीरास पोचणार तरी कसा व रामांना भेटून सीतेविषयी माहिती सांगणार तरी कसा ? किंवा मी येथे कैदी बनून गेलो तर रामांना हनुमान कोठे गेला त्याची गंधवार्ताही समजणार नाही. मग ते तिची प्राप्ती कशी करून घेऊ शकतील ? मी येथे हजारो राक्षसांना ठार मारू शकतो, पण मी जर युद्ध करण्यातच गुंतलो तर महासागराच्या परतीरास कसा पोचू शकेन ? बर युद्धात जय कोणला मिळेल याची शाश्वती नाही. ‘कश्च निःसंशयं कार्यं कुर्यात् प्राज्ञः ससंशयम्’ कोण असा बुद्धिमान असेल की जो संशयरहित कार्यास संशययुक्त बनविण्याची इच्छा करील ? ॥५-३०-३५॥
सौ. मनीषा अभ्यंकर