Wednesday, April 10, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २९

कर्णवध 

    पुन्हा कर्ण व अर्जुन या दोघांचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाने आपल्या बाणांनी कर्णाच्या कवचाचे तुकडे केले. त्याच्या प्रहारांनी कर्ण जखमी झाला व रथावर मूर्छित होऊन पडला. कर्ण मूर्छित झाला हे पाहून अर्जुनाने कर्णाचा वध केला नाही. श्रीकृष्ण त्याला तो युद्धात बेपर्वाई दाखवत असल्याबद्दल दटावीत होते. कारण संकटात सापडलेल्या शत्रूवर हल्ला करून त्याला ठार मारले पाहिजे असे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावीत होते. पुन्हा अर्जुन कर्णावर बाणांचा प्रहार करू लागला. कर्णही सावध होऊन पुन्हा त्याचा प्रतिकार करू लागला. व श्रीकृष्णांनाही बाणांनी घायाळ करू लागला. नंतर कर्ण जेव्हा महारौद्राने अभिमंत्रित लोखंडाचा बाण अर्जुनावर सोडण्य़ाच्या तयारीत होता त्याचवेळी पृथ्वी कर्णाच्या रथाचे चाक गिळू लागली. तशाही परिस्थितीत कर्ण अर्जुनाच्या बाणांचा प्रतिकार करत होता.  तोपर्यंत पृथ्वीने कर्णाच्या रथाचे पूर्णपणे गिळले. शेवटी कर्ण रथातून खाली उतरला व पृथ्वीत घुसलेले चाक आपल्या दोन्ही भुजांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. चाक बाहेर निघत नव्हते. कर्ण हताश झाला रागाने थरथर कापू लागला व अर्जुनाला म्हणाला, “अर्जुना, तू धर्म व नीतीने वागणारा आहेस. तेव्हा क्षणभर थांब. मी हे चाक बाहेर काढतो. मग तू माझ्य़ाशी युद्ध कर. तू रथावर आहेस व मी जमिनीवर आहे याचा विचार कर.” 

    कर्णाच्या तोंडून या धर्माच्या गोष्टी ऐकून श्रीकृष्ण क्रुद्ध झाले. तेव्हा मात्र त्यांनी त्याला फैलावर घेतले. ते कर्णाला म्हणाले, “कर्णा, आता तुला धर्माची आठवण झाली. नीच मनुष्य संकट आले की दैवाची निंदा करतात, आपल्या कुकर्मांची निंदा करत नाहीत.” असे म्हणून त्यांनी पांडवांचा नाश करण्याच्या प्रयत्नांचा व द्यूतसभेत केलेल्या अधर्माचा पाढा कर्णापुढे वाचला. आणि अर्जुनाला कर्णाचा वध करण्यास सांगितले. कर्णाची मान लाजेने खाली झुकली. पुन्हा दोघांचे घमासान युद्ध सुरू झाले. कर्ण अर्जुनावर अस्त्रे सोडत होता व  आपल्या रथाचे चाकही बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. पण चाक बाहेर काढण्यास तो असफल ठरत होता. जेव्हा कर्ण रथावरून खाली उतरला होता तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले - ‘छिन्ध्यस्य मूर्धानमरे: शरेण न यावदारोहति वै रथं वृष:’ ‘अर्जुना कर्ण जोपर्यंत रथावर चढत नाही, तोपर्यंतच आपल्या बाणांनी त्य़ाचे मस्तक उडव.’ श्रीकृष्णांनी आज्ञा करताच अर्जुनाने कर्णाचे मस्तक उडवले व आपल्या विजयाचा रस्ता प्रशस्त केला. 

    कर्णाचा वध झाला. श्रीकृष्णांना अतिशय आनंद झाला. त्यांनी पार्थाला हृदयाशी कवटाळले कारण आजचे हे कार्य इंद्राने केलेल्या वृत्रासुराच्या वधाप्रमाणेच श्रेष्ठ ठरले होते. कर्णार्जुनांचे युद्ध पहाण्यास युधिष्ठिर रणांगणावर आला होता. पण कर्णाकडून जबरदस्त जखमी झाल्यामुळे पुन्हा शिबिरात परत गेला होता. म्हणून श्रीकृष्ण व अर्जुन ह्या विजयाची वार्ता त्याला देण्यासाठी शिबिराकडे गेले. श्रीकृष्णांच्या मुखातून ही वार्ता ऐकून युधिष्ठिराच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले. त्याने सर्व श्रेय श्रीकृष्णांनाच दिले

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment