Sunday, March 31, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २०

भगदत्ताबरोबर युद्ध - 

    युद्धात सारथ्याचे काम हे कौशल्याचे आहे. कारण शत्रू घोड्यांवर, सारथ्यावर बाण मारून रथाचे तुकडे करून टाकीत असे. त्यामुळे रथीला ठार मारणे अधिक सुलभ होई. त्यामुळे शत्रूच्या बाणांपासून स्वत:ला, रथीला व घोड्यांना वाचवावे लागत असे. श्रीकृष्ण हे असेच कुशल सारथी होते. अर्जुनाचे संशप्तकांपैकी भगदत्ताबरोबर युद्ध चालले होते. भगदत्त अर्जुनावर बाणांच्या फैरी झाडत होता व ते बाण आपल्यापर्यंत पोचण्याआधीच अर्जुन ते बाण छिन्नविच्छिन्न करून टाकत होता. भगदत्ताच्या हत्तीला चुकवत श्रीकृष्ण रथ हाकत होते. शेवटी रागावलेल्या भगदत्ताने वैष्णवास्त्र अभिमंत्रित करून अर्जुनाच्या छातीवर सोडले. ते अस्त्र सर्वांचा विनाश करणारे होते. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याचा घाव स्वत:च्या छातीवर झेलला. ते अस्त्र श्रीकृष्णांनी छातीवर झेलताच त्याचे वैजयंतीहारात रूपांतर झाले. 

    आपण त्या घावाचा प्रतीकार करण्यास समर्थ असतांना व श्रीकृष्णांची युद्ध करणार नाही अशी प्रतिज्ञा असतांना श्रीकृष्णांनी तो घाव आपल्या छतीवर झेलावा हे अर्जुनाला आवडले नाही. अर्जुनाने तसे बोलून दाखवताच श्रीकृष्ण त्याला म्हणाले की पूर्वी पृथ्वीने मला प्रार्थना केली होती हे अस्त्र आपला पुत्र नरकासुराला द्यावे. म्हणून मी हे अस्त्र नरकासुराला दिले होते. त्याच्याकडून ते भगदत्ताला मिळाले. हे अस्त्र भागदत्ताकडे असल्यामुळे भागदत्ताला जिंकणे अवघड होते.  म्हणून अर्जुनाच्या रक्षणाकरता व भागदत्ताला अस्त्ररहित करण्य़ाकरता आपण ह्या अस्त्राचा घाव आपल्या छातीवर झेलला. 

जयद्रथवध - 

    नंतर संशप्तकांबरोबर अर्जुनाला लढाईत गुंतवून कौरवांनी चक्रव्यूहाची रचना केली. अर्जुनाव्यतिरिक्त चक्रव्यूहामधे युद्ध करण्याची कला कोणी जाणत नव्हते. अर्जुनपुत्र अभिमन्यु याला चक्रव्यूहाचा भेद कसा करायचा ते माहीत होते, पण त्य़ातून बाहेर कसे पडायचे ते माहीत नव्हते. पण तरीही अभिमन्यूने चक्रव्यूहभेद करायचे ठरवले. भीम, युधिष्ठिर त्याचे रक्षण करणार होते. पण अभिमन्यु चक्रवूह भेदून आत गेल्यावर भीमादी पांडवांना त्याच्या रक्षणासाठी जयद्रथाने पोहोचू दिले नाही व द्रोण, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, बृहद्बल व कृतवर्मा अशा सहा वीरांनी मिळून एकाकी असहाय अवस्थेत अभिमन्यूला ठार मारले. हे कौरवांचे नियमबाह्य वर्तन होते. तेव्हा अर्जुनाने दुसर्‍या दिवशी जद्ररथाला ठार मारण्याची प्रतिज्ञा केलीच, पण त्याबरोबर अशी प्रतिज्ञा केली की सूर्यास्ताच्या आत जर जयद्रथाचा वध केला नाही तर आपण प्रज्वलित अग्नीत प्रवेश करू. शोकाच्या भरात अर्जुनाने अशी प्रतिज्ञा केली, पण त्यामुळे कौरवांचे फावले. एक दिवस जयद्रथाचे रक्षण केले की झाले. मग त्यांचा मुख्य शत्रु अर्जुन हा स्वत:च नाश पावणार होता. 

    आपल्या भावांचे व आपले मत न विचारताच अशी घोर प्रतिज्ञा करणे हे अर्जुनाचे हे दु:साहस श्रीकृष्णांनाही आवडले नाही. आधीच सैन्यबळ कमी. त्यात अविचाराने अशा प्रतिज्ञा जर पांडव करू लागले तर ते उपहासास पात्र ठरतील. श्रीकृष्णांनी गुप्तहेरांकरवी कौरव दळातील माहिती काढली होती की अर्जुनाची प्रतिज्ञा कळताच जयद्रथ घाबरला. त्याने सर्व कौरवांना आपले रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा कर्ण, भूरिश्रवा, अश्वत्थामा, वृषसेन, कृपाचार्य व द्रोण हे त्याचे रक्षण करणार आहेत द्रोणाचार्य असा व्यूह रचणार आहेत की मध्यभागी असलेल्या जयद्रथापर्यंत अर्जुन पोचूच शकणार नाही. तेव्हा त्या सहा महारथींना जिंकल्याशिवाय जयद्रथाला ठार मारता येणार नाही.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Saturday, March 30, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १९

श्रीकृष्णांची कर्णाला पांडवांच्या पक्षाकडे वळवण्याची पराकष्ठा - 

    युद्ध सुरू होण्यापूर्वी युधिष्ठिराने कवच काढले, शस्त्रे खाली ठेवली, रथातून उतरला व भीष्मांच्या रोखाने पायी चालू लागला. त्याच्या या कृतीने बाकीचे सर्व पांडव बुचकळ्यात पडले. तेही त्याच्या मागोमाग जाऊ लागले. युधिष्ठिराने भीष्मांना नमस्कार केला व युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. तसेच द्रोणाचार्य, कृपाचार्य यांचाही आशीर्वाद घेतला. युधिष्ठिर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत होता तोपर्यंत श्रीकृष्ण कर्णाकडे गेले. 

    युद्धाच्या आधी जेव्हा दोन्ही पक्षामधे रथी अतिरथी कोण कोण आहेत हे भीष्म दुर्योधनाला सांगत असतांना कर्ण दोनतीनदा अर्जुनाबरोबर झालेल्या युधातून पळून आला होता म्हणून त्यांनी कर्णाला अर्धरथी म्हटले होते. त्याचा राग येऊन कर्णाने प्रतिज्ञा केली होती की ‘जोपर्यंत भीष्म जिवंत आहेत तोपर्यंत मी युद्ध करणार नाही.’ म्हणून श्रीकृष्ण कर्णाकडे गेले व त्याला म्हणाले की ‘राधेय, भीष्म जिवंत असे पर्यंत तू युद्ध करणार नाहीस असे ऐकून आहे. तर तोपर्यंत तू पांडवांच्या बाजूने लढ. भीष्मांचा वध झाला की पुन्हा तू दुर्योधनाच्या बाजूने लढ.’ अर्थातच कर्णाने ही गोष्ट मान्य केली नाही. कारण तो दुर्योधनाचा सच्चा मित्र होता. बाकीचे भीष्म, द्रोण वा कृपाचार्य ‘अर्थस्य पुरुषो दास:’ असे म्हणून आम्ही कौरवांशी धनाने बांधले गेलेलो आहोत पण मनोमन तुझ्य़ाच विजयाची इच्छा करतो असे युधिष्ठिराला म्हणाले होते पण कर्ण मात्र दुर्योधनाशी प्रेमाने बांधला गेलेला होता. त्यामुळे त्याने श्रीकृष्णांच्या या विनंतीला मान दिला नाही. पण शेवट पर्यंत श्रीकृष्णांनी कर्णाला आपल्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सोडले नाहीत असेच दिसते. 

श्रीकृष्णांचे हातात शस्त्र घेणे - 

    नंतर प्रत्यक्ष त्या घमासान युद्धाला प्रारंभ झाला. भीष्मांच्या अधिपत्याखाली कौरवांची सेना लढत होती. काही वेळा पांडवांची सरशी होत होती तर काही वेळा कौरवांची सरशी होत होती. जेव्हा कौरव पांडवांकडून पराभूत होत असत तेव्हा तेव्हा दुर्योधन संतापत असे भीष्मांना बोल लावत असे, व भीष्मांना आपल्या वाग्बाणांनीघायाळ करत असे. तेव्हा भीष्म आपला पराक्रम दाखवत असत. मग ते पांडवांना आवरता आवरत नसत. पांडवांची सेना त्यांच्या पराक्रमापुढे निष्प्रभ ठरू लागे. 

    दोनदा असे घडले की दुर्योधनाच्या वाग्बाणांनी घायाळ झालेले भीष्म पांडवांवर चाल करून आले. पांडवांची सेना त्यांच्या पराक्रमापुढे निष्प्रभ ठरली व पळून जाऊ लागली तेव्हा तेव्हा सैनिकात नवचैतन्य आणण्य़ासाठी श्रीकृष्णांनी अर्जुनाला भीष्मांशी लढण्यास सांगितले व रथ भीष्मांच्या दिशेला वळवला. ते पाहून युधिष्ठिराची पळून जात असलेली सेना पुन्हा युद्धासाठी परत फिरली. त्यावेळी श्रीकृष्णांचे सारथ्याचे कौशल्य दिसून आले. भीष्म त्यांच्या रथावर बाण सोडत असत, म्हणून श्रीकृष्ण रथ मंडलाकार फिरवत, त्यामुळे भीष्मांचे बाण व्यर्थ गेले. तरीही भीष्मांनी श्रीकृष्ण व अर्जुनाला आपल्या बाणांनी घायाळ केलेच होते. 

    युद्ध सुरू होऊन नऊ दिवस झाले. तरी भीष्म आपला पराक्रम गाजवतच होते. हाजारो रथांचे तुकडे झाले होते. हजारो घोडे, हत्ती निष्प्राण झाले होते जिकडे तिकडे रक्ताची नदी वहात होती. कवच, बाण, पट्टीश, गदा, धनुष्ये छिन्न भिन्न होऊन जिकडेतिकडे विखुरले होते. पांडवांच्या सेनेत घबराहट पसरली. युद्धातून पळून जाणार्‍या राजांना पांडव थोपवून धरू शकत नव्हते. 

    तेव्हा श्रीकृष्णांनी पुन्हा अर्जुनाला डिवचले. “पूर्वी विराट नगरात मोठ्या आवेशाने भीष्मद्रोणांदींना ठार मारायची प्रतिज्ञा केली होतीस ना ? आता ती सत्य करून दाखवण्याची वेळ आलेली आहे. अर्जुना, आता क्षत्रिय धर्माचे स्मरण करू सर्व चिंता सोडून युद्ध कर.” असे म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ पुन्हा भीष्मांच्या दिशेने वळवला. भीष्मांनी अर्जुनाच्या रथावर बाणांचा वर्षाव करण्य़ास सुरवात केली की बाणांनी रथ झाकला गेला. परंतु श्रीकृष्ण न घाबरता धैर्य धारण करून अर्जुनाचे घोडे शीघ्रतेने हाकीत होते. वेगवेगळ्या पवित्र्यात रथ हाकीत असल्यामुळे भीष्मांचे बाण व्यर्थ जात होते. श्रीकृष्णांना अर्जुन मन लाऊन युद्ध करीत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे श्रीकृष्ण संतापले व त्यांनी रथातून खाली उडी घेतली व ते भीष्मांचा वध करण्याच्या इच्छेने त्यांच्यावर धाऊन गेले.  अर्जुनाने श्रीकृष्णांना अडवले, त्यांना त्यांच्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली व भीष्मांना आपण ठार मारू असे वचन दिले. तेव्हा पुन्हा श्रीकृष्ण रथावर परतले. 

    युद्ध सुरू झाल्यापासून भीष्म अविरतपणे पांडवसेनेचा संहार करत होते. शेवटी त्यांनी सांगितलेल्या उपायाप्रमाणेच शिखंडीला पुढे करून अर्जुन व इतरांनी मिळून भीष्मांना बाणशय्येवर झोपवले. सतत दहा दिवस युद्ध करून दहाव्या दिवशी भीष्मांनी विश्रांती घेतली. देह शरशय्येवर होता. पण दक्षिणायन असल्यामुळे त्यांनी उत्तरायणात प्राण सोडण्याचे ठरवले होते. भीष्म पडल्यावर पांडवसैन्यात जोम आला. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराचे अभिनंदन केले. तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिले की, ‘आपणच आमचे आश्रय अहात व भक्तांना अभयदान देणारे अहात. आपल्याच कृपाप्रसादाने विजय प्राप्त होतो.” युधिष्ठिराचे हे बोलणे ‘तवैवैतद्युक्तरूपं वचनं पार्थिवोत्तम’ “नृपश्रेष्ठ, आपले वचन सर्वथा युक्तिसंगत आहे’ असे म्हणून श्रीकृष्णांनी मान्य केले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Friday, March 29, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १८

अर्जुनाला गीतोपदेश -  
    सर्वजण आपापले रथ घेऊन रणांगणाकडे निघाले. अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्णांनी सारथ्य करत होते. त्यांनी त्या रथाच्या घोड्याचे लगाम जसे हातात घेतले तसेच अर्जुनाच्या जीवनरथाचे लगाम सुद्धा आपल्या हातात घेतले. त्यांनी अर्जुनाला दुर्गादेवीची प्रार्थना करायला सांगितले. त्यानुसार अर्जुनाने महिषासुरमर्दिनीचे सुंदर स्तोत्र गायिले व ‘जयो भवतु मे नित्यं त्वत्प्रसादाद् रणाजिरे’, ‘तुझ्या कृपेने रणांगणात माझा नेहेमी जय होऊ दे’ अशी प्रार्थना केली. त्याच्या स्तुतीने प्रसन्न होऊन देवी अंतरिक्षात भगवान श्रीकृष्णांच्या पुढ्यात प्रगट झाली व ‘स्वल्पेनैव तु कालेन शत्रूञ्जेष्यसि पाण्डव’ ‘तू अल्प कालावधीतच शत्रूंना जिंकशील’ असा वर दिला आणि पांडवसैन्य रणांगणाकडे निघाले. रणांगणावर आल्यावर अर्जुनाने श्रीकृष्णांना आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले. कारण त्याला एकंदर दोन्ही सैन्यांची परिस्थिती, शत्रुपक्षातील सैन्याची मांडणी, आघाडीवर असणार्‍या लोकांचे निरीक्षण करावयाचे होते. आणि त्याचे हे वागणे कुशल योद्ध्याप्रमाणेच होते. त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला व कौरव पक्षातील वीर त्याला दाखवले. इतका वेळ युधिष्ठिराला धीर देणारा अर्जुन, प्रत्यक्ष श्रीकृष्ण पाठीशी असतांना व दुर्गादेवीने विजयी होण्याचा आशीर्वाद दिलेला असतांना सुद्धा कौरवांचे सैन्य व त्यात असणारे आपले नातेवाईक पाहून गळाठून गेला. संजयाने जे ‘स्वजनवधामुळे पाप लागेल’ हे बी पेरले होते त्याचा त्याच्या मनात वटवृक्ष झाला. व परिणामी भैक्ष्यकर्म स्वीकारणे बरे असे वाटून हातपाय गाळून धनुष्य टाकून स्वस्थ बसला. नि:शस्त्र अशा आपल्याला कौरवांनी ठार मारले तरी चालेल पण मी लढणार नाही असा त्याचा ठाम निश्चय झाला होता. ‘हे वागणे क्षत्रियाला योग्य नाही, हा अवेळी झालेला मोह बरा नाही, तुझ्या आतापर्यंतच्या कीर्तीचा ह्या वागण्याने नाश होईल, तेव्हा करुणा टाकून युद्धाला उभा रहा’ असे श्रीकृष्णांनी सांगूनही ‘गुरुजनांच्या वधाचे व कुलक्षयाचे पाप लागेल’ हे त्याचे पालुपद चालूच होते. तेव्हा भगवंतांना त्याला उपदेश करून युद्धाला उभे करावे लागले. हाच भगवंतांचा उपदेश ‘श्रीमद्भगवद्गीता’ या नावाने प्रसिद्ध असून तो वैदिक तत्वज्ञानाचा श्रेष्ठ ग्रंथ ठरला आहे. हे फार मोठे कार्य श्रीकृष्णांनी केलेले आहे. त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने नसते तर पांडवांनी युद्ध केलेच नसते व आयुष्यभर त्यांनी जंगलात दिवस काढले असते. 

    भगवंतांनी यात कर्माचे सुंदर विवेचन केले. कर्माचे फळ त्याच्या हेतूवर अवलंबून असते. ‘हे कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे म्हणून अहंकाररहित व फलाची आकांक्षा सोडून केलेल्या कर्माचे फळ कर्त्याला लागत नाही, तेव्हा धनुष्य घे व लढ’ असा थोडक्यात त्यांचा उपदेशाचा आशय होता. आपले तत्वज्ञान त्यांनी अर्जुनाच्या गळी उतरवले. आणि नंतर त्याला विश्वरूप दाखवून सर्व कौरवसेना विश्वरूपाच्या मुखात जात असलेली दाखवली. व सांगितले की मीच काळ आहे व लोकांना ठार मारण्यास मीच येथे प्रवृत्त झालो आहे. तेव्हा 

    तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुक्ष्व राज्यं समृद्धम् ।
    मयैवेव निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥११-३३॥गीता॥

भगवान् म्हणातात की, “अर्जुना, तू ऊठ व शत्रूंना जिंकून यश प्राप्त करून घे. मी यांना ठार मारलेलेच आहे, तू फक्त निमित्तमात्र हो.” शेवटी त्यांनी 

    ‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
    स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥१८-७३॥गीता॥ भीष्मपर्व ४२-७३॥

“हे श्रीकृष्णा आपल्या कृपेमुळे माझा मोह नाहीसा झाला व मला स्मृति प्राप्त झाली आहे. माझा संशय नाहीसा झालेला आहे. आता मी तू सांगशील तसे करीन.” असे त्यांनी अर्जुनाकडून वचन घेतले व मग धैर्याने पांडवसेना कौरवांशी युद्ध करायला लागली.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Thursday, March 28, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १७

    वास्तविक ‘न धरी शस्त्र करी मी’ अशी श्रीकृष्णांनी प्रतिज्ञा केली होती. ते युद्धात प्रत्यक्ष लढाईत भाग घेणार नव्हते. तर त्यांचा युद्धामधे कोणा्त्या प्रकारचा सहभाग होता ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ते अर्जुनाच्या रथाचे सारथी बनणार होते.  आणि युद्धामधे जेवढे महत्व प्रत्यक्ष योद्ध्याला असते तसेच महत्व सारथ्यालाही असते. आणि अर्जुनाच्या केवळ रथाचेच ते सारथी झाले नव्हते तर त्यांनी अर्जुनाच्या जीवनरथाचेच सारथ्य केले होते. त्यामुळे त्यांचा युद्धातील सहभाग हा अमौलिक होता.

    श्रीकृष्ण-शिष्टाईचा काहीही उपयोग झाला नाही. दुर्योधनाने पांडवांना त्यांचे राज्य देण्याचे नाकारले. त्यामुळे आता युद्ध हाच एकमेव पर्याय उरला होता. त्यानुसार दोन्ही सैन्यांची जुळावाजुळवी झाली आणि त्यांनी कुरुक्षेत्रावर कूच केले. 

    युद्ध निश्चित झालेले असले तरी संजयाने जे शिष्टाईच्या वेळी ‘स्वजनवधाने पाप लागेल’ हे बीज पेरले ते पांडवांच्या मनात रुजलेले होते. ते केव्हा ना केव्हा तरी कुणाच्या ना कुणाच्या मनात अंकुरतच होते. कुरुक्षेत्रावर पांडवसेनेचा पाडाव पडला व शिबिरांची उभारणी सुरू झाली. आता युद्धात अवध्य मनुष्यांचा सुद्धा वध करावा लागणार या कल्पनेने युधिष्ठिर दु:खी झाला. युद्ध टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करून सुद्धा त्याचा काहीही उपयोग झाला नाही याबद्दल त्याला वाईट वाटत होते. तो म्हणतो 

    कथं ह्यवध्यै: संग्राम: कार्य: सह भविष्यति ।
    कथं हत्वा गुरून् वृद्धान् विजयो नो भविष्यति ॥१५४-२२॥उद्योगपर्व॥

“जे मारण्य़ास योग्य नाहीत त्यांच्या बरोबर युद्ध करणे उचित होईल का ? वृद्ध गुरुजनांचा वध करून मिळालेला विजय कशा प्रकारचा असेल ?”

    यावर परस्पर अर्जुनानेच उत्तर दिले की श्रीकृष्ण व विदुर आपल्याला अधर्माच्या गोष्टी सांगणारच नाहीत. आणि अशा परिस्थितीत युद्धातून परत फिरणेही योग्य होणार नाही.” त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाचे मत बरोबर आहे असे म्हणून युधिष्ठिराकडे पाहून फक्त हसले.
    पुढे भीष्मांनी रचलेला व्यूह पाहून तो म्हणतो
    ते वयं संशयं प्राप्ता: ससैन्या: शत्रुकर्षण ।
    कथमस्मान्महाव्यूहादुत्थानं नो भाविष्यति ॥२१-५॥भीष्मपर्व॥

    अर्जुना, आपण आपल्या सैन्याबरोबर प्राणसंकटात सापडलो आहोत. या मोठ्या व्यूहापासून आपले रक्षण कसे होणार ? 

    तेव्हाही अर्जुनाने उत्तर दिले की “राजन् जेथे धर्म असतो तेथे विजय असतो. तेव्हा अहंकारशून्य होऊन युद्ध करा. नारदांनीही सांगितले आहे की ‘यत: कृष्णस्ततो जय:’ जेथे कृष्ण आहे तेथे विजय आहे. आणि विजय हे कृष्णाचे एक नाव आहे आणि विनय हा त्यांचा दुसरा अद्वितीय गुण आहे. तेव्हा काळजी करू नका. श्रीकृष्ण आपल्या पक्षाला आहेत तेव्हा आपलाच जय होणार आहे. तेव्हा आपल्याला काहीही चिंता करण्याचे कारण नाही.”

सौ. मनीषा अभ्यंकर.

Wednesday, March 27, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १६

श्रीकृष्णांची दोन्ही पक्षांना मदत -

    शिष्टाईच्या आधीपासूनच सर्वांची जुळावाजुळवी चाललेली होती. जो प्रथम सहाय्य मागायला येईल त्याला मदत द्यायची हा त्याकाळचा नियम होता. त्यामुळे प्रत्येकजणच मदतीसाठी दुसरा पक्ष तिथे पोचण्याच्या आधी आपण पोचण्याचा प्रयत्न करत होता. 

    विराटनगरातून उत्तरा व अभिमन्यु यांचा विवाह आटोपून व कौरवांकडे समेटाकरता दूत पाठवायचे ठरवून श्रीकृष्ण द्वारकेला चालले. दुर्योधनाने गुप्तचरांमार्फत सर्व बातमी काढली होती. तो वायुवेगाने द्वारकेला निघाला. त्याचवेळी अर्जुनही सहाय्य मागण्याच्या हेतूने श्रीकृष्णांच्याकडे आला होता. दोघांनीही पाहिले की श्रीकृष्ण झोपलेले आहेत. श्रीकृष्णांच्या शयनकक्षात प्रथम दुर्योधनाने पाऊल ठेवले. श्रीकृष्ण झोपलेले आहेत असे पाहून तो त्यांच्या उशागती ठेवलेल्या आसनावर बसला. नंतर अर्जुनाने प्रवेश केला तो नम्रतेने हात जोडून श्रीकृष्णांच्या पायापाशी बसला. जाग आल्यावर श्रीकृष्णांना पायापाशी बसलेला अर्जुन प्रथम दिसला. श्रीकृष्णांनी दोघांचाही आतिथ्य सत्कार करून येण्याचे कारण विचारले. तेव्हा दुर्योधनाने सांगितले की भावी युद्धात आपण मला सहाय्य करा. मी आपल्याकडे प्रथम आलेलो आहे व प्रथम जो मदत मागतो त्याला मदत करणे हा धर्म आहे.” तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले, “दुर्योधना, तू पहिल्यांदा आला आहेस ही गोष्ट खरी असली तरी मी प्रथम अर्जुनाला पाहिले आहे. तेव्हा मी दोघांनाही मदत करीन. एका बाजूला माझी ही सर्व विशाल सेना आहे. व दुसर्‍या बाजूला मी एकटा आहे. परंतु ‘अयुध्यमाने संग्रामे न्यस्तशस्त्रोऽहमेकत:’ ‘मी युद्ध करणार नाही वा शस्त्रही धारण करणार नाही ’. या दोन्हींपैकी काय पाहिजे त्याची निवड करायची आहे. आणि अर्जुन हा तुझ्यापेक्षा लहान आहे. तेव्हा निवडीचा पहिला अधिकार त्याचा आहे.” तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांचीच निवड केली. अर्थातच श्रीकृष्णांची सर्व सेना दुर्योधनाला मिळाली. त्यालाही तेच हवे होते. युद्ध न करणारा व एकटा श्रीकृष्ण त्याला नकोच होता. सैन्य मिळाल्यावर दुर्योधन स्वत:ला कृतार्थ मानून हस्तिनापूरला परत गेला. आपण श्रीकृष्णांना का निवडले याचे कारण सांगतांना अर्जुन म्हणतो -

    भवांस्तु कीर्तिमाँल्लोके तद् यशस्त्वां गमिष्यति ।
    यशसां चाहमप्यर्थी तस्मादसि मया वृत: ॥७-३६॥ उद्योगपर्व॥

     भगवन्, आपण संसारात यशस्वी अहात. आपण जेथे असाल तेथे यश मागोमाग येईल. आणि मला यशाची इच्छा आहे. म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. आणि माझी अनेक दिवसांची ही इच्छा आहे की आपण माझे सारथी व्हावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.” तेव्हा भगवंतांनी अर्जुनाचे सारथी होण्य़ाचेही मान्य केले.

    येथेही श्रीकृष्णांचे कौटिल्य प्रगट झाले आहे. दोघांचीही त्यांनी मदत केली. आपल्याला सैन्य देऊन श्रीकृष्णाने फसवले आहे हे शेवटपर्यंत दुर्योधनाला कळलेच नाही.

    नंतरही वेळोवेळी श्रीकृष्णांच्यामुळेच पांडवांना विजयाकडे घोडदौड करता आली. श्रीकृष्ण पांडवांच्या पक्षाला नसते तर पांडवांना जय मिळाला असता की नाही हा प्रश्नच होता. कारण असे अनेक प्रसंग उद्भवले आहेत की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णांनी पांडवांना सावरले आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर

Tuesday, March 26, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १५

    श्रीकृष्ण कौरवांच्या सभेतून कुंतीकडे गेले. तिला भेटून त्यांनी तिचा पांडवांच्य़ासाठी असलेला निरोप घेतला व उपप्लव्य नगरात पांडवांच्याकडे जाण्यासाठी निघाले. जातांना त्यांनी कर्णाला रथावर बसवले व ते सात्यकीसह निघाले.     

कर्णाचा बुद्धिभेद - 

    कर्ण जरी दुष्टपणे वागला होता तरी तो दुर्योधनाच्या संगतीचा परिणाम होता. सतत ‘सूतपुत्र’ म्हणून झालेल्या उल्लेखामुळे तो त्रस्त झालेला होता. सूतपुत्रत्वापुढे त्याचा पराक्रम फिका पडलेला होता. पण मुळात त्याचे वागणे धर्मशील होते. तो दानी होता. अर्जुनाकडून पूर्वी झालेल्या दोन तीन युद्धात त्याचा पराभव झाला होता तरी तो शूर होता. ज्याच्या खांद्यावर् दुर्योधनाने युद्धाचे जू ठेवले होते तो खांदाच जर काढून घेतला तर दुर्योधनाची शक्ती निम्मी कमी होईल हे श्रीकृष्ण जाणून होते. म्हणून त्यांनी भेदनीतीचा अवलंब केला.

    वाटेत थांबून त्यांनी कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य संगितले व म्हणाले, “तू सुद्धा पांडुपुत्र आहेस, तेव्हा पांडवांच्या पक्षाला सामील हो. पांडव तुला ज्येष्ठ भावाचा मान देतील, तूच राजा होशील व सर्व पांडव तुझी आज्ञा मानतील. युद्ध झाले तर त्यात कौरवांचा नाश होईल. तेव्हा पांडवांच्या पक्षाला सामील होणे हेच तुझ्य़ासाठी कल्याणकारक आहे.” एक कुशल राजकारणी म्हणून श्रीकृष्णांनी अवलंबलेला हा मार्ग योग्यच होता. 

    परंतु ज्यावेळी ‘सूतपुत्र’ म्हणून त्याची हेटाळणी होत होती, त्यावेळी त्याला दुर्योधनाने आधार दिला होता, राज्य दिले होते. तेव्हा मित्राला गरज असतांना त्याचा विश्वासघात करणे त्याला योग्य वाटत नव्हते. तसेच सतत अर्जुनाशी मनोमन वैर जपलेले होते. आणि आता पुन्हा त्यांच्याच पक्षाला जाऊन मिळणे त्याला प्रशस्तही वाटत नव्हते. त्यामुळे त्याने श्रीकृष्णांच्या विनंतीला नम्रपणे नकार दिला. 

    कुंतीनेही कर्णाला पांडवांच्या पक्षाला वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिलाही त्याने उत्तर दिले की “ज्या राधेने व सूत अधिरथाने मला वाढवले त्यांचा सूतपुत्र म्हणवून घेण्यातच मी धन्यता मानीन”. कारण कुंतीला प्रेमाचा पान्हा फुटला तो पांडवांचा विनाश होईल या भीतीने. त्याआधी कधीही तिने तो क्षत्रिय असल्याचे समाजाला उच्चरवाने सांगितले नाही, याचाच त्याला राग होता. पण कुंती आपल्याकडे काही मागायला आलेली आहे असे पाहून त्याने तिला अर्जुन सोडून इतर कोणत्याही पांडवाचा मी वध करणार नाही असे वचन दिले.

धृतराष्ट्राचे दुर्योधनाला समजावणे - 

    ‘यतो धर्मस्ततो जय’ असे म्हणून भीष्म, द्रोण, विदुर, गांधारी इत्यादींनी धर्माचाच जय होतो तेव्हा तू धर्माने वाग असे दुर्योधनाला परोपरीने सांगितले. धृतराष्ट्रानेही आपल्या कुळाचा इतिहास सांगितला. आपणही अंध असल्यामुळे राज्याचा अधिकारी नव्हतो तर तू ह्या राज्याची इच्छा कशी करतोस ? हे राज्य पांडूचे होते व पुढे ते त्याच्या पुत्रांचेच असणार आहे. धृतराष्ट्राने त्याला स्पष्ट शब्दात बजावले, तू राजाचा पुत्र नाहीस. तुझे वागणे सुद्धा दुष्टांप्रमाणेच आहे. तू लोभी आहेस. आपल्या भावांच्या बाबतीत नेहेमी पापपूर्ण विचार करतोस. तेव्हा कमीतकमी अर्धे राज्य तरी पांडवांना दे.” अर्थात धृतराष्ट्राची ही पश्चात् बुद्धि होती. याआधी त्याने सतत दुर्योधनाच्या वागण्याला खतपाणीच घातले होते. आणि दुर्योधनही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हता. युद्ध करून राज्य मिळावायचेच असा त्याचा ठाम निश्चय होता.

श्रीकृष्ण-युधिष्ठिर संवाद - 

    या सर्व प्रकारात जरी श्रीकृष्णांना यश आले नसले तरी त्यांनी एका कुशल दूताची भूमिका व्यवस्थित वठवलेली होती. श्रीकृष्ण पांडवांकडे परत आले. ‘अभीष्ट कार्याच्या सिद्धीकरता आपण तेथे सर्व बांधवांमधे बंधुजनोचित प्रेम टिकून रहावे म्हणून प्रथम सामनीतीचा प्रयोग कसा केला, सामवचनांचा उपयोग झाला नाही त्यामुळे आपण भेदनीतीचा उपयोग कसा केला, दुर्योधनाच्या बाजूला गोळा झालेल्या  त्या राजांमधे दुर्योधनाची काळी कारस्थाने सांगून त्यांच्यामधे फूट पाडण्याचा कसा प्रयत्न केला, त्याचाही उपयोग झाला नाही व दुर्योधन आपल्याला कैद करण्याची भाषा बोलू लागल्यावर आपण तिथे विश्वरूपदर्शनासारखे अमानुष कृत्य कसे केले’ तो सर्व वृत्तांत त्यांनी सर्व वृत्तांत युधिष्ठिराला निवेदन केला व म्हणाले ‘दण्डं चतुर्थं पश्यामि तेषु पापेषु नान्यथा’ आता त्या पाप्यांसाठी चौथा दंडाचाच प्रयोग करणे आवश्यक आहे, अन्यथा आता त्यांना सन्मार्गावर आणणे असंभव आहे. शांतीचे सर्व प्रयत्न करून झालेले आहेत त्यामुळे आता धर्माचे ऋणही आपल्यावर नाही ‘धर्मस्य गतमानृण्यम्’ असे सांगून आता एकमेव युद्धच करणे आवश्यक आहे असे सांगितले. 

    न च भीष्मो न च द्रोणो युक्तं तत्राहतुर्वच: ।
    सर्वे तमनुवर्तन्ते ऋते विदुरमयुत ॥१५४-११॥उद्योगपर्व॥

श्रीकृष्ण म्हणतात की, “युधिष्ठिरा, तेथे एक विदुर सोडले तर भीष्म किंवा द्रोण सुद्धा उचित गोष्ट करत नाहीत. ते त्या दुर्योधनाचेच अनुसरण करत आहेत.” ही गोष्ट श्रीकृष्णांना फार खटकली होती. वास्तविक भीष्मांना आपल्या अधिकाराखाली दुर्योधनावर सक्ती करून पांडवांचे राज्य त्यांना परत देता आले असते. श्रीकृष्णांनी तसा प्रस्तावसुद्धा मांडला होता. आणि हीच गोष्ट विदुरांनीही भीष्मांना विचारली होती. विदुर म्हणाले होते -

    तन्मे विलपमानस्य वचनं समुपेक्षसे ।
    कोऽयं दुर्योधनो नाम कुलेऽस्मिन् कुलपांसन: ॥१४ ८-१९॥
    यस्य लोभाभिभूतस्य मतिं समनुवर्तसे ।
    मां चैव धृतराष्ट्रं च पूर्वमेव महामते ।
    चित्रकार इवालेख्यं कृत्वा स्थापितवानसि ॥१४८-२३॥उद्योगपर्व॥

‘या वंशाचा नाश होत आहे म्हणून मी विलाप करत आहे. तुम्ही माझ्या वचनाची का बरे अवहेलना करत अहात ? हा कुलांगार दुर्योधन या कुळाचा कोण आहे की ज्याच्या लोभाला वश होऊन आपण त्याचेच अनुसरण करत अहात ? हे महामते, चित्रकार जशी चित्रे बनवून एका जागी ठेवतो त्याप्रमाणे मला व धृतराष्ट्राला तुम्ही पहिल्यापासूनच निरुपयोगी करून ठेवले आहे. ”

    थोडक्यात भीष्मांनी मनात आणले असते तर हा कुलक्षय थांबवू शकले असते. पण त्यांनीही दुर्योधनावर आपला अधिकार चालवला नाही. वास्तविक अयोग्य व्यक्तीला राज्याधिकार न देण्याची परंपरा त्यांच्या वंशात होती. पण त्याचे पालन केले गेले नाही. व कौरववंशाला शोकांतिकेला सामोरे जावे लागले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Monday, March 25, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १४

सभेत श्रीकृष्णांचे विश्वरूपदर्शन - 

    पुन्हा सभेत आलेल्या दुर्योधनाला श्रीकृष्ण म्हणाले, “अरे दुर्बुद्धी, मी एकटा आहे असे तुला वाटले का ? असे म्हणून त्यांनी आपले विश्वरूप प्रगट केले व म्हणाले, “हे बघ, सर्व पांडव येथेच आहेत, अंधक व वृष्णीवंशातील लोक येथेच आहेत आदित्यगण, रुद्रगण, व वसुगण सुद्धा येथे आहेत. असे म्हणून श्रीकृष्ण अट्टहास करू लागले. त्यांच्या हास्याबरोबर त्यांच्या अंगामधे अंगठ्याएवढ्या असलेल्या विजेसारख्या तेजस्वी देवता आगीच्या ज्वाळा सोडू लागल्या. त्यांच्या कपाळावर ब्रह्मदेव व छातीवर रुद्रदेव विद्यमान होते. सर्व लोकपाल त्यांच्या भुजांमधे होते. आदित्य, साध्य, वसु, दोन्ही अश्विनीकुमार, इंद्रासह मरुद्गण, विश्वेदेव, यक्ष, गंधर्व, नाग व राक्षस हे सर्वजणच त्यांच्या विभिन्न अंगातून प्रगट होऊ लागले. दोन्ही भुजांवर बलराम व अर्जुन प्रगट झाले. भीम, युधिष्ठिर, नकुल सहदेव, पृष्ठभागात स्थित होते तर  प्रद्युम्न वगैरे वृष्णीवंशी व अंधवंशी योद्धा हातात विशाल आयुधे धारण करून अग्रभागी प्रगट झालेले दिसले. त्यांच्या नाकातोंडातून अग्नी ज्वाळा प्रगट होत होत्या. शंख, चक्र, गदा, शक्ति, शार्ङ्गधनुष्य, हल व नंदक नावाचे खड्ग त्यांच्या उंचावलेल्या हातात होते. 

    श्रीकृष्णांचे ते भयानक रूप पाहून सर्व राजांच्या मनात भीती दाटून आली. श्रीकृष्णांचे ते आश्चर्यकारक रूप पाहून देवताही दुदुंभी वाजवू लागल्या व त्यांच्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली. त्यांचे ते दिव्य रूप पहाण्यासाठी धृतराष्ट्राने दृष्टी मागून घेतली. श्रीकृष्णांनी त्याला दृष्टी प्रदान केली. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्य़ावेळी पृथ्वी डगमगू लागली, समुद्रातही खळबळ माजली. नंतर श्रीकृष्णांनी ते रूप आवरून घेतले व शिष्टाईचा काही उपयोग होणार नाही हे जाणून सभेतील ऋषिमंडळींचा निरोप घेऊन सात्यकी व कृतवर्माचा हात पकडून तेथून ते सरळ बाहेर पडले व कुंतीकडे गेले.

    कौरवसभेमधे विश्वरूप दाखवून श्रीकृष्ण सभेतून बाहेर पडले व कुंतीकडे आले. कुंतीला नमस्कार करून त्यांनी परत जाण्याची अनुज्ञा मागितली, तेव्हा कुंतीने त्यांच्याजवळ युधिष्ठिरासाठी निरोप दिला की, “वत्स, तुझ्या प्रजापालनरूप धर्माची हानी होत आहे. तू केवळ शांतिधर्माकडेच पहात आहेस. तू क्षत्रिय आहेस हे विसरू नकोस. बाहुबळ हेच क्षत्रियाचे खरे बल आहे. युद्ध हेच क्षत्रियासाठी नियत केलेले आहे. राजाने प्रजेचे रक्षण करायचे असते व प्रजा धर्माने वागली की त्या पुण्यकर्माचा चौथा भाग राजाला प्राप्त होत असतो. स्वधर्मानुसार दंडनीतीचाही उपयोग करावा लागतो. त्याने न्यायाने दंडनीतीचा उपयोग केला तर सत्ययुग अवतरायला वेळ लागणार नाही. ‘राजा कालस्य कारणम्’ राजा हाच कालाला कारण असतो. तोच सत्य, त्रेता व द्वापर युगाचा स्रष्टा असतो. पिता-पितामहांनी ज्या राजधर्माचे पालन केले त्या राजधर्माकडे पहा. तू ज्या धर्माचे आचरण करत आहेस तो राजर्षींचा धर्म नाही. केवळ दयाभावाने प्रजापालनजनित पुण्याची प्राप्ती होत नाही. तू राजधर्मानुसार युद्ध कर. आपल्या बापजाद्यांच्या नावाला कलंक लावू नकोस.” प्रथम भेटीतही कुंती श्रीकृष्णांना म्हणाली होती की ‘यदर्थं क्षत्रिया सूते तस्य कालोऽयमागत:’ (९०-७५). ‘ती म्हणते क्षत्राणी ज्या हेतूने पुत्राला जन्म देते तो काळ आता आला आहे. हीच युद्ध करण्याची वेळ आहे. वेळ आल्यावरही जर तुम्ही युद्ध करणार नसाल तर या नृशंस कर्माबद्दल मी तुमचा त्याग करीन.’ असा त्या तेजस्वी क्षात्रीणीने युधिष्ठिराला युद्ध करण्याविषयी निरोप पाठवला. कुंतीचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण परत जाण्यास निघाले. युद्ध करावे लागणार हे त्यांना प्रथमपासूनच दिसत होते. फक्त एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते शिष्टाईसाठी आले होते. 

    पण या शिष्टाईने एक गोष्ट चांगली झाली होती, ती ही की दुर्योधनाचे आजवरचे पांडवांबरोबरचे वाईट वागणे सार्‍या जगासमोर आले होते. दुर्योधनाच्या बाजूने जमलेले त्यांच्यातील काही राजे धर्माची साथ देण्याकरता उद्या कदाचित युधिष्ठिराच्या बाजूला येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Sunday, March 24, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १३

    कपटद्यूताच्या वेळी भीष्म व द्रोण जे वागले ते श्रीकृष्णांना मुळीच आवडले नाही. ते ज्येष्ठ होते. सर्वांच्या देखत अधर्म चाललेला असतांना ते चित्रवत् ते पहात बसले होते. पणाला लावलेली द्रौपदी जिंकली म्हणून तिला भर सभेत ओढून आणली व हे दोघे ज्येष्ठ ती ‘जिता की अजिता’ याचा धर्मशास्त्रदृष्ट्या काथ्याकूट करत राहिले. पण अगदी सामान्य स्त्रीशीही सभेमधे असे अनीतीने वर्तन करू नये या सामान्य नीतिधर्माचीही त्यांनी जाण ठेवली नाही याचा श्रीकृष्णांना राग आला होता. म्हणून तेव्हा झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी द्यावी या हेतूने दुर्योधन निघून गेल्यावर श्रीकृष्णांनी भीष्म, द्रोण इत्यादी कुरुवृद्धांना म्हणाले, “आपण या दुर्योधनाला राजपदावर बसवले आहे हीच गोष्ट मोठी अन्यायाची आहे. याच्यावर तुम्ही नियंत्रणही ठेऊ शकत नाही. मी तुम्हाला एक हिताची गोष्ट सांगतो. तुम्हाला पटत असेल तर पहा. राजन् तुम्हीच दुर्योधनाला कैद करा व पांडवांशी संधी करा. असे होऊ नये की तुमच्यामुळे क्षत्रियांचा विनाश झाला.” श्रीकृष्णांनी नंतर सभेपुढे आपले उदाहरण ठेवले. ते म्हणाले की, “उग्रसेनाचा मुलगा कंस अत्यंत अत्याचारी होता. त्याने पित्याला कैद केले व स्वत: राजा बनला. म्हणून सर्व बांधवांच्या इच्छेने मी त्याला ठार मारले व पुन्हा उग्रसेनाला गादीवर बसवले. आता आम्ही सर्व कुटुंबीजन एका कंसाचा त्याग केल्यामुळे अंधक व वृष्णी कुळातले यादव परस्पर संगठित झालो आहोत व उत्तरोत्तर प्रगति करत आहोत. तेव्हा हे भरतवंशीयांनो, तुम्हीही दुर्योधन, कर्ण, शकुनि व दु:शासनाला बंदी बनवून पांडवांच्या हवाली करा.

त्यजेत् कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥१२८-४९॥उद्योगपर्व॥

    “सर्व कुळाच्या भल्याकरता एका पुरुषाचा त्याग करावा, एका गावाच्या हितासाठी कुळाचा त्याग करावा, देशाच्या भल्यासाठी एका गावाचा त्याग करावा व आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा त्याग करावा.” 

    पण श्रीकृष्णांच्या या पर्यायावर कोणी काही बोलायच्या आधीच धृतराष्ट्राने गांधारीला दुर्योधनाची समजूत काढण्यास बोलावून घेतले. जर तिचेही त्याने ऐकले नाही तर श्रीकृष्णाच्या म्हणण्याचा विचार करता येईल असे म्हणून त्याने ती गोष्ट तात्पुरती तरी टाळली. गांधारीने सभेत आल्यावर  धृतराष्ट्रावरच प्रथम दोषारोपण केले. ती म्हणाली, “ आपल्याला आपला पुत्र अतिशय प्रिय आहे. तेव्हा वर्तमान परिस्थितीला आपणच कारणीभूत अहात. त्याचे पापपूर्ण विचार आपण जाणत होतात. तरीही तुम्ही नेहेमी त्याचेच अनुसरण केलेत. आता तो काम व क्रोधाच्या आहारी गेलेला आहे. तेव्हा त्याला आता सन्मार्गावर आणणे कठिण आहे. त्याचे सहायक दुष्ट आहेत. मूढ, लोभी, दुराचारी व अज्ञानी अशा आपल्या मुलावर आपण राज्याचा भार सोपवलात त्य़ाचे फळ आपण पहातच अहात. आता तुमचीच सर्व लोक निंदा करणार आहेत.” नंतर सभेत परत आलेल्या दुर्योधनाची समजूत काढण्याचा तिने व्यर्थ प्रयत्न केला. अर्थात तो ऐकणार नाही हे ती जाणून होती. आणि झालेही तसेच. तिने एक महत्वाचा मुद्दा मांडला. ती दुर्योधनाला म्हणाली, “दुर्योधना, भीष्म, द्रोण व कृपाचार्य आपल्या सर्व ताकदीनिशी तुझ्या बाजूने लढतील असे जे तुला वाटत आहे ती तुझी फार मोठी चूक आहे. त्यांच्या दृष्टीने राज्य तुझ्याकडे किंवा पांडवाकडे राहिले तरी समानच आहे. यांच्या मनात तुम्हा दोघांविषयी सारखेच प्रेम आहे. पण हे धर्माला महत्व देतात. आणि तो धर्म पांडवांजवळ आहे. या राज्याचे अन्न खाल्ले आहे म्हणून ते कदाचित तुझ्या बाजूने लढतीलही, तुझ्यासाठी प्राणांचा त्यागही करतील, पण ते पांडवांच्याकडे वक्र दृष्टीने पाहू शकणार नाहीत. तेव्हा तू पांडवांशी संधी कर.”     

    श्रीकृष्णांनी आपल्याला कैद करण्याचा सल्ला भीष्मादी कुरुवृद्धांना दिला आहे हे कळताच  दुर्योधनाने श्रीकृष्णांनाच कैद करण्याचा निर्णय घेतला. सात्यकीला ही वार्ता कळताच त्याने कृतवर्म्याला सेना सुसज्ज करून सभाद्वारावर हजर रहाण्य़ास सांगितले व स्वत: श्रीकृष्णांना व धृतराष्ट्रादि मंडळीना त्य़ाने सूचना दिली. तेव्हा श्रीकृष्णांनीही आपल्याला बंदी बनवण्याचे धृतराष्ट्राला आव्हान दिले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Saturday, March 23, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १२

    श्रीकृष्णाच्या समजावणी नंतर भीष्म, द्रोण, विदुर व धृतराष्ट्रानेही त्याला समजावले. ‘वासुदेवार्जुनौ यत्र विद्ध्यजेयानलं हि तान्’ ज्यांच्या बाजूने श्रीकृष्ण व अर्जुन आहेत त्यांना तू अजेय समज, असाच सर्वांच्या उपदेशाचा सूर होता.   

    श्रीकृष्ण व कुरुवृद्धांनी समजावूनही दुर्योधन ऐकण्यास तयार नव्हता. उलट सर्व सभाजनांमधे आपली निंदा केल्याबद्दल त्याने श्रीकृष्णांनाच दूषण दिले. ‘पांडवांना द्युत खेळ अधिक पसंत होता. म्हणूनच ते द्यूत खेळण्यास प्रवृत्त झाले. आणि माझे मामा शकुनि यांनी त्यांचे राज्य जिंकले यात माझा काय दोष ? बर त्यावेळी जिंकलेले धन आम्ही त्यांना त्यावेळीच परत केले. आता पुन्हा ते द्यूतात हरून त्यांना वनवास भोगायला लागला यात आमचा काय अपराध ? आणि तुम्ही कितीही पांडवांच्या शौर्याची प्रशंसा केलीत तरी आम्हाला जिंकण्याचे साहस करेल असा एकही वीर मला दिसून येत नाही. भीष्म, द्रोण, कृपाचार्य व कर्ण यांच्याशी देव सुद्धा युद्ध करू शकणार नाहीत. आम्ही क्षत्रिय आहोत त्या धर्माप्रमाणेच आम्ही युद्ध करू. रणांगणात मृत्यु आला तर आम्हाला स्वर्गच मिळेल. तेव्हा

ध्रियमाणे महाबाहौ मयि सम्प्रति केशव ।
यावद्धि तीक्ष्णया सूच्या विध्येदग्रेन केशव ।
तावदप्यपरित्याज्यं भूमेर्नः पाण्डवान् प्रति ॥१२७-२५॥ उद्योगपर्व॥

    “केशव, यावेळी मी दुर्योधन जिवंत असतांना पांडवांना टोकदार सुईने छेदली जाईल एवढी भूमी सुद्धा पांडवांना दिली जाणार नाही.”

    ‘आपला काहीच दोष नाही’ अशा प्रकारचे साळसूदपणाचे ते दुर्योधनाचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांना संताप आला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याची सर्व करतूत सर्व राजांच्या सभेपुढे मांडली. ते दुर्योधनाला म्हणाले, “पांडवांच्या समृद्धीने संतप्त होऊन पांडवांच्या बरोबर द्यूत खेळायचे हा विचार तूच शकुनीसह निश्चित केला होतास. त्य़ाशिवाय निष्कपट पांडव येथे द्यूत खेळायला आलेच कशाला असते ? तूच सदाचाराकडे न पहाता पापासक्त लोकांसहित भयंकर विपत्तीला कारणीभूत होणारा हा खेळ सुरू केला होतास. तूच आपल्या मोठ्या भावाच्या पत्नीला भर सभेमधे आणून अनुचित गोष्टी बोलून दुराचरण केले होतेस. तू त्या एका सत्वशील महाराणीबरोबर वाईट वर्तन केलेस. पांडव वनात निघाले असतांना तूच त्यांना कठोर वचने बोलला होतास. ते तर सर्वच कौरवांना माहीत आहे. तू, कर्ण व दु:शासन यांनी आर्यांना न शोभणरी वचने बोलला होतात. त्यापूर्वी वारणावतात त्यांना मातेसहित जाळून मारण्याचा प्रयत्न केला होतास. पण तो तुझा उद्देश सफल झाला नाही. तेव्हाही पांडव दीर्घकाळपर्यंत वनात लपून राहिले होते. तूच भीमाला विष दिलेस व हातपाय बांधून पाण्यात बुडवले होतेस. आणि वर म्हणतोस माझा काहीही दोष नाही म्हणून ? आता तू पांडवांना त्यांचे राज्य देण्याचे नाकारत आहेस पण जेव्हा मृत्युमुखी पडशील तेव्हा तुला त्यांचे राज्य देणेच भाग पडेल.” श्रीकृष्णांचे ते वचन ऐकून दु:शासनालाही मनातून भीती वाटायला लागली व त्यानेही त्याला पांडवांचे राज्य परत देण्याचा सल्ला दिला. त्यामुळे दुर्योधन अतिशयच संतापला. व सभेतून उठून निघून गेला त्याच्याबरोबर त्याचे भाऊ, मंत्री व सहयोगी सुद्धा निघून गेले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Friday, March 22, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ११

श्रीकृष्णांची दुर्योधनाला समजावणी - 

    श्रीकृष्णांनी कौरवसभेपुढे न्याय्य हक्कांची मागणी ठेवली. परंतु धृतराष्ट्राने माझी मुले माझे म्हणणे वा सर्वच गुरुजनांचे म्हणणे ऐकत नाहीत, तेव्हा तूच त्यांना समजाव असे सांगितल्यावर श्रीकृष्ण दुर्योधनाला समजाऊ लागले. एखाद्या लहान मुलाला समजावे तसे श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावत होते. “तू मोठ्या कुळात जन्माला आला आहेस. स्वत:ही शास्त्रज्ञानाने युक्त आहेस. तुझ्यामधे सर्व चांगले गुण आहेत. असे म्हणून त्यांनी त्याला चुचकारले. ‘अरे अधर्मयुक्त कार्य नीच कुळातले लोक करतात, तुझ्यासारखे उच्च कुळात जन्माला आलेले लोक अधर्मयुक्त वागत नाहीत. सध्या तुझ्यात दुष्ट वृत्ती दृगोचर होत आहे. हा दुराग्रह अधर्मयुक्त आहे. तुझ्या वागण्याला योग्य असे कारणही दाखवता येत नाही. तेव्हा दुराग्रह सोडलास तर सर्वांचेच कल्याण होणार आहे असे केलेस म्हणजे अधर्म व अपयश यापासून तुझी सुटका होईल. तेव्हा तू पांडवांशी संधी कर. धृतराष्ट्र, भीष्म, विदूर, द्रोण, अश्वत्थामा, विकर्ण, संजय वगैरे सर्वांनाच ही गोष्ट पटलेली आहे. अरे, माता पिता जे सांगतात ते मुलाच्या कल्याणासाठीच ना सांगतात ? परंतु जे मोहाने हितकर गोष्ट ऐकत नाहीत त्या मनुष्याला शेवटी पश्चात्ताप करायला लागतो. अरे, जो मनुष्य दुष्ट मनुष्यांची संगत करतो व आत्मीयांशी द्वेषपूर्ण वागतो त्याचा पृथ्वी सुद्धा त्याग करते. तू पांडवांशी वैर करतोस व दुसर्‍या अशिष्ट लोकांकडून रक्षणाची अपेक्षा करतोस. (येथे श्रीकृष्णांनी कर्ण व शकुनी यांची नावे घेतली नसली तरी त्यांचा रोख त्या दोघांकडे आहे.) तुझ्य़ाशिवाय असा दुसरा कोण मनुष्य असेल जो आपल्या बांधवांचा त्याग करून दुसर्‍यांकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करेल ? पांडव धर्मात्मा आहेत आणि तू नेहेमीच त्यांच्याशी कुटिलतेने वागत आलेला आहेस. तरी पांडव तुझ्याशी सद्भावनेनेच वागत आलेले आहेत. आणि तूही आपल्या त्या श्रेष्ठ बांधवांच्या बरोबर तसेच वागले पाहिजेस. क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस. बुद्धिमान लोक धर्म, अर्थ व काम या तीनही पुरुषार्थांची सिद्धी होईल असेच वागतात. आणि जर यातील एकाचीच निवड करण्याची वेळ आली तर ते धर्माचीच निवड करतात. मध्यमश्रेणीच मनुष्य अर्थाची निवड करतात तर अधम श्रेणीचे लोक कामाची निवड करतात. इंद्रियांना वश होऊन जो धर्माचा त्याग करतो तो मनुष्य नष्ट होतो. ज्याला अर्थ व काम हे पुरुषार्थ मिळवायचे असतील त्याने प्रथम धर्माने वागले पाहिजे. कारण अर्थ व काम कधी धर्मापासून वेगळे होत नाहीत. धर्म हाच त्रिवर्गाच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय आहे. जो धर्माच्या द्वारे अर्थ व काम मिळवतो त्याची उन्नती होते. पण तू हे विशाल साम्राज्य अनुचित उपायांनी मिळवू पहात आहेस. दुष्ट लोकांबरोबर मेळ करण्यापेक्षा पांडवांबरोबर मेळ करणे तुझ्या अधिक हिताचे आहे. पांडवांवर प्रेम कर, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. पांडवांनीच स्थापन केलेल्या राज्याचा तू उपभोग घेत आहेस व त्यांचीच अवहेलना करत आहेस. दु:शासन, दुर्विषह, कर्ण, शकुनि यांच्या खांद्यावर तू ऐश्वर्याचा भार ठेवला आहेस. आणि त्यांच्याकडून तू उन्नतीची इच्छा करतोस. ते हे लोक तुला ज्ञान, धर्म व अर्थ यांची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहेत व पांडवांबरोबर पराक्रम करण्यासही असमर्थ आहेत. हे सर्व राजांसहित भीमाकडे वक्रदृष्टीने पाहूही शकणार नाहीत. तुझी ही सर्व सेना अर्जुनाचा सामना करू शकणार नाही. अर्जुन सर्व देवता, असुर व गंधर्व यांना सुद्धा अजेय आहे. तेव्हा तू युद्धाचा विचार करू नकोस. यांच्यापैकी कोणता राजा अर्जुनाशी सामना करून सकुशल घरी परत जाऊ शकेल ? या नरसंहाराने तुझा काय लाभ होणार आहे ? अर्जुनाने खांडववनात गंधर्व, यक्ष, असुर व नागांसहित सर्व देवतांना जिंकले होते. विराट नगरातील त्याचा पराक्रम युद्धाचा भावी परिणाम सांगण्यास पुरेसा आहे. त्याने साक्षात महादेवाशी युद्ध करून त्याला युद्धात संतुष्ट केलेले आहे. आणि तू त्याला युद्धात जिंकण्याची इच्छा करतोस ? ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि समजा, हे युद्ध झालेच, तर मी त्याचा सारथी होणार आहे. मग त्याचा कोण बरे पराभव करू शकेल ? युद्धात अर्जुनाला जिंकणे म्हणजे आपल्या दोन हातांनी पृथ्वीला उचलण्यासारखे आहे. हा जर क्रुद्ध झाला तर सर्व प्रजेला दग्ध करू शकेल व देवतांनाही स्वर्गातून खाली यायला भाग पाडेल. तेव्हा दुर्योधना, तुझ्या या सर्व बंधुजनांचा नाश होऊ नये असे तुला वाटत असेल तर ही नष्टबुद्धी सोडून दे. तुझी कुलघातकी अशी कीर्ती होऊ नये. पांडव तुलाच युवराजपद बहाल करतील व धृतराष्ट्रच महारज पदावर स्थित रहातील. राज्यक्ष्मी तुझे दार ठोठावते आहे. तिचा अपमान करू नकोस. कुंतीच्या मुलांना त्याचे अर्धे राज्य देऊन सुखाने संपत्तीचा उपभोग घे. आपल्या सुहृदांची गोष्ट ऐक. पांडवांशी संधी करशील तरच तुझे कल्याण होईल.”

सौ. मनीषा अभ्यंकर.

Thursday, March 21, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग १०

    पुढे विदुरांनी तर त्यांना कौरवसभेत शिष्टाईकरता सुद्धा  न जाण्याची विनंती केली. कारण श्रीकृष्णांच्या शत्रूंना दुर्योधनाने तेथे एकत्र केलेले होते. श्रीकृष्णांपासून ज्यांना भीती होती असे सर्व राजे दुर्योधनाला शरण गेलेले होते. अशा सर्व विरोधी लोकांच्या सभेत जाणॆ हे प्राणांवर बेतणारेच होते. 

    विदुरांच्या भावना श्रीकृष्णांना समजत होत्या. श्रीकृष्णांनी त्यांच्या बोलण्याची प्रशंसा केली व आपले तेथे जाणे कसे आवश्यक आहे तेही त्यांना पटवून दिले. श्रीकृष्ण म्हणाले की दुर्योधनाची दुष्टता, त्याने केलेल्या सैन्याची जमवाजमव व त्याचा हट्टीपणा ह्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. हे भयंकर संकट कर्ण व दुर्योधनामुळेच उपस्थित झालेले आहे. त्याच्या ह्या हट्टापायी सर्व मानवजात विनाशाच्या मार्गाला लागलेली आहे. आणि सर्व मानवजात जर युद्धामुळे विनष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर तिला मृत्युपाशातून सोडवणे हा परम धर्म आहे. मी निष्कपट भावाने सर्व क्षत्रियांच्या हिताचा प्रयत्न करेन. भावाभावांमधे फूट पडण्य़ाची वेळ आली असता त्यांच्यात मेळ घडवून आणणारा खरा मित्र आहे. आता या प्रयत्नात मला यश येणारही नाही, पण धर्मकार्य केल्याचे समाधान तरी मला मिळेल. मी असा प्रयत्न नाही केला तर ‘श्रीकृष्ण समर्थ असूनही त्याने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही’ असे ज्ञातिबांधव मला बोल लावतील. तेव्हा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. हितकारक वचन ऐकायचे की नाही ते त्याने ठरवायचे आहे. आणि त्याने जर ऐकले व संधी केला तर ते एक मोठे पुण्यकार्य होईल. राहता राहिला माझ्य़ा सुरक्षेचा प्रश्न. पण माझ्या क्रोधापुढे कोणताही राजा टिकाव धरू शकणार नाही याची मला खात्री आहे.”

श्रीकृष्ण-शिष्टाई -

    दुसरे दिवशी श्रीकृष्ण कौरवसभेत निघाले. बरोबर सात्यकी, कृतवर्मा वगैरेही मंडळी होती. मोठ्या आदराने कौरवांनी त्यांचे राजसभेत स्वागत केले. तेथे नारदादि ऋषिमंडाळीही राजसभा पहाण्यासाठी उपस्थित होती. श्रीकृष्णांनी आसन ग्रहण केले. सर्व मंडळी मूक झालेली होती. शेवटी श्रीकृष्णांनी आपल्या येण्य़ाचा उद्देश सांगितला. श्रीकृष्ण धृतराष्ट्राला म्हणाले, “मी येथे क्षत्रिय वीरांचा संहार न होता  कौरव पांडवांमधे शांती प्रस्थापित करण्य़ासाठी आलो आहे. याव्यतिरिक्त मला दुसरी कोणतीही कल्याणकारक गोष्ट सांगायची नाही. कुरुकुळ हे सर्व राजवंशात श्रेष्ठ कुळ आहे. या कुळात शास्त्र व सदाचाराचे पालन होते. हे कुळ सद्गुणांनी संपन्न आहे. कृपा, अनुकंपा, करुणा, अनृशंसता, सरलता, क्षमा व सत्य हे गुण या कुळात अधिक प्रमाणात दिसून येतात. तेव्हा आपल्या कुळाकडून अनुचित कार्य होता कामा नये. कौरव जर मिथ्या आचरण करत असतील तर आपण त्यांना अडवून सन्मार्गावर आणले पाहिजे. दुर्योधनादि पुत्र क्रूर आचरण करतात. लोभामुळे यांनी मर्यादा तोडली आहे. यावेळी शांती प्रस्थापित करणे ही कठिण गोष्ट नाही ही गोष्ट आपल्या दोघांच्या हातात आहे. मी पांडवांना नियंत्रणात ठेवीन तुम्ही कौरवांना ठेवा. आपल्या मुलांनी आपल्या आज्ञेचे पालन करावे. पांडवांच्या बरोबर विवाद करून चांगला परिणाम होणार नाही. तेव्हा आपण स्वत: संधीसाठी प्रयत्न करावा. कौरव व पांडव एकत्र आले तर सगळ्या जगात अजेय बनतील. पण हे युद्ध झाले तर मोठा संहार घडून येईल. या युद्धात पांडव अथवा कौरव मारले गेले तर तुम्हाला कोणते सुख मिळणार आहे ? या युद्धामुळे दोन्ही बाजूंची हानी होणार आहे. तेव्हा आपणच यापासून रक्षण करा. या सर्व राजांचा सन्मान करून यांना परत पाठवा. आपण पूर्वीसारखेच पांडवांवर प्रेम करा. पांडवांशी वैर करून आपला धर्म व अर्थ दोन्ही नष्ट होऊ देऊ नका. पांडवांनी सांगितले आहे की ‘आम्ही केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे १२ वर्षाचा वनवास व १ वर्षाचा अज्ञात वास मोठ्या कष्टाने व्यतीत केला आहे. आम्ही ही अट कधी तोडलेली नाही. तेव्हा आपणही केलेल्या प्रतिज्ञेवर दृढ रहा व आमचे राज्य आम्हाला परत करा. आम्ही गुरुजनोचित आपल्याशी वागत आलेलो आहोत. आपणही शिष्याशी गुरुजन वागतील तसे वागावे. आम्ही वाईट मार्गाने जात असू तर आम्हाला सन्मार्ग दाखवण्याचे आपले काम आहे.’ 

    पुढे श्रीकृष्ण सांगतात की “पांडवांनी या सभेसाठी सुद्धा संदेश दिला आहे. ‘आपण सर्व सभासदगण धर्माचे ज्ञाते अहात. आपल्या देखत कोणतेही अनुचित कार्य घडू नये. सभासदांच्या देखत जर धर्माचा व सत्याचा गळा घोटला जात असेल तर ते सभासद नष्ट झाल्यातच जमा आहेत. सभासदांनी अधर्माला काट्याप्रमाणे दूर केले नाही तर तो काटा सभासदांनाच विद्ध करतो.” 

    श्रीकृष्ण म्हणतात की पांडवांची ही मागणी न्यायसंगत आहे. पांडवांना त्यांचे राज्य परत देण्याव्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट उचित आहे याचा आपण व या सभेतील सर्व राजांनी यावर विचार करावा. आपणच युधिष्ठिराला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले होते. त्याने पराक्रम करून ते वाढवले पण तरीही त्याने कधी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. अशा युधिष्ठिराचे राज्य हडप करण्यासाठी शकुनीने कपटद्यूत केले, द्रौपदीला भर सभेत आणले गेले, हे लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा की कुंतीचे पुत्र आपली सेवा करायलाही तयार आहेत व युद्धासाठी सुद्धा समर्थ आहेत. तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो आपण विचार करून घ्या.”

    श्रीकृष्णांनी सभेमधे पांडवांच्या न्याय्य हक्कांचीच मागणी केली, व पांडवाची बाजू कशी बरोबर आहे ते सर्व उपस्थित राजांना ऐकवले. सर्व सभेलाच श्रीकृष्णांचे म्हणणे मान्य झालेले होते.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Wednesday, March 20, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ९

    विदुर पुन्हा पुन्हा अर्धे राज्य देण्याचा सल्ला देत आहेत हे दुर्योधनाला आवडले नाही. त्याने पुन्हा सर्वांना निक्षून सांगितले की अशा प्रकारचा संधी होण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट श्रीकृष्ण येथे आले की मी त्यांना बंदी बनवीन कारण श्रीकृष्णांना कैद केले की सर्व यदुवंशी व पांडव आपल्या आधीन होतील असे त्याला वाटत होते. आणि या बाबतीत त्याने सभासदगणांचा सल्ला विचारला. 

    दुर्योधनाच्या या बोलण्यावर सर्वच सभासदगण अवाक् झाले. तेव्हा धृतराष्ट्राने समजावले की श्रीकृष्ण यावेळी दूत बनून आपल्याकडे येत आहेत. ते आपले संबधीही आहेत व त्यांनी कौरवांचा कोणताही अपराध केलेला नाही. तेव्हा त्यांना कैद करणे योग्य होणार नाही. भीष्मांनीही त्याच्या या योजनेची कठोर शब्दात निंदा केली.

    श्रीकृष्ण आले की त्यांची दु:शासनाच्या महालात रहाण्याची दुर्योधनाने व्यवस्था केली होती. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण हस्तिनापूरला पोचले. दुर्योधन सोडून धृतराष्ट्राचे सर्व पुत्रांसहित भीष्मद्रोणादि श्रीकृष्णांच्या स्वागताकरता गेले. सर्वांच्याकडून स्वागत स्वीकारून श्रीकृष्ण विदुरांच्या घरी गेले. श्रीकृष्णांनी विदुरांना पांडवाची हालहवाल सांगितली. नंतर त्यांनी कुंतीला भेटून तिचे सांत्वन केले.   

    नंतर ते दुर्योधनाला भेटण्याकरता गेले. त्याच्या महालात दु:शासन, कर्ण व शकुनी आलेले होतेच. सुरवातीला दुर्योधनाच्या  वाणीत मृदुता होती. पण शेवटी शठता प्रगट होऊ लागली. दुर्योधनाने त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. पण श्रीकृष्णांनी ते स्वीकारले नाही. दुर्योधनाने त्यांना यामगचे कारण विचारले. श्रीकृष्णांनी सांगितले की प्रेम असेल व संकट आले असेल तरच कोणाच्या तरी घरी जेवण करता येते. आणि मी कोणत्याही संकटात सापडलेलो नाही व तुझे माझ्यावर प्रेम नाही. पांडव तुझे भाऊ आहेत व सद्गुणांनी संपन्न आहेत तरीही तू त्यांच्याशी अकारण द्वेष करतोस. जो पांडवांचा द्वेषी आहे तो माझाही द्वेषी आहे. मी व पांडव एकरूप आहेत असेच समज. जो काम व क्रोधाच्या आहारी जाऊन गुणवान मनुष्याशी विरोध करतो तो मनुष्य अधम आहे. जो द्वेष करतो त्याचे अन्न खाऊ नयेच पण त्यांना अन्न वाढू सुद्धा नये असे शास्त्र सांगते व तुझे अन्न दुर्भावनेने दूषित झालेले आहे. तेव्हा मी येथे जेवणे योग्य होणार नाही. तेव्हा मी विदुरांच्याकडेच भोजन करेन. असे स्पष्टपणे सांगून श्रीकृष्ण विदुरांकडे गेले. 

    विदुरानी श्रीकृष्णांना दुर्योधनाचा मनातील भाव सांगितला. विदुर म्हणाले की दुर्योधनाने धर्म व अर्थ या दोन्हींचे उल्लंघन केलेले आहे. तो गुरुजनांचेही ऐकत नाही. धर्मशास्त्रांची आज्ञा मानत नाही. तो भोगात आसक्त आहे, स्वत:ला पंडित समजतो, सर्वांकडेच तो संशयी नजरेने पहातो. स्वत: उपकार करत नाही व दुसर्‍यांनी केलेले मानत नाही. धर्माचा त्याग करून त्याने असत्याचा स्वीकार केलेला आहे. तो स्वत:ला श्रेष्ठ समजतो. आपल्याबरोबर भीष्म, द्रोण, कृप, कर्ण वगैरे अजेय योद्धे असल्यामुळे आपण युद्धात नक्की विजयी होऊ याची त्याला खात्री आहे. त्यामुळे तो संधी करण्य़ास तयार नाही. त्यामुळे त्याने युद्धासाठी सेना एकत्र केलेली आहे. तेव्हा तुम्ही कितीही समजावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तो संधी करण्यास तयार होणार नाही. तुम्ही त्याच्या मनात भ्रातृभाव जागवण्याचा प्रयत्न करायला आलेले अहात, पण ते सर्व परिश्रम व्यर्थ जाणार आहेत.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Tuesday, March 19, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण  - भाग ८

    पांडवांच्या म्हणण्याप्रमाणे श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईसाठी निघाले. कार्तिकमासातील रेवती नक्षत्र होते व मैत्र नावाचा मुहूर्त होता. हेमंत ऋतूला सुरवात झालेली होती. कौरव व पांडव पक्षाचे ते जरी समान हितकर्ते असले तरी दुर्योधनाच्या दृष्टीने ते शत्रूच होते. अर्थात शत्रुपक्षाकडे जाण्यास भगवान निघाले. दगा फटका होण्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली होती. म्हणून ते सात्यकीला म्हणाले, ‘युयुधान, माझ्या रथावर शंख, चक्र, गदा, तूणीर, शक्ति तसेच सर्व प्रकारची शस्त्र व अस्त्रे ठेव.’ त्याचे कारण सांगतांना भगवान म्हणतात -

दुर्योधनश्च दुष्टात्मा कर्णच सह सौबल: ।
न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ॥८३-१३॥उद्योगपर्व॥

“कोणी कितीही बलवान असले तरी त्याने दुर्बल शत्रूची सुद्धा अवहेलना करू नये. मग दुर्योधन, कर्ण व शकुनि तर दुष्टात्मेच आहेत. त्यांच्यापासून सावधान रहाण्याची तर नितांत आवश्यकता आहे.” येथे श्रीकृष्णांची दूरदृष्टी दिसून येते. सेवकांनी सर्व जय्यत तयारी केल्यावर भगवंतांनी सात्यकीला सुद्धा रथावर बसवले व भगवंत कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी निघाले. महाभारतात संजय शिष्टाई व श्रीकृष्ण शिष्टाई या दोन शिष्टाई प्रसिद्ध आहेत.
    भगवंतांना पोचवण्य़ासाठी कुंतिपुत्र त्या रथाच्या मागून जात होते. द्रुपदादी राजेही त्यांच्याबरोबर होते. युधिष्ठिराने श्रीकृष्णांना आपल्या मातेला भेटण्यास सांगितले व मग सर्व मंडळी थोडे अंतर त्यांच्याबरोबर चालून परत फिरली. भगवंतांच्या रथाने हस्तिनापूरकडे प्रयाण केले.

    स्वत: भगवान श्रीकृष्ण शिष्टाईकरता येत आहेत अशी वार्ता कौरवांना कळली. तेव्हा धृतराष्ट्राने वाटेतील त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्य़ास दुर्योधनास सांगितले. कारण ते आपल्या सत्काराने संतुष्ट झाले तर आपल्यासाठी सुखदायक होतील व आपण आपले मनोरथ त्यांच्याद्वारे पूर्ण करून घेऊ शकू, असे धृतराष्ट्रास वाटत होते. धृतराष्ट्राच्या आज्ञेप्रमाणे दुर्योधनाने श्रीकृष्णांच्या मार्गावर अनेक विश्रामस्थाने बनवली व सर्व उपभोग सामग्रीची त्याठिकाणी व्यवस्था केली. हेतु एकच होता की श्रीकृष्णांना आपल्याबद्दल प्रेम वाटले पाहिजे. श्रीकृष्णांना आपल्या अनुकूल करून घेण्य़ाचा हा प्रयत्न थोडा हास्यास्पदच होता. श्रीकृष्णांनीही त्या विश्रामस्थानांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांचा रथ हस्तिनापूरच्या मार्गावर अग्रेसर होतच होता. 

    त्या सर्व व्यवस्थेमागचा हेतु विदुर जाणतच होते. त्यांनी धृतराष्ट्राला पुन्हा सांगितले, “राजन्, भगवान श्रीकृष्ण येत आहेत. सरळ मार्गाने चाला. मूर्खपणे कुटिलतेचा आश्रय घेऊन आपल्या प्रिय पुत्र, पौत्र व सुहृद् यांचा सर्वनाश करू नका. आपण श्रीकृष्णांना अनेक उत्तमोत्तम वस्तु भेट देऊ म्हणून सांगता अहात पण त्यामागे आपला धर्मपालनाचा अथवा श्रीकृष्णाचे प्रिय करण्याचा उद्देश आहे असे मला वाटत नाही. त्यामागचा वास्तविक अभिप्राय मी जाणतो. ही केवल प्रवंचना आहे. आपण धन देऊन श्रीकृष्णांना पांडवांपासून फोडू शकणार नाही. आपण त्यांना पाय धुण्यासाठी दिलेले पाणी व कुशलप्रश्न यांच्या शिवाय ते तुमच्याकडून कशाचाही स्वीकार करणार नाहीत. तेव्हा श्रीकृष्ण ज्या दोन्ही पक्षांचे कल्याण करण्य़ाच्या हेतूने येथे येत आहेत तेच त्यांना तुम्ही त्यांना उपहारादाखल द्या.” विदुरांना धृतराष्ट्राचा डाव कळलेला होता. म्हणूनच त्यांनी स्पष्ट शब्दात धृतराष्ट्राचा मनातला हेतु सफल होणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Monday, March 18, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ७


    नंतर आपण शिष्टाईसाठी जाणार आहोत तर तेथे नेमके काय करणार आहोत तेही सांगितले. श्रीकृष्ण म्हणतात, “दुर्योधनाच्या वागणुकीविषयी जे जे लोक संदेहात पडलेले आहेत, त्याच्या चांगल्या वाईट वागण्याचा जे निर्णय करू शकत नाहीत त्या सर्वांचा संशय मी तेथे जाऊन दूर करीन. तेथे जमलेल्या सर्व राजांच्या देखत मी आपल्या गुणांचे वर्णन व दुर्योधनाचे दोष दाखवून देईन. त्यामुळे तेथे जमलेल्या सर्व राजांची खात्री पटेल की युधिष्ठिर धर्मात्मा व सत्यवादी असून दुर्योधन पांडवाशी लोभामुळे अयोग्य वागला आहे. तेथे जमलेल्या चारही वर्णांच्या आबालवृद्धांसमोर मी दुर्योधनाची निंदा करीन. तसेच शांती साठी याचना करत असतांनाही आपण अधर्माचे भागिदार होणार नाही याचीही काळजी घेईन. तुम्हाला जे इष्ट आहे त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ न देता कौरवांबरोबर संधी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तसेच त्यांनी केलेल्या युद्धाच्या तयारीचीही माहिती काढून येईन. पण तुम्ही युद्धाला सज्ज रहा.”

    भीम प्रथम पासूनच दुर्योधनाचा बदला घेण्याच्या, त्याला युद्धात ठार मारण्याच्या गोष्टी बोलत असे. पण संजयाच्या शिष्टाईचा त्याच्याही मनावर परिणाम झाला होता. त्यानेही श्रीकृष्णांना कौरवांकडे शांतिदूत बनूनच जायला सांगितले. भीम म्हणतो -

अपि दुर्योधनं कृष्ण सर्वे वयमधश्चरा: ।
नीचैर्भूत्वानुयास्यामो मा स्म नो भरता नशन् ॥७४-२०॥ उद्योगपर्व॥

    “भगवन् आम्ही सर्वजण पायी चालत अत्यंत नम्र होऊन दुर्योधनाचे अनुसरण करत राहू, परंतु आम्हा भरतवंशीयांचा नाश होऊ नये.”

    तेव्हा श्रीकृष्णांनी तेथे हितकर वचन कोमल वाणीत सांगावे. थोडीही उग्रता येता कामा नये की ज्यामुळे दुर्योधन असंतुष्ट होईल व शांतीचा प्रस्ताव फेटाळून लावेल. अशा प्रकारचे भीमाचे ते अभूतपूर्व मृदु वचन ऐकून श्रीकृष्णांना हसूच फुटले. ते भीमाला म्हणाले, “बंधो आजपर्यंत कधी अशी कोमल वाणी मी तुझ्या मुखातून ऐकली नाही. आजपर्यंत तर तू त्या क्रूर धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठार मारण्याची भाषा बोलत होतास. त्यासाठी रात्रंदिवस अशांत होतास. सतत भुवया चढवलेला व दातओठ खाणारा असाच मी तुला बघत आलो आहे. आणि आज अचानक तू शांतीची भाषा करू लागलास ! मनुष्याच्या विचारात इतका आमूलाग्र बदल होतो ! तुलाही युद्धाची भीती वाटू लागलेली दिसते. तुझ्या या शांतीच्या प्रस्तावाचेच मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. तेव्हा 

स दृष्ट्वा स्वानि कर्माणि कुले जन्म च भारत ।
उत्तिष्ठस्व विषादं मा कृथा वीर स्थिरो भव ॥७४-२२॥उद्योगपर्व॥

    “भारत, तू आपले कर्म व कुळ याकडे दृष्टी ठेव. विषाद करू नकोस. क्षत्रियोचित कर्माला घट्ट चिकटून रहा.” असे बोलून त्यांनी भीमाला प्रोत्साहित केले. शांतीचे सर्व प्रयत्न आपण करणारच आहोत व त्या प्रयत्नांना यश आले तर सोन्याहून पिवळे. त्यामुळे सर्वांचेच हित होईल. पण शांतीचा प्रस्ताव जर त्यांनी धुडकावून लावला तर युद्धच करावे लागेल याची त्यांनी भीमालाही कल्पना दिली व या युद्धाची संपूर्ण जबाबदारी भीम व अर्जुन यांच्यावरच असल्याची त्याला जाणीवही दिली. 

    अर्जुनालाही त्यांनी सांगितले की दुर्योधन मरेपर्यंत राज्य देऊन संधी करणार नाही. युधिष्ठिराने जो पाच गावांचा प्रस्ताव मांडला होता तोही श्रीकृष्णांना मान्य नाही. कारण दुर्योधन तो प्रस्ताव मान्यच करणार नाही. श्रीकृष्ण व विदूर उपदेश करून  दुर्योधनाला योग्य मार्गावर आणतील असा नकुलाला भरवसा वाटत होता. पण सहदेव मात्र दुर्योधनाबरोबर केलेले युद्ध जरी अधर्म ठरणार असेल तरी सुद्धा युद्धासाठीच प्रयत्नशील रहावे या मताचा होता. द्रौपदीचे सुद्धा मत होते की युद्धच केले पाहिजे. पूर्वी क्रोधाने तडफडणारा भीम सुद्धा शांतीची भाषा बोलू लागल्यावर तर तिला प्राणांतिक यातना झाल्या. तेव्हा एकमेव युद्ध या मतावरच ती ठाम राहिलेली होती. कारण ज्याप्रमाणे निरपराधाचा वध केला की पाप लागते त्याप्रमाणे वध्य माणसाचा वध केला नाही तरी पाप लागते. आणि तरीही जर जर पांडव शांतीच्याच मार्गाने जाऊ इच्छित असतील तर आपले वडील द्रुपद व पाच पुत्र कौरवांशी युद्ध करतील असे तिने स्पष्ट शब्दात बजावले. आणि सर्वांच्या मनाची युद्धासाठी तयारी करून श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईला निघाले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Sunday, March 17, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ६

    श्रीकृष्णांचा पांडवांना इशारा -

    युधिष्ठिरासह सर्व पांडव व वृष्णीवंशी लोकांच्या मतानुसार श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईकरता जाण्य़ास तयार झाले पण त्यांना माहीत होते की दुर्योधन पापाचारी आहे. तेव्हा तो तहाच्या गोष्टी बिलकूल मानणार नाही तेव्हा युद्ध करूनच पांडवांना राज्य मिळावावे लागणार आहे. पण तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शिष्टाईकरता जाण्यास निघाले. संधीचा प्रयत्न न करताच पांडवांनी सर्व वंशाचा नाश केला असा दोषारोप जगाने भविष्यकाळात करू नये एवढाच त्यांचा या शिष्टाईसाठी जाण्यामागे हेतु होता. पण तरीही जाण्यापूर्वी श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला युद्धावाचून तुला राज्य मिळाणार नाही ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे.

सर्वथा युद्धमेवाहमाशंसामि परै: सह ।
निमित्तानि हि सर्वाणि तथा प्रादुर्भवन्ति मे ॥७३-३८॥
दुर्योधनो न ह्यलमद्य दातुं 
    जीवंस्तवैतन्नृपते कथंचित् ।
यत्ते पुरस्तादभवत् समृद्धं द्युते 
    हृतं पाण्डवमुख्यराज्यम् ॥७३-४२॥उद्योगपर्व॥

“हे पांडवप्रवर, मला तर शत्रूंबरोबर युद्ध होण्याचीच संभावना दिसते. मला अशीच लक्षणे दिसत आहेत. आपल्याजवळ प्रथम जे समृद्धशाली राज्य होते व जे आपण द्यूताच्या पटावर घालवलेत, ते सारे राज्य दुर्योधन स्वत: जिवंत असेपर्यंत आपल्याला कधीही परत देणार नाही. तेव्हा आपण युद्धासाठी तयार रहा.” तेव्हा श्रीकृष्ण संधी करून येतील व शांतीने यात काहीतरी तोडगा काढतील अशा भ्रमात युधिष्ठिराने राहू नये हेच त्यांना सांगायचे होते. 

    संजयाने केलेली शिष्टाई त्यांनी ऐकली होती. त्यावरून कौरव राज्य देण्यास तयार नाहीत हे त्यांना कळून चुकले होते. युधिष्ठिराने संजयाकरवी ‘आपण पाच गावांवर सुद्धा संतुष्ट राहू’ हा जो धृतराष्ट्राला निरोप पाठवला होता, तेही त्यांनी ऐकले होते आणि ती गोष्ट श्रीकृष्णांना मुळीच आवडलेली नव्हती. युधिष्ठिराचे धर्मपूर्वक वागणे, धृतराष्ट्राला पित्याप्रमाणे मान देणे या गोष्टी श्रीकृष्णांनाही भावलेल्या आहेत. पण शेवटी कर्तव्य म्हणूनही काही असतेच. भगवान युधिष्ठिराला म्हणातात, “महाराज, आपण युद्ध न करता जेवढे मिळेल त्यावर संतुष्ट अहात, तेच खूप झाले असे मानता अहात. पण हे क्षत्रियाचे नैष्ठिक कर्म नाही. क्षत्रियाने कधी भीक मागू नये. त्याच्यासाठी युद्धात पराक्रम, हेच कर्तव्य विधात्याने ठरवलेले आहे. रणांगणावर विजय प्राप्त करावा किंवा मृत्यु स्वीकारावा, हाच क्षत्रियाचा स्वधर्म आहे. दीनता व भित्रेपणा ही त्याच्यासाठी प्रशंसनीय गोष्ट नाही. तेव्हा ‘विक्रमस्व महाबाहो जहि शत्रून् परंतप’, महाबाहु युधिष्ठिर, आता पराक्रम दाखवा व शत्रूंचा संहार करा. महाराज, धृतराष्ट्राचे पुत्र लोभी आहेत. तुमच्या वनवासाच्या काळात त्यांनी अनेक मित्रराजांचा संग्रह केलेला आहे. त्यांच्याशी स्नेह वाढवलेला आहे व शक्तीचाही संचय केलेला आहे. द्रोण, भीष्म व कृपाचार्य आपल्या पक्षाला असल्यामुळे ते कौरव स्वत:ला अधिक बलवान समजतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अर्धे राज्य देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण जोपर्यंत यांच्याशी नरमाईने वागत रहाल तोपर्यंत ते आपले राज्य बळकावयाचाच प्रयत्न करतील. तेव्हा धृतराष्ट्राचे  पुत्र आपल्यावर कृपा करून किंवा आपल्याला दुर्बल मानून, किंवा धर्माकडे दृष्टी ठेऊन तुम्हाला राज्य देतील अशा खोट्या भ्रमात राहू नका. त्यांनी तुम्हाला सर्व कुरुवृद्धांच्या देखत द्यूतात फसवले व एका लंगोटीवर दीर्घकाळपर्यंत वनात पाठवले व त्याबद्दल त्यांना काहीही पश्चात्ताप होत नाही किंवा त्यांना त्याबद्दल लाजही वाटत नाही, यावरूनच ते संधी करणार नाहीत हे स्पष्ट होते. तेव्हा अशा कुटिल स्वभावाच्या व अनाचारी दुर्योधनाबद्दल आपण प्रेम दाखवू नका. धृतराष्ट्राचे पुत्र सर्व लोकांसाठीच वध्य आहेत. तेव्हा ते आपल्यासाठी अवध्य कसे काय ठरतील ? कपटद्यूताच्यावेळी त्याने केलेली संभाषणे आठवा. त्यावेळी तुमचे बंधु पराक्रम करण्य़ास समर्थ होते, तरीही तुम्ही धर्मबंधनाच्या निमित्ताने त्यांना अडवलेत. त्यामुळे ते त्यावेळी अन्यायाचा प्रतिकार करू शकले नाहीत. ज्याचे चारित्र्य इतके रसातळाला गेलेले आहे त्याचा वध करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. तेव्हा आपण उगाचच दुविधेत पडू नका. त्याचा खुशाल वध करा. त्यामुळे कोणतेही पाप लागणार नाही.” असे सांगून संजयाने जे ‘कौरवांचा वध केल्याने पाप लागेल’ हे विष पांडवांच्या मनात पेरले होते त्याचे श्रीकृष्णांनी निराकरण केले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Saturday, March 16, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ५

श्रीकृष्णांचे संजयाला उत्तर - 

    यावर इंद्रप्रस्थाचे राज्य परत देणे हा युद्ध टाळण्याचा एकच मार्ग आहे असे युधिष्ठिराने सांगितले व पुढे श्रीकृष्णांना उत्तर देण्य़ास सांगितले. या संजयाच्या शिष्टाईला श्रीकृष्णांनी अगदी योग्य प्रत्युत्तर दिले. श्रीकृष्णांनी प्रथम आपण दोन्ही पक्षांचे हित इच्छितो व या प्रकरणामधे शांततेनेच मार्ग निघावा अशी आपली इच्छा आहे ही गोष्ट स्पष्ट केली. पांडव शांततेच्याच मार्गाने जाणारे आहेत. पण धृतराष्ट्रासह त्याचे पुत्र पांडवांचे राज्य बळकावण्याची इच्छा करत असतांना शांततेने मार्ग कसा काय निघू शकेल ? असा प्रश्न त्यानी विचारला. त्यांनी पुढे सांगितले की युद्ध करणे हे क्षत्रियाचे नियत कर्म असून ते केल्यामुळे पाप लागत नाही किंवा नरकप्राप्तीही होत नाही. आणि राजाने सर्व वर्णाचे लोक आपापल्या वर्णाप्रमाणे वागतात की नाही त्यावर लक्ष ठेवावे. जर कोणी दुसर्‍याची धनसंपत्ती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन करावे हा राजाचा धर्म आहे. अशा लोकांचा वध करुन राजाला पुण्यप्राप्तीच होत असते. आणि दुसर्‍यांचे धन लुटणे हा दोष कौरवांच्या ठिकाणी तीव्ररूपाने प्रगट झाला आहे. कौरवांनी पांडवांचे पैतृक राज्य अपहरण केलेले आहे. त्य़ामुळे चोर-डाकू व त्यांच्यात काहीही फरक नाही. श्रीकृष्ण एवढेच बोलून थांबले नाहीत तर द्यूताच्या वेळी भरसभेत द्रौपदीची झालेली विटंबना, त्यावेळी कर्ण, दु:शासन वगैरेंनी केलेली कडवट संभाषणे, विदुरांव्यतिरिक्त भीष्म-द्रोणादिकांनीही त्या गोष्टीची केलेली उपेक्षा, याकडेही त्यांनी संजयाचे लक्ष वेधले व संजयाला विचारले की ‘द्यूतसभेत झालेला अन्याय तूही पाहिलेला होतास. तो विसरून तू युधिष्ठिराला उपदेश करण्याचे धाडस कसे काय करू शकतोस ?’ तसेच पांडवाच्या सामर्थ्याचीही त्यांनी त्याला कल्पना दिली व अस्त्र शस्त्रांची त्यांच्याकडेही कमतरता नसून भीम व अर्जुन कौरवांचा समाचार घेण्यास समर्थ आहेत असेही त्याला खडसावले. 

धृतराष्ट्राची मनस्थिती - 

    संजयाने युधिष्ठिराचा व श्रीकृष्णांचा निरोप धृतरष्ट्राला सांगितला. आपल्या निरोपाचा फारसा परिणाम पांडवांवर झाला नाही व आता जर राज्य दिले नाही तर युद्ध टळणार नाही हे त्याला कळून चुकले. विदुरानेही धृतराष्ट्राला पांडवांचे राज्य त्यांना परत करण्यात सर्वांचे हित आहे हे सांगितले. तेव्हा धृतराष्ट्रही या तोडग्याला अनिच्छेनेच का होईन पण तयार झाला. 

    दोन्ही पक्ष संधी करण्याचा प्रयत्न करत होते. आपले इंद्रप्रस्थाचे राज्य जर कौरव परत द्यायला तयार तर असतील युद्ध करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही व शांती प्रस्थापित होईल असे युधिष्ठिराने उत्तर दिलेले होते.

    भीष्म, धृतराष्ट्र, विदुर व द्रोण पांडवांना त्यांचे राज्य परत करण्याबद्दल दुर्योधनाला समजावत होते. पण दुर्योधन कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण आपल्याकडे ११ अक्षौहिणी सैन्य व भीष्म, द्रोण, कर्णांसारखे शूरवीर असतांना पांडवांबरोबर आपण निश्चित विजय मिळवू शकू याची त्याला खात्री होती. 

    दुर्योधन कधीही संधी करायला तयार होणार नाही हे युधिष्ठिराला कळून चुकले होते. धृतराष्ट्रालाही राज्याचा लोभ असल्यामुळे पांडवांचे राज्य न देता संधी कसा होईल त्याचे मार्ग तो शोधत रहाणार आहे हेही तो जाणून होता. तरीही तो संधीचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता. अविस्थल, वृकस्थल, माकन्दी, वारणावत आणखी एखादे गाव अशी पाच गावे घेऊनही तो विवाद मिटवण्य़ास तयार झाला होता. कारण भरतवंशीयांचा नाश होऊ न देणे एवढे एकच ध्येय त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. परंतु दुर्योधन त्याही गोष्टीला तयार नाही याचे त्याला दु:ख वाटत होते. म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण संधीचा प्रस्ताव मांडण्य़ासाठी कौरवांच्या सभेत जाण्यास तयार झाले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Friday, March 15, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ४

विराटनगरातील श्रीकृष्णांचे भाषण - 

विराटाच्या नगरीत अर्जुनपुत्र अभिमन्यु व उत्तरा यांचा विवाह समारंभ पार पडला. आता पुढच्या हालचालींना वेग आला. पांडवांनी अटीप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढली होती. आता ठरल्याप्रमाणे दुर्योधनाने त्यांचे राज्य त्यांना परत करायला हवे होते. तेव्हा पुढे काय करायचे त्यावर तिथे विचारमंथन सुरू झाले. त्यावेळी श्रीकृष्णांनी तिथे जे भाषण केले ते पहाण्य़ासारखे आहे. श्रीकृष्णांनी दुर्योधनाने पांडवांचे पैतृक राज्य रणांगणावर नव्हे तर कपटद्यूतात जिंकले आहे यावर भर दिलाच पण त्याशिवाय पांडव लहान असतांना जेव्हा कुंती पांडुराजाच्या निधनानंतर त्यांना हस्तिनापुरात घेऊन आली तेव्हा सुद्धा कौरवांनी अनेक षडयंत्रे रचून त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला होता याचा पुनरुच्चार केला. आणि आता ठरलेल्या अटीप्रमाणे पांडव वागल्यानंतरही दुर्योधन त्यांना जर त्यांचे राज्य देणार नसला तर युद्ध हाच एक पर्याय उरतो याचीही जाणीव त्यांनी सभेला करून दिली. व सर्वांच्या मतानुसार दुर्योधनाचे मत जाणून घेण्याकरता हस्तिनापूरला दूत पाठवायचे ठरले. तसेच कौरव पांडवांनी सैन्याच्या जुळवाजुळवीलाही सुरवात केली. 

द्रुपदाचा पुरोहित कौरवांकडे - 

    त्यानुसार प्रथम द्रुपदाचा पु्रोहित कौरवांकडे गेला. दुर्योधनाने पांडवांना प्राणांतिक कष्ट दिले आहेत, त्यांचा त्याने वध करण्याचा हरप्रकारे प्रयत्न केलेला आहे, पांडवांनी आपल्या बाहुबळावर जी संपत्ती प्राप्त केली होती तीही त्याने कपटद्यूतात बळकावली आहे, त्या द्यूतकर्माला धृतराष्ट्रानेही अनुमोदन दिले, पांडवांची पत्नी द्रौपदी हिलाही क्लेश दिलेले आहेत आणि धृतराष्ट्राने सर्व राज्य आपल्या ताब्यात घेतले आहे, या सर्व गोष्टींचा त्याने तिथे उच्चार केलाच व सांगितले की ‘हे पहिले केलेले अत्याचार विसरून पांडव कौरवांशी मेळ करू इच्छितात. वीर पांडव कौरवांशी युद्ध करू इच्छित नाहीत तर युद्ध न करताच आपले राज्य प्राप्त करू इच्छितात. तेव्हा कुरुवृद्धांनी दुर्योधनाला समजावावे. याचा अर्थ पांडव कौरवांना घाबरले आहेत असा नाही. त्यांनी सेना जमवलेली आहे व वेळ आली तर ते युद्ध करण्य़ासही तयार होतील. आणि पांडवांचे सैन्य कौरवांच्या तुलनेत कमी असले तरी पांडव आपल्या बाहुबळावर युद्ध करण्यास तयारही आहेत. तेव्हा आपण लोकांनी विचार करावा, पांडवांचे अर्धे राज्य त्यांचे त्यांना परत द्यावे व युद्ध टाळावे. हातात आलेली ही सुंदर घडी व्यर्थ घालवू नये.” असा पुरोहिताने कौरवांकडे पांडवांचा निरोप सांगितला. 

संजय शिष्टाई - 

    द्रुपदाच्या पुरोहिताकरवी पांडवांचा निरोप ऐकून धृतराष्ट्राने संजयाबरोबर पांडवांना शर्करावगुंठित संदेश पाठवला. संजयाने युधिष्ठिराला सांगितले की ‘सर्व कौरव ठीक आहेत. धृतराष्ट्रही नित्य तुमच्या सदाचरणाची व पराक्रमाची आठवण काढत असतात. कोणत्याही स्वार्थाकरता पांडव कधी धर्माचा त्याग करणार नाहीत असा त्यांचा विश्वास आहे. तेव्हा अजात शत्रो, आपणच यातून काहीतरी मार्ग काढावा.’ पुढे त्याने सांगितले की ‘स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे पापदायक आहे. आपले पुत्र मूर्ख असून अधर्माने वागतात व त्यांचा निग्रह करण्यास पांडव समर्थ असले तरी आपल्या बंधुजनांचा वध करून त्यांना पापच लागेल व नरकप्राप्ती होईल. तेव्हा त्यांनी वनातच निवास करावा किंवा भैक्ष्यकर्म स्वीकारावे.’ पाप व नरकाची जशी त्य़ाने भाषा केली त्याप्रमाणेच आपल्या पक्षाला द्रोणाचार्य, भीष्म, कृपाचार्य यांचे सहाय्य असून अनेक राजे येऊन मिळालेले आहेत अशी अप्रत्यक्ष धमकीही दिली आणि वर सांगितले की तुम्हाला जर युद्धच करायचे होते तर तेव्हाच द्यूताच्या वेळीच करायला हवे होते. कारण ही विशाल सेना तेव्हा तुमच्याच आधीन होती. तेव्हा तुम्ही बलशाली होता व तेव्हाच तुम्ही दुर्योधनाशी युद्ध करून त्याला नेस्तनाबूत करू शकला असतात. मग तुम्ही कशासाठी इतका विलंब केलात व शत्रूची ताकद वाढवण्य़ास वेळ दिलात ? आता वेळ निघून गेली आहे. ही विशाल सेना आता दुर्योधनाच्या ताब्यात आहे आणि ह्या विशाल सेनेचा पराभव करणे आता दुष्कर आहे.’ अर्थात संजय दूत म्हणून आला होता. राजा जे सांगेल ते प्रतिपक्षाला सांगणे एवढेच दूताचे काम. तेव्हा संजयाने सांगितला तो धृतराष्ट्राचा निरोप पांडवांना सांगितला व त्याने त्याचे काम केले. 

    पांडव धर्माच्या मार्गाने जाणारे आहेत. तेव्हा त्यांना पाप व नरक यांच्या गोष्टी संघितल्या तर ते आपणहून राज्य दुर्योधनाच्या ताब्यात देऊन वनात रहातील अशी धृतराष्ट्राची अटकळ होती. सुरवातीला या त्याच्या वचनांचा परिणाम पांडवांवर झालेला नाही पण ऐन युद्धाच्यावेळेला अर्जुन हातपाय गाळून युद्ध करण्य़ास नकार देऊन बसला हा त्या संजयाच्या शिष्टाईचाच परिणाम होता.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Thursday, March 14, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३

    ‘आपण द्वारकेमधे असतो तर पांडवावर ही विपत्ती येऊच दिली नसती. बिना बोलावताच आपण द्यूतसभेत येऊन द्यूताचे दोष दाखवून ते द्यूत थांबवायचा प्रयत्न केला असता आणि समजुतीच्या शब्दांनी जर कौरव ऐकले नसते तर आपण बलपूर्वक ते द्यूत थांबवले असते’ असे त्यांना वाटत होते. पण त्यावेळी ते शाल्वाशी युद्ध करण्यात गुंतलेले होते. त्यामुळे द्यूताच्या वेळी ते हजर राहू शकले नाहीत. पण एकूण श्रीकृष्णांना भावी युद्धाची चाहूल लागलेली होती व त्यात आपण पूर्णपणे पांडवांच्या बाजूने उभे रहायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवलेले होते.

    श्रीकृष्णांची पांडवांशी पांडव वनवासात असतांना दोन-तीनदा भेट झाली आहे व दरवेळी त्यांनी ‘आपण पराक्रम गाजवून शत्रूंचे अस्तित्व मिटवून टाकू अशी ग्वाहीही दिलेली आहे.    सात्यकीने तर असाही प्रस्ताव मांडला होता की तुम्ही वनवासाची प्रतिज्ञा पुरी करत रहा, तोपर्यंत आम्ही शत्रूला दंड देतो व तुम्ही परत येईपर्यंत अभिमन्यु पृथ्वीचे शासन करेल. एकूण पांडवांच्या पक्षाकडील सर्वांनाच दुर्योधनाला दंड देण्याची घाई झालेली आहे.

    पांडव अटीप्रमाणे शांत चित्ताने वनवास भोगत असतांनाही दुर्योधनादि कौरव त्यांना वनातही त्रास देण्य़ाचा प्रयत्न करतच होते. वनातच त्यांना ठार मारण्याकरता सुद्धा निघाले होते तेव्हा व्यासांनी अडवले म्हणून कौरव गप्प बसले. एकदा घोषयात्रेचे निमित्त करून त्यांची दुर्दशा बघण्य़ासाठी वनात गेले होते. एकदा दुर्वास ऋषींना दुर्योधनाने अतिथि सत्कार करून प्रसन्न करून घेतले व त्यांना त्य़ाने पांडवांकडे अवेळी अतिथि म्हणून जाण्य़ास सांगितले. हेतु हा होता की पांडव अतिथिसत्कार करू शकणार नाहीत व दुर्वासांच्या शापाने त्यांचा आपोआपच नाश होईल. तेव्हाही भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचे रक्षण केले. जयद्रथाने द्रौपदीहरणाचा प्रयत्न केला. अशा प्रकारे कौरव पांडवांना वनवासात सुद्धा सुखाने जगू देत नव्हते.

    नंतर अर्जुनाने वनवासात असतांना तपस्या करून पाशुपतास्त्र व इंद्रादि देवतांकडून अस्त्रे मिळवली व पुन्हा आपल्या बांधवांकडे आला. बारा वर्षांचा वनवासाचा काळ संपत आलेला होता. अजून एक वर्ष अज्ञातवासाचे शिल्लक होते. तेव्हा पुन्हा एकदा श्रीकृष्ण पांडवांना भेटण्य़ासाठी वनात आलेले आहेत. तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, “धर्मराज आपले मनोरथ शीघ्र पूर्ण होतील. आपली वनवासाची प्रतिज्ञा पूर्ण झाली असेल तर आम्ही सर्व लोक कौरवांना दंड देण्यास तयार आहोत. आम्ही सर्व आपल्या आज्ञेची वाट पहात आहोत. किंवा आपण आपल्या प्रतिज्ञेचे पालन करा व आम्ही सर्व यदुवंशी योद्धे आपल्या सर्वशत्रूंना ठार मारू व हस्तिनापुरात आपल्या शुभागमनाची प्रतीक्षा करत राहू. तुम्ही वनवासाची प्रतिज्ञा पूर्ण करून हस्तिनापुरात या.” पण युधिष्ठिर प्रतिज्ञेप्रमाणे अज्ञातवासाचे वर्ष पूर्ण करूनच पुढील काय तो निर्णय घेण्यावर ठाम होता. युधिष्ठिराचा प्रतिज्ञापालनाचा कालावधी संपल्याशिवाय काहीही करता येणार नाही हे श्रीकृष्णांनी जाणले. तेव्हा अज्ञातवासाचा काळ संपेपर्यंत वाट पहावीच लागणार होती. थोडक्यात युद्धाशिवाय पर्याय नाही याची खूणगाठ श्रीकृष्णांनी मनाशी बांधलेली होती. 

   पांडव विराटाच्या राज्यात अज्ञातवासाचा काळ कंठत होते. युधिष्ठिर विराटाला द्यूत शिकवणारा कंक बनला होता, भीम विराटाचा बल्लव नावाने आचारी बनला होता. अर्जुन बृहन्नडेचा स्त्रीवेष घेऊन विराटाची मुलगी उत्तरा हिचा नृत्यशिक्षक बनला होता. नकुल व सहदेव विराटाचे गोधन व घोड्यांची पागा सांभाळत होते तर द्रौपदी विराटाच्या राणीकडे सैरंध्री म्हणून राहिली होती. पांडवांना शोधून काढण्याच्या इच्छेने कौरवांनी विराटाचे गोधन हरण्याचे ठरवले व विराटावर दोन बाजूंनी हल्ला केला. स्वत: विराट चार पांडवांना बरोबर घेऊन ससैन्य एका आघाडीवर त्रिगर्ताच्या सुशर्माबरोबर युद्ध करण्यात गुंतला असतांनाच दुर्योधनाने भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण वगैरे सर्व कौरवांबरोबर दुसर्‍या बाजूने गोधनावर हल्ला केला. राजधानीत एकटा उत्तर हा विराटाचा मुलगा होता. तो तर घाबरून गेला. शेवटी बृहन्नडेच्या वेशात असलेला अर्जुन उत्तरचा सारथी बनला व त्याने सगळ्या कौरवांचा पराभव केला. तेव्हा विराटाला पांडव हे आपल्या आश्रयाने रहात आहेत असे कळले. व त्याने आपली मुलगी उत्तरा अर्जुनाला देण्य़ाचे ठरवले.  तेव्हा अर्जुनाने ती शिष्या असल्यामुळे आपण तिच्याशी लग्न करू शकत नाही असा स्पष्ट शब्दात पण नम्रपणे नकार देऊन तिचा आपला मुलगा अभिमन्यु याची पत्नी म्हणून म्हणून स्वीकार करण्याचे ठरवले. विराटाला ते मान्य होताच अभिमन्यु व उत्तराच्या विवाहासाठी द्रुपद व यादव वीरांसह भगवान श्रीकृष्ण सुद्धा तिथे विराटाच्या राज्यात उपस्थित झाले. आणि विवाह-समारंभ पार पडल्यानंतर पांडवांच्या न्याय्य हक्काच्या विषयाबाबत तोंड फुटले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Wednesday, March 13, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २

    भगवान श्रीकृष्ण हे महाभरताचे नायक असले तरी महाभरतात १८८ व्या अध्यायात त्यांचा पहिला उल्लेख येतो तो द्रौपदी-स्वयंवराच्या वेळी. द्रौपदीच्या स्वयंवराला देशोदेशीचे राजे जसे आपल्या गळ्यात माळ पडेल या उद्देशाने आलेले होते, तसे काही स्वयंवर पहाण्यासाठीही आलेले होते. त्यात श्रीकृष्ण, कृष्णाचे पुत्र, बलराम, अक्रूर, सात्यकि, उद्धव, कृतवर्मा, उशीनर असे अनेक वृष्णीवंशी सुद्धा आलेले होते. तसेच काही ब्राह्मणमंडळीही आलेली होती. लाक्षागृहातून सुटका करून घेऊन पांडव अज्ञातपणे वनावनातून हिंडत असता द्रौपदीच्या स्वयंवराची हकिकत कळल्यानंतर तेही ब्राह्मणांचा वेश धारण करून ब्राह्मणांच्या समूहात बसलेले होते. 

    स्वयंवरसभेत पांडवांनी जरी अंगावर भस्माचे पट्टे ओढले होते तरी श्रीकृष्णांनी त्यांना ओळखले होते व बलरामांना त्यांनी ही गोष्ट हळूच निदर्शनासही आणून दिली होती. पांडवांना तेथे पहाताच त्यांना मनोमन आनंद झाला होता. नंतर कौरव पक्षाकडील व इतरही राजांना मस्यवेधाचा पण जिंकता न आल्यामुळे शेवटी ब्राह्मणवेशतील अर्जुन मस्यवेध करण्याकरता रंगमंचावर आला. तेव्हाही त्यांना आता पण जिंकून अर्जुनच  द्रौपदीला प्राप्त करणार याची खात्री वाटू लागली व मनोमन आनंदही झाला. द्रौपदीशी पांडवांचा विवाह झाल्यावर जेव्हा धृतराष्ट्राला पांडव जिवंत असल्याचे कळले तेव्हा भीष्म व विदुर यांच्या सल्ल्यावरून पांडवांना त्याने सन्मानपूर्वक बोलावून अर्धे राज्य दिले. त्या अरण्यसदृश राज्याचे श्रीकृष्णांनी इंद्रप्रस्थात रूपातंर करण्य़ास पांडवांना मदतही केली. 

    पांडवांशी त्यांचे नाते होतेच पण आपली बहिण सुभद्रा हिचा अर्जुनाशी विवाह करून देऊन त्यांनी ते नाते अधिक घट्ट केले.

    ज्यावेळी त्यांना कळले की युधिष्ठिर द्यूताच्या पटावर राज्य हरला आहे व आपले बंधु व द्रौपदी यांच्या समवेत  वनवासात गेला आहे ते ऐकून त्यांना अतिशय दु:ख झाले व ते अंधक, वृष्णी व भोज वंशातील सर्वांना घेऊन पांडवांना भेटण्याकरता वनात गेले. त्यांच्याबरोबर द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न सुद्धा होता. सर्वजण कौरवांची निंदा करत होते व आता आपण कोणती भूमिका घ्यायची त्याविषयी पांडवांबरोबर चर्चा करत होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
    दुर्योधनस्य कर्णस्य शकुनेश्च दुरात्मन: ।
    दु:शासनस्य चतुर्थानां भूमि: पास्यसि शोणितम् ॥१२-५॥सभापर्व॥

    हे राजांनो, मला तर असे वाटते की ही पृथ्वी दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि या चौघांच्या रक्ताचे पान करणार.

    यावरूनच लक्षात येते की भावी संधर्ष अटळ आहे असेच श्रीकृष्णांना वाटत होते. ‘निकृत्योपचरन् वध्य एष धर्म: सनातन:’ जो दुसर्‍यांच्या बरोबर छल-कपट करून किंवा धोका देऊन सुख उपभोगतो त्याला ठारच मारले पाहिजे हाच सनातन धर्म आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. पांडवांच्या अपमानाने ते अत्यंत संतापलेले होते. कपटद्यूताच्या वेळी द्रौपदीचे त्यांनी लज्जारक्षण केलेच होते, पण जेव्हा वनामधे भेटल्यावर द्रौपदीने आपले गार्‍हाणे त्यांच्यापुढे मांडले, तेव्हा त्यांनी द्रौपदीला वचन दिले की -

    रोदिष्यन्ति स्त्रियो ह्येवं येषां क्रुध्यसि भामिनि ।
    बीभत्सुशरसंच्छन्नाञ्छोणितौघपरिप्लुतान् ॥ १२-१२८॥
    निहतान् वल्लभान् वीक्ष्य शयानान् वसुधातले
    यत् समर्थं पाण्डवानां तत् करिष्यामि मा शुच: ॥ १२-१२९॥सभा॥

    “भामिनि, तू ज्यांच्यावर क्रुद्ध झाली आहेस त्यांच्या स्त्रिया सुद्धा आपले प्रिय पती अर्जुनाकडून ठार मारलेले गेलेले व रक्ताने माखलेले पाहून असाच शोक करतील. पांडवाच्या हितासाठी जे करणे शक्य आहे ते मी सर्व करीन’ असे त्यांनी द्रौपदीला आश्वासनही दिले आहे. ‘न मे मोघं वचो भवेत्’ माझे वचन व्यर्थ ठरणार नाही अशी त्यांनी तिला ग्वाहीही दिलेली आहे.

सौ. मनीषा अभ्यंकर.

Tuesday, March 12, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण  - प्रास्ताविक

    व्यासांनी कौरव-पांडवांच्या युद्धाची कथा सांगणारा ‘जय नावाचा’ इतिहास लिहिला. त्या इतिहासाचे रूपांतर नंतर ‘भारत’ या ग्रंथात झाले व नंतर त्याचे ‘महाभारत’ झाले. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असे जे म्हटले आहे ते अक्षरश: खरे आहे. जगात असा कोणताही विषय नाही की जो महाभरतात आलेला नाही. वेगवेगळी कथानके, तत्वज्ञानाच्या विविध शाखा, वर्णाश्रमधर्मांचे निरूपण, व्यक्तिचित्रणे वगैरेंनी हा ग्रंथ परिपूर्ण आहे. प्रश्न असा पडतो की या ग्रंथात पात्रांचा इतका भरणा आहे की या ग्रंथाचा नायक कोण असावा ? पांडवांनी मिळवलेल्या जयाचा हा इतिहास आहे म्हणून युधिष्ठिर याचा नायक आहे का ? पण तसेही दिसून येत नाही. कारण आजतागायत भारताच्या राष्ट्रजीवनावर भगवान श्रीकृष्णांचाच प्रभाव पडलेला दिसून येतो. लौकिक जीवनातील मुत्सदी, पराक्रमी, धर्माराज्याचा संस्थापक, तत्वज्ञानाचा द्रष्टा तर आध्यात्मिक जीवनातील पूर्णावतार अशा विविध पैलूंनी त्यांचे जीवन नटलेले आहे. भक्ति असो, राजकारण असो, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पडलेला नाही, ठसा उमटलेला नाही. त्यांच्या इतके विलक्षण गुंतागुंतीचे व गूढ चरित्र आजवर पुन्हा झालेले नाही. त्यामुळे महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्णच आहेत व महाभरतीय युद्धात विजयाचे माप युधिष्ठिराच्या झोळीत टाकण्यास सर्वस्वी तेच कारणीभूत आहेत. 

    श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वी जरासंधाचा साम्राज्यवाद, त्याचीच री ओढणारा कंसाचा सत्तावाद बोकाळलेला होता. जरासंधाने आपल्या दोन्ही मुली कंसाला दिल्यामुळे त्याचा कंसाला आश्रय मिळाला होता. त्या बळावर त्याने आपल्या पित्यालाही कैद करून स्वत: शूरसेन देशाचे राज्यपद त्याने बळकावले होते. चारित्र्य व नीतीचा मार्ग त्य़ाने सोडून दिला होता. वसुदेव देवकीची पहिली सहा मुले त्यांनी जन्मल्या जन्मल्या दगडावर आपटून मारली होती. स्वकीयांवर सुद्धा अत्याचार करणार्‍या त्याला सर्व प्रजा सुद्धा त्रासली होती. आपल्या शासनाला विरोध करणार्‍या वसुदेव व देवकीलाही त्याने तुरुंगात डांबले होते. ही झाली प्रत्यक्ष यादवराज्याची परिस्थिती. नंतर उत्तरेत हस्तिनापुरामधे पांडवांना प्रथम लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न फसल्यावर कौरवांनी त्यांचे राज्य कपटद्यूतात हिसकावून घेऊन त्यांना १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात भोगण्यास पाठवले व दुर्योधन स्वत: राजा म्हणून मिरवू लागला होता. एकंदर सगळीकडेच अंदाधुंदी पसरलेली होती. अशा परिस्थितीतच क्रांतीची बीजे दडलेली असतात. श्रीकृष्णांनी प्रथम आपला मामा कंस याला यमसदनी धाडून उग्रसेनाला पुन्हा राज्यावर प्रस्थापित केले. जरासंधासारख्या सामर्थ्यशाली राजास अर्जुन व भीम यांना हाताशी धरून त्यांच्या मदतीने त्याचाही वध केला. आणि पांडवांचा न्याय्य अधिकार मिळवून देण्याच्या निमित्ताने त्यांनी महाभारतीय युद्ध घडवून आणले. व ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ ही आपली प्रतिज्ञा त्यांनी खरी केली.

सौ. मनीषा अभ्यंकर.