पंधरा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर भीष्म व द्रोणांचा वध झाला होता. कौरवांचे तीन चतुर्थांश बळ कमी झाले होते. विजय आटोक्यात आला होता. आणि अर्जुन युधिष्ठिराचाच वध करण्य़ास उद्युक्त झाला होता. श्रीकृष्णांनी त्याचा धिक्कार केला व त्याला म्हणाले, “तू अडाणी आहेस. करण्यायोग्य कार्य जो असाध्य मानतो व जी कर्मे साध्य होणे सुलभ आहे पण निषिद्ध असतात ती कर्मे जो मनुष्य करतो त्याला अधम म्हटले आहे. सामान्य मनुष्यासारखा तू किंकर्तव्यमूढ कसा काय झालास ? आपल्या धर्मज्ञ भावाचाच वध करण्यास उद्युक्त झालास ? आधी तू एखाद्या अजाण मुलासारखी प्रतिज्ञा केलीस व त्य़ासाठी आता मूर्खपणे अधर्मयुक्त कृत्य करण्य़ास तयार झाला आहेस. अरे धर्माचे स्वरूप सूक्ष्म आहे. एकदा एका व्याधाने एका आंधळ्या पशूला ठार मारले तर त्याला स्वर्गात नेण्यासाठी विमान आले. कारण त्या पशूने पूर्वजन्मी खूप तपश्चर्या करून सर्व प्राण्यांचा संहार करण्याकरता वर मागून घेतला होता. म्हणून ब्रह्मदेवाने त्याला आंधळ्या पशूचा जन्म दिला व त्याचा व्याधाने वध केला ही चांगलीच गोष्ट झाली, म्हणून तो व्याध वध करूनही स्वर्गात गेला. उलट कौशिक मुनी तप करत असत. त्यांनी नेहेमी सत्य बोलण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांनी डाकूंना घाबरून लपून बसलेल्या मनुष्यांचा पत्ता खरे बोलायचे म्हणून डाकूंना सांगितला. व डाकूंनी त्य़ा लोकांना ठार मारले. म्हणून कौशिक ऋषींना तप करून सुद्धा नरकप्राप्ती झाली. तेव्हा कोणतेही कार्य करायचे ते विचार करूनच केले पाहिजे.” अर्जुनालाही पटले की युधिष्ठिर वध करण्यास योग्य नाहीत. पण यातून तोडगा कसा काढायचा असा त्याला प्रश्न पडला होता. म्हणून त्याने श्रीकृष्णांना विचारले की माझी प्रतिज्ञाही मोडता कामा नये व युधिष्ठिरांचा वधही होता कामा नये असा मार्ग मला सांग.” तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की युधिष्ठिरांनी जे तुला अप्रिय वचन बोलले आहे ते ते कर्णाकडून घायाळ झाल्यामुळे केले आहे. आणि पापी कर्णाचा सामना तुझ्य़ाशिवाय कोणी करू शकत नाही हे ते जाणून आहेत. आणि कर्णाचा मृत्यु झाल्यावर कौरव सहजच पराभूत होणार आहेत. म्हणून तुझ्या मनात राग निर्माण करण्याकरता ते तुला असे बोलले आहेत. तेव्हा युधिष्ठिर वध करण्य़ास योग्य नाहीत व तुलाही तुझ्या प्रतिज्ञेचे पालन करायचे आहे तेव्हा इतके दिवस तुम्ही सर्व भावांनी युधिष्ठिरांचा सन्मान केला आहे तेव्हा आता तू त्यांचा थोडासा अपमान कर. तू युधिष्ठिराला नेहेमी आदरार्थी हाक मारतोस आता त्यांना ‘तू’ असे एकेरी संबोधन वापर. अपमान करणे हे त्यांचा वध केल्यासारखेच आहे. नंतर तू त्यांच्या पाया पडून त्यांची क्षमा माग. युधिष्ठिर धर्मराज आहेत. ते तुला क्षमाच करतील. अशा प्रकारे तू मिथ्याभाषण व भ्रातृवध ह्या दोन्ही पापांपासून मुक्त होशील.”
श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन युधिष्ठिराला खूप कठोर वचन बोलू लागला. त्याची ती वचने ऐकून युधिष्ठिराला वाटू लागले की आपण राजा होण्य़ास योग्य नाही. तेव्हा तो वनात जाण्याची इच्छा करू लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला खरी हकिकत सांगितली व आपल्यास व अर्जुनास क्षमा करण्यास सांगितले. श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या पाया पडले.
आपण युधिष्ठिराला अपमानास्पद बोललो म्हणून आता अर्जुनाला विषाद वाटू लागला. आपल्या हातून पाप घडले आहे असे तो मानू लागला. तेव्हा श्रीकृष्ण किंचित हसून अर्जुनाला म्हणाले, अरे राजाला केवळ एकेरी नावाने संबोधलेस तर तुला इतका शोक होतो आहे. मग त्याचा वध केला असतास तर काय झाले असते ? तेव्हा आता युधिष्ठिराची क्षमा माग. आणि कर्णाचा वध करून युधिष्ठिराच्या मनात अत्यानंद निर्माण कर.” तेव्हा अर्जुनाने लज्जित होऊन युधिष्ठिराची क्षमा मागितली. आपल्या पायावर डोके ठेऊन रडणार्या अर्जुनाला त्यांने छातीशी धरले. व त्याला कर्णाचा वध करण्य़ास सांगितले. अर्जुनाने कर्णाचा वध करण्य़ाची प्रतिज्ञा केली व पुन्हा श्रीकृष्णांसह रणांगणावर गेला.
इतके दिवस भीष्मांच्या उपस्थितीत न लढण्याचा कर्णाचा निश्चय असल्यामुळे कर्ण रणांगणावर आलाच नव्हता. भीष्मवधानंतर तो रणात उतरला पण त्याच्याजवळील शक्तीचा घटोत्कचावर प्रयोग होईपर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाचे कर्णाशी युद्ध होऊ देत नसत किंवा यदाकदाचित कर्ण सामोरा आलाच तर त्याला ते मोहित करत असत. त्यामुळे कर्ण अर्जुनावर शक्तीचा प्रयोग करू शकत नसे. आता कर्ण शक्तिविरहित झाला असल्यामुळे आता त्याच्याशी युद्ध करण्याचा अर्जुनाचा मार्ग मोकळा झाला होता.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment