समुद्रावरून उडत जात असता समुद्राने विचार केला की मला या वीरवर हनुमानांची मदत केलीच पाहिजे. कारण इक्ष्वाकुकुलाधिपति महाराज सगर यांनी मला वाढविले आहे. आणि या समयी हे हनुमान इक्ष्वाकुवंशीय राजा रामचंद्रास मदत करीत आहेत; या करिता हे थकून जाता उपयोगी नाही. तेव्हा हनुमानांना थोडी विश्रांती घेता यावी म्हणून आपल्या उदकाने आच्छादित होऊन राहिलेल्या सुवर्णमय पर्वतश्रेष्ठ मैनाकाला समुद्र म्हणाला की - “हे पर्वता ! बाजूला, उर्ध्वभागी आणि अधोभागी सर्वबाजूस वाढण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. म्हणून हे गिरिश्रेष्ठा ! मी तुला आज्ञा देत आहे की तू वर ये. म्हणजे उड्डाण करण्यात प्रवीण असे हे श्रेष्ठ कपि हनुमान तुझ्यावर काही काळ विश्रांती घेतील. विश्रांती घेतल्यानंतर हनुमान ऊर्वरीत मार्ग सुखाने पार करून जातील.” समुद्राचे म्हणणे मैनाक पर्वताने मान्य केले व तो समुद्रातून वर आला. त्याला पाहून हनुमानांना वाटले की हे एक विघ्नच उपस्थित झाले. म्हणून त्यांनी आपल्या छातीचा तडाखा देऊन मैनाक पर्वताला खाली पाडले. तेव्हा मैनाकाला त्यांच्या महान वेगाचा अनुभव आला व हे आपले कार्य नक्कीच पार पाडतील असा विश्वास त्यांना वाटला. मनुष्यरूप धारण करून मैनाक त्यांना म्हणाला, “हे वानरवीरा, आपण महान कार्य आरंभले आहे तेव्हा माझ्या या शिखरावर काही काळ विश्रांती घेऊन उर्वरित मार्ग अवलंबावा.” तेव्हा हनुमानांनी त्याला केवळ स्पर्श केला व पुन्हा आकाशमार्गाचा अवलंब केला. कारण मध्यंतरी कोठेही न थांबता समुद्र ओलांडायची त्यांनी वानरांजवळ प्रतिज्ञा केली होती. येथे हनुमानांची रामकार्याबद्दलची निष्ठाच दिसून येते.
देवता, गंधर्व, सिद्ध, महर्षी यांना हनुमानाच्या बल व पराक्रमाची परीक्षा घ्यावयाची होती. म्हणून ते नागमाता सुरसेला म्हणाले, “हा वायुपुत्र हनुमान समुद्रावरून जात आहे. त्याच्या मार्गात तू दोन घटका साठी विघ्न उत्पन्न कर.” तेव्हा सुरसेने समुद्रामधे भयंकर राक्षसीचे रूप धारण केले. अत्यंत भयानक अशी ती राक्षसी आकाशमार्गाने जाणार्या हनुमानांचा मार्ग अडवून म्हणाली, “हे कपिश्रेष्ठा ! देवेश्वरांनी तुला माझे भक्ष्य म्हणून अर्पण केले आहे, म्हणून मी तुला भक्षण करीन. तरी तू या माझ्या मुखामध्ये प्रवेश कर.” असे म्हणून ताबडतोब आपले विशाल मुख पसरून ती हनुमानासमोर उभी राहिली. तेव्हा हनुमानांनी तिला रामकार्य करण्याची तातडी असल्याचे सांगितले व आपले काम संपवून पुन्हा तिच्या पुढ्यात हजर होऊ असेही तिला वचन दिले. आपण रामांचा दूत बनून जात असून सुरसाही रामांच्याच राज्यात रहात असल्यामुळे तिनेही रामांना वास्तविक मदत केली पाहिजे असेही हनुमानांनी तिला सांगितले. पण राक्षसी ऐकेना. ती मुख पसरून हनुमानांसमोर उभी राहिली. तेव्हा हनुमानांनी आपले शरीर वाढवावयास सुरवात केली. हनुमानांनी अत्यंत विशाल रूप धारण केल्यावर राक्षसीनेही आपले मुख मोठे केले. त्याबरोबर हनुमानांनी अंगुष्ठमात्र रूप धारण केले व तिच्या मुखात प्रवेश करून लगेच बाहेर आले. हनुमानांची बुद्धिमत्ता पाहून सुरसा प्रसन्न झाली व तिने त्यांना त्यांच्या कार्यात यशासाठी आशीर्वाद दिला.
हनुमंतांचा पुन्हा लंकाप्रवास सुरु झाला. जात असतांना वाटेत त्यांना सिंहिका नावाच्या राक्षसीने पाहिले. ती त्यांना त्यांची छाया पकडून ओढू लागली. त्यामुळे हनुमानांची गती अवरुद्ध झाली. नंतर सिंहिका आपले मुख पसरून हनुमानांना खाण्यासाठी धावली. तेव्हा हनुमानांनी आपला देह अत्यंत संकुचित करून तिच्या अक्राळ विक्राळ मुखामधे प्रवेश केला. तिच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांनी त्या राक्षसीचा वध केला. आकाशचारी सर्व प्राणी त्यामुळे आनंदित झाले.
यस्य त्वेतानि चत्वारि वानरेन्द्र यथा तव ।
धृतिर्दृष्टिर्मतिर्दाक्ष्यं स्वकर्मसु न सीदति ॥ ५-१-२०१॥
ज्या पुरूषाच्या ठिकाणी तुझ्यासारखे धैर्य, प्रसंगावधान, बुद्धि आणि दक्षता (कौशल्य) हे चार गुण असतात, तो आपल्या कार्यात कधीही अयशस्वी होत नाही. असे आकाशचारी प्राणी त्यांना म्हणाले. हनुमानांच्याजवळ हे चारही गुण होते.
अखेर हनुमान समुद्राच्या पलिकडील तीरावर पोचले. आकाशामधूनच त्यांनी सर्वत्र दृष्टी टाकली. दक्षिण तटावरील मलय पर्वत, त्यावरील वनराजी, समुद्राला मिळणार्या नद्या, लंका नावाचे बेटही पाहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या विशाल शरीराकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे विशाल शरीर धारण करून लंकेत प्रवेश करणे योग्य होणार नाही. कारण तेथील राक्षसांच्या मनात कुतूहल उत्पन्न होईल व आपला भेद त्यांना कळून येईल. म्हणून त्यांनी आपल्या पर्वताकार शरीराचा संकोच केला व पुन्हा वानररूप रूप धारण केले.
दुस्तर अशा सागराचे उल्लंघन करून महाबली हनुमानांनी प्रथम त्रिकुट पर्वताचा आश्रय घेतला. तेथून त्यांनी लंकेचे निरीक्षण केले. नंतर ते वृक्षांनी आच्छादित पर्वत व प्रफुल्ल वनराजी यामधून विचरण करू लागले. लंकेत प्रवेश करून त्यांनी लंकेतील संरक्षणव्यवस्था, तेथील घरे, ऐश्वर्य यांचे निरीक्षण केले. पर्वताच्या शिखरावर वसलेली लंका त्यांना आकाशात तरंगत असल्याप्रमाणे दिसत होती. तिचे उत्तरद्वार गगनचुंबी होते. ती लंकानगरी भयानक राक्षसांनी व्याप्त होती. त्यांच्या हातात शूळ पट्टीश वगैरे शस्त्रे होती. ती लंकानगरी पाहिल्यावर हनुमानांच्या मनात विचार आला की ही लंका जी देवांनांही अजिंक्य आहे ती वानरांना जिंकणे शक्यच नाही. साम, दाम, दंड व भेद या उपायांचा येथे काही उपयोग होणार नाही. येथे फक्त अंगद, नील, सुग्रीव व आपण स्वत: हे चारच वानर येथेपर्यंत येऊ शकतात असे त्यांना वाटून गेले.
ज्या सीतेसाठी एवढा खटाटोप करायचा ती सीता प्रथम जिवंत आहे की नाही असा विचार त्यांच्या मनात आला. तेव्हा प्रथम सीतेचा शोध घेऊन हनुमानांनी नंतर लंका नगरी कशी जिंकता येईल याचा विचार करावा असे ठरवले.
म्हणून प्रथम ते सीताशोधाच्या मोहिमेवर निघाले. सीताशोधासाठी काय उपाय योजावा यावर त्यांनी दोन घटका विचार केला. रावणाच्या दृष्टीस न पडता त्यांना सीतेसे दर्शन करावयाचे होते. त्याच बरोबर रामकार्य बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावयाची होती. अयोग्य दूताची निवड केली तर देश व काल यांच्या प्रतिकूल कार्य करणारा हा दूत जवळ जवळ सिद्धीस गेलेली कार्येही नष्ट करतो. स्वत:ला शहाणा मानणारा दूतही अभिमानाने कार्य नष्ट करतो. तेव्हा आपण कसे वागले पाहिजे याचा ते स्वत:च्या मनाशी ऊहापोह करत होते.
आकाशमार्गाने प्रवास करत असता त्यांनी अति विशाल रूप धारण केले होते. लंकेत प्रवेश केल्यावर त्यांनी आपले वास्तविक वानररूप धारण केले होते. पण आता सीताशोधासाठी लंकेत फिरतांना हे वानररूपही पण उपयोगी पडणार नव्हते. कारण तेथे अतिशय शूरवीर व बलाढ्य राक्षस होते व त्यांची नजर चुकवून त्यांना सीतेचा शोध घ्यावयाचा होता. वास्तविक रूपात ते तिथे फिरले असते तर ते राक्षसांच्या दृष्टीस पडले असते व कदाचित राक्षसांनी त्यांना ठारही मारले असते. म्हणून त्यांनी लंकेत प्रवेश करतांना अतिशय छोटे रूप घेऊन रात्रीच्या वेळी प्रत्येक घरात घुसून सीतेचा शोध घेण्याचा विचार केला.
अनेन रूपेण मया न शक्या रक्षसां पुरी ।
प्रवेष्टुं राक्षसैर्गुप्ता क्रूरैर्बलसमन्वितैः ॥ ५-२-३३॥
हनुमतांनी विचार केला की, “मी या रूपाने या राक्षसांच्या नगरीत प्रवेश करू शकत नाही कारण अनेक क्रूर आणि बलाढ्य राक्षस हिचे रक्षण करीत आहेत.” म्हणून त्यांनी समयोचित कार्य सिद्ध करण्यासाठी सहज डोळ्यांना दिसून येणार नाही अशा रूपाचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी लंकेत प्रवेश करावयाचे ठरवले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment