Tuesday, April 2, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २२

कर्णाच्या शक्तीने घटोत्कचाचा वध -
    कर्णाला जन्मत:च कवच व कुंडले प्राप्त झालेली असल्यामुळे तो अवध्य होता. त्यात त्याने अर्जुनवधाची दुर्योधनासमोर प्रतिज्ञा केली होती. त्यामुळे युधिष्ठिराला सतत चिंता वाटत असे. त्यामुळे अर्जुन जेव्हा पाशुपतास्त्र मिळवून इंद्रलोकात गेला होता त्यावेळी लोमशमुनींबरोबर इंद्राने युधिष्ठिराला निरोप पाठवला होता की -
    यच्चापि ते भयं कर्णान्मनसिस्थमरिन्दम ।
    तच्चाप्यहरिष्यामि सव्यसाचिन्युपागते ॥९१-२३, २४॥वनपर्व॥
इंद्राने सांगितले की कर्णाविषयी तुझ्या मनात जी भिती आहे त्या भीतीचा नाश मी अर्जुन तुमच्याकडे परत आल्यावर करीन. त्याप्रमाणे ब्राह्मणाचे ईप्सित कर्ण पुरे करतो हे जाणून इंद्र कर्णाकडे ब्राह्मणाचे रूप घेऊन त्याची कवचकुंडले मागण्याकरता आला. सूर्याने आपला पुत्र कर्ण याला ह्याची आधी सूचना दिलेली असूनही कर्ण दान देण्याच्या आपल्या व्रतावर दृढ राहिला होता. तेव्हा सूर्याने त्याच्या बदल्यात इंद्राकडून एखादे अस्त्र मागून घेण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे कर्णाने इंद्राकडे कवचकुंडलांच्या बदल्यात अमोघ शक्तीची याचना केली. या शक्तीचे सामर्थ्य असे होते की इंद्र दैत्यांना ठार मारण्यासाठी ही शक्ती त्यांच्यावर सोडत असे तेव्हा दैत्यांना ठार मारून ती शक्ती पुन्हा त्याच्या हातात येत असे. इंद्राने त्याला ती शक्ती दिली व वर दिला की, “तू एका बलवान शत्रूला हिच्या सहाय्याने मारू शकशील व नंतर ती पुन्हा माझ्या हातात येईल. आणि जेव्हा सर्व अस्त्र-शस्त्र संपतील व प्राणसंकटाची स्थिती उत्पन्न होईल त्याचवेळी या शक्तीचा उपयोग तुला करता येईल. नाहीतर ती शक्ती तुझाच नाश करेल.”
    इंद्राने हेही सांगितले होते की, ‘तू ज्या शत्रुसाठी ही अमोघ शक्ति मागून घेत आहेस त्याचे रक्षण स्वत: परमात्मा श्रीकृष्ण करत आहेत.” इंद्राने असे जरी सांगितले असले तरी अर्थातच कर्ण त्या शक्तीच्या सहाय्याने अर्जुनाचाच वध करू इच्छित होता.
    महायुद्धाच्यावेळी कौरवांच्या बाजूने लढणारा अलयुध राक्षस रात्रीच्या वेळी भीमाशी भयंकर युद्ध करत होता. ते पाहून श्रीकृष्णांनी घटोत्कचाला त्याला प्रथम अलयुधाचा वध करण्यास सांगितले. त्याप्रमाणे घटोत्कचाने अलयुधाचा वध केला व नंतर तो प्राणपणाने कर्णाशी लढायला सिद्ध झाला. घटोत्कच मायायुद्ध करण्यात पटाईत होता. तो मधेच अदृश्य होत असे व शिला, वज्र, प्रास, खड्ग, वीज वगरे अनेक शस्त्रांचाचा अदृश्यपणे वर्षाव करत असे. त्याच्या ह्या शस्त्रप्रहारांनी दुर्योधनाची सेना आर्त झाली. कर्णालाही तो अस्त्रवर्षाव आपल्या बाणांच्या सहाय्याने थांबवता आला नाही. त्याची दिव्यास्त्रे घटोत्कचाच्या मायेने नष्ट होत होती. शेवटी दुर्योधनाच्या सांगण्यावरून अर्जुनासाठी राखून ठेवलेली शक्ती त्याला घटोत्कचावर सोडावी लागली त्यामुळे घटोत्कचाचा वध झाला.
    कर्णाकडे ती शक्ती होती त्यामुळे श्रीकृष्णांना रात्रंदिवस चिंता सतावत होती. ती शक्ति त्याच्याकडे होती तोपर्यंत श्रीकृष्णांनी अर्जुनाचे कर्णाशी द्वैरथ युद्ध होऊ दिले नाही. अर्जुनासमोर कर्ण आला की श्रीकृष्ण त्याला मोहित करत होते व कर्ण ती शक्ती अर्जुनावर सोडू शकत नव्हता. ते दरवेळी कोणाला ना कोणाला तरी कर्णाबरोबर युद्ध करण्य़ास पाठवत राहिले. नंतर रात्रीच्या वेळी चाललेल्या त्या युद्धात घटोत्कचाशिवाय कर्णाला कोणी पीडित करू शकले नसते म्हणून श्रीकृष्णांनी घटोत्कचाला त्याच्याशी युद्ध करावयास लाऊन कर्णाला ती शक्ती घटोत्कचावर चालवण्य़ास भाग पाडले.
    घटोत्कच हा भीमाचा हिडिंबेपासून झालेला पुत्र होता. पांडव वनवासात असतांना ह्याने पांडवांची सहायता केली होती. अर्जुन तपश्चर्येकरता निघून गेल्यावर हा पांडवांच्या बरोबर काम्यक वनात राहिला होता. गंधमादन पर्वतावर जाण्याच्या वेळी त्याने खूप मदत केली होती. त्यामुळे पांडवांना दु:ख झाले होते. पण श्रीकृष्ण मात्र आनंदात मग्न होऊन सिंहनाद करू लागले व नाचू लागले. पांडवांना ही गोष्ट विचित्र वाटली एरवी पांडवांच्या दु:खाने दु:खी होणारे श्रीकृष्ण मात्र आज पांडवांचा पुत्र धराशायी झाल्याबद्दल आनंदाने बेहोष होऊन नाचत होते. 

    अर्जुनाने त्याचे कारण विचारताच श्रीकृष्ण म्हणाले, “कर्ण कार्तिकेयाप्रमाणे शक्तिशाली आहे. तुझ्या हितासाठी इंद्राने त्याची कवचकुंडले मागून घेतली त्यामुळे त्याचे बळ कमी झाले होते, पण बदल्यात त्याला शक्ती दिली होती व त्याने एका शत्रूचा वध तू करू शकशील असा वरही दिला होता. ती शक्ति त्याने तुझ्यासाठीच राखून ठेवली होती. आता ती शक्ति घटोत्कचावर पडल्यामुळे आता त्याचे हात रिकामे झाले आहेत व तुला त्याच्यापासून काहीही भय नाही.  जरासंध, शिशुपाल व एकलव्य या तिघांना मी युद्धाआधीच ठार मारण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबिले. कारण जर ते आता जिवंत असते तर ते दुर्योधनाच्या पक्षाला मिळाले असते व ते तिघे व कर्ण मिळून तुमच्या सेनेला भारी पडले असते. मग तुम्हाला विजयाची आशाच करायला नको होती. मायावी अलयुध घटोत्कचाकरून मारविला व कर्णाच्या शक्तीने घटोत्कचाचा नाश केला. जर कर्णाने आज त्याला मारले नसते तर मलाच एक दिवस त्याचा वध करावा लागला असता. कारण तो ब्राह्मणांचा व यज्ञाचा द्वेष करणारा पापात्मा होता. ‘ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव’ जे धर्माचा लोप करतात ते सर्व प्राणी माझ्यासाठी वध्य आहेत.

    सात्यकीला हे सर्व सांगून भगवंत म्हणाले - “मला अर्जुनाच्या रक्षणाची जितकी आवश्यकता वाटते तितकी आई, वडील किंवा तुझ्यासारख्या बांधवांची किंवा माझ्या स्वत:च्या प्राणांच्या रक्षणाची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. त्रैलोक्याच्या राज्यापेक्षासुद्धा अत्यंत दुर्लभ वस्तु असेल तर ती सुद्धा मी अर्जुनाशिवाय उपभोगू इच्छित नाही. त्यामुळे आज कर्ण शक्तिविरहित झाला हे पाहून मला एखाद्याला आपली प्रिय व्यक्ती मृत्यु पावली असता ती जिवंत होऊन आल्यावर जितका आनंद होईल तसा आनंद झाला आहे.”

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment