Monday, May 6, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १८)

रामांकडे येताच प्रथम हनुमानांनी काय केले असेल तर रामांच्या चरणांवर मस्तक टेकवून सीतेच्या पातिव्रत्याची खात्री दिली व सीतेने दिलेला चूडामणी रामांच्या हातात दिला व सीता कशी तरी जीवन धारण करीत असल्याचे, तसेच राक्षसी तिला देत असलेला त्रास, रावणाने तिला दिलेली दोन महिन्यांची मुदत व तोपर्यंत जर राम आले नाहीत तर सीतेची प्राणत्याग करण्याची तयारी या सर्व गोष्टी  सांगितल्या व सीतेचा संदेश ऐकवला. तो चूडामणी पाहून व खुणेची कावळ्याची गोष्ट ऐकून कपिराज सीतेला भेटले असल्याची रामांची खात्री पटली व सीतेच्या आठवणीने ते विलाप करू लागले. 

    हनुमानांकडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर रामांनी हनुमानांची प्रशंसा केली. या समयी रामांजवळ प्रिय संदेश ऐकवल्यावर देण्यायोग्य पुरस्काराचा अभाव असल्यामुळे त्यांनी हनुमानांना आलिंगन दिले. 

    नंतर सर्वानुमते लंकेकडे प्रयाण करण्याचे ठरले. रामांनी हनुमानांना दुर्गम लंकानगरीचे प्रत्यक्ष पहात असल्याप्रमाणे वर्णन करण्यास सांगितले. रावणाची सेना, पुरीचे दरावाजे, लंकेच्या रक्षणाचे उपाय, राक्षसांची भवने या सर्व गोष्टींची माहिती रामांनी विचारल्यावर हनुमानांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली. लंका दुर्गम असली तरी आपण तेथील संक्रम, तटबंदी, खंदक राक्षससेनेचा एक चतुर्थांश भाग कसा नष्ट केला आहे तेही सांगितले. समुद्रोल्लंघन केले की लंका जणु जिंकल्यासारखीच झाली अशी त्यांनी रामांना खात्री दिली.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Sunday, May 5, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १७)

    त्याचे भाषण ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने कठोर बनलेले ते राक्षस हनुमंताच्या पुच्छाला जुन्या पुराण्या फाटक्या सुती कपड्‍यांच्या चिंध्या गुंडाळू लागले. महाकपि हनुमान आपले शरीर आणि पुच्छ वृद्धिंगत करू लागले. राक्षसांनी चिंध्या गुंडाळल्यानंतर त्यांच्या पुच्छावर तेल ओतून त्याला आग लावून दिली. तेव्हां हनुमानांचे हृदय क्रोधाने भरून गेले. आपल्या पेटलेल्या पुच्छानेच त्यांनी राक्षसांना झोडपण्यास सुरूवात केली. तेव्हां क्रूर राक्षसांनी मिळून पुन्हा त्या वानर शिरोमणीना करकचून बांधून ठेवले. त्या वेळी वीर हनुमान करकचून बांधलेले असतांना त्या समयास अनुसरून विचार करू लागले. मी जरी बद्ध झालो असलो तरी राक्षसांचे माझ्यापुढे काही एक चालणार नाही. मी हे पाश तोडून टाकून एका उड्‍डाणात यांना मारून टाकीन. संग्रामामधे सर्व राक्षसांचा संहार करण्यास हनुमान एकटे समर्थ असले तरी त्यांनी ते बंधन मुकाट्याने स्वीकारले. त्यांनी विचार केला की राक्षस आपली नगरातून धिंड काढणार असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लंकानगरी दिवसा नीट पहायला मिळेल. त्यामुळे हनुमानांनी आपले दिव्य स्वरूप गुप्त ठेवले व ते बंधन आनंदाने स्वीकारले. महाकपीला बद्ध केल्याचा आनंद राक्षसांना झाला व ते त्यांना शंख व नगारे वाजवीत व त्यांच्या अपराधांची घोषणा करत  नगरात फिरवू लागले. पुढे हनुमान व मागे राक्षस अशी वरात चालली होती. नगरातून फिरत असता हनुमानांनी नगरीतील चित्रविचित्र विमाने, तटबंदी असलेले भूभाग, पृथक पृथक बनविलेले सुंदर चबुतरे पाहिले. सुव्यवस्थितपणे रेखलेले चौक, घरांनी गजबजून गेलेले रस्ते, चव्हाटे, लहान मोठे मार्ग आणि घरांमधील मोकळे भूभाग, त्या वायुपुत्रानी नीटपणे निरखून पाहिले. 

    शेपूट जळत असलेल्या त्या वानरास पहाण्यास लंकेमधे गर्दी होऊ लागली. सीतेलाही ही बातमी समजली. तिने अग्निदेवाचे ध्यान केले व म्हणाली, “हे अग्निदेवा ! मी जर पतीची शुश्रुषा केली असेल, जर काही तप केले असेल अथवा माझ्या ठिकाणी जर पातिव्रत्य असेल तर हे अग्ने ! तू हनुमंताला शीतल असा भासमान हो.” सीतेच्या प्रार्थनेमुळे अग्नी हनुमानांकरता शीतल झाला. हनुमानांना आपल्या शेपटाच्या टोकावर जणु काही बर्फाचा गोळा आहे असेच वाटू लागले. नंतर त्या महाकपींनी पाश तोडून आकाशात वेगाने उड्डाण केले. आता आणाखी कोणते कार्य शेष राहिले त्याचा ते विचार करू लागले. प्रमदवन उध्वस्त करून झाले होते. मुख्य सेनानायकांसह राक्षसांची एक अंश सेना त्यांनी नाहिशी केली होती. रावणाची भेट झाली होती. आता त्यांनी पुच्छाला लागलेल्या अग्नीला लंकेतील श्रेष्ठ गृहांची आहुती द्यायचे ठरवून ते लंकेतील भवनांतून हिंडू लागले. एका घरावरून दुसर्‍या घरावर उड्डाण करत लंकेतील घरे जाळू लागले. बिभीषणाचे घर सोडून त्यांनी प्रहस्ताचा महाल, महापार्श्वाचे निवासस्थान, वज्रदंष्ट्र, शुक, सारण, मेघनाद, जंबुमाळी, सुमाळी, रश्मिकेतु, सूर्यशत्रू, ह्रस्वकर्ण, रोमश वगैरे सर्वांची घरे जाळली. नंतर ते रावणाच्या महालावर पोचले. वायूच्या सहाय्याने प्रदीप्त झालेला अग्नी घराघरांवर पसरू लागला. उंच उंच प्रासाद अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. सर्व लंकापुरी जळून भस्मसात होऊ लागली. नंतर महाकपी हनुमानांनी समुद्राच्या जलात आपली शेपटी बुडवून शेपटीची आग विझवली. 

    नंतर त्यांना चिंता वाटू लागली की या आगीत सीता सुद्धा दग्ध झाली नसेल ना ? 

धन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् । 
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवांभसा ॥५-५५-३॥ 

“प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे जळाने लोक विझवून टाकतात त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाला जे महामनस्वी महात्मा पुरुष आपल्या बुद्धीच्या द्वारा आवरून धरतात तेच खरोखरच संसारात धन्य आहेत.”  क्रोध हाच सर्वनाशाला कारणीभूत होतो. आपल्या क्षमेच्या बळावर जो क्रोधाचा त्याग करतो तोच खरा पुरुष. त्यांना वाटू लागले की आपण क्रोधाच्या आहारी जाऊन भलताच उद्योग करून बसलो. लंकेला लागलेल्या अग्नीत जर सीतेचीही आहुती पडली असेल तर आपण सर्व स्वामीकार्याचाच नाश केला आहे. धर्म व अर्थ याचा आपल्या हातून सर्वस्वी नाश झाला आहे, आपण पापाचे भागिदार बनलो आहोत अशा विचाराने ते व्यथित झाले. कदाचित सीतादेवीच्या धर्माचरणानेच सीतेचे रक्षण केले असेल असे वाटून त्यांना उत्साहही वाटला व ते सीतेची खुशाली पहाण्यासाठी पुन्हा अशोकवाटिकेकडे वळले. सीता खुशाल आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला. तिला नमस्कार करून परत निघाले. सीतेने त्यांना उचित वाटत असेल तर आणखी एक दिवस थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली. पण हनुमानांनी तिला राम तुला सोडवायला नक्की येतील असे आश्वासन देऊन रामांना भेटायला परत समुद्रोल्लंघन करण्यासाठी अरिष्ठ नामक पर्वतावर चढले. दक्षिण तटावरून उत्तरतटाकडे जाण्यास त्यांनी आपल्या शरीरास खूप वाढवले उड्डाण केले. 

    मजल-दरमजल करत उत्तरतटाच्या निकट महागिरी महेंद्रावर दृष्टी पडताच मोठ्याने गर्जना करू लागले. गर्जनेने त्यांनी दाही दिशा दणाणून सोडल्या. हनुमानांचा सिंहनाद ऐकून सर्व वानर आनंदित झाले व हनुमान आपले काम नक्की फत्ते करून आले याची त्यांना खात्री वाटली. महेंद्र पर्वतावरून उतरून त्यांनी जांबवंत वगैरे वृद्द्ध मंडळी व स्वामीभावनेने अंगदालाही नमस्कार केला आणि त्यांना त्यांनी लंकेतील सर्व वृत्तांत सांगितला. सीतेचा शोध लागलेला कळताच सर्व वानर आनंदित झाले. हनुमानांनी सीतेच्या दुरवस्थेचे, तिच्या पातिव्रत्याचे, तेजस्वितेचे वर्णन करून वानरांना रावणाबरोबर युद्ध करण्यास उत्साहित केले. या हनुमानांच्या भाषणात नेतृत्वाचे गुण दिसतात. हनुमान म्हणाले, “मी एकटा सुद्धा राक्षसगणांसहित समस्त लंकापुरीचा वेगाने विध्वंस करण्यास आणि महाबलाढ्य रावणास मारण्यास पर्याप्त आहे. मग जर संपूर्ण अस्त्रांना जाणणारे आपल्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानरांची सहायता मिळाली तर आणखी काय पाहिजे ? त्यांनी अंगद, जांबवान, नील, मैंद, द्विविद यांच्या सामर्थ्याचीही स्तुती केली. त्यामुळे वानरवीरांच्या अंगात वीरश्री संचारली. अंगदाला तर सर्व वानरांना घेऊन लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला घेऊनच रामांकडे जावे असेच वाटू लागले. परंतु श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेस सोडवून आणण्याची प्रतिज्ञा केली असल्यामुळे आपण सीतेला सोडवून आणणे उचित नाही असा जांबवानानी सल्ला दिला. त्याप्रमाणे सर्व वानरगण श्रीरामांना सर्व वृत्तांत निवेदन करण्यास निघाले.

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

Saturday, May 4, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १६)

हनुमंतांचा    रावणास उपदेश  :

    रावणाला स्वत:ची ओळख करून दिल्यानंतर ते रावणाला म्हणाले, “हे महामान्य रावणा ! तू धर्म आणि अर्थ यांचे तत्त्व जाणतोस. तू फार मोठ्‍या तपाचाही संग्रह केला आहेस म्हणून परस्त्रीला आपल्या घरात डांबून ठेवणे तुला केव्हाही योग्य नाही. धर्माविरूद्ध कार्यात फार मोठे अनर्थ भरलेले असतात. ते कर्त्याचा समूळ नाश करून टाकतात. म्हणून तुझ्यासारख्या बुद्धिमान पुरुषाने अशा कार्यास प्रवृत्त होता उपयोगी नाही. हे राजन ! तिन्ही लोकात असा एकही प्राणी नाही की जो भगवान श्रीरामांचा अपराध करून सुखी राहू शकेल. म्हणून हे माझे धर्म आणि अर्थ यांना अनुसरून असलेले आणि सर्वकाळी हितावह असणारे भाषण तू लक्षात घे आणि जानकीला पुरुषश्रेष्ठ श्रीरामास परत दे. सीता तुझ्या घरात पाच फणा असलेल्या नागिणी प्रमाणे निवास करीत आहे. तिला तू पूर्णपणे ओळखलेले नाहीस. तू तपस्येचे कष्ट घेऊन हा धर्माचे फळस्वरूप जो ऐश्वर्याचा संग्रह केला आहेस आणि शरीर आणि प्राणांनाही दीर्घकाळ पर्यंत धारण करण्याची शक्ति प्राप्त केली आहेस, त्याचा विनाश करणे उचित नाही. तुला तपामुळे देव आणि असुर यांच्याकडून जी अवध्यता प्राप्त झाली आहे तिचे कारणही तुझे हे धर्माचरण आहे. जो पुरुष प्रबळ अधर्माच्या फळाने बांधला जातो तो बद्ध होतो, त्याला धर्माचे फळ मिळत नाही; त्याला त्या अधर्मफळाचीच प्राप्ती होते. हां, जर त्याने त्या अधर्मानंतर कुठल्याही प्रबळ धर्माचे अनुष्ठान केले तर ते अनुष्ठान पहिल्याने केलेल्या अधर्माचे नाशक होते.  तू पहिल्याने जो धर्म केला होतास त्याचे फळ तुला येथे पूर्णरूपाने प्राप्त झाले आहे, यांत संशयच नाही. आता या सीताहरणरूपी अधर्माचे फळही तुला लवकरच भोगावे लागेल. जनस्थानातील राक्षसांचा संहार, वालीचा वध आणि राम आणि सुग्रीव यांचे सख्य - या तीन कार्यांचा कार्यकारण संबंध नीट जाणून घे आणि त्यानंतर आपल्या हिताचा विचार कर. जिला तू सीता असे समजत आहेस आणि जी सांप्रत तुझ्या ताब्यात आहे, ती संपूर्ण लंकेचा नाश करणारी काळरात्रच आहे, हे तू लक्षात ठेव. सीतेचे शरीर धारण करुन तुझ्याजवळ काळाचाच पाश येऊन पोहोचला आहे. त्यात स्वतः होऊन गळा अडकवणे ठीक नाही म्हणून आपल्या कल्याणाचा तू आता काही तरी विचार कर. नाहीतर श्रीरामांच्या क्रोधाने प्रदीप्त झालेली आणि सीतेच्या तेजाने आधीच दग्ध झालेली ही लंकानगरी, तिच्यातील मार्ग, इमारती यांसह जळत असलेली पाहण्याचा प्रसंग तुझ्यावर येईल. हे स्वतःचे मित्र, मंत्री, कुटुंबी जन, भ्राते, पुत्र, हितचिंतक, स्त्रिया आणि सुखोपभोगाची सर्व साधने आणि संपूर्ण लंका यांना तू मृत्युमुखांत ढकलू नकोस. त्यांच्या नाशास कारण बनू नकोस. नृपश्रेष्ठ श्रीरामांचा तू आपल्या कृत्याने अपराध केला आहेस म्हणून तुझे जीवित सुरक्षित राहणे कठीण आहे.” रावणाला केलेल्या उपदेशातही हनुमानांचे धैर्य व बुद्धिमत्ता दिसून येते.  

    वीरभावाने निर्भयतापूर्वक भाषण करणार्‍या महाकपि हनुमंतांचे ते भाषण सुंदर आणि संयुक्तिक होते. तथापि रावणाला ते अप्रिय वाटले. तेव्हा रावणाने हनुमानाचा वध करावा अशी आज्ञा केली. पण बिभीषणाने दूताचा वध करू नये अशी शास्त्राज्ञा सांगितली. तसेच हा जर मारला गेला तर आकाशमार्गाने येथे येणारा दुसरा कोणी प्राणी मला दिसून येत नाही आहे, जो महासागर उल्लंघून या बाजूस येऊ शकेल. या परिस्थितीमध्ये शत्रूच्या गति आणि विधिचा पत्ता आपल्याला लागू शकणार नाही. ह्याचा वध झाला तर आपल्याला विरोध करणार्‍या त्या दोन्ही स्वतंत्र प्रकृतीच्या राजकुमारांना युद्धासाठी तयार करू शकेल असा दुसरा कोणी दूत आढळून येत नाही. म्हणून हनुमानांना दुसरा दंड देण्याचे रावणाने ठरवले. वानरांना आपले पुच्छ फार प्रिय वाटते आणि तेच त्यांचे आभूषण आहे. म्हणून राक्षसराज रावणाने अशी आज्ञा केली की या वानराचे पुच्छ पेटवून द्यावे आणि राक्षसगणांनी त्याला रस्त्या रस्त्यांतून आणि चव्हाट्‍यावरून संपूर्ण नगरांतून फिरवावे. त्याची धिंड काढावी.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Friday, May 3, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १५)

    रावणाने प्रहस्ताच्या पुत्रास जंबुमाळीस हनुमानांचा सामना करण्यास पाठवले. तो धनुष्याचा टणत्कार करित निघाला. त्या धनुष्याच्या प्रचंड टणत्काराने दिशा, उपदिशा आणि आकाशही एकदम दणाणून गेले. महातेजस्वी जंबुमाळीने दरवाजाच्या कमानीखालच्या दोन खांबावरील आडव्या लाकडावर बसलेल्या त्या महाकपि हनुमंतास तीक्ष्ण बाणांनी विंधण्यास आरंभ केला. जंबुमाळीच्या बाणांनी जखमी झाल्याने महाकपि हनुमंतांना अत्यंत क्रोध आला. शेजारीच असलेली प्रचंड लांबरूंद शिळा उपटून बलाढ्‍य हनुमंतानी अत्यंत वेगाने ती त्या जंबुमाळीवर फेकली. शेवटी रागाने त्यांनी परिघ हातात घेतला व तो जंबुमाळीच्या वक्षस्थळावर फेकला. त्यावेळी जंबुमाळी रथासहित ठार झाला. 

    मग रावणाने रागाने सात अमात्यपुत्रांना हनुमानांबरोबर युद्ध करण्यास पाठवले. हनुमानांनी त्या सात अमात्य पुत्रांच्या विशाल सेनेला भयभीत केले व सातही अमात्यपुत्रांना ठार मारले. त्यामुळे त्यांची विशाल सेना घाबरून पळून गेली. पुन्हा ते महाकपि दरवाज्यावर जाऊन बसले. आपण पाठवलेल्या वीरांना त्या वानराने सहज ठार मारून टकले हे पाहून रावणाला हनुमान म्हणजे साधासुधा वानर नाही याची खात्री पटली. म्हणून त्याने विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस व भासकर्ण या पाच सेनापतींना हनुमानास पकडून आणण्याची आज्ञा केली. ते पाच सेनापती अशोकवाटिकेकडे आले असता हनुमान त्यांना कसे दिसले याचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात, “पुढे गेल्यावर तो देदिप्यमान महाकपि त्यांना दिसला. स्वतःचेच ठिकाणी असलेल्या प्रभेने युक्त असल्यामुळे तो वानर उदयाचलावर येत असलेल्या सूर्याप्रमाणे भासत होता. प्रचंड वेग, अनुपम धैर्य, अतर्क्य सामर्थ्य, लोकोत्तर बुद्धि, अद्वितीय उत्साह, अनिर्वचनीय देह आणि अतुल पराक्रम यांनी युक्त असलेला तो वानर दरवाजावर बसलेला होता.” त्या पाच सेनापतींशी त्यांचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा हनुमानांनी विकट गर्जना करून आपला देह अधिक विशाल केला व विजेचा स्त्रोत एकदम एखाद्या पर्वतावर पडावा त्याप्रमाणे महावेगवान हनुमानांनी आकाशांत एकदम उंच जाऊन एकाएकी दुर्धराच्या रथावर उडी मारली. त्यामुळे त्याच्या रथाचा चुराडा झाला व तो दुर्धर मृत्यु पावला. तसेच त्यांनी इतर सेनापतींचाही सेनेसह वध केला. 

    नंतर रावणाने आपला पुत्र अक्षकुमार यास पाठवले. युद्धात अक्षकुमाराचा पराक्रम पाहून हनुमान खूष झाले. पण त्याची उपेक्षा करणे योग्य नाही असे वाटून हनुमानांनी त्या राक्षसाचे दोन्ही पाय पकडले व त्याला आकाशात गरगर फिरवून युद्धभूमीवर आपटले. अक्षकुमाराचाही हनुमानांनी वध केला हे ऐकताच रावण खवळला व त्याने बाहुबळाने न तपोबळाने युक्त असा आपला पुत्र इंद्रजित याला हनुमानांबरोबर युद्धास पाठवले. त्याला पहाताच हनुमानांनी मोठ्याने गर्जना केली व आपले शरीर वृद्धिंगत केले आकाशात विचरण करू लागले. इन्द्रजित हनुमानांवर बणांनी प्रहार करत होता. पण हनुमान बाणांच्या पुढे उभे रहात व दोन्ही हात पसरून बघता बघता आकाशात उड्डण करून निघून जात. त्यामुळे इंद्रजिताला हनुमानांवर प्रहार करण्याची संधीच मिळत नव्हती. तसेच हनुमानांनाही  त्या वीराला जेरीस आणण्याची संधी मिळत नव्हती. दोघांनाही एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज लागत नव्हता. शेवटी इंद्रजिताने हनुमानांना ब्रह्मास्त्राने बद्ध केले. परंतु ब्रह्मदेवाने हनुमानांना वर दिला होता की माझे अस्त्र तुला एका क्षणात बंधनातून मुक्त करेल.’ ते मनात म्हणाले की ब्रह्मा, इंद्र आणि वायु यांनी माझे रक्षण केले असल्यामुळे या अस्त्राने जरी मी बद्ध झालो आहे तरी मला काहीही भीती नाही. परंतु राक्षसांनी मला बांधून नेले तर राक्षसराज रावणाशी मला बोलतां येईल हा एक मोठाच लाभ होईल यासाठी शत्रु मला खुशाल अस्त्राने बांधून नेऊ देत. याप्रमाणे कोणतेही कार्य विचारपूर्वक करणारे ते शत्रूवीरांचे संहारक हनुमान वरील प्रमाणे मनाचा निश्चय करून तसेच निश्चेष्ट पडून राहिले. तेव्हा तर शत्रूनी जवळ येऊन त्यांच्यावर सर्व बाजूनी हल्ला करून त्यांना धरले आणि ते त्यांची निर्भत्सना करू लागले, त्यावेळी जणु फार कष्ट होत आहेत याप्रकारे हनुमान ओरडू लागले. हनुमान निश्चेष्ट पडले आहेत असे पाहून राक्षसांनी त्यांना तागाच्या दोर्‍यांनी बांधले. शत्रुपक्षीय वीर राक्षसांनी बलात्काराने केलेले बंधन आणि निर्भत्सना हे त्यावेळी सर्व हनुमंतास आपल्या कार्यासाठी उचित वाटले म्हणून त्यांनी ते सहन केले. त्यांच्या मनात विचार आला की माझा पराक्रम ऐकून आणि माझ्याविषयीच्या कुतूहलामुळे स्वाभाविकच राक्षसराज रावण एकदा तरी मला पहाण्याची इच्छा करेल. त्याप्रमाणे राक्षसांनी त्यांना मारीत मारीत रावणाच्या पुढ्यात उभे केले. 

    रावणाला हनुमानांनी आपण सुग्रीवाचा मंत्री असून रामांनी पाठवलेला दूत आहोत अशी स्वत:ची ओळख करून दिली. रावणाचे धैर्य, शक्ती, तेज व त्याची राजोचित लक्षणे पाहून हनुमान मोहित झाले. रावणाच्या ठिकाणी अधर्म प्रबळ नसता तर हा राक्षसराज रावण इंद्रासहित संपूर्ण देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता असे त्यांना वाटून गेले. परंतु याच्या लोकनिंदित क्रूर कर्मामुळे दानवांसहित सर्वलोक भयभीत झाले होते.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Thursday, May 2, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १४)

    सीताशोधाचे कार्य पूर्ण झाले होते. परंतु त्यांच्या दृष्टीने एक कार्य मात्र बाकी राहिले होते. ते म्हणजे रावणाच्या बळाचा अंदाज घेणे. शत्रूच्या बळाचा अंदाज साम, दाम, भेद व दंड  या चार उपायांनी घेता येतो. पण येथे राक्षसांच्या ठिकाणी सामाचा काही उपयोग होणार नाही. ते द्रव्यसंपन्न आहेत म्हणून त्यांना दान देणेही योग्य नाही. शिवाय त्यांना बळाचा गर्व झालेला असल्याने भेदाने काम साध्य होणार नाही. म्हणून केवळ चौथ्या उपायाचा, दण्डाचा प्रयोग करणे हाच उपाय हनुमानांना ठीक वाटला. त्यांना पराक्रम करून दाखविणेच उचित वाटले. राक्षसांमधील मुख्य मुख्य वीर मारले गेले तरच हे राक्षस नरम होतील असे त्यांना वाटले. 

कार्ये कर्मणि निर्दिष्टे यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्यं कर्तुमर्हति ॥५-४१-५॥
न ह्येकः साधको हेतुः स्वल्पस्यापीह कर्मणः ।
यो ह्यर्थं बहुधा वेद स समर्थोऽर्थसाधने ॥५-४१-६॥ 

मुख्य कार्य पार पडल्यावर, पहिल्या कार्याला बाधा न येऊ देता, जो अनेक कार्ये पार पाडतो तोच हाती घेतलेले कार्य उत्तम प्रकारे शेवटास नेण्यास समर्थ होतो. लहान लहान कार्ये असली तरीही एकाच उपायाने पार पडतील असे नाही. जो पुरुष कुठलेही कार्य अथवा प्रयोजन अनेक प्रकारांनी सिद्ध करण्याची कला जाणतो तोच कार्य सिद्धिस नेण्यास समर्थ होऊ शकतो. असा त्यांनी विचार केला. शत्रूशी आपल्या पक्षाला युद्ध करण्याचा प्रसंग आला तर कोण प्रबळ होईल आणि कोण कमजोर ठरेल, शत्रूमध्ये आणि आपल्यामध्ये विशेष काय आहे, हे समजून आल्यानंतर जर आपण वानराधिपती सुग्रीवाकडे गेलो तर आपल्याकडून स्वामीच्या आज्ञेचे पूर्णरूपाने पालन झाले असे समजले जाईल असे त्यांना वाटले. त्यासाठी ते युद्धाची संधी कशी मिळेल या बद्दल विचार करू लागले. म्हणजे त्यांना तुलनात्मक दृष्टीने कोणचे पारडे अधिक जड आहे याचा विचार करता आला असता. त्या युद्धात त्यांनी रावणाचे मंत्री, सेना आणि सहायकांसह रावणाचा सामना करून त्याच्या अंतःकरणातील भाव तसेच, सैनिकांची शक्ती याची माहिती करून घेण्याचा विचार केला. म्हणून युद्धास तोंड फुटावे म्हणून त्यांनी रावणाला प्रिय असलेल्या अशोकवाटिकेचा विध्वंस करण्याचे ठरवले. म्हणजे रावण निश्चितच रागावला असता व सेनेसहित हनुमानांवर चालून आला असता. आपल्या पराक्रमावर हनुमानांचा कमालीचा विश्वास होता. त्यांनी रावणाने पाठवलेल्या सर्व सेनेचा वध करून किष्किंधेला जायचा विचार केला. 

    त्याप्रमाणे त्यांनी आपल्या प्रचंड वेगाने अशोकवाटिकेतील मोठे मोठे वृक्ष उन्मळून टाकले. सीता ज्या वृक्षाखाली बसली होती तो वृक्ष सोडून त्यांनी सर्व प्रमदवनाची नासधूस केली व राक्षसांबरोबर युद्ध करण्याच्या इच्छेने  ते प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले. प्रमदवनातील राक्षसीणींना भीती वाटेल असे भयंकर रूप त्यांनी धारण केले. रावणाला ही वार्ता समजताच त्याने आपले किंकर नावाचे सैनिक पाठवून दिले. ते सर्व हनुमानांवर तुटून पडले. आपण रामांचा दास असल्याचे त्यांनी त्यांना गर्जून सांगितले. त्यांची ती सिंहगर्जना ऐकताच सर्व राक्षस भयभीत झाले. दरवाजावरील परीघ घेऊन त्यांनी त्या निशाचरांना मारण्यास प्रारंभ केला. त्या किंकर नामक राक्षसांचा वध केल्यावर हनुमान पुन्हा त्या प्रमदवनाच्या दरवाज्यावर जाऊन बसले.  

    त्यानंतर त्यांच्या मनात विचार आला की येथील  राक्षसांच्या देवालयाचा नाश करावा. ते देवालयावर चढले व त्या प्रासादाची मोडतोड करू लागले. मोडतोड करत असता ते श्रीरामांच्या नावाचा जयजयकार करत होते व भयानक आवाजात गर्जना करत होते. त्यांची गर्जना ऐकून प्रासादरक्षक नानाविध अस्त्रे घेऊन आले. त्यांच्याशी युद्ध करतांना त्यांनी त्या प्रासादाचा सोन्याचा खांब उपटून काढला व तो ते जोराजोराने फिरवण्यास लागले. तेव्हा दुसर्‍या खांबाशी घर्षण होऊन अग्नी उत्पन्न झाला. त्यामुळॆ तो प्रासाद जळू लागला. हनुमानांनी त्या खांबानेच शेकडो राक्षसांना मारून टाकले. आणि आकाशात स्थित होऊन तेजस्वी वाणीने बोलले, “राक्षसांनो ! सुग्रीवाच्या आज्ञेत वागणारे माझ्यासारखे असे हजारो विशालकाय बलवान वानरश्रेष्ठ सर्व बाजूस पाठवले गेले आहेत. आम्ही आणि इतरही वानर मिळून सर्व पृथ्वी हिंडत आहोत. आम्हापैकी काहीना दहा हत्तींचे बळ आहे. काही त्यांच्यापेक्षाही बलाढ्‍य आहेत, त्याच्यांत शंभर हत्तींचे बळ आहे. तर कित्येक वानर असे आहेत की ते हजारो हत्तींप्रमाणे बल आणि पराक्रमाने संपन्न आहेत. कांहीचे बळ जलाच्या प्रवाहासारखे असह्य आहे. कित्येक तर वायुच्या समान बलवान आहेत आणि कित्येक वानर यूथपति आपल्या ठिकाणी असीम बळ धारण करणारे आहेत. दात आणि नखे हीच ज्यांची आयुधे आहेत असे अनंत बलशाली शेकडो, हजारो, लाखो, करोडो वानर बरोबर घेऊन वानरराज सुग्रीव येथे येईल. ते सर्व तुम्हां सर्व निशाचरांचा संहार करण्यास समर्थ आहेत. आता तर ही लंकापुरी राहाणार नाही, तुम्हीही राहाणार नाही आणि ज्याने इक्ष्वाकुवंशीय वीर महात्मा श्रीरामांशी वैर बांधले आहे, तो रावणही राहू शकणार नाही.”  

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

Wednesday, May 1, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १३)

सूर्याचा उदय झाल्यावर ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचे काही चालत नाही, तो निष्फळ होतो, नष्ट होतो त्याप्रमाणे अविवेकी किंवा असावधान दूताच्या हाती पडल्यावर जवळ जवळ पूर्ण होत आलेले कार्यही देश-काळ विरोधी होऊन असफळ, अयशस्वी ठरते. कर्तव्य आणि अकर्तव्य या विषयी निश्चित झालेली स्वामीची बुद्धिही अविवेकी दूतामुळे शोभून दिसत नाही कारण स्वतःला मोठा बुद्धिमान अथवा पण्डित समजणारा दूत आपल्या बेअक्कल वागण्याने कार्याचा नाश करून टाकतो. म्हणून काय केले असता हे कार्य बिघडणार नाही, काय केले असता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असावधानी होणार नाही आणि माझे समुद्रोल्लंघनही व्यर्थ ठरणार नाही, कुठल्या प्रकारे सीता माझे सर्व म्हणणे ऐकून तर घेईल पण घाबरणार मात्र नाही - या सर्व गोष्टी संबंधी हनुमान विचार करत होते. तेव्हा त्यांनी ठरवेले की आपण सीतेला रामांचे गुण गाऊन दाखवावेत म्हणजे ती उद्विग्न होणार नाही. येथेच बसून त्यांची सुंदर व धर्मानुकूल वचने तिला ऐकवावीत व श्रीरामांचा संदेश तिला ऐकवावा, म्हणजे तिचा त्या वचनांवर विश्वास बसेल व तिचा सर्व संदेह दूर होईल. असा विचार करून हनुमानांनी सीतेलाच ऐकू जाईल अशा जवळच्या जागेवर बसून श्रीरामकथा गावयास सुरवात केली.  

सर्व रामकथा ऐकवून त्यांनी श्रीरामांनी सीताप्राप्तीसाठी सुग्रीवाशी केलेले सख्यही तिला निवेदन केले व सीतेच्या शोधास सर्वदिशांना वानर रवाना झालेले असून त्यातीलच  आपण एक वानर असून समुद्रोल्लंघन करून येथे आलो असल्याचे त्यांनी तिला सांगितले. 

    आपल्याला कोण रामचरित्र ऐकवत आहे असे वाटून सीतेने आवाजाच्या रोखाने शिंशपावृक्षाकडे नजर टाकली. तेथे तिने वानररूपात हनुमानास पाहिले व ती घाबरून गेली. हा रावण तर वेष बदलूना आला नाही ना असे तिला वाटले. आपण एखादे स्वप्न तर पहात नाही ना असे तिला वाटू लागले. रामगुणांचे वर्णन करून हा आपले चित्त आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असावा असे तिच्या मनात आले. सतत रामांचा विचार करत असल्यामुळेच आपल्याला हे रामचरित्र ऐकावयाला आले असावे असेही तिला वाटले. अशा संभ्रमित अवस्थेत असतांना हनुमान अशोकवृक्षावरून खाली उतरले व हात जोडून विनीतभावाने त्यांनी सीतेस नमस्कार केला. लवकरच तिची रामांशी भेट होईल, राम रावणाचा वध करतील, त्यांनीच आपल्याला येथे पाठवले असून आपला कुशलसमाचार तुला कळवण्यास सांगितला आहे या सर्व गोष्टींवर तिने विश्वास ठेवावा असे त्यांनी तिला सांगितले. दोघांनाही परस्परांच्या भेटीमुळे आनंद झाला. 

    सीतेने विचारले म्हणून हनुमानांनी पुन्हा रामांचे वर्णन करून ते सीतेसाठी कसे व्याकुळ झाले आहेत तिच्या प्राप्तीसाठीच त्यांनी सुग्रीवाशी सख्य कसे केले आहे ते सविस्तर सांगितले व तिचा विश्वास बसावा म्हणून रामनामांकित अंगठी त्यांनी तिला दिली. ती अंगठी पहाताच हनुमानाविषयीची तिची शंका दूर झाली. ‘परंतु काकुत्स्थकुळभूषण श्रीराम जर कुशल आहेत तर प्रलयाग्नीप्रमाणे ते कोपाने ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी दग्ध का बरे करून टाकीत नाहीं ? आपले दु:ख दूर करण्यास ते इतका विलंब का लावतात की आपल्याबाबतीत ते स्नेहहीन झाले आहेत, किंवा त्यांचे मन अन्यत्र गुंतले आहे अशी शंका तिला आली. 

    तेव्हा हनुमानांनी  स्पष्ट केले की रामांना सीता लंकेमधे आहे याची काहीही कल्पना नाही. आपण येथून परत गेल्यावरच रामांनी ही गोष्ट समजणार आहे. त्यावेळी राम नक्कीच विशाल सेना घेऊन येतील व रावणाला ठार मारून सीतेची सुटका करतील अशी ग्वाही दिली. सीता जितकी रामांसाठी व्याकुळ झालेली आहे तसेच श्रीराम सुद्धा जानकीविना शोकाने व्याकुळ झालेले आहेत असे तिला सांगून हनुमानांनी तिला आश्वस्त केले.    
    हनुमानांचे बोलणे ऐकून सीतेने हनुमानांना लंकेत येण्यासाठी त्वरा करण्याचा निरोप दिला. सीता-हरणाला दहा महिने उलटून गेले होते. शेवटची दोन महिन्यांची मुदत देऊन रावण निघून गेला होता. या दोन महिन्यात राम आले नाहीत तर रामांना आपण जिवंत दिसणार नाही असेही तिने त्यांना सांगितले. तेव्हा हनुमानांनी तिला राम वानरांची व अस्वलांची विशाल सेना घेऊन येत आहे असा धीर दिला. आणि त्यातूनही आपणही तिला खांद्यावरून रामांपर्यंत पोचवू शकतो असे अभिवचन दिले. कारण त्यांना रामचंद्राचे लवकर प्रिय करण्याची इच्छा होती. 

    परंतु हनुमानांबरोबर जाणे तिला प्रशस्त वाटले नाही. एकतर अशा परपुरुषाबरोबर जाणे योग्य नव्हते. वायुवेगाने हनुमानाबरोबर जातांना आपल्याला चक्कर येईल, कदाचित आपण समुद्रातही पडू, कदाचित रावणाचे सैनिक पाठलाग करतील, अशा स्थितीत सितेचे संरक्षण व राक्षसांशी युद्ध या दोन्ही गोष्टी हनुमानास कशा जमतील अशी अनेक कारणे सीतेने सांगितली. सगळ्यात महत्वाचे कारण होते की जर राम स्वत: आले नाहीत तर ते त्यांना मानहानिकारक होईल. तेव्हा रामांनीच पराक्रम गाजवून आपल्याला येथून घेऊन गेले पाहिजे असे सीतेचे म्हणणे होते. ते हनुमानांना पटले. कारण ते बोलणे स्त्रीस्वभावाला व पतिव्रतांच्या विनयशीलतेला शोभणारेच होते. हनुमानांनी तिला वचन दिले की तिचे ते उत्तम भाषण आपण रामांच्या कानावर घालू. 

    त्यानंतर हनुमानांनी तिच्याजवळची एखादी वस्तु खूण म्हणून रामांना  देण्यासाठी मागितली. तेव्हा सीतेने त्यांना चित्रकूट पर्वतावर घडलेली कावळ्याची गोष्ट सांगितली. मांस खाण्याच्या उद्देशने एक कावळा सीतेला टोच मारत असतांना श्रीरामांनी  एक दर्भ ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडला. आपले प्राण वाचवण्यासाठी कावळा तिन्ही लोकात फिरून शेवटी रामांनाच शरण आला. पण ब्रह्मास्त्र फुकट जाणारे नव्हते म्हणून त्यांनी त्या कावळ्याच्या संमत्तीनेच त्याचा उजवा डोळा फोडला.  ही कथा सांगून तिने रामांना निरोप दिला की ‘तुम्ही यकश्चित कावळ्याला सुद्धा दंड दिला होतात तर या महान अपराध करणार्‍या रावणाला का बरे शिक्षा करत नाही ?’ असे म्हणून सीता रडू लागली. तेव्हा हनुमानांनी पुन्हा तिची समजूत काढली. ते म्हणाले, “हे देवी ! मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीराम तुझ्या विरह-शोकाने पीडित होऊन अन्य सर्व कार्यापासून विमुख झाले आहेत. केवळ तुझेच चिंतन करीत असतात. श्रीराम दुःखी असल्याने लक्ष्मणही सदा अत्यंत चिंताक्रांत झाले आहेत. हे विशाल लोचने ! राघव समरांगणात क्रूरता प्रकट करणार्‍या रावणाला त्याच्या बंधुबांधवांसहित मारून तुला आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील.”
    नंतर सीतेने वस्त्रात बांधलेला चूडामणी बाहेर काढला व रामांना खूण म्हणून देण्यासाठी दिला. तो चूडामणी घेऊन हनुमानांनी सीतेला प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घालून त्यांनी परत फिरण्याची तयारी केली. जातांना त्यांनी पुन्हा श्रीराम सुग्रीवासह येथे येऊन रावणाला पराजित करून सीतेला सोडवून नेतील असे वचन दिले व त्यांनी उत्तरदिशेला प्रयाण केले.

                       
सौ. मनीषा अभ्यंकर

Tuesday, April 30, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १२)


    रावणाच्या महालात अशी टीचभरही जागा नव्हती की जेथे हनुमानांनी सीतेचा शोध घेतला नाही. सीतेच्या शोधकार्यात जसजसे यश मिळत नव्हते तसतसे हनुमान निराश होऊ लागले. प्रायोपवशेन करावे, वानप्रस्थ स्वीकारावा की सरळ रावणाचाच वध करावा, असे अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. नंतर आपण अशोकवाटिकेत सीतेला शोधले नाही हे लक्षात येताच हनुमान अशोकवाटिकेत सीताशोधास निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी सर्व देव-देवतांना, श्रीरामचंद्रांना आपल्या कार्यात सफलता प्राप्त होण्यासाठी नमस्कार केला आणि अशोकवाटिकेच्या तटबंदीवर चढले. अशोकवाटिकेचे निरीक्षण करत ते एका शिंशपा वृक्षावर चढून बसले.
    तेथे थोड्या दूर अंतरावर हनुमानांनी एक उंच गोलाकार मंदिर पाहिले. व जवळच मलीन वस्त्र धारण केलेली व अलंकाररहित  एक स्त्री त्यांच्या दृष्टीस पडली. तिने केसांची एक लांब वेणी घातलेली होती. त्या स्त्रीला राक्षसस्त्रियांनी घेरलेले होते. उपवासामुळे ती स्त्री अत्यंत कृश दिसत होती व वारंवार सुस्कारे टाकत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वहात होते व निरंतर ती दु:खात बुडून गेलेली होती. ती असहाय दिसत होती. रावण सीतेचे हरण करून घेऊन जात असता त्या दिवशी ज्या रूपात तिचे दर्शन झाले होते तशीच ही स्त्री दिसत होती. त्रिकूर्ण नावाची कर्णफुले, पोवळी जडवलेली कंकणे, वगैरे तिच्या ज्या आभूषणांची चर्चा त्यांनी रामांबरोबर केली होती तेच अलंकार सीतेच्या अंगावर होते. पण सीतेने खाली टाकलेले अलंकार मात्र तिच्या अंगावर यावेळी दिसत नव्हते. तिने अलंकार खाली टाकते समयी ज्या वस्त्रात गुंडाळलेले होते तसेच वस्त्र तिच्या अंगावर होते.  वाल्मीकी म्हणतात - 

तां समीक्षय विशालाक्षीं राजपुत्रीमनिंदिताम् ।    
तर्कयामास सीतेति कारणैरुपपादयन् ॥५-१५-४०॥
आता मात्र हनुमानांनी युक्तायुक्त कारणांच्या द्वारे हीच सीता आहे असे अनुमान केले. 

    राम व सीता या दोघांचेही मन एकमेकांच्या ठिकाणी जडलेले आहे म्हणूनच दोघेही जिवंत आहेत असेही त्यांना वाटून गेले. ही सीताच आहे असा मनाशी निश्चय झाल्यावर त्यांना आनंद झाला. पतिव्रता सीतेला सुद्धा ज्याअर्थी असे दु:ख भोगावे लागते त्याअर्थी ‘कालो हि दुरतिक्रम:’ असे त्यांना वाटू लागले. जिच्या साठीच रामांनी विराध, कबंध, वाली, त्रिशिरा, खर, दूषणासह १४ हजार राक्षस यांना ठार मारले; सुग्रीवाशी सख्य केले व आपणही समुद्रोल्लंघन केले तीच ही सीता आज अशा प्रकारे दु:खी झालेली पाहून त्यांना वाईट वाटले. तिच्या भोवती अक्राळ विक्राळ राक्षसिणी हातात नानाविध शस्त्रे घेऊन उभ्या होत्या. इतक्यात पहाटेच रावण अशोकवनात आलेला त्यांना दिसला. त्याचे बोलणे नीट ऐकू यावे म्हणून हनुमान थोडे जवळ आले व वृक्षांच्या पानात लपून बसले. 

    त्या रावणाला पहाताच भीतीने सीता थर थर कापू लागली. रावण तिचा अनुनय करत होता, तिला ऐश्वर्योपभोगांचे व पट्टराणीपदाचे आमीष दाखवत होता हे हनुमानांनी पाहिले व ती स्त्री सीताच असल्याची त्यांची खात्री पटली. सीता त्याची मागणी धुडकावून आपल्या पातिव्रत्य धर्मावर स्थित होती. ‘रावण ज्याप्रमाणे आपल्या पत्नींचे रक्षण करतो त्याप्रमाणे त्याने परस्त्रियांचेही रक्षण केले पाहिजे, त्याने स्वस्त्रियांच्या ठिकाणी अनुरक्त होऊन आपली अभिलाषा त्याने सोडून द्यावी, सदाचाराने वागावे व आपल्याला रामांकडे सन्मानाने परत पाठवावे, नाहीतर श्रीराम येथे असा काही बाणांचा वर्षाव करतील की लंकेत तिळभरही जागा रहाणार नाही’ वगैरे सीतेचे भाषणही हनुमानांनी ऐकले व तिच्या शुद्ध चारित्र्याविषयी हनुमानांची खात्री पटली.  

    सीतेला दोन महिन्यांची मुदत देऊन रावण तेथून निघून गेल्यावर इतर सर्व राक्षसी तिला रावणाची पत्नी होण्याचा सल्ला देत होत्या. कोणी तिला प्रेमाने तर कोणी धाकदपटशाने सांगत होत्या व सीता त्यांना असले निंद्य कर्म करण्यास नकार देत होती. आपला पती रावणाचा नाश करण्यास समर्थ आहे असे तिला अजूनही वाटत होते. परंतु इतके दिवस उलटून गेले तरी राम अजूनही लंकेत का येत नाहीत हे मात्र तिला कळत नव्हते. सीतेचा शोक पाहून व प्राणत्याग करण्याचा निश्चय ऐकून हनुमानांचे हृदय द्रवले. हनुमानांनी सीतेचा विलाप, रावणाचे व राक्षसिणींचे तिला धमकावणे वगैरे सर्व प्रसंग व्यवस्थित ऐकले होते. अशा परिस्थितीत राक्षसिणींच्या नकळत  सीतेशी वार्तालाप कसा करावा, तिचे सांत्वन कसे करावे, काय केले म्हणजे आपण श्रीरामांचे दूत म्हणून येथे आलो आहोत या विषयी तिची खात्री पटेल, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. ज्याप्रमाणे रामांना सीतेचा संदेश ऐकवून सांत्वना देणे उचित आहे त्याप्रमाणे सीतेलाही त्यांचा संदेश ऐकवून आश्वासन देणे योग्य ठरेल असे त्यांना वाटत होते पण राक्षस्त्रियांच्या समोर तिच्याशी संभाषण तरी कसे करणार ? असा त्यांचा मनाशी संवाद चालला होता. 

    हनुमानांनी ठरवले की राक्षसी इकडेतिकडे पहात आहेत अशी संधी साधून सीतेशी संवाद करावा. आपण वानर असलो तरी संस्कृत भाषेतच बोलावे. पुन्हा त्यांना शंका आली की आपली संस्कृत भाषा ऐकून सीतेला वाटेल की रावणच वेष बदलून आला आहे की काय. आपण जर एकदम समोर गेलो तर ती जनकनंदिनी घाबरून जाईल. तिच्या ओरडण्यामुळे राक्षसीही सावध होतील व मलाच मारण्याचा प्रयत्न करतील. मग मी समुद्राच्या परतीरास पोचणार तरी कसा व रामांना भेटून सीतेविषयी माहिती सांगणार तरी कसा ? किंवा मी येथे कैदी बनून गेलो तर रामांना हनुमान कोठे गेला त्याची गंधवार्ताही समजणार नाही. मग ते तिची प्राप्ती कशी करून घेऊ शकतील ? मी येथे हजारो राक्षसांना ठार मारू शकतो, पण मी जर युद्ध करण्यातच गुंतलो तर महासागराच्या परतीरास कसा पोचू शकेन ? बर युद्धात जय कोणला मिळेल याची शाश्वती नाही. ‘कश्च निःसंशयं कार्यं कुर्यात् प्राज्ञः ससंशयम्’ कोण असा बुद्धिमान असेल की जो संशयरहित कार्यास संशययुक्त बनविण्याची इच्छा करील ? ॥५-३०-३५॥  

                     
  सौ. मनीषा अभ्यंकर

Monday, April 29, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ११)

मांजराएवढा देह धारण करून त्यांनी सूर्यास्त झाल्यावर लंकेत प्रवेश केला. तेव्हा लंकेतील वैभव त्यांच्या दृष्टीस पडले. चारी बाजूंनी ती लंकापुरी रावणाच्या सुरक्षारक्षकांकडून सुरक्षित केलेली होती. त्यामुळे त्यांना ती लंका अजिंक्य भासली. परंतु राम व लक्ष्मण यांच्या पराक्रमाचा विचार केल्यावर मात्र त्यांना लंका जिंकता येईल अशी खात्री वाटली.   

लंकेत प्रवेश करतानाच हनुमानांचा सामना प्रथम लंकेची अधिष्ठात्री देवता लंकिणीशी झाला. रावणाच्या आज्ञेप्रमाणे वागणार्‍या त्या लंकिणीला हनुमानांनी आपण लंका नगरी पहाण्यास आलो आहे व लंकानगरी पाहून मी आलो तसाच परत जाईन असे सांगितले. तरीही लंकिणीने त्यांच्यावर प्रहार करताच हनुमानांनी तिच्यावर उलट प्रहार केला. लंकिणीला ब्रह्मदेवांने सांगितले होते की ‘जेव्हा तुझ्यावर कोणी वानर प्रहार करेल तेव्हा राक्षसांवर विपत्ती आली आहे असे तू समज.’ आता लंकिणीला कळून आले की राक्षसांच्या विनाशाचा काळ जवळ आला आहे. तेव्हा तिने हनुमानांना लंकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली. 

    तेव्हा हनुमानांनी लंकेच्या तटावरून उडी मारून डावा पाय प्रथम टाकून नगरीत प्रवेश केला. कारण शत्रूच्या नगरीत प्रवेश करावयाचा असल्यास डावा पाय पुढे टकावा हे शास्त्रज्ञान हनुमानांस होते. लंका नगरीत या घरावरून त्या घरावर उड्या मारत जात असता हनुमान सूक्ष्म निरीक्षण करत होते. नगराच्या मध्यभागी त्यांना रावणाचे गुप्तहेर दिसून आले. त्यातील काही दीक्षा घेतलेले, काही मस्तक मुंडन केलेले, काही जटाधारी, काही मृगचर्म परिधान केलेले, काही नग्न, काही एकाक्ष असे नानाविध गुप्तहेर त्यांच्या दृष्टीस पडले. धनुष्य, तलवार, शतघ्नी, मुसळ, परिघ, पट्टीश, वज्र, गोफण, पाश अशी नानाविध आयुधे त्यांच्या हातात होती. रावणाच्या अंत:पुराजवळ पहारा देणारे लाखो सैनिक होते. रावणाचे घर श्वेत कमलांनी सुशोभित अशा खंदकांनी वेढलेले होते. त्याच्या चारही बाजूस उंच तटबंदी होती. हजारो निशाचर त्या महालाचे रक्षण करत होते. त्या महालाभोवती हेम व जांबुनद या दोन प्रकारच्या सोन्याची तटबंदी होती. हिरे मोत्यांनी ती तटबंदी सुशोभित केलेली होती. त्या रावणाच्या महालात व सभोवती असलेल्या इतर राक्षसांच्या घरात हनुमानांनी सीतेचा शोध घेतला. प्रहस्त, महापार्श्व, कुंभाकर्ण, महोदर, विरूपाक्ष, विद्युज्जिह्व, विद्युन्माळी, वज्रदंष्ट्र, शुक, सारण, इंद्रजित, जंबुमाळी, सुमाळी अशा अनेक राक्षसांच्या घरात त्यांनी सीतेला शोधले. सीतेचा शोध घेत असता हनुमानांना रावणाचा ऐश्वर्ययुक्त महाल, त्यातील रावणाच्या असंख्य पत्नी, पुष्पक विमान, रावणाच्या महालाचे रक्षण करणार्‍या अक्राळ-विक्राळ राक्षसी त्यांना दिसल्या. तेथे रावणाच्या महालात अतिशय सुंदर स्त्री हनुमानांना दिसली. प्रथम रूप व यौवनाने संपन्न अशा मंदोदरीला पाहून ती स्त्री सीताच असावी असे हनुमानांना वाटले व त्यांना आनंद झाला. पण त्यांनी विचार केला की रामाच्या वियोगाने संतप्त झालेली स्त्री अशा प्रकारे शृंगार, भोजन, मदिरासेवन करणे शक्य नाही. परपुरुषाच्या शय्यागृहात जाणेही शक्य नाही. तेव्हा ही निश्चयाने सीता नाही असा त्यांच्या मनाने त्यांना कौल दिला व त्यांचा सीताशोध पुन्हा सुरु झाला पण सीता मात्र कुठेही दिसत नव्हती.  

    रावणाच्या व इतर राक्षसांच्या महालात असंख्य अस्याव्यस्त पडलेल्या स्त्रिया हनुमानांच्या दृष्टीस पडल्या. परस्त्रियांचे अवलोकन कराणे हे धर्मास अनुसरून नव्हते. तसेच पापी रावणास पाहिल्यामुळेही आपला धर्मलोप झाला की काय असेही हनुमानांना वाटू लागले. परंतु सीतेचा शोध घेत असता त्यांच्या दृष्टीस स्त्रिया पडल्या होत्या. स्त्रियांचे अवलोकन करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांना पाहून हनुमानांच्या चित्तात कोणताही विकार उत्पन्न झाला नाही. शुभ अथवा अशुभ कर्मास प्रेरणा देण्यास मनच कारणीभूत असते. पण हनुमानांचे मन पूर्णत: स्थिर होते. सीतेला स्त्रियांच्याच समुदायामधे शोधणे भाग होते. त्यामुळे परस्त्रीदर्शन अपरिहार्य होते. त्यामुळे आपल्याला परस्त्रीदर्शन धर्माचा लोप करण्यास कारणीभूत होणार नाही अशी त्यांच्या मनाने त्यांना ग्वाही दिली. 

    सीता जिवंत तरी आहे की नाही अशी हनुमानांना भीती वाटू लागली. सीता जिवंतच नसली तर आपले सर्व परिश्रम व्यर्थ ठरतील असे त्यांना वाटू लागले. 

अस्मिन्नेवंगते कार्ये प्राप्तकालं क्षमं च किम् ।
भवेदिति मतं भूयो हनुमान् प्रविचारयन् ॥५-१३-१९ ॥ 

“ज्यावेळी कुठलेही कार्य करणे दुष्कर असते अशा परिस्थितीत या समयास उचित ठरेल असे कशा रीतीने वागावे या संबंधी हनुमान वारंवार विचार करू लागले.” सीतेचे दर्शन न घेता जाणेही त्यांना उचित वाटत नव्हते. कारण मग समुद्रोल्लंघनाचे कष्टही फुकट गेले असते. रिक्त हस्ताने परत गेल्यास सर्व वानरांना व रामांना काय वाटेल अशी चिंता त्यांना वाटू लागली. म्हणून पुन्हा उत्साह धरून त्यांनी सीताशोधास प्रारंभ केला.

   सौ. मनीषा अभ्यंकर

Sunday, April 28, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १०)

   हनुमंतांचा पुन्हा लंकाप्रवास सुरु झाला. जात असतांना वाटेत त्यांना सिंहिका नावाच्या राक्षसीने पाहिले. ती त्यांना त्यांची छाया पकडून ओढू लागली. त्यामुळे हनुमानांची गती अवरुद्ध झाली. नंतर सिंहिका आपले मुख पसरून हनुमानांना खाण्यासाठी धावली. तेव्हा हनुमानांनी आपला देह अत्यंत संकुचित करून तिच्या अक्राळ विक्राळ मुखामधे प्रवेश केला. तिच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांनी त्या राक्षसीचा वध केला. आकाशचारी सर्व प्राणी त्यामुळे आनंदित झाले. 

यस्य त्वेतानि चत्वारि वानरेन्द्र यथा तव । 
धृतिर्दृष्टिर्मतिर्दाक्ष्यं स्वकर्मसु न सीदति ॥ ५-१-२०१॥

ज्या पुरूषाच्या ठिकाणी तुझ्यासारखे धैर्य, प्रसंगावधान, बुद्धि आणि दक्षता (कौशल्य) हे चार गुण असतात, तो आपल्या कार्यात कधीही अयशस्वी होत नाही. असे आकाशचारी प्राणी त्यांना म्हणाले. हनुमानांच्याजवळ हे चारही गुण होते. 

    अखेर हनुमान समुद्राच्या पलिकडील तीरावर पोचले. आकाशामधूनच त्यांनी सर्वत्र दृष्टी टाकली. दक्षिण तटावरील मलय पर्वत, त्यावरील वनराजी, समुद्राला मिळणार्‍या नद्या, लंका नावाचे बेटही पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या विशाल शरीराकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे विशाल शरीर धारण करून लंकेत प्रवेश करणे योग्य होणार नाही. कारण तेथील राक्षसांच्या मनात कुतूहल उत्पन्न होईल व आपला भेद त्यांना कळून येईल. म्हणून त्यांनी आपल्या पर्वताकार शरीराचा संकोच केला व पुन्हा वानररूप रूप धारण केले.  

    दुस्तर अशा सागराचे उल्लंघन करून महाबली हनुमानांनी प्रथम त्रिकुट पर्वताचा आश्रय घेतला. तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले. नंतर ते वृक्षांनी आच्छादित पर्वत व प्रफुल्ल वनराजी यामधून विचरण करू लागले. लंकेत प्रवेश करून त्यांनी लंकेतील संरक्षणव्यवस्था, तेथील घरे, ऐश्वर्य यांचे निरीक्षण केले. पर्वताच्या शिखरावर वसलेली लंका त्यांना आकाशात तरंगत असल्याप्रमाणे दिसत होती. तिचे उत्तरद्वार गगनचुंबी होते. ती लंकानगरी भयानक राक्षसांनी व्याप्त होती. त्यांच्या हातात शूळ पट्टीश वगैरे शस्त्रे होती. ती लंकानगरी पाहिल्यावर हनुमानांच्या मनात विचार आला की ही लंका जी देवांनांही अजिंक्य आहे ती वानरांना जिंकणे शक्यच नाही. साम, दाम, दंड व भेद या उपायांचा येथे काही उपयोग होणार नाही. येथे फक्त अंगद, नील, सुग्रीव व आपण स्वत: हे चारच वानर येथेपर्यंत येऊ शकतात असे त्यांना वाटून गेले. 

    ज्या सीतेसाठी एवढा खटाटोप करायचा ती सीता प्रथम जिवंत आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा प्रथम सीतेचा शोध घेऊन हनुमानांनी नंतर लंका नगरी कशी जिंकता येईल याचा विचार करावा असे ठरवले.    

    म्हणून प्रथम ते सीताशोधाच्या मोहिमेवर निघाले. सीताशोधासाठी काय उपाय योजावा यावर त्यांनी दोन घटका विचार केला. रावणाच्या दृष्टीस न पडता त्यांना सीतेसे दर्शन करावयाचे होते. त्याच बरोबर रामकार्य बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावयाची होती. अयोग्य दूताची निवड केली तर देश व काल यांच्या प्रतिकूल कार्य करणारा हा दूत जवळ जवळ सिद्धीस गेलेली कार्येही नष्ट करतो. स्वत:ला शहाणा मानणारा दूतही अभिमानाने कार्य नष्ट करतो. तेव्हा आपण कसे वागले पाहिजे याचा ते स्वत:च्या मनाशी ऊहापोह करत होते. 

    आकाशमार्गाने प्रवास करत असता त्यांनी अति विशाल रूप धारण केले होते. लंकेत प्रवेश केल्यावर त्यांनी आपले वास्तविक वानररूप धारण केले होते. पण आता सीताशोधासाठी लंकेत फिरतांना हे वानररूपही पण उपयोगी पडणार नव्हते. कारण तेथे अतिशय शूरवीर व बलाढ्य राक्षस होते व त्यांची नजर चुकवून त्यांना सीतेचा शोध घ्यावयाचा होता. वास्तविक रूपात ते तिथे फिरले असते तर ते राक्षसांच्या दृष्टीस पडले असते व कदाचित राक्षसांनी त्यांना ठारही मारले असते. म्हणून त्यांनी लंकेत प्रवेश करतांना अतिशय छोटे रूप घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्येक घरात घुसून सीतेचा शोध घेण्याचा विचार केला. 

अनेन रूपेण मया न शक्या रक्षसां पुरी । 
प्रवेष्टुं राक्षसैर्गुप्ता क्रूरैर्बलसमन्वितैः ॥ ५-२-३३॥ 

हनुमतांनी विचार केला की, “मी या रूपाने या राक्षसांच्या नगरीत प्रवेश करू शकत नाही कारण अनेक क्रूर आणि बलाढ्य राक्षस हिचे रक्षण करीत आहेत.” म्हणून त्यांनी समयोचित कार्य सिद्ध करण्यासाठी सहज डोळ्यांना दिसून येणार नाही अशा रूपाचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी लंकेत प्रवेश करावयाचे ठरवले.

सौ. मनीषा अभ्यंकर

Saturday, April 27, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ९)


    समुद्रावरून उडत जात असता समुद्राने विचार केला की मला या वीरवर हनुमानांची मदत केलीच पाहिजे. कारण इक्ष्वाकुकुलाधिपति महाराज सगर यांनी मला वाढविले आहे. आणि या समयी हे हनुमान इक्ष्वाकुवंशीय राजा रामचंद्रास मदत करीत आहेत; या करिता हे थकून जाता उपयोगी नाही. तेव्हा हनुमानांना थोडी विश्रांती घेता यावी म्हणून आपल्या उदकाने आच्छादित होऊन राहिलेल्या सुवर्णमय पर्वतश्रेष्ठ मैनाकाला समुद्र म्हणाला की - “हे पर्वता ! बाजूला, उर्ध्वभागी आणि अधोभागी सर्वबाजूस वाढण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. म्हणून हे गिरिश्रेष्ठा ! मी तुला आज्ञा देत आहे की तू वर ये. म्हणजे उड्डाण करण्यात प्रवीण असे हे श्रेष्ठ कपि हनुमान तुझ्यावर काही काळ विश्रांती घेतील. विश्रांती घेतल्यानंतर हनुमान ऊर्वरीत मार्ग सुखाने पार करून जातील.” समुद्राचे म्हणणे मैनाक पर्वताने मान्य केले व तो समुद्रातून वर आला. त्याला पाहून हनुमानांना वाटले की हे एक विघ्नच उपस्थित झाले. म्हणून त्यांनी आपल्या छातीचा तडाखा देऊन मैनाक पर्वताला खाली पाडले. तेव्हा मैनाकाला त्यांच्या महान वेगाचा अनुभव आला व हे आपले कार्य नक्कीच पार पाडतील असा विश्वास त्यांना वाटला. मनुष्यरूप धारण करून मैनाक त्यांना म्हणाला, “हे वानरवीरा, आपण महान कार्य आरंभले आहे तेव्हा माझ्या या शिखरावर काही काळ विश्रांती घेऊन उर्वरित मार्ग अवलंबावा.” तेव्हा हनुमानांनी त्याला केवळ स्पर्श केला व पुन्हा आकाशमार्गाचा अवलंब केला. कारण मध्यंतरी कोठेही न थांबता समुद्र ओलांडायची त्यांनी वानरांजवळ प्रतिज्ञा केली होती. येथे हनुमानांची रामकार्याबद्दलची निष्ठाच दिसून येते. 

    देवता, गंधर्व, सिद्ध, महर्षी यांना हनुमानाच्या बल व पराक्रमाची परीक्षा घ्यावयाची होती. म्हणून ते नागमाता सुरसेला म्हणाले, “हा वायुपुत्र हनुमान समुद्रावरून जात आहे. त्याच्या मार्गात तू दोन घटका साठी विघ्न उत्पन्न कर.” तेव्हा सुरसेने समुद्रामधे भयंकर राक्षसीचे रूप धारण केले. अत्यंत भयानक अशी ती राक्षसी आकाशमार्गाने जाणार्‍या हनुमानांचा मार्ग अडवून म्हणाली, “हे कपिश्रेष्ठा ! देवेश्वरांनी तुला माझे भक्ष्य म्हणून अर्पण केले आहे, म्हणून मी तुला भक्षण करीन. तरी तू या माझ्या मुखामध्ये प्रवेश कर.” असे म्हणून ताबडतोब आपले विशाल मुख पसरून ती हनुमानासमोर उभी राहिली. तेव्हा हनुमानांनी तिला रामकार्य करण्याची तातडी असल्याचे सांगितले व आपले काम संपवून पुन्हा तिच्या पुढ्यात हजर होऊ असेही तिला वचन दिले. आपण रामांचा दूत बनून जात असून सुरसाही रामांच्याच राज्यात रहात असल्यामुळे तिनेही रामांना वास्तविक मदत केली पाहिजे असेही हनुमानांनी तिला सांगितले. पण राक्षसी ऐकेना. ती मुख पसरून हनुमानांसमोर उभी राहिली. तेव्हा हनुमानांनी आपले शरीर वाढवावयास सुरवात केली. हनुमानांनी अत्यंत विशाल रूप धारण केल्यावर राक्षसीनेही आपले मुख मोठे केले. त्याबरोबर हनुमानांनी अंगुष्ठमात्र रूप धारण केले व तिच्या मुखात प्रवेश करून लगेच बाहेर आले. हनुमानांची बुद्धिमत्ता पाहून सुरसा प्रसन्न झाली व तिने त्यांना त्यांच्या कार्यात यशासाठी आशीर्वाद दिला.
    हनुमंतांचा पुन्हा लंकाप्रवास सुरु झाला. जात असतांना वाटेत त्यांना सिंहिका नावाच्या राक्षसीने पाहिले. ती त्यांना त्यांची छाया पकडून ओढू लागली. त्यामुळे हनुमानांची गती अवरुद्ध झाली. नंतर सिंहिका आपले मुख पसरून हनुमानांना खाण्यासाठी धावली. तेव्हा हनुमानांनी आपला देह अत्यंत संकुचित करून तिच्या अक्राळ विक्राळ मुखामधे प्रवेश केला. तिच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांनी त्या राक्षसीचा वध केला. आकाशचारी सर्व प्राणी त्यामुळे आनंदित झाले. 

यस्य त्वेतानि चत्वारि वानरेन्द्र यथा तव । 
धृतिर्दृष्टिर्मतिर्दाक्ष्यं स्वकर्मसु न सीदति ॥ ५-१-२०१॥ 

ज्या पुरूषाच्या ठिकाणी तुझ्यासारखे धैर्य, प्रसंगावधान, बुद्धि आणि दक्षता (कौशल्य) हे चार गुण असतात, तो आपल्या कार्यात कधीही अयशस्वी होत नाही. असे आकाशचारी प्राणी त्यांना म्हणाले. हनुमानांच्याजवळ हे चारही गुण होते. 

    अखेर हनुमान समुद्राच्या पलिकडील तीरावर पोचले. आकाशामधूनच त्यांनी सर्वत्र दृष्टी टाकली. दक्षिण तटावरील मलय पर्वत, त्यावरील वनराजी, समुद्राला मिळणार्‍या नद्या, लंका नावाचे बेटही पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या विशाल शरीराकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे विशाल शरीर धारण करून लंकेत प्रवेश करणे योग्य होणार नाही. कारण तेथील राक्षसांच्या मनात कुतूहल उत्पन्न होईल व आपला भेद त्यांना कळून येईल. म्हणून त्यांनी आपल्या पर्वताकार शरीराचा संकोच केला व पुन्हा वानररूप रूप धारण केले. 

    दुस्तर अशा सागराचे उल्लंघन करून महाबली हनुमानांनी प्रथम त्रिकुट पर्वताचा आश्रय घेतला. तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले. नंतर ते वृक्षांनी आच्छादित पर्वत व प्रफुल्ल वनराजी यामधून विचरण करू लागले. लंकेत प्रवेश करून त्यांनी लंकेतील संरक्षणव्यवस्था, तेथील घरे, ऐश्वर्य यांचे निरीक्षण केले. पर्वताच्या शिखरावर वसलेली लंका त्यांना आकाशात तरंगत असल्याप्रमाणे दिसत होती. तिचे उत्तरद्वार गगनचुंबी होते. ती लंकानगरी भयानक राक्षसांनी व्याप्त होती. त्यांच्या हातात शूळ पट्टीश वगैरे शस्त्रे होती. ती लंकानगरी पाहिल्यावर हनुमानांच्या मनात विचार आला की ही लंका जी देवांनांही अजिंक्य आहे ती वानरांना जिंकणे शक्यच नाही. साम, दाम, दंड व भेद या उपायांचा येथे काही उपयोग होणार नाही. येथे फक्त अंगद, नील, सुग्रीव व आपण स्वत: हे चारच वानर येथेपर्यंत येऊ शकतात असे त्यांना वाटून गेले. 

    ज्या सीतेसाठी एवढा खटाटोप करायचा ती सीता प्रथम जिवंत आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा प्रथम सीतेचा शोध घेऊन हनुमानांनी नंतर लंका नगरी कशी जिंकता येईल याचा विचार करावा असे ठरवले. 

    म्हणून प्रथम ते सीताशोधाच्या मोहिमेवर निघाले. सीताशोधासाठी काय उपाय योजावा यावर त्यांनी दोन घटका विचार केला. रावणाच्या दृष्टीस न पडता त्यांना सीतेसे दर्शन करावयाचे होते. त्याच बरोबर रामकार्य बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावयाची होती. अयोग्य दूताची निवड केली तर देश व काल यांच्या प्रतिकूल कार्य करणारा हा दूत जवळ जवळ सिद्धीस गेलेली कार्येही नष्ट करतो. स्वत:ला शहाणा मानणारा दूतही अभिमानाने कार्य नष्ट करतो. तेव्हा आपण कसे वागले पाहिजे याचा ते स्वत:च्या मनाशी ऊहापोह करत होते. 

    आकाशमार्गाने प्रवास करत असता त्यांनी अति विशाल रूप धारण केले होते. लंकेत प्रवेश केल्यावर त्यांनी आपले वास्तविक वानररूप धारण केले होते. पण आता सीताशोधासाठी लंकेत फिरतांना हे वानररूपही पण उपयोगी पडणार नव्हते. कारण तेथे अतिशय शूरवीर व बलाढ्य राक्षस होते व त्यांची नजर चुकवून त्यांना सीतेचा शोध घ्यावयाचा होता. वास्तविक रूपात ते तिथे फिरले असते तर ते राक्षसांच्या दृष्टीस पडले असते व कदाचित राक्षसांनी त्यांना ठारही मारले असते. म्हणून त्यांनी लंकेत प्रवेश करतांना अतिशय छोटे रूप घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्येक घरात घुसून सीतेचा शोध घेण्याचा विचार केला. 

अनेन रूपेण मया न शक्या रक्षसां पुरी । 
प्रवेष्टुं राक्षसैर्गुप्ता क्रूरैर्बलसमन्वितैः ॥ ५-२-३३॥ 

हनुमतांनी विचार केला की, “मी या रूपाने या राक्षसांच्या नगरीत प्रवेश करू शकत नाही कारण अनेक क्रूर आणि बलाढ्य राक्षस हिचे रक्षण करीत आहेत.” म्हणून त्यांनी समयोचित कार्य सिद्ध करण्यासाठी सहज डोळ्यांना दिसून येणार नाही अशा रूपाचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी लंकेत प्रवेश करावयाचे ठरवले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Friday, April 26, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ८)

जांबवानाने हनुमानांना प्रेरणा दिल्यावर हनुमानांना आत्मतेजाची खात्री पटली. आपल्या महान वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला व त्यांनी आपले विराट रूप उत्पन्न केले. ते वानरांना म्हणाले, “अत्यंत शीघ्र वेगाने जाणार्‍या त्या शीघ्रगामी महात्मा वायूंचा मी औरस पुत्र आहे आणि उड्डाण करण्यात त्यांच्या समान आहे. कित्येक हजार योजनापर्यंत पसरलेल्या मेरूगिरीची मी विश्राम न घेता हजारो वेळा परिक्रमा करू शकतो. आपल्या भुजांच्या वेगाने समुद्राला विक्षुब्ध करून त्याच्या जलाने मी पर्वत, नद्या आणि जलाशयांसहित संपूर्ण जगताला आप्लावित करू शथकतो. वरूणाचे निवासस्थान असलेला हा महासागर माझ्या मांड्यांच्या आणि पोटर्‍यांच्या वेगाने विक्षुब्ध होऊन जाईल आणि याच्यात राहाणारे मोठ मोठे ग्राह वर येतील. महान् वेगाने महासागरास ओलांडून मी अवश्य त्याच्या पार पोहोचून जाईन. ’कपिवरांनो ! तुम्ही पहाल की मी महागिरि मेरूसमान विशाल देह धारण करून स्वर्गाला झाकून टाकत आणि आकाशाला गिळून टाकीत असल्याप्रमाणे पुढे जाईन. मेघांना छिन्नभिन्न करून टाकीन, पर्वतांना हलवून सोडीन आणि एकचित्त होऊन उड्डाण करून पुढे गेल्यावर समुद्रालाही सुकवून टाकीन”. असे म्हणून कपिवर हनुमान  महेंद्र पर्वतावर चढून गेले. 

    सर्व वानरांनी हातपाय गाळले असता  एकट्या हनुमानांनी समुद्रोल्लंघनाचे धाडस केले. 

    देवजातिविशेष ज्या आकाशमार्गाने संचार करीत असतात तो मार्ग त्यांनी निवडला. प्रथम इंद्र, सूर्य, वायु, ब्रह्मदेव यांना नमस्कार केला. पूर्वाभिमुख होऊन त्यांनी आपला पिता वायुदेवाला नमस्कार केला व महामेघाप्रमाणे गर्जना केली. दूरचा मार्ग अवलोकन करण्यासाठी आकाशाकडे पहात पहात हृदयात प्राणवायूचा निरोध केला आणि त्यांनी आकाशात उड्डाण केले. जातांना ते सर्व वानरांना म्हणाले की, ‘मी रामांनी सोडलेल्या बाणाप्रमाणे वायुवेगाने लंकेमधे जाईन व वैदेहीचा शोध घेईन.” अशा जबर आत्मविश्वासानेच हनुमानांनी कार्यास आरंभ केला होता.

Thursday, April 25, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ७)

हनुमानांची जन्मकथा 

    पुञ्जिकस्थला नावाची अप्सरा एकदा शापवशात् कपियोनीमध्ये वानरराज कुंजराची कन्या म्हणून अवतीर्ण झाली. ती इच्छे प्रमाणे रूप धारण करणारी होती. या भूतलावर तिच्या रूपाची बरोबरी करणारी दुसरी कुणीही स्त्री नव्हती. ती तीन्ही लोकामध्ये विख्यात होती. तिचे नाव अञ्जना होते. वानरराज केसरीशी तिचा विवाह झाला. 

    एक दिवस रूप आणि यौवनाने सुशोभित असणारी ती अञ्जना मानवी स्त्रीचे शरीर धारण करून पर्वतशिखरावर विचरत होती. तिने फुलांची आभूषणे धारण केली होती. ती लाल काठाचे पीत वस्त्र नेसली होती. पर्वताच्या शिखरावर उभी असतांना वायुदेवाने तिचे ते वस्त्र हळूच हरण केले. 

    तिचे सुंदर रूप पाहून पवनदेव कामाने मोहित झाले. त्यांच्या संपूर्ण अंगात कामभावाचा आवेश उत्पन्न झाला. मन अञ्जनेमध्येच लागले. त्यांनी त्या अनिंद्य सुंदरीला आपल्या दोन्ही विशाल भुजामध्ये धरून हृदयाशी धरले. अञ्जना उत्तम व्रताचे पालन करणारी सती नारी होती. म्हणून त्या अवस्थेत सांपडल्याने ती घाबरून गेली आणि म्हणाली - ‘कोण माझ्या या पतिव्रत्याचा नाश करू इच्छित आहे ?’ अञ्जनाचे बोलणे ऐकून पवनदेवाने उत्तर दिले- ’सुश्रोणि ! मी तुमच्या पातिव्रत्याचा नाश करीत नाही. म्हणून तुमच्या मनांतील हे भय दूर झाले पाहिजे. यशस्विनी ! मी अव्यक्त रूपाने तुझे आलिंगन करून मानसिक संकल्पाच्या द्वारा तुझ्याशी समागम केला आहे. यामुळे तुला बल-पराक्रमाने संपन्न आणि बुद्धिमान् पुत्र प्राप्त होईल. तो महान् धैर्यवान्, महातेजस्वी, महाबली, महापराक्रमी तसेच ओलांडून जाणे आणि उड्डाण करणे, उडी मारणे यात माझ्यासमान होईल.’ नंतर तिने एका पुत्राला एका गुहेत जन्म दिला. बाल्यावस्थेमध्ये एका विशाल वनामध्ये एक दिवस उदित होत असलेल्या सूर्याला पाहून त्या बालकाला असे वाटले की हे देखील कुठले तरी फळ आहे, म्हणून ते घेण्यासाठी त्याने एकाएकी आकाशात झेप घेतली. तीनशे योजने उंच गेल्यावर सूर्याच्या तेजाने आक्रान्त होऊनही त्या बालकाच्या मनात खेद वा चिंता उत्पन्न झाली नाही. अंतरिक्षात जाऊन जेव्हा तात्काळच तो बालक जेव्हा सूर्याजवळ पोहोचला, तेव्हा इंद्रांनी कुपित होऊन त्याच्यावर तेजाने प्रकाशित वज्राने प्रहार केला. त्यावेळी उदयगिरिच्या शिखरावर त्याच्या हनुवटीचा डावा भाग वज्राच्या प्रहाराने खण्डित झाला. तेव्हा पासून त्या बालकाचे नाम हनुमान् पडले. त्याच्यावर प्रहार केला गेला आहे हे पाहून गंधवाहक वायुदेवांना फार क्रोध आला. त्या प्रभञ्जन देवांनी तिन्ही लोकात प्रवाहित होण्याचे थांबवले. यामुळे संपूर्ण देवता घाबरून गेल्या. कारण वायु अवरूद्ध होण्यामुळे तिन्ही लोकात खळबळ उडाली. त्या समयी समस्त लोकपाल कुपित झालेल्या वायुदेवांची मनधरणी करू लागले. तेव्हा पवनदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी हनुमानांना असा वर दिला की हनुमान समरांगणामध्ये कुठल्याही अस्त्र-शस्त्र द्वारा मारले जाऊ शकणार नाहीत. वज्राच्या प्रहारानेही हनुमान पीडित झाले नाहीत हे पाहून सहस्त्र नेत्रधारी इंद्राला प्रसन्नता वाटली आणि त्यांनी हनुमानांना हा उत्तम वर दिला की, ‘मृत्यु तुमच्या इच्छेच्या अधीन राहील- तुम्ही जेव्हा इच्छा कराल तेव्हाच तुम्हाला मृत्यु येईल, अन्यथा नाही.’ या प्रकारे हनुमान केसरीचे क्षेत्रज पुत्र आहेत व वायुदेवाचे औरसपुत्र. त्यामुळे हनुमानांचा पराक्रम शत्रुंसाठी भयंकर आहे. तेजाच्या दृष्टिनेही हनुमान वायुसमान आहेत. हनुमान पवनाचे पुत्र असल्यामुळे उड्डाण करण्यातही त्यांच्या सारखेच आहेत.

सौ. मनीषा अभ्यंकर

Tuesday, April 23, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ६)

हनुमान काही वानरसेना घेऊन दक्षिणदिशेला निघाले. तेथे सर्वांनी पर्वतात, गुहांत सीतेचा शोध घेतला. पण त्यांना सीतेचा पत्ता लागला नाही. शोध घेत थकलेले वानर ऋक्षबिल नामक गुहेत शिरले. त्या गुहेत त्यांना सीता काही दिसली नाही. पण ती गुहा फळे, मध यांनी समृद्ध होती. त्या गुहेत स्वयंप्रभा नावाची तापसी रहात होती. तिच्या परवानगीने सर्व वानरांनी तेथील फळा-मुळांचा आस्वाद घेतला. नंतर आपली सर्व कथा सांगून हनुमानांनी तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली व म्हटले की, “देवी, आम्ही भुकेने मरत होतो. तेव्हा आपण आमचे आतिथ्य करून आमचे प्राण वाचवलेत. या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही आपली काय सेवा करु ?” या बोलण्यावरून हनुमानांच्या स्वभावातील मार्दव व कृतज्ञता दिसून येते. 

    सुग्रीवाने सीताशोधासाठी सर्व वानरांना एक महिन्याची मुदत दिली होती. तेवढी मुदत टळून गेली तरी हनुमानादी वानरांना सीतेचा शोध लागला नाही. आपण सीतेचा शोध न करताच गेलो तर सुग्रीव आपल्याला शिक्षा करेल अशी भीती सर्व वानरांना वाटू लागली. अंगदालाही वाटू लागले की श्रीरामांनी सांगितले असल्यामुळे सुग्रीवाने आपल्याला युवराजपद दिले आहे. पण आपल्या वडिलांना ठार मारणारा सुग्रीव नक्कीच आपल्या वधासाठी निमित्त शोधत असेल. अशा परिस्थितीत त्याने सोपवलेले काम पूर्ण न करताच जर आपण परत गेलो तर आपला कांटा काढण्यासाठी त्याला आयतेच निमित्त मिळेल. तार वगैरे वानरांनाही सुग्रीवाचे म्हणणे पटले व तार नावाच्या वानराने तर त्याला पुन्हा स्वयंप्रभेच्या गुहेतच रहाण्याचा सल्ला दिला.

    हनुमानांनी हे सर्व ऐकून विचार केला की काही वानर अंगदाला सामिल झाले आहेत. कदाचित अंगदाचे सामर्थ्य वाढून तो सुग्रीवाला भारी पडेल. तेव्हा सर्वशास्त्रविशारद अशा हनुमानांनी तार वगैरे वानरांच्यापासून अंगदाला फोडण्याचा प्रयत्न केला. ते अंगदाला म्हणाले, “तारानंदन ! तुम्ही युद्धात आपल्या पित्यासमानच अत्यंत शक्तिशाली आहात हे निश्चित रूपाने सर्वांना विदित आहे. ज्याप्रमाणे तुझे पिता वानरांचे राज्य सांभाळत होते, त्या प्रकारे तुम्हीही त्याला दृढतापूर्वक धारण करण्यास समर्थ अहात. परंतु हरिपुंगव ! हे कपिलोक सदाच चञ्चलचित्त असतात. आपल्या स्त्री-पुत्रांपासून अलग राहून तुमच्या आज्ञेचे पालन करणे ह्यांच्यासाठी सहन होणार नाही. मी तुमच्या समक्षच सांगतो की ह्या वानरांतील कोणीही वानर सुग्रीवाशी विरोध करून तुमच्या प्रति अनुरक्त होऊ शकत नाही. जसे हे जांबवान्, नील आणि महाकपि सुहोत्र आहेत त्याच प्रकारे मीही आहे. ‘मी, तसेच हे सर्व लोक साम, दाम आदि उपायांच्या द्वारे सुग्रीवांपासून अलग केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही दण्डद्वारा आम्हा सर्वांना वानरराजा पासून दूर करू शकाल हेही संभव नाही. दुर्बलाशी विरोध करून बलवान् पुरुष गुपचुप बसून राहील - हे तर संभव आहे. परंतु कोणा बलवानाशी वैर बांधून कुणी दुर्बल पुरुष कोठेही सुखाने राहू शकत नाही;  म्हणून आपली सुरक्षा इच्छिणार्‍या दुर्बल पुरुषाने बलवानाबरोबर कधी विग्रह करता कामा नये - हे नीतिज्ञ पुरुषांचे वचन आहे. तसेच स्वयंप्रभेची गुहा राम व लक्ष्मण यांच्यापासून लपून रहाणारी नाही. राम व लक्ष्मण त्या गुहेला आपल्या बाणांनी सहज विदीर्ण करू शकतील. आमच्या बरोबर येऊन जेव्हा तुम्ही विनीत पुरुषाप्रमाणे त्यांच्या सेवेत उपस्थित व्हाल तेव्हा सुग्रीव क्रमशः आपल्यानंतर तुम्हांलाच राज्यावर बसवतील.  तेव्हा तू पुन्हा सुग्रीवाच्या सेवेत उपस्थित रहा.” असा हनुमानांनी अंगदाला सल्ला दिला. अंगद जर पुन्हा सुग्रीवाच्या सेवेत उपस्थित होईल तर सुग्रीव आपल्यानंतर अंगदालाच गादीवर बसवतील याची हनुमानांनी अंगदाला ग्वाही दिली. 

दक्षिण दिशेला सुग्रीवाने अंगदाच्या अधिपत्याखाली वानरसेना पाठवली होती. परंतु वेळप्रसंगी आपल्या सेनानायकालाही त्यांनी हिताचा सल्ला दिला व आपल्या राजाचे अहित होणार नाही याचीही खबरदारी घेतली. मंत्र्याने नेहेमी असेच दूरदृष्टीने वागले पाहिजे.  

सीतेचा शोध लागत नाही व सुग्रीवाने दिलेली मुदतही संपून गेली. अशा परिस्थितीत आपण सीतेचा शोध न लावताच परत गेलो तर सुग्रीव आपल्याला ठार मारेल अशा विचाराने सर्व वानरांनी प्रायोपवेशन करण्याचे ठरवले. नंतर संपातीकडून त्यांना सीता लंकेत असल्याची बातमी कळली. पण समुद्र ओलांडून लंकेत कसे पोचावे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. तेव्हा जांबवानांनी हनुमानांना त्यांच्या जन्मकथेचे व त्यांच्या सामर्थ्याचे स्मरण करून दिले व त्यांना समुद्र पार करून लंकेत जाण्याची विनंती केली.  

सौ. मनीषा अभ्यंकर

Monday, April 22, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ५)


    सुग्रीव सीताकार्याच्या शोधात उशीर लावत आहे हे पाहून लक्ष्मण क्रुद्ध होऊन आला आहे, हे ऐकताच सुग्रीव घाबरला. आपण रामांचा कोणताही अपराध केलेला नसतांना अथवा त्यांना कोणातीही दुर्वचने बोललो नसतांना राम आपल्यावर क्रुद्ध झालेले आहेत हे ऐकून त्याला चिंता वाटू लागली. मैत्री करणे सोपे आहे पण ती निभावणे कठिण आहे. कारण थोड्याशा कारणानेही मैत्रीत अंतर पडू शकते. भीतीमुळे आपल्यामधे महात्मा रामांनी केलेल्या उपकारांची भरपाई करण्य़ाची शक्ती नाही असे त्याला वाटू लागले. तेव्हा सर्व मंत्र्यांच्या समक्ष युक्तीचा आधार घेऊन हनुमान बोलू लागले. वाल्मीकींनी ‘उवाच स्वेन तर्केण’ असे म्हटले आहे. त्यांनी युक्तीने युक्त असे वाक्य बोलून प्रथम सुग्रीवाच्या मनातील भीती घालवली. हनुमान म्हणाले, “आपण मित्राने केलेला उपकार विसरलेला नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. कारण सज्जनांचा हा स्वभावच असतो. श्रीराम आपल्यावर कुपित झालेले नाहीत. श्रीरामांनी शोभा-संपत्तिची वृद्धि करणार्‍या आपला भाऊ लक्ष्मण यांस जे आपल्यापाशी पाठवले आहे त्यास सर्वथा आपल्या बद्दलचे प्रेम कारण आहे. आपण समयज्ञ अहात. तरीही आपण सीतेचा शोध करण्यासाठी जो समय निश्चित केला होता, त्याचा आपल्याला सध्या प्रमादात पडल्यामुळे विसर पडला आहे. पहा बरे, वर्षा ऋतु संपून शरद ऋतु सुरु झाला आहे. वानरराज ! राजांसाठी विजय यात्रेची तयारी करण्याचा समय आलेला आहे; परंतु आपल्याला तर काही पत्ताही नाही. यावरून स्पष्ट प्रतीत होत आहे की आपण प्रमादात पडला आहात, म्हणून लक्ष्मण येथे आले आहेत. महात्मा राघवांच्या पत्‍नीचे अपहरण झालेले आहे म्हणून ते फार दुःखी आहेत. म्हणून जर लक्ष्मणांच्या मुखाने त्यांचे काही कठोर वचन ऐकावे लागले तरी आपण ते गुपचुप सहन करावयास पाहिजे. आपल्याकडून अपराध झाला आहे. म्हणून हात जोडून लक्ष्मणांना प्रसन्न करण्याशिवाय आपल्यासाठी दुसरे आणखी काही उचित कर्तव्य मला दिसत नाही.” (४-३२-१० ते १८) हनुमानांनी स्पष्ट शब्दात सुग्रीवाकडून घडलेल्या अपराधाची त्याला जाणीव करून दिली व त्यासाठी लक्ष्मणाची कठोर वचने ऐकून घ्यायची सुग्रीवाच्या मनाची तयारी केली. मंत्र्यांनी राजाला हितकारी गोष्ट सांगितली पाहिजे हे लक्षात घेऊन हनुमानांनी सुग्रीवाची कानउघडणी केली आहे. हनुमान म्हणाले, “भगवान् राघव जर क्रोध करून हातात धनुष्य घेतील तर देवता, असुर, गंधर्वासहित संपूर्ण जगतास आपल्या वश करू शकतात. राजन ! यासाठी आपण पुत्र आणि मित्रांसह मस्तक नमवून त्यांना प्रणाम करावा आणि आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहावे. ज्याप्रमाणे पत्‍नी आपल्या पतीच्या स्वाधीन राहाते त्याप्रकारे आपण सदा श्रीरामांच्या अधीन राहावे. ’वानरराज ! राम आणि रामानुज यांच्या आदेशाची आपण मनानेही उपेक्षा करता कामा नये. देवराज इंद्राप्रमाणे तेजस्वी लक्ष्मणासहित श्रीराघवांच्या अलौकिक बळाचे ज्ञान तर आपल्या मनाला आहेच.’ ॥४-३२-१८ ते २२॥ 

    सुग्रीवानेही हनुमानाचे वचन मानले. रामांची महत्ता सांगून आपल्यावर श्रीरामांनी केलेल्या उपकाराचा पुनरुच्चार केला त्याने लक्ष्मणाची क्षमा मागितली व त्याने त्याला प्रसन्न करून घेतले. हनुमानांच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मणाजवळ क्षमायाचना करून सुग्रीवाने सर्व वानरसैन्याला हजर होण्य़ास सांगितले व त्या सैन्याची चार गटात विभागणी करून त्याला चारही दिशांना पाठवले. रावण सीतेला दक्षिण दिशेला घेऊन गेला होता. त्यामुळे दक्षिण दिशेला त्याने हनुमानाची योजना केली. कारण हनुमानच कार्य सिद्धीस नेईल असा त्याला भरंवसा वाटत होता. कारण पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, देवलोक, किंवा पाणी या ठिकाणी हनुमानांच्या गतीला विरोध नाही हे त्याला ठाऊक होते. असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, देवता, समुद्र तसेच पर्वतांसहित संपूर्ण लोकांचे हनुमानांना ज्ञान होते. सर्वत्र अबाधित गति, वेग, तेज आणि उत्साह - हे सर्व सद्‌गुण त्यांच्यात होते व ते आपल्या पित्याप्रमाणे महापराक्रमी होते. या भूमंडलात त्यांची बरोबरी करू शकणारा कोणीही वीर नव्हता. बल, बुद्धी, पराक्रम व देशकालाचे ज्ञान त्यांच्या ठिकाणी एकवटले होते. तसेच त्यांचे वर्तन नीतीचे होते. त्यांच्या तेजाची बरोबरी करू शकणारा कोणीही वीर नव्हता. त्यामुळे हनुमानच सीताशोधाच्या कार्यात यश मिळवील असा भरंवसा रामांनाही वाटत होता. हनुमान रामांना प्रणाम करून रामांनी दिलेली अंगठी घेऊन कामगिरीवर निघाले. रामांनीही त्यांना विशुद्ध मनाने निरोप दिला व आपण त्यांच्या पराक्रमावर विसंबून आहोत असे पुन्हा पुन्हा सांगितले.

                      
 सौ. मनीषा अभ्यंकर

Sunday, April 21, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग ४)

    किष्किंधेचे राज्य प्राप्त झाल्यावर लगेचच पावसाळा सुरु झाला असल्यामुळे सीतेचा शोध घेण्याच्या कामात चार महिन्यांचा विलंब होणार होता. तोपर्यंत थांबणे भागच होते. पण या चार महिन्यात सुग्रीव उपभोगांमधे मग्न झाला होता. त्याने सर्व राज्यकारभार आपल्या मंत्र्यांवर सोपवला होता. त्यावेळी हनुमानांनी सुग्रीवाला मित्रकार्याची आठवण करून दिली. हनुमानांचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात - 

    निश्चितार्थोऽर्थतत्त्वज्ञः कालधर्मविशेषवित् ॥४-२९-६॥
    प्रसाद्य वाक्यैविविधैः हेतुमद्‌भिर्मनोरमैः ।
    वाक्यविद् वाक्यतत्त्वज्ञं हरीशं मारुतात्मजः ॥४-२९- ७॥
    हितं तथ्यं च पथ्यं च सामधर्मार्थनीतिमत् ।
    प्रणयप्रीतिसंयुक्तं विश्वासकृतनिश्चयम् ॥४-२९-८॥
    हरीश्वरमुपागम्य हनुमान् वाक्यमब्रवीत् ॥४-२९-९॥ 

    “पवनकुमार हनुमान् शास्त्राच्या निश्चित सिद्धांताला जाणणारे होते. काय करावयास पाहिजे आणि काय नाही या सर्व गोष्टींचे त्यांना यथार्थ ज्ञान होते. कुठल्या समयी कुठल्या विशेष धर्माचे पालन केले पाहिजे हेही ते ठीक-ठीक जाणत होते. हनुमान् वानरराज सुग्रीवांजवळ गेले आणि त्यांना युक्तियुक्त विविध आणि मनोरम वचनांच्या द्वारा प्रसन्न केले. वाक्यतत्त्वज्ञ असणार्‍या हनुमानांनी त्या सुग्रीवाला हितकर, सत्य, लाभदायक, साम, धर्म आणि अर्थनीतिने युक्त शास्त्रविश्वासी पुरुषाच्या सदृढ निश्चयाने संपन्न तसेच प्रेम आणि प्रसन्नतायुक्त वचन बोलले. हनुमान सुग्रीवाला म्हणतात, “राजन् ! आपण राज्य आणि यश प्राप्त केले आहे तसेच कुलपरंपरेने आलेल्या लक्ष्मीलाही वाढविले आहे; परंतु आता मित्राचे कार्य करणे शेष राहिले आहे. ते आपणाला या समयी पूर्ण केले पाहिजे. जो राजा ‘प्रत्युपकार केव्हा केला पाहिजे’ ही गोष्ट जाणून मित्रांच्या प्रति सदा साधुतापूर्ण आचरण करतो, त्याच्या राज्य, यश आणि प्रतापाची वृद्धि होते.” मित्रकर्तव्याची त्यांनी सुग्रीवाला आठवण तर करून दिलीच पण त्याचबरोबर राजकर्तव्याचीही त्यांनी जाणीव करून दिली. हनुमान म्हणतात, “पृथ्वीनाथ ! ज्या राजाचा कोश, दण्ड, सेना, मित्र आणि स्वतःचे शरीर - ही सर्वच्या सर्व समान रूपाने त्याच्या वश राहातात, तो विशाल राज्याचे पालन करतो आणि त्या राज्याचा उपभोग घेतो. आपण सदाचाराने संपन्न आणि नित्य सनातन धर्माच्या मार्गावर स्थित आहात. मित्राच्या कार्याला सफल बनविण्यासाठी जी प्रतिज्ञा केली आहे, ती यथोचित रूपाने पूर्ण करावी. जो आपली सर्व कार्ये सोडून मित्राचे कार्य सिद्ध करण्यासाठी विशेष उत्साह दाखवत नाही त्याला अनर्थाचे भागी व्हावे लागते. कार्य साधण्याचा उपयुक्त अवसर निघून गेल्यावर जो मित्राच्या कार्याच्या मागे लागतो, तो मोठ्यात मोठी कार्ये सिद्ध करूनही मित्राचे प्रयोजन सिद्ध करणारा मानला जात नाही. शत्रुदमना ! भगवान् राघव आपले परम सुहृद आहेत. त्यांच्या या कार्याचा समय निघून जात आहे. म्हणून वैदेही सीतेचा शोध घेण्यास आरंभ केला पाहिजे. राजन् ! परम बुद्धिमान् श्रीराम समयाचे ज्ञान राखतात आणि त्यांना आपल्या कार्याच्या सिद्धिसाठी घाई झालेली आहे, तरीही ते आपल्या अधीन होऊन राहिले आहेत. संकोचवश, ते ‘माझ्या कार्याचा समय निघून चालला आहे’ असे आपल्याला सांगत नाहीत. वानरराज ! भगवान् राघव दीर्घकाळपर्यंत मैत्री निभावणारे आहेत. ते आपल्या समृद्धिशाली कुलाच्या अभ्युदयाचे हेतु आहेत. त्यांचा प्रभाव अतुलनीय आहे. गुणांमधे बरोबरी करण्यात कोणीही त्यांच्या तोडीचे नाही. आता आपण त्यांचे कार्य सिद्ध करावे, कारण त्यांनी आपले काम आधीच सिद्ध केलेले आहे. आपण प्रधान प्रधान वानरांना या कार्यासाठी आज्ञा द्यावी.” 

    “श्रीरामांनी सांगण्यापूर्वीच जर आपण या कार्याचा प्रारंभ केला तर वेळ निघून गेली असे मानले जाणार नाही, परंतु जर त्यांना यासाठी प्रेरणा करावी लागली तर मग असेच समजले जाईल की आपण वेळ घालविला आहे, त्यांच्या कार्यास फारच उशीर लावला आहे. वानरराज ! ज्याने आपला काही उपकार केलेला नाही त्याचे कार्य सुद्धा सिद्ध करणारे आपण आहात; मग ज्यांनी वालीचा वध तसेच राज्य प्रदान करून आपल्यावर उपकार केले आहेत, त्यांचे कार्य आपण शीघ्र सिद्ध कराल हे काय सांगायला हवे का ? यात संदेह नाही की दशरथकुमार भगवान् श्रीराम आपल्या बाणांनी समस्त देवता, असुर आणि मोठमोठ्या नागांनाही आपल्या वश करू शकतात तथापि आपण जी त्यांचे कार्यास सिद्ध करण्याची प्रतिज्ञा केली आहे, त्याचीच ते वाट पहात आहेत. त्यांनी आपल्यासाठी वालीचे प्राण घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. ते आपले फार मोठे प्रिय कार्य करून चुकले आहेत, म्हणून आता आपण त्यांची पत्‍नी वैदेही सीतेचा या भूतलावर आणि आकाशात ही शोध घ्यायला हवा. वानरराज ! असे शक्तिशाली आणि प्रथमच उपकार करणार्‍या भगवान् रामांचे प्रिय कार्य आपल्याला आपली सर्व शक्ति पणाला लावून केले पाहिजे.” ॥४-९-९ते२५॥ 

    हनुमंतांनी किती सौम्य पण परिणामकारक भाषेत सुग्रीला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. सुग्रीव आता राज्याचा स्वामी आहे. तेव्हा त्याला न दुखावता त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणे हे काम सोपे नव्हते. त्याला त्याच्या चुकांची जाणीव तर व्हायला हवी पण त्याचवेळी त्याला रागही येता कामा नये हे हनुमानांना पथ्य पाळावयाचे होते. ह्या कामात ते यशस्वीही झाले. दीर्घकाळानंतर प्राप्त झालेल्या राज्यात आसक्त होऊन आपण मित्रकार्य विसरलो याची सुग्रीवाला जाणीव झाली व त्याने हनुमानांच्या बोलण्याचा राग न मानता श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्याचा निश्चय केला.

सौ. मनीषा अभ्यंकर

Saturday, April 20, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ:  (भाग ३)

हनुमानांच्या बोलण्याची पद्धत पाहून श्रीरामांना वाटले की हनुमानांनी नक्कीच वेदांचा, व्याकरणचा अभ्यास केला असला पाहिजे. त्याशिवाय अशा सुंदर व शुद्ध भाषेत वार्तालाप करणे शक्य नाही. संभषणाच्या वेळी त्यांचे मुख, नेत्र, ललाट, भुवया तसे शरीराची इतर अंगे यातून कोणताही दोष प्रकट झाला नाही. त्यांच्या बोलण्यात कंटाळा येईल असा फापटपसारा नव्हता व ते अतिशय संक्षिप्तही नव्हते की ज्यामुळे त्यांचे बोलणे ऐकून भ्रम निर्माण होईल. संभाषण करतांना त्यांनी घाई केली नाही अथवा विलंब केला नाही. त्यांची वाणी संथही नाही व त्यांनी गडबडीनेही कोणती गोष्ट सांगितली नाही. उलट त्यांचे बोलणे ऐकून शत्रूचे हृदय सुद्धा पाझरले असते. असा दूत ज्या राजाकडे असेल तर त्या राजाचे कार्य निश्चितच सिद्धीस जाईल असे वाटून रामांनी लक्ष्मणास त्यांच्याशी बातचित करण्यास सांगितले. 

    सुग्रीवाला शोधतच हे दोन वीर येथे आले असून ते सुग्रीवाशी मैत्री करू इच्छितात हे लक्ष्मणाकडून ऐकून हनुमान प्रसन्न झाले.

    हनुमान व लक्ष्मण या दोघांनी एकमेकांचा परिचय करून घेतल्यावर लक्ष्मणांना हनुमानांच्या सत्यवचनाची प्रतीती आली. 

प्रसन्नमुखवर्णश्च व्यक्तं हृष्टश्च भाषते । 
नानृतं वक्ष्यते वीरो हनुमान पवनात्मज: ॥४-४-३२॥ 

लक्ष्मण म्हणाला की “यांच्या मुखाची कांती स्पष्टपणे प्रसन्न दिसून येत आहे आणि ते हर्षाने उत्फुल्ल होऊन बोलत आहेत. त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की पवनपुत्र हनुमान खोटे बोलणार नाहीत.” लक्ष्मणाला हनुमानांच्या सत्यवचनाची प्रतीती आली. एकमेकांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास वाटल्यावरच सुग्रीवाची भेट घेण्याचे नक्की झाले व हनुमान आपले मूळ रूप प्रकट करून राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून ते ऋष्य़मूक पर्वतावर गेले.   

    हनुमानांनी सुग्रीवाला सर्व वृत्तांत निवेदन करून राम व लक्ष्मण यांच्याशी मैत्री करण्यास सांगितले. कारण श्रीरामांच्या मदतीनेच सुग्रीवाला वालीवर विजय मिळवणे शक्य होते. हनुमानाच्या सांगण्यावरून सुग्रीवाने सुद्धा रामांसमोर मैत्रीचा हात पसरला. नंतर हनुमानांनी अग्नी प्रज्वलित करून राम व सुग्रीव यांच्यामधे स्थापन केला व अग्नीच्या साक्षीने त्यांच्यात मैत्री प्रस्थापित केली. सुग्रीवाची पत्नी रुमा व किष्किंधेचे राज्य परत मिळावून देण्यासाठी रामांनी सुग्रीवाला मदत करायची व सीतेचा शोध घेऊन रावणाबरोबर युद्धात सुग्रीवाने रामांना मदत करायची असा दोघांमधे करार झाला.   

    ठरल्याप्रमाणे रामांनी वालीचा वध केला व सुग्रीवाची पत्नी सुग्रीवास मिळवून दिली व त्याचबरोबर किष्किंधेच्या राज्याचा सुग्रीवावर अभिषेक केला. वालीचा वध झाल्यामुळे वालीची पत्नी तारा अत्यंत शोकाकूल झाली. तेव्हा हनुमानांनी तिची समजूत काढली. या हनुमानांच्या संभाषणात तत्त्वज्ञान ठासून भरले आहे. हनुमान तारेला म्हणतात, “मनुष्य जिवंतपणी जी शुभ अथवा अशुभ कर्मे करतो त्या कर्मांची फळे मनुष्याला मृत्युनंतर अवश्य मिळतात. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असणार्‍या या शरीराच्या बाबतीत शोक तो कसला करावयाचा ? वाली नीतीने राज्यशासन करत होते. साम, दान व क्षमा यांच्यात तत्पर होते. तेव्हा धर्माचरण करणार्‍या पुरुषाला जी सद्गती मिळते ती त्यांना नक्की मिळाली आहे. म्हणून तू आता वालीचा और्ध्वदेहिक संस्कार कर.” हनुमानांनी तारेची समजूत काढतांना कुठेही वालीची अवहेलना केली नाही हा त्यांच्या संभाषणातील एक विशेष आहे. 

    वालीचा और्ध्वदेहिक संस्कार पार पडल्यावर सुग्रीवाला राज्याभिषेक करणे हे महत्वाचे कार्य करावयाचे होते. त्यासाठी हनुमानांनी रामांना विनंती केली. त्यावेळचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात की उगवत्या सूर्याप्रमाणे रक्तवर्ण मुख असणारे व सोन्याच्या पर्वताप्रमाणे तेजस्वी हनुमान हात जोडून रामांना म्हणाले, “आपल्या कृपेमुळे हे किष्किंधेचे दुर्लभ राज्य सुग्रीवाला मिळाले आहे. तेव्हा राज्यारोहण केल्यावर सुग्रीव आपली विशेष पूजा करणार आहेत. तेव्हा आपण किष्किंधानगरीत प्रवेश करावा.” 

    हनुमानांनी रामांना हा प्रस्ताव सुग्रीवाच्या      सांगण्यावरून दिलेला नाही. यावरूनच त्यांच्या बुद्धिमत्तेची व अधिकाराची व सुग्रीवाने हनुमानांनाच प्रधान मंत्री म्हणून का नेमले असावे त्याची कल्पना येते. अर्थात पित्याच्या आज्ञेवरून आपण वनात रहात असल्यामुळे आपण गावात येऊ शकत नाही व त्यामुळे सुग्रीवाला राज्याभिषेक व अगंदाची युवराजपदी नियुक्ती ही दोन कामे श्रीरामांनी हनुमानांवरच सोपवली.
                  
सौ. मनीषा अभ्यंकर

Friday, April 19, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ:  (भाग २)

वाल्मीकी रामायणात हनुमानांची कामगिरी अजोड आहे. वास्तविक सुग्रीव वा बिभीषण यांना श्रीरामांपासून काहीतरी लाभाची अपेक्षा होती. पण हनुमानांना मात्र श्रीरामांपासून कोणत्याही वैयक्तिक लाभाची अपेक्षा नव्हती. त्यांनी जे कार्य केले आहे ते केवळ स्वामीकार्य म्हणून. हनुमानांनी उत्कृष्ट सेवेचा आदर्श ठेवला आहे.
    वाल्मीकिरामायणात हनुमान दृष्टीस पडतात ते किष्किंधाकांडापासून. कबंधाने सांगितल्याप्रमाणे श्रीराम ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवाचा शोध घेत आले. कारण त्यांना सुग्रीव सीताशोधात मदत करणार होता. सुग्रीव हा वालीचा धाकटा भाऊ. वालीने सुग्रीवाला राज्यातून हाकलून लावले होते. त्यामुळे तो आपल्या सहकारी ५ मंत्र्यांसमवेत ऋष्यमूक पर्वतावर रहात होता. राम व लक्ष्मणांना लांबूनच येतांना पाहून तो अतिशय घाबरला. त्याला वाटले की यांना बहुधा वालीनेच आपल्याला मारण्यासाठी पाठवले असावे. तेव्हा बोलण्यामधे जाणकार हनुमानांनी त्याची समजूत काढली. वाल्मीकींनी हनुमानांना ‘वाक्यकोविद:’ असे विशेषण वापरले आहे. वास्तविक वाली ऋष्यमूक पर्वतावर शापामुळे येऊ शकत नव्हता. तरीसुद्धा श्रीरामांना पाहून सुग्रीवाचे घाबरणे म्हणजे वानरोचित चपलताच प्रकट करणे आहे असे हनुमानांना वाटत होते. वास्तविक राजाने कसे असले पाहिजे ? हनुमान सांगतात -
    बुद्धिविज्ञानसम्पन्न इङ्गितै: सर्वमाचर । न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति ह ॥४-२-१८॥
“बुद्धि व विज्ञानाने संपन्न होऊन आपण दुसर्‍याच्या कृतिद्वारा त्यांचा मनोभाव जाणावा व त्यास अनुसरून सर्व आवश्यक कार्य करावे. कारण की जो राजा बुद्धिबलाचा आश्रय घेत नाही तो संपूर्ण प्रजेवर शासन करू शकत नाही.” परंतु श्रीरामांचे देवोपम रूप पाहून सुग्रीवाला वाटत होते की नक्कीच त्यांना वालीने पाठवलेले असावे. कारण वाली स्वत: तिथे येऊ शकत नसल्यामुळे त्यानेच कपट वेश धारण केलेल्या या दोन वीरांना आपल्याला मारण्यासाठी पाठवेलेले असावे. तेव्हा त्यांच्या बद्दलची माहीती काढण्यास सुग्रीवाने हनुमानांचीच योजना केली व त्या दोन्ही पुरुषांच्या हालचालीवरून, रूपावरून व संभाषण करण्याच्या पद्धतीवरून त्या दोघांचा यथार्थ परिचय प्राप्त करून घेण्यास सांगितले. त्यांचा मनोभाव जाणून त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास उत्पन्न करण्यास सांगितले. कारण सुग्रीवाला त्याच्या मंत्र्यांमधे हनुमानच हे कार्य उत्तमप्रकारे करू शकतील अशी खात्री होती.
    वायुपुत्र हनुमानांनी विचार केला की आपल्या या कपिरूपावर कुणाचा विश्वास बसू शकणार नाही. म्हणून ते सामान्य भिक्षूचे रूप धारण करून राम व लक्ष्मणांजवळ गेले व त्यांनी त्यांची प्रशंसा केली व त्यांच्याबरोबर मधुर वाणीत वार्तालाप करण्यास सुरवात केली. कोणत्याही मनुष्यास त्याच्या रूपाची, बलाची प्रशंसा केलेली आवडते. हा सामान्य नियम लक्षात घेऊन हनुमानांनी श्रीराम व लक्ष्मण यांच्या रूपाची व बलाची प्रशंसा केली व त्यांना पंपासरोवराकडे येण्याचे कारण विचारले. आपण सुग्रीवाचे मंत्री असून सुग्रीवाच्या सांगण्यावरून येथे आलो आहोत व सुग्रीव आपल्याशी मैत्री करू इच्छितात हेही त्यांनी स्पष्ट केले. आपण वायुपुत्र हनुमान असून आपल्या इच्छेप्रमाणे कोठेही जाऊ शकतो व कोणतेही रूप धारण करू शकतो अशी आपल्या सामर्थ्याचीही त्यांनी ओळख करून दिली.

सौ. मनीषा अभ्यंकर

Thursday, April 18, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ:  (भाग १)

रामरक्षेत बुधकौशिकऋषींनी हनुमानांचे वर्णन करतांना म्हटले आहे, 

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरीष्ठं ।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥


बुधकौशिक ऋषी म्हणतात की, “ मनासारख्या वेगवान, वायूप्रमाणे वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमानांमधे श्रेष्ठ, वायुपुत्र, वानरसमूहाचा प्रमुख अशा रामाचा दूत असलेल्या हनुमानांना मी शरण जातो.”

    येथे बुधकौशिकऋषींनी हनुमानांना ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असे विशेषण वापरले आहे. वाल्मीकींनीही हनुमानांना उद्देशून रामायणामधे ‘वाक्यकोविद:, वाक्यज्ञ:, वाक्यविशरद:, बुद्धिसम्पन्न:, सर्वशास्त्रविशारद:, वीर्यवतां श्रेष्ठ:, प्लवतां वरिष्ठ:’ अशी अनेक विशेषणे वापरली आहेत. बुद्धिमानांमधे श्रेष्ठ असणारे हनुमान कसे होते ? 

सौ. मनीषा अभ्यंकर. 

Wednesday, April 17, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३६

    अश्वत्थाम्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला. व्यासांनी त्याला त्याच्या मस्तकावरील अमूल्यमणी पांडवांना देऊन त्या बदल्यात पांडवांना अश्वत्थाम्याला जीवदान द्यायला सांगितले. त्याच्या या कृत्याबद्दल श्रीकृष्णांनी त्याला शाप दिला की, “तू तीन हजार वर्षे पृथ्वीवर एकटा निर्जन स्थानी भटकत फिरशील. तुझ्या शरीरातून पू व रक्ताची दुर्गंधी येत राहील. त्यामुळे तुला दुर्गम स्थानांचा आश्रय करावा लागेल. तू सर्व रोगांनी पीडित होशील. आणि तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने दग्ध झालेल्या बालकाला मी जिवंत करीन.”  व्यासांनीही श्रीकृष्णांच्या बोलण्याला अनुमोदन दिले.

    त्याप्रमाणे उत्तरेचा पुत्र मृतावस्थेत जन्माला आला. श्रीकृष्णांनी त्याला जिवंत केले. कृपाचार्यांकडूनच तो शस्त्रविद्याही शिकला. व या भूमंडलाचा सम्राट झाला. 

भगवंतांनी गीतेत सांगितले होते की

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
    अभ्युथानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥४-७॥
    परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां ।
    धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥४-८॥ 

    “जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते व अधर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा तेव्हा मी स्वत:ला अवतीर्ण करतो. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश व धर्मसंस्थापना करण्यासाठी मी युगायुगात अवतार घेतो.” 

    या अवतारात भगवंतांनी पांडवांना हाताशी धरून धर्मसंस्थापना करण्याचे योजले होते. त्याप्रमाणे त्यांनी महायुद्धात स्वत: शस्त्र धारण न करताही पांडवांना मार्गदर्शन करून ह्या महायुद्धाचे यश पांडवांच्याच पदरात घातले. आणि युधिष्ठिरानेही 

    येषां च जगतीनाथो नाथ: कृष्णो जनार्दन: ।
    कथं तेषां जयो न स्याद् येषां धर्मो व्यपाश्रय: ॥१९-२७॥शल्यपर्व॥
    लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराभव: ।
    येषां नाथो हृषीकेश: सर्वलोकविभुर्हरि: ॥शल्यपर्व॥ 

    अखिल विश्वाचे प्रभू व सर्वांच्या इंद्रियांचे नियमन करणारे भगवान् श्रीहरी ज्यांचे स्वामी व संरक्षक आहेत त्यांनाच लाभ प्राप्त होतो व त्यांचाच जय होतो. त्यांचा पराजय कसा होऊ शकेल ?” 

    “संपूर्ण जगताचे स्वामी श्रीकृष्ण ज्यांचे रक्षक आहेत व ज्यांना धर्माचा आश्रय प्राप्त आहे त्यांचा विजय का होणार नाही ?” असे म्हणून युधिष्ठिरानेही श्रीकृष्णांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व यश भगवंताच्या पायाशी समर्पित केले. 

    श्रीरामाप्रमाणे मर्यादेने वागून ह्यावेळी दुष्टांचा नाश होणार नव्हता. हा श्रीकृष्णांचा लीलावतार होता. अनीतीने चालणार्‍या लोकांचा प्रतिकार सदासर्वकाळ नीतीने करता येत नाही, त्यासाठी काही वेळा अनीतीचाही आश्रय घ्यावा लागतो हेच ह्या अवतारात जसे श्रीकृष्णांनी दाखवून दिले. त्याप्रमाणे धर्माने वागणार्‍यांच्या पाठीशी सर्वकाळ भगवंत उभा असतो हेही दाखवून दिले.
 (समाप्त)

सौ. मनीषा अभ्यंकर.

Tuesday, April 16, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३५


    कृपाचार्यांनी अश्वत्थाम्याला समजावले. दुर्योधनाचा दुष्ट स्वभावामुळे त्याला हे फळ प्राप्त झाले आहे. आपण त्या पाप्याचेच अनुसरण करत आलो म्हणून ही आपली दशा झाली आहे. 
 
    रागात् क्रोधाद् भयाल्लोभाद् योऽर्थानीहति मानव: ।
    अनीशश्चावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रिय: ॥२-२४॥सौप्तिकपर्व॥
 
जो आपल्या मनाला ताब्यात न ठेवता दुसर्‍यांची अवहेलना करून राग, क्रोध, भय व लोभ यांनी प्रेरित होऊन एखादे कार्य करण्याचा प्रयत्न करतो तो लवकरच आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो.     खूप विचार करूनही कृपाचार्यांची बुद्धी त्यांना काम देत नव्हती. म्हणून त्यांनी सांगितले की आपण हस्तिनापूरला जाऊन धृतराष्ट्र, गांधारी व विदुर यांना हितकारक काय आहे ते विचारून मग निर्णय घेऊ या. परंतु अश्वत्थामा आपल्या निर्णयावर दृढ होता. कृपाचार्यांनी त्याला पुन्हा समजावले की आपण उद्या सकाळी त्यांच्या बरोबर युद्ध करू. पण अश्वत्थामा हट्टाला पेटला होता. आता छावणीत सर्वजण निर्धास्त झोपलेले असतील तेव्हा आताच हल्ला करणे योग्य आहे. असे म्हणून अश्वत्थामा एकटाच रथाला घोडे जोडून निघाला. तेव्हा त्याच्या मागोमाग कृपाचार्य व कृतवर्मा पण निघाले.
 
    त्या दिवशी शिबिरांमधे विजयाचा हर्षोल्लास साजरा करून दमलेले पांडव सैन्य झोपेच्या आधीन झाले होते. श्रीकृष्णांनी त्या रात्री पाच पांडवांना शिबिरात विश्रांती न घेता ओघवती नदीच्या काठी विश्रांती करता घेऊन गेले. व लगेचच युधिष्ठिराच्या सांगण्यावरून हस्तिनापूरला गेले होते. त्याचे सांत्वन केले होते. तेथेच त्यांना अश्वत्थाम्याचा विचार अंतर्ज्ञानाने कळला. म्हणून ते त्याच पावली तेथून परत निघाले. 
 
    पाच पांडव नदीकाठीच राहिले होते. अशा परिस्थितीत अश्वत्थामा शिबिरात येऊन पोचला. तेव्हा त्याला द्वारात एक अद्भुत, तेजस्वी, विशालकाय प्राणी उभा असलेला दिसला. अश्वत्थाम्याने त्याच्यावर बाणांचा प्रहार केला. त्याच्याशी युद्ध करतांना त्याची सर्व अस्त्रे व शस्त्रे संपली. तेव्हा त्याने शंकराला शरण जायचे ठरवले. व रथातून उतरून शंकराची स्तुती करण्यास लागला. त्यावेळी त्याच्यासमोर एक सुवर्णमय वेदी प्रगट झाली व त्यात अग्निदेव व शिवाचे अनेक गण प्रगट झाले. तेव्हा तो स्वत:च शिवाला अर्पण होण्याच्या हेतूने त्या वेदीवर चढला व अग्नीमधे बसून राहिला. शंकर त्याला म्हणाले, “श्रीकृष्णांचा सन्मान व तुझी परीक्षा करण्यासाठी म्हणून मी इतकावेळ पांचालांचे रक्षण केले. परंतु आता त्यांचे जीवन संपलेले आहे.” असे म्हणून शंकराने स्वत: त्य़ाच्य़ा शरीरात प्रवेश केला व त्याला एक खड्ग प्रदान केले. शंकराचा आवेश झाल्यामुळे अश्वत्थामा तेजाने प्रज्वलित झाला आणि त्याने शिबिराच्या दिशेने प्रस्थान ठेवले. कृपाचार्य व कृतवर्माही त्याच्या मदतीला आलेच होते. अश्वत्थाम्याने प्रथम झॊपलेल्या धृष्ट्द्य्म्नाला ठार मारले. आणि नंतर तो प्रत्येक शिबिरावर आक्रमण करू लागला. उत्तमौजा, युधामन्यु, द्रौपदीचे पाचही पुत्र, शिखंडी सह सर्व सैन्य कापून काढले. झोपेत असलेल्या त्या सैन्याला प्रतिकाराचा अवधीही मिळाला नाही. कृतवर्मा व कृपाचार्य त्याच्या मदतीला होतेच. सर्वांचा वध केल्यावर हा प्रिय समाचार त्यांनी दुर्योधनाला सांगितला. ते ऐकून दुर्योधनाने प्राण सोडले.
 
    सकाळी हा समाचार कळताच सर्व पांडव दु:खाकूल झाले. तेव्हा द्रौपदीच्या विनवणीवरून भीम अश्वत्थाम्याचा वध करण्यास निघाला. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सचेत केले व भीमाच्या रक्षणाची आवश्यकता सांगितली कारण अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र होते. म्हणून स्वत: श्रीकृष्ण सर्व आयुधांनी संपन्न होऊन रथात युधिष्ठिर व अर्जुनाला घालून भीमाच्या मागोमाग निघाले. अश्वत्थामा गंगाकिनार्‍यावर बसला होता. भीम व पाठोपाठ आलेल्या श्रीकृष्णांना पाहून तो घाबरला व त्याने ‘हे अस्त्र सर्व पांडवांचा विनाश करो’ असे म्हणून ब्रह्मास्त्राचे चिंतन केले. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या व भावांच्या संरक्षणासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करण्यास सांगितले. तेव्हा ‘आचार्यपुत्राचे कल्याण होवो व या ब्रह्मास्त्राने शत्रूचे ब्रह्मास्त्र शांत होवो’ असा संकल्प करून ब्राह्मास्त्र सोडले. तेव्हा सर्व प्राण्यांच्या हिताची इच्छा करणारे नारद व व्यास तिथे आले व त्यांनी असा प्रयोग पूर्वी कोणीही मनुष्यावर केला नसल्याचे सांगितले. तेव्हा अर्जुनाने स्वसंरक्षणार्थ हे अस्त्र सोडल्याचे सांगितले. व ते त्याने पुन्हा परत फिरवले. अश्वत्थाम्याने सांगितले की ‘आपण अधर्माने दुर्योधनाचा वध करणार्‍या भीमाच्या नाशा करता हे अस्त्र सोडले पण ते परत घेण्य़ाचे बळ माझ्याकडे नाही. तेव्हा अस्त्र अभिमन्यू व विराटपुत्री उत्तरा याच्या गर्भस्थ शिशूचा नाश करेल.”

सौ. मनीषा अभ्यंकर.

Monday, April 15, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३४

अश्वत्थाम्याला शाप - 

    युद्ध संपले होते पण शेवटचा अंक बाकी होता. पांडवांचा जय झाला असून सर्व कौरव युद्धात ठार मारले गेले आहेत ही वार्ता धृतराष्ट्र व गांधारीला कळवणे आवश्यक होते. आपल्याच बांधवांचा आपल्याला वध करावा लागला असल्यामुळे युधिष्ठिर मनोमन दु:खी होता. धृतराष्ट्र व गांधारीसमोर उभे रहाण्याचे त्याला धैर्य नव्हते. म्हणून त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की तुम्ही हस्तिनापुरात जाऊन त्या दोघांचे सांत्वन करावे. त्यांचा राग थोडा शांत झाला की  मग युधिष्ठिराने हस्तिनापूरला जाणे योग्य आहे असे वाटून श्रीकृष्ण हस्तिनापूरला जाण्यास तयार झाले. 

    श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले. धृतराष्ट्राचा हात हातात घेऊन त्याच्या पुत्रांच्या झलेल्या वधाबद्दल स्वत: शोक केला. पण नंतर त्यांनी युद्धाची अपरिहार्यता धृतराष्ट्राला सांगितली. दुर्योधनाने दिलेले सर्व कष्ट पांडवांनी सहन केले. १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगून सुद्धा ठरलेल्या अटीप्रमाणे त्याने त्यांना त्यांचे राज्य परत दिले नाही. पांडव पाच गावांवर सुद्धा संतुष्ट होते. पण त्याने सुईच्या टोकावर राहील एवढी माती सुद्धा पांडवांना मिळणार नाही असे सांगितल्यावर युद्धाशिवाय पर्याय राहिला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकृष्ण म्हणाले, “यात पांडवांचा काही दोष नाही. आणि तुमचा वंश आता पांडवच चालवणार आहेत. पिंडदानामुळे पुत्राकडून प्राप्त होणारे फळ आता तुम्हाला पांडवांकडूनच मिळणार आहे. तेव्हा आपण त्यांचे वाईट चिंतू नका. ते गांधारीला म्हणाले, हे महाराणी, पुत्राची समजूत कढातांना तुम्ही त्याला म्हणाला होतात की ‘यत्र धर्मस्ततो जय:’ ती तुम्ही म्टलेलीच गोष्ट आज सत्य झाली आहे. युधिष्ठिर आजही बंधुजनांच्या वधामुळे दु:खी झाला आहे. तो तुमच्यासमोर येण्याचे धाडस करू शकत नाही.” श्रीकृष्णांनी असे बोलून दोघांनाही धीर दिला व काही आशंका मनात आल्यामुळे ते परत पांडवांकडे परत येण्यास निघाले.

    इकडे दुर्योधन मांड्या तुटलेल्या अवस्थेत रणांगणात पडलेला होता. विलाप करत होता. त्याच्या भोवती अनेक लोक जमलेले होते. त्याने  त्यांना आपल्याला अधर्माने युद्धात कसे ठार मारले ते अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा यांना सांगण्याची विनंती केली. त्यानुसार त्यातील काही दूतांनी ही वार्ता त्या तिघांपर्यंत पोचवली. ती वार्ता कळताच ते तिघेही दुर्योधन जिथे पडलेला होता तिथे आले. त्याची ती अवस्था पाहून तिघांना अतिशय वाईट वाटले. एकेकाळी पृथ्वीचे राज्य भोगणारा हा दुर्योधन आता दयनीय अवस्थेत पडला होता. आपण शत्रूला पाठ दाखवली नाही, क्षत्रियोचित पराक्रम गाजवला आहे व वीरमरण पत्करले आहे याचे त्याला समाधान होते. पण अश्वत्थामा त्याची ती अवस्था पाहून दु:खी झाला होता. त्याने तिथे प्रतिज्ञा केली की, “मी सर्व पांचालाचा वध करीन, तुम्ही मला त्य़ासाठी आज्ञा द्या.” ते ऐकून दुर्योधन प्रसन्न झाला. त्याने कृपाचार्यांकरवी अश्वत्थाम्याचा  सेनापतिपदावर अभिषेक केला. दुर्योधनाचा निरोप घेऊन तिन्ही महारथी वनात विश्रांतीसाठी गेले. तेथे रात्री अश्वत्थाम्याला झोप येत नव्हती. आपण प्रतिज्ञा केली पण हे कार्य कसे पार पाडायचे याची त्याला चिंता लागलेली होती. तेव्हा त्याला रात्री कावळ्यांवर हल्ला करत असलेले एक घुबड दिसले आणि त्याचा विचार पक्का झाला. त्याने कृपाचार्य व कृतवर्म्याला उठवले आणि आपला विचार सांगितला. त्याचा तो कठोर निर्णय ऐकून दोघेही शहारले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Sunday, April 14, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३३

    आज सार्‍या निष्कंटक पृथ्वीचे राज्य पांडवांना मिळाले होते. जरी त्या विजयाला भ्रातृवधाच्या दु:खाची किनार होती तरी सर्वजण मनोमन आनंदित झालेले होते. ते आनंदाच्या भरात दुर्योधनाची निंदा करत होते. पूर्वी श्रीकृष्णांनीही दुर्योधनाच्या कृत्याचा अनेकवेळा पाढा वाचला होता. पण आता दुर्योधन मृतप्राय अवस्थेत होता. मांड्या तुटून धरणीवर पडलेला होता. आता त्याची निंदा करणे म्हणजे मेलेल्या शत्रूला पुन्हा मारण्यासारखे होते. म्हणून श्रीकृष्णांनी पांडवपक्षातील लोकांना अशी निंदा न करण्य़ास सांगितले व छावणीच्या दिशेने प्रस्थान ठेवण्यास सांगितले.

    पांडव जसे जाण्यास निघाले तसा दुर्योधनाचा क्रोध उफाळून आला. त्याने या युद्धात पांडवांनी अधर्माने केलेल्या वधाची यादी त्याने सादर केली व त्यासाठी श्रीकृष्णांना जबाबदार धरले कारण ही सर्व कृत्ये पांडवांनी श्रीकृष्णांच्या आदेशानुसारच केली होती. तो श्रीकृष्णांना म्हणाला, “तू अनार्य आहेस. आम्ही स्वधर्माने वागत असता तूच पांडवांच्याकडून आमचा वध करवला आहेस.”

    मृत्यूच्या दारात उभा असून सुद्धा त्याला आपल्या वागण्य़ाचा पश्चात्ताप होत नव्हता. उलट तो स्वत:ला स्वधर्माचे पालन करणारा म्हणवून घेत होता. त्याचे ते बोलणे ऐकून श्रीकृष्ण चिडले व पुन्हा त्यांनी त्याच्या पुढ्यात त्यांनी केलेल्या अधर्माची कृत्ये सादर केली. व हा जो त्यांचा दारुण पराभव झाला व सर्व वीरांना मृत्यु प्राप्त झाला त्याचे कारण म्हणजे एकच - दुर्योधनाचे अधर्माने वागणे असे त्यांनी ठासून सांगितले. 

    लोभेनातिबलेन त्वं तृष्णया च वशीकृत: ।
    कृतवानस्यकार्याणि विपाकस्तस्य भुज्यताम् ॥६१-४९॥शल्यपर्व॥

“अत्यंत प्रबल लोभाला व हव्यासाला वश होऊन तू जी अयोग्य कार्ये केली आहेस त्याचे फळ तू भोग.”

    तरीही भीष्म, द्रोण, कर्ण यांना अधर्माने मारल्याबद्दल पांडवपक्षातील सर्वांनाच अपराधी वाटत होते. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की भीष्म, द्रोण, कर्ण वा दुर्योधन ह्यांच्यापैकी कोणालाही धर्मानुकूल सरलतेने मारता येणे शक्य नव्हते. म्हणून -

    मयानेकैरुपायैस्तु मायायोगेन चासकृत् ।
    हतास्ते सर्व एवाजौ भवतां हितमिच्छता ॥६१-६३॥शल्यपर्व॥

“आपणा सर्वांचे हित व्हावे या हेतूने मी वारंवार मायेचा प्रयोग करून अनेक उपायांनी या युद्धात या सर्वांचा वध केला आहे.” पुढे ते म्हणतात की युद्धात जर अशाप्रकारचे कपट केले नसते तर तुम्हाला जय कसा मिळाला असता ? तेव्हा या गोष्टीचा खेद करण्य़ाचे काहीही कारण नाही. शक्तिशाली शत्रूंना नाना प्रकारच्या उपायांनी व कूटनीतीनेच मारावे लागते. असुरांचा नाश करतांना देवतांनी सुद्धा याच मार्गाचा आश्रय केला होता. आणि श्रेष्ठ लोक ज्या मार्गाने जातात त्याचेच लोक अनुकरण करत असतात.” श्रीकृष्णांनी जर या कृत्याने पाप लागणार असेल तर या पापाचा सर्व भार ‘मीच यांचा वध केला’ असे म्हणून जणु स्वत:च्या शिरावर घेतला. या त्यांच्या बोलण्याने सर्वांच्याच मनातील अपराधीपणाची भावना नाहीशी झाली. 

    कृपाचार्यांनी जेव्हा दुर्योधनाला संधी करण्य़ाचा सल्ला दिला होता तेव्हा त्यानेही आपल्या तोंडाने आपण केलेल्या अपराधांची कबुली दिली आहे व अशा परिस्थितीत आपण संधी जरी केला तरी पांडव आपल्यावर विश्वास कसा ठेवतील असा प्रश्न त्यांना विचारला आहे. त्यामुळे आपल्यापुढे युद्ध हाच एकमेव पर्याय असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

    युद्धातील सर्व हत्यांची जबाबदारी श्रीकृष्णांनी स्वत:च्या शिरावर घेतल्यावर पांडव नि:शंक होऊन शिबिरात परतले. शिबिरात परत आल्यावर  श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, “अर्जुना, तू धनुष्यबाण घेऊन तू आधी उतर, नंतर मी उतरीन.” अर्जुनाने त्याचप्रमाणे केले. अर्जुन उतरल्यावर मग श्रीकृष्णांनी घोड्यांचा लगाम सोडून दिला व ते रथातून खाली उतरले. श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाच्या रथावरील ध्वजस्वरूप दिव्य वानर अंतर्धान पावला. आणि नंतर तो दिव्य रथ घोड्यांसहित जळून भस्म झाला. युद्धामधे नाना अस्त्रांमुळे तो रथ आधीच दग्ध झालेला होता. केवळ श्रीकृष्ण त्यात बसलेले होते म्हणून तो जळला नाही आता जेव्हा श्रीकृष्णांनी तो रथ सोडून दिला तेव्हा तो भस्मसात झाला. ज्या कार्याकरता अग्नीने तो रथ अर्जुनाला दिला होता ते कार्य पूर्ण झाले होते. त्यामुळे अग्नीने तो रथ जणु परत नेला.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Saturday, April 13, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३२

    दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. भीम बलशाली होता तर दुर्योधनाने अभ्यास केलेला होता. कोणीच कोणाला हार जात नव्हते. श्रीकृष्णांना कळून चुकले की भीम जर धर्मपूर्वक युद्ध करू लागला तर तो दुर्योधनाला नक्कीच जिंकणार नाही. ते अर्जुनाला म्हणाले, “पूर्वी देवतांनी मायेनेच असुरांवर जय मिळवला होता. इंद्राने मायेनेच विरोचनाचा पराभव केला होता. तेव्हा भीमानेही मायामय पराक्रमाचाच आश्रय घ्यायला हवा. द्यूताच्यावेळी भीमाने प्रतिज्ञाही केली होती की, ‘मी दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या गदेने तोडून टाकीन. तेव्हा भीमाने ती प्रतिज्ञा खरी करावी तरच जय मिळण्याची आशा आहे. युधिष्ठिराने पुन्हा विरुद्ध परिस्थिती निर्माण केली आहे. ‘धर्मराजापराधेन भयं न: पुनरागतम्’ धर्माराजाच्या अपराधामुळे पुन्हा संकट निर्माण झालेले आहे. सर्व कौरवांना ठार मारून विजय जवळ जवळ मिळाल्यासारखाच झालेला होता. एकाच्या जय-पराजयामुळे सर्वांचा जय-पराजयाची अट ठेऊन त्यांनी पुन्हा युद्ध म्हणजे जुगारच बनवला आहे. हे भयंकर अज्ञान आहे. शुक्राचार्यांनी सांगितले आहे की युद्धामधे वाचलेले लोक पुन्हा युद्धासाठी आले तर त्यांना घाबरून असावे. कारण शेंडी तुटो की पारंबी तुटो’ अशा निश्चयानेच ते आलेले असतात. मृत्यूची त्यांना भीती नसते. जे जीवनाची आशा सोडून धैर्याने युद्धाला आलेले असतात त्यांच्यासमोर इंद्र सुद्धा युद्धासाठी उभा राहू शकत नाही.” 

    श्रीकृष्णांना युधिष्ठिराने दुर्योधनासमोर ठेवलेल्या अटीची भीषणता जाणवत होती. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते की युधिष्ठिराने हा भयावह जुगार खेळला आहे. 

    श्रीकृष्णांचे मत कळल्यावर अर्जुनाने भीमसेनाकडे पाहून आपली डावी मांडी थोपटली. अर्जुनाकडून संकेत मिळताच वेळ साधून भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांवर गदेने प्रहार केला. व त्याला धराशायी केले. अन्यायाने व अधर्माने वागणार्‍या सर्व धृतराष्ट्रपुत्रांचा वध झाला होता. आता त्याबद्दल स्वर्ग मिळो किंवा नरक मिळो, भीमाला त्याची पर्वा नव्हती. दोन्ही मांड्या तुटून धराशायी झालेल्या दुर्योधनावर भीमाने आपला इतक्या वर्षांचा साचलेला राग काढला. त्याचे मस्तक त्याने आपल्या पायाने ढकलले व रणांगणात तो बेहोश होऊन नाचू लागला. शेवटी युधिष्ठिराने त्याला भानावर आणले व त्या अनुचित कृत्यापासून त्याला अडवले. 

    आपल्या दोन्ही शिष्यांचे गदायुद्ध बघण्यास बलराम आले होते. भीमाने दुर्योधनावर नाभीखाली प्रहार केला होता. त्याच्या या कृत्याची त्यांनी निंदा केली. गदायुद्ध नियमबाह्य झाले होते. बलरामांना वाटले की आपलाही या कृत्यामुळे अपमानच झाला आहे. म्हणून ते भीमावर धावून गेले. श्रीकृष्णांनी त्यांना अडवले. त्यांनी त्यांची समजूत घातली. ते बलरामांना म्हणाले, “पांडव आपल्या आत्याचे मुलगे असल्यामुळे आपले बांधव असून सहज मित्र आहेत. कौरव यांच्याशी पूर्वी खूप कपटाने वागलेले आहेत. आणि द्रौपदीला भरसभेत ओढून आणल्यानंतर भीमाने दुर्योधनाच्या मांड्या फोडीन अशी प्रतिज्ञा केली होती. आणि त्या प्रतिज्ञेचे पालन करून भीमाने क्षत्रियधर्माचे पालनच केले आहे. मैत्रेय ऋषींनी सुद्धा त्याला पूर्वी शाप दिला होता की भीम तुझ्या मांड्या फोडेल.’ तेव्हा आपण रागावू नका. पांडवांच्या वृद्धिमुळे आपलीही उन्नति होणार आहे.’ आणि कौरवांनीही युद्धात अधर्मच केला आहे हे अभिमन्यूच्या उदाहरणाने त्यांनी त्यांना पटवायचा प्रयत्न केला. पण बलरामांना पांडवांचे वागणे धर्मसंगत आहे हे श्रीकृष्णांचे वचन पटले नाही. व ते द्वारकेला निघून गेले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Friday, April 12, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३१

    पांडवांना चुकवून पुन्हा ते तिघे सरोवरासमीप आले व आपल्या सहाय्याने दुर्योधनाला पांडवांशी युद्ध करण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा त्यांची दुर्योधनाशी चाललेली बातचीत तेथे आलेल्या काही व्याधांनी ऐकली व धनाच्या आशेने त्यांनी ती बातमी युधिष्ठिराला जाऊन सांगितली. तेव्हा श्रीकृष्णांसह पांडव त्या द्वैपायन सरोवराजवळ आले. मायेने पाणी स्तंभित करून दुर्योधन सरोवरात गेला असल्याचे त्यांना कळले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, “राजन्, मायावी दुर्योधनाचा यावेळी आपण मायेचा आश्रय घेऊनच वध करा. ‘मायावी मायया वध्य:’ अशी नीती आहे. मायावीचा वध मायेनेच केला पाहिजे. तेव्हा आपण अनेक उपाय करून दुर्योधनाचा वध करा. मायावी दैत्यांचा इंद्राने, बली, हिरण्य़ाक्ष, हिरण्यकशिपु यांचा श्रीहरीने  सुद्धा मायावी उपायांनीच नाश केला होता. अशी अनेक पूर्वीची उदाहरणे देऊन श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला पराक्रम प्रगट करण्य़ास सांगितले. तेव्हा युधिष्ठिराने दुर्योधनाला आपल्याबरोबर क्षत्रियोचित युद्ध करण्य़ास ललकारले. पांडवांना पराजित तरी कर किंवा वीरोचित मरण तरी पत्कर. पण दुर्योधन पाण्याबाहेर येण्य़ास तयार नव्हता. उलट तूच पृथ्वीचे राज्य कर व मी मृगचर्म धारण करून वनात जाईन असे तो त्याला उत्तर देत होता. पण युधिष्ठिर दुर्योधनाला पराजित केल्याशिवाय राज्याचा स्वीकार करण्य़ास तयार नव्हता. 

    शेवटी दुर्योधनाने सांगितले तुम्ही सर्व रथी अहात व मी जमिनीवर आहे. तेव्हा मी तुमच्याशी एकेकाशी युद्ध करीन. ही गोष्ट युधिष्ठिराने मान्य केली व बोलण्याच्या ओघात म्हणाला की ‘तुला जे शस्त्र पसंत असेल ते घेऊन तू आमच्याशी एकेकाशी युद्ध कर. किंवा आमच्यापैकी एकाचा जरी तू वध केलास तरी राज्य तुझे होईल.’ 

    युधिष्ठिराच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि श्रीकृष्ण संतापले. कारण दुर्योधन गदायुद्धात श्रेष्ठ होता. त्याची बरोबरी फक्त पांडवांमधे भीमच करू शकत होता. भीम व दुर्योधन या दोघांनी गदायुद्धाचे शिक्षण बलरामांकडे घेतले होते.  त्याने जर गदायुद्धासाठी भीम सोडून पांडवांपैकी इतर कोणालाही युद्धासाठी आव्हान दिले असते तर हातातोंडाशी आलेला विजय पांडव घालवून बसले असते. दुर्योधनाने भीमाची लोखंडी मूर्ती बनवून त्या मूर्तीबरोबर तेरा वर्षे गदायुद्धाचा अभ्यास केला होता. तेव्हा त्याला गदायुद्धात हरवणे कठिण होते. म्हणून श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, ‘किमिदं साहसं राजंस्त्वया व्याहृतमीदृशम् ?’ ‘तू आमच्या पैकी एकाला मारून राज्य प्राप्त कर’ असे बोलण्याचे दु:साहस तुम्ही कसे केलेत ? आपण आता यावेळी पूर्वी सारखाच जुगार खेळला अहात. आणि हा जुगार शकुनीशी खेळलेल्या जुगारापेक्षाही भयानक आहे. भीमसेनही गदायुद्धात प्रवीण आहे, पण दुर्योधनाने गदायुद्धाचा अधिक अभ्यास केला आहे. आज आपण स्वत: मोठ्या संकटात फसले आहात व आम्हा लोकांनाही संकटात टाकले आहे. आता तुमचा एकच शत्रु जिवंत आहे आणि हातात आलेले राज्य तुम्ही पुन्हा डावावर लावले आहे. असा अविचार दुसरा कोण बरे करेल ? मला तर असे वाटते की पांडुराजा व कुंतीचे पुत्र राज्य भोगण्याचे अधिकारीच नाहीत. विधात्याने त्यांना अनंतकाळपर्यंत वनवास भोगण्यासाठीच जन्माला घातले आहे.”  

    श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या या वागण्यामुळे खूप हताश झाले. तेवढ्यात भीमाने त्यांना आपण दुर्योधनाचा वध करू म्हणून आश्वासन दिले व दुर्योधनाला निवडीचे स्वातंत्र्य न देताच  त्याने त्याला गदायुद्धाकरता आव्हान दिले. 

    श्रीकृष्णांनी भीमाचे कौतुक केले. धृतराष्ट्राच्या सर्व पुत्रांचा वध भीमानेच केला होता. पण तरीही अधिक आत्मविश्वास घातकच असतो. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला सल्ला दिला की, ‘तू अवश्य दुर्योधनाचा वध करशील. परंतु  त्याच्याशी प्रयत्नपूर्वक युद्ध करायला हवे. कारण तो बलवान व युद्धकलेत कुशल आहे व त्याने तेरा वर्षे गदायुद्धाचा अभ्यास केला आहे. तू बलवान असलास तरी अभ्यास करणार्‍याची योग्यता अधिक मानली गेली आहे. तेव्हा प्रयत्नपूर्वक युद्ध कर व ह्या पृथ्वीचे राज्य युधिष्ठिराच्या चरणी अर्पण कर.’ असे बोलून भीमाला युद्धासाठी प्रोत्साहन दिले.

सौ. मनीषा अभ्यंकर.