सुग्रीव सीताकार्याच्या शोधात उशीर लावत आहे हे पाहून लक्ष्मण क्रुद्ध होऊन आला आहे, हे ऐकताच सुग्रीव घाबरला. आपण रामांचा कोणताही अपराध केलेला नसतांना अथवा त्यांना कोणातीही दुर्वचने बोललो नसतांना राम आपल्यावर क्रुद्ध झालेले आहेत हे ऐकून त्याला चिंता वाटू लागली. मैत्री करणे सोपे आहे पण ती निभावणे कठिण आहे. कारण थोड्याशा कारणानेही मैत्रीत अंतर पडू शकते. भीतीमुळे आपल्यामधे महात्मा रामांनी केलेल्या उपकारांची भरपाई करण्य़ाची शक्ती नाही असे त्याला वाटू लागले. तेव्हा सर्व मंत्र्यांच्या समक्ष युक्तीचा आधार घेऊन हनुमान बोलू लागले. वाल्मीकींनी ‘उवाच स्वेन तर्केण’ असे म्हटले आहे. त्यांनी युक्तीने युक्त असे वाक्य बोलून प्रथम सुग्रीवाच्या मनातील भीती घालवली. हनुमान म्हणाले, “आपण मित्राने केलेला उपकार विसरलेला नाही यात आश्चर्य करण्यासारखे काहीही नाही. कारण सज्जनांचा हा स्वभावच असतो. श्रीराम आपल्यावर कुपित झालेले नाहीत. श्रीरामांनी शोभा-संपत्तिची वृद्धि करणार्या आपला भाऊ लक्ष्मण यांस जे आपल्यापाशी पाठवले आहे त्यास सर्वथा आपल्या बद्दलचे प्रेम कारण आहे. आपण समयज्ञ अहात. तरीही आपण सीतेचा शोध करण्यासाठी जो समय निश्चित केला होता, त्याचा आपल्याला सध्या प्रमादात पडल्यामुळे विसर पडला आहे. पहा बरे, वर्षा ऋतु संपून शरद ऋतु सुरु झाला आहे. वानरराज ! राजांसाठी विजय यात्रेची तयारी करण्याचा समय आलेला आहे; परंतु आपल्याला तर काही पत्ताही नाही. यावरून स्पष्ट प्रतीत होत आहे की आपण प्रमादात पडला आहात, म्हणून लक्ष्मण येथे आले आहेत. महात्मा राघवांच्या पत्नीचे अपहरण झालेले आहे म्हणून ते फार दुःखी आहेत. म्हणून जर लक्ष्मणांच्या मुखाने त्यांचे काही कठोर वचन ऐकावे लागले तरी आपण ते गुपचुप सहन करावयास पाहिजे. आपल्याकडून अपराध झाला आहे. म्हणून हात जोडून लक्ष्मणांना प्रसन्न करण्याशिवाय आपल्यासाठी दुसरे आणखी काही उचित कर्तव्य मला दिसत नाही.” (४-३२-१० ते १८) हनुमानांनी स्पष्ट शब्दात सुग्रीवाकडून घडलेल्या अपराधाची त्याला जाणीव करून दिली व त्यासाठी लक्ष्मणाची कठोर वचने ऐकून घ्यायची सुग्रीवाच्या मनाची तयारी केली. मंत्र्यांनी राजाला हितकारी गोष्ट सांगितली पाहिजे हे लक्षात घेऊन हनुमानांनी सुग्रीवाची कानउघडणी केली आहे. हनुमान म्हणाले, “भगवान् राघव जर क्रोध करून हातात धनुष्य घेतील तर देवता, असुर, गंधर्वासहित संपूर्ण जगतास आपल्या वश करू शकतात. राजन ! यासाठी आपण पुत्र आणि मित्रांसह मस्तक नमवून त्यांना प्रणाम करावा आणि आपल्या प्रतिज्ञेवर अढळ राहावे. ज्याप्रमाणे पत्नी आपल्या पतीच्या स्वाधीन राहाते त्याप्रकारे आपण सदा श्रीरामांच्या अधीन राहावे. ’वानरराज ! राम आणि रामानुज यांच्या आदेशाची आपण मनानेही उपेक्षा करता कामा नये. देवराज इंद्राप्रमाणे तेजस्वी लक्ष्मणासहित श्रीराघवांच्या अलौकिक बळाचे ज्ञान तर आपल्या मनाला आहेच.’ ॥४-३२-१८ ते २२॥
सुग्रीवानेही हनुमानाचे वचन मानले. रामांची महत्ता सांगून आपल्यावर श्रीरामांनी केलेल्या उपकाराचा पुनरुच्चार केला त्याने लक्ष्मणाची क्षमा मागितली व त्याने त्याला प्रसन्न करून घेतले. हनुमानांच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मणाजवळ क्षमायाचना करून सुग्रीवाने सर्व वानरसैन्याला हजर होण्य़ास सांगितले व त्या सैन्याची चार गटात विभागणी करून त्याला चारही दिशांना पाठवले. रावण सीतेला दक्षिण दिशेला घेऊन गेला होता. त्यामुळे दक्षिण दिशेला त्याने हनुमानाची योजना केली. कारण हनुमानच कार्य सिद्धीस नेईल असा त्याला भरंवसा वाटत होता. कारण पृथ्वी, अंतरिक्ष, आकाश, देवलोक, किंवा पाणी या ठिकाणी हनुमानांच्या गतीला विरोध नाही हे त्याला ठाऊक होते. असुर, गंधर्व, नाग, मनुष्य, देवता, समुद्र तसेच पर्वतांसहित संपूर्ण लोकांचे हनुमानांना ज्ञान होते. सर्वत्र अबाधित गति, वेग, तेज आणि उत्साह - हे सर्व सद्गुण त्यांच्यात होते व ते आपल्या पित्याप्रमाणे महापराक्रमी होते. या भूमंडलात त्यांची बरोबरी करू शकणारा कोणीही वीर नव्हता. बल, बुद्धी, पराक्रम व देशकालाचे ज्ञान त्यांच्या ठिकाणी एकवटले होते. तसेच त्यांचे वर्तन नीतीचे होते. त्यांच्या तेजाची बरोबरी करू शकणारा कोणीही वीर नव्हता. त्यामुळे हनुमानच सीताशोधाच्या कार्यात यश मिळवील असा भरंवसा रामांनाही वाटत होता. हनुमान रामांना प्रणाम करून रामांनी दिलेली अंगठी घेऊन कामगिरीवर निघाले. रामांनीही त्यांना विशुद्ध मनाने निरोप दिला व आपण त्यांच्या पराक्रमावर विसंबून आहोत असे पुन्हा पुन्हा सांगितले.
सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment