जांबवानाने हनुमानांना प्रेरणा दिल्यावर हनुमानांना आत्मतेजाची खात्री पटली. आपल्या महान वेगाबद्दल विश्वास उत्पन्न झाला व त्यांनी आपले विराट रूप उत्पन्न केले. ते वानरांना म्हणाले, “अत्यंत शीघ्र वेगाने जाणार्या त्या शीघ्रगामी महात्मा वायूंचा मी औरस पुत्र आहे आणि उड्डाण करण्यात त्यांच्या समान आहे. कित्येक हजार योजनापर्यंत पसरलेल्या मेरूगिरीची मी विश्राम न घेता हजारो वेळा परिक्रमा करू शकतो. आपल्या भुजांच्या वेगाने समुद्राला विक्षुब्ध करून त्याच्या जलाने मी पर्वत, नद्या आणि जलाशयांसहित संपूर्ण जगताला आप्लावित करू शथकतो. वरूणाचे निवासस्थान असलेला हा महासागर माझ्या मांड्यांच्या आणि पोटर्यांच्या वेगाने विक्षुब्ध होऊन जाईल आणि याच्यात राहाणारे मोठ मोठे ग्राह वर येतील. महान् वेगाने महासागरास ओलांडून मी अवश्य त्याच्या पार पोहोचून जाईन. ’कपिवरांनो ! तुम्ही पहाल की मी महागिरि मेरूसमान विशाल देह धारण करून स्वर्गाला झाकून टाकत आणि आकाशाला गिळून टाकीत असल्याप्रमाणे पुढे जाईन. मेघांना छिन्नभिन्न करून टाकीन, पर्वतांना हलवून सोडीन आणि एकचित्त होऊन उड्डाण करून पुढे गेल्यावर समुद्रालाही सुकवून टाकीन”. असे म्हणून कपिवर हनुमान महेंद्र पर्वतावर चढून गेले.
सर्व वानरांनी हातपाय गाळले असता एकट्या हनुमानांनी समुद्रोल्लंघनाचे धाडस केले.
देवजातिविशेष ज्या आकाशमार्गाने संचार करीत असतात तो मार्ग त्यांनी निवडला. प्रथम इंद्र, सूर्य, वायु, ब्रह्मदेव यांना नमस्कार केला. पूर्वाभिमुख होऊन त्यांनी आपला पिता वायुदेवाला नमस्कार केला व महामेघाप्रमाणे गर्जना केली. दूरचा मार्ग अवलोकन करण्यासाठी आकाशाकडे पहात पहात हृदयात प्राणवायूचा निरोध केला आणि त्यांनी आकाशात उड्डाण केले. जातांना ते सर्व वानरांना म्हणाले की, ‘मी रामांनी सोडलेल्या बाणाप्रमाणे वायुवेगाने लंकेमधे जाईन व वैदेहीचा शोध घेईन.” अशा जबर आत्मविश्वासानेच हनुमानांनी कार्यास आरंभ केला होता.
No comments:
Post a Comment