त्याचे भाषण ऐकून क्रोधाविष्ट झाल्याने कठोर बनलेले ते राक्षस हनुमंताच्या पुच्छाला जुन्या पुराण्या फाटक्या सुती कपड्यांच्या चिंध्या गुंडाळू लागले. महाकपि हनुमान आपले शरीर आणि पुच्छ वृद्धिंगत करू लागले. राक्षसांनी चिंध्या गुंडाळल्यानंतर त्यांच्या पुच्छावर तेल ओतून त्याला आग लावून दिली. तेव्हां हनुमानांचे हृदय क्रोधाने भरून गेले. आपल्या पेटलेल्या पुच्छानेच त्यांनी राक्षसांना झोडपण्यास सुरूवात केली. तेव्हां क्रूर राक्षसांनी मिळून पुन्हा त्या वानर शिरोमणीना करकचून बांधून ठेवले. त्या वेळी वीर हनुमान करकचून बांधलेले असतांना त्या समयास अनुसरून विचार करू लागले. मी जरी बद्ध झालो असलो तरी राक्षसांचे माझ्यापुढे काही एक चालणार नाही. मी हे पाश तोडून टाकून एका उड्डाणात यांना मारून टाकीन. संग्रामामधे सर्व राक्षसांचा संहार करण्यास हनुमान एकटे समर्थ असले तरी त्यांनी ते बंधन मुकाट्याने स्वीकारले. त्यांनी विचार केला की राक्षस आपली नगरातून धिंड काढणार असल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा लंकानगरी दिवसा नीट पहायला मिळेल. त्यामुळे हनुमानांनी आपले दिव्य स्वरूप गुप्त ठेवले व ते बंधन आनंदाने स्वीकारले. महाकपीला बद्ध केल्याचा आनंद राक्षसांना झाला व ते त्यांना शंख व नगारे वाजवीत व त्यांच्या अपराधांची घोषणा करत नगरात फिरवू लागले. पुढे हनुमान व मागे राक्षस अशी वरात चालली होती. नगरातून फिरत असता हनुमानांनी नगरीतील चित्रविचित्र विमाने, तटबंदी असलेले भूभाग, पृथक पृथक बनविलेले सुंदर चबुतरे पाहिले. सुव्यवस्थितपणे रेखलेले चौक, घरांनी गजबजून गेलेले रस्ते, चव्हाटे, लहान मोठे मार्ग आणि घरांमधील मोकळे भूभाग, त्या वायुपुत्रानी नीटपणे निरखून पाहिले.
शेपूट जळत असलेल्या त्या वानरास पहाण्यास लंकेमधे गर्दी होऊ लागली. सीतेलाही ही बातमी समजली. तिने अग्निदेवाचे ध्यान केले व म्हणाली, “हे अग्निदेवा ! मी जर पतीची शुश्रुषा केली असेल, जर काही तप केले असेल अथवा माझ्या ठिकाणी जर पातिव्रत्य असेल तर हे अग्ने ! तू हनुमंताला शीतल असा भासमान हो.” सीतेच्या प्रार्थनेमुळे अग्नी हनुमानांकरता शीतल झाला. हनुमानांना आपल्या शेपटाच्या टोकावर जणु काही बर्फाचा गोळा आहे असेच वाटू लागले. नंतर त्या महाकपींनी पाश तोडून आकाशात वेगाने उड्डाण केले. आता आणाखी कोणते कार्य शेष राहिले त्याचा ते विचार करू लागले. प्रमदवन उध्वस्त करून झाले होते. मुख्य सेनानायकांसह राक्षसांची एक अंश सेना त्यांनी नाहिशी केली होती. रावणाची भेट झाली होती. आता त्यांनी पुच्छाला लागलेल्या अग्नीला लंकेतील श्रेष्ठ गृहांची आहुती द्यायचे ठरवून ते लंकेतील भवनांतून हिंडू लागले. एका घरावरून दुसर्या घरावर उड्डाण करत लंकेतील घरे जाळू लागले. बिभीषणाचे घर सोडून त्यांनी प्रहस्ताचा महाल, महापार्श्वाचे निवासस्थान, वज्रदंष्ट्र, शुक, सारण, मेघनाद, जंबुमाळी, सुमाळी, रश्मिकेतु, सूर्यशत्रू, ह्रस्वकर्ण, रोमश वगैरे सर्वांची घरे जाळली. नंतर ते रावणाच्या महालावर पोचले. वायूच्या सहाय्याने प्रदीप्त झालेला अग्नी घराघरांवर पसरू लागला. उंच उंच प्रासाद अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. सर्व लंकापुरी जळून भस्मसात होऊ लागली. नंतर महाकपी हनुमानांनी समुद्राच्या जलात आपली शेपटी बुडवून शेपटीची आग विझवली.
नंतर त्यांना चिंता वाटू लागली की या आगीत सीता सुद्धा दग्ध झाली नसेल ना ?
धन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् ।
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवांभसा ॥५-५५-३॥
“प्रदीप्त झालेला अग्नि ज्याप्रमाणे जळाने लोक विझवून टाकतात त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाला जे महामनस्वी महात्मा पुरुष आपल्या बुद्धीच्या द्वारा आवरून धरतात तेच खरोखरच संसारात धन्य आहेत.” क्रोध हाच सर्वनाशाला कारणीभूत होतो. आपल्या क्षमेच्या बळावर जो क्रोधाचा त्याग करतो तोच खरा पुरुष. त्यांना वाटू लागले की आपण क्रोधाच्या आहारी जाऊन भलताच उद्योग करून बसलो. लंकेला लागलेल्या अग्नीत जर सीतेचीही आहुती पडली असेल तर आपण सर्व स्वामीकार्याचाच नाश केला आहे. धर्म व अर्थ याचा आपल्या हातून सर्वस्वी नाश झाला आहे, आपण पापाचे भागिदार बनलो आहोत अशा विचाराने ते व्यथित झाले. कदाचित सीतादेवीच्या धर्माचरणानेच सीतेचे रक्षण केले असेल असे वाटून त्यांना उत्साहही वाटला व ते सीतेची खुशाली पहाण्यासाठी पुन्हा अशोकवाटिकेकडे वळले. सीता खुशाल आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला. तिला नमस्कार करून परत निघाले. सीतेने त्यांना उचित वाटत असेल तर आणखी एक दिवस थांबून विश्रांती घेण्याची विनंती केली. पण हनुमानांनी तिला राम तुला सोडवायला नक्की येतील असे आश्वासन देऊन रामांना भेटायला परत समुद्रोल्लंघन करण्यासाठी अरिष्ठ नामक पर्वतावर चढले. दक्षिण तटावरून उत्तरतटाकडे जाण्यास त्यांनी आपल्या शरीरास खूप वाढवले उड्डाण केले.
मजल-दरमजल करत उत्तरतटाच्या निकट महागिरी महेंद्रावर दृष्टी पडताच मोठ्याने गर्जना करू लागले. गर्जनेने त्यांनी दाही दिशा दणाणून सोडल्या. हनुमानांचा सिंहनाद ऐकून सर्व वानर आनंदित झाले व हनुमान आपले काम नक्की फत्ते करून आले याची त्यांना खात्री वाटली. महेंद्र पर्वतावरून उतरून त्यांनी जांबवंत वगैरे वृद्द्ध मंडळी व स्वामीभावनेने अंगदालाही नमस्कार केला आणि त्यांना त्यांनी लंकेतील सर्व वृत्तांत सांगितला. सीतेचा शोध लागलेला कळताच सर्व वानर आनंदित झाले. हनुमानांनी सीतेच्या दुरवस्थेचे, तिच्या पातिव्रत्याचे, तेजस्वितेचे वर्णन करून वानरांना रावणाबरोबर युद्ध करण्यास उत्साहित केले. या हनुमानांच्या भाषणात नेतृत्वाचे गुण दिसतात. हनुमान म्हणाले, “मी एकटा सुद्धा राक्षसगणांसहित समस्त लंकापुरीचा वेगाने विध्वंस करण्यास आणि महाबलाढ्य रावणास मारण्यास पर्याप्त आहे. मग जर संपूर्ण अस्त्रांना जाणणारे आपल्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, शक्तिशाली आणि विजयाभिलाषी वानरांची सहायता मिळाली तर आणखी काय पाहिजे ? त्यांनी अंगद, जांबवान, नील, मैंद, द्विविद यांच्या सामर्थ्याचीही स्तुती केली. त्यामुळे वानरवीरांच्या अंगात वीरश्री संचारली. अंगदाला तर सर्व वानरांना घेऊन लंकेत जाऊन रावणाचा वध करून सीतेला घेऊनच रामांकडे जावे असेच वाटू लागले. परंतु श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेस सोडवून आणण्याची प्रतिज्ञा केली असल्यामुळे आपण सीतेला सोडवून आणणे उचित नाही असा जांबवानानी सल्ला दिला. त्याप्रमाणे सर्व वानरगण श्रीरामांना सर्व वृत्तांत निवेदन करण्यास निघाले.
सौ. मनीषा अभ्यंकर