आज सार्या निष्कंटक पृथ्वीचे राज्य पांडवांना मिळाले होते. जरी त्या विजयाला भ्रातृवधाच्या दु:खाची किनार होती तरी सर्वजण मनोमन आनंदित झालेले होते. ते आनंदाच्या भरात दुर्योधनाची निंदा करत होते. पूर्वी श्रीकृष्णांनीही दुर्योधनाच्या कृत्याचा अनेकवेळा पाढा वाचला होता. पण आता दुर्योधन मृतप्राय अवस्थेत होता. मांड्या तुटून धरणीवर पडलेला होता. आता त्याची निंदा करणे म्हणजे मेलेल्या शत्रूला पुन्हा मारण्यासारखे होते. म्हणून श्रीकृष्णांनी पांडवपक्षातील लोकांना अशी निंदा न करण्य़ास सांगितले व छावणीच्या दिशेने प्रस्थान ठेवण्यास सांगितले.
पांडव जसे जाण्यास निघाले तसा दुर्योधनाचा क्रोध उफाळून आला. त्याने या युद्धात पांडवांनी अधर्माने केलेल्या वधाची यादी त्याने सादर केली व त्यासाठी श्रीकृष्णांना जबाबदार धरले कारण ही सर्व कृत्ये पांडवांनी श्रीकृष्णांच्या आदेशानुसारच केली होती. तो श्रीकृष्णांना म्हणाला, “तू अनार्य आहेस. आम्ही स्वधर्माने वागत असता तूच पांडवांच्याकडून आमचा वध करवला आहेस.”
मृत्यूच्या दारात उभा असून सुद्धा त्याला आपल्या वागण्य़ाचा पश्चात्ताप होत नव्हता. उलट तो स्वत:ला स्वधर्माचे पालन करणारा म्हणवून घेत होता. त्याचे ते बोलणे ऐकून श्रीकृष्ण चिडले व पुन्हा त्यांनी त्याच्या पुढ्यात त्यांनी केलेल्या अधर्माची कृत्ये सादर केली. व हा जो त्यांचा दारुण पराभव झाला व सर्व वीरांना मृत्यु प्राप्त झाला त्याचे कारण म्हणजे एकच - दुर्योधनाचे अधर्माने वागणे असे त्यांनी ठासून सांगितले.
लोभेनातिबलेन त्वं तृष्णया च वशीकृत: ।
कृतवानस्यकार्याणि विपाकस्तस्य भुज्यताम् ॥६१-४९॥शल्यपर्व॥
“अत्यंत प्रबल लोभाला व हव्यासाला वश होऊन तू जी अयोग्य कार्ये केली आहेस त्याचे फळ तू भोग.”
तरीही भीष्म, द्रोण, कर्ण यांना अधर्माने मारल्याबद्दल पांडवपक्षातील सर्वांनाच अपराधी वाटत होते. तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की भीष्म, द्रोण, कर्ण वा दुर्योधन ह्यांच्यापैकी कोणालाही धर्मानुकूल सरलतेने मारता येणे शक्य नव्हते. म्हणून -
मयानेकैरुपायैस्तु मायायोगेन चासकृत् ।
हतास्ते सर्व एवाजौ भवतां हितमिच्छता ॥६१-६३॥शल्यपर्व॥
“आपणा सर्वांचे हित व्हावे या हेतूने मी वारंवार मायेचा प्रयोग करून अनेक उपायांनी या युद्धात या सर्वांचा वध केला आहे.” पुढे ते म्हणतात की युद्धात जर अशाप्रकारचे कपट केले नसते तर तुम्हाला जय कसा मिळाला असता ? तेव्हा या गोष्टीचा खेद करण्य़ाचे काहीही कारण नाही. शक्तिशाली शत्रूंना नाना प्रकारच्या उपायांनी व कूटनीतीनेच मारावे लागते. असुरांचा नाश करतांना देवतांनी सुद्धा याच मार्गाचा आश्रय केला होता. आणि श्रेष्ठ लोक ज्या मार्गाने जातात त्याचेच लोक अनुकरण करत असतात.” श्रीकृष्णांनी जर या कृत्याने पाप लागणार असेल तर या पापाचा सर्व भार ‘मीच यांचा वध केला’ असे म्हणून जणु स्वत:च्या शिरावर घेतला. या त्यांच्या बोलण्याने सर्वांच्याच मनातील अपराधीपणाची भावना नाहीशी झाली.
कृपाचार्यांनी जेव्हा दुर्योधनाला संधी करण्य़ाचा सल्ला दिला होता तेव्हा त्यानेही आपल्या तोंडाने आपण केलेल्या अपराधांची कबुली दिली आहे व अशा परिस्थितीत आपण संधी जरी केला तरी पांडव आपल्यावर विश्वास कसा ठेवतील असा प्रश्न त्यांना विचारला आहे. त्यामुळे आपल्यापुढे युद्ध हाच एकमेव पर्याय असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
युद्धातील सर्व हत्यांची जबाबदारी श्रीकृष्णांनी स्वत:च्या शिरावर घेतल्यावर पांडव नि:शंक होऊन शिबिरात परतले. शिबिरात परत आल्यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, “अर्जुना, तू धनुष्यबाण घेऊन तू आधी उतर, नंतर मी उतरीन.” अर्जुनाने त्याचप्रमाणे केले. अर्जुन उतरल्यावर मग श्रीकृष्णांनी घोड्यांचा लगाम सोडून दिला व ते रथातून खाली उतरले. श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाच्या रथावरील ध्वजस्वरूप दिव्य वानर अंतर्धान पावला. आणि नंतर तो दिव्य रथ घोड्यांसहित जळून भस्म झाला. युद्धामधे नाना अस्त्रांमुळे तो रथ आधीच दग्ध झालेला होता. केवळ श्रीकृष्ण त्यात बसलेले होते म्हणून तो जळला नाही आता जेव्हा श्रीकृष्णांनी तो रथ सोडून दिला तेव्हा तो भस्मसात झाला. ज्या कार्याकरता अग्नीने तो रथ अर्जुनाला दिला होता ते कार्य पूर्ण झाले होते. त्यामुळे अग्नीने तो रथ जणु परत नेला.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment