Monday, April 15, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३४

अश्वत्थाम्याला शाप - 

    युद्ध संपले होते पण शेवटचा अंक बाकी होता. पांडवांचा जय झाला असून सर्व कौरव युद्धात ठार मारले गेले आहेत ही वार्ता धृतराष्ट्र व गांधारीला कळवणे आवश्यक होते. आपल्याच बांधवांचा आपल्याला वध करावा लागला असल्यामुळे युधिष्ठिर मनोमन दु:खी होता. धृतराष्ट्र व गांधारीसमोर उभे रहाण्याचे त्याला धैर्य नव्हते. म्हणून त्याने श्रीकृष्णांना विनंती केली की तुम्ही हस्तिनापुरात जाऊन त्या दोघांचे सांत्वन करावे. त्यांचा राग थोडा शांत झाला की  मग युधिष्ठिराने हस्तिनापूरला जाणे योग्य आहे असे वाटून श्रीकृष्ण हस्तिनापूरला जाण्यास तयार झाले. 

    श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले. धृतराष्ट्राचा हात हातात घेऊन त्याच्या पुत्रांच्या झलेल्या वधाबद्दल स्वत: शोक केला. पण नंतर त्यांनी युद्धाची अपरिहार्यता धृतराष्ट्राला सांगितली. दुर्योधनाने दिलेले सर्व कष्ट पांडवांनी सहन केले. १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगून सुद्धा ठरलेल्या अटीप्रमाणे त्याने त्यांना त्यांचे राज्य परत दिले नाही. पांडव पाच गावांवर सुद्धा संतुष्ट होते. पण त्याने सुईच्या टोकावर राहील एवढी माती सुद्धा पांडवांना मिळणार नाही असे सांगितल्यावर युद्धाशिवाय पर्याय राहिला नाही हे त्यांनी स्पष्ट केले. श्रीकृष्ण म्हणाले, “यात पांडवांचा काही दोष नाही. आणि तुमचा वंश आता पांडवच चालवणार आहेत. पिंडदानामुळे पुत्राकडून प्राप्त होणारे फळ आता तुम्हाला पांडवांकडूनच मिळणार आहे. तेव्हा आपण त्यांचे वाईट चिंतू नका. ते गांधारीला म्हणाले, हे महाराणी, पुत्राची समजूत कढातांना तुम्ही त्याला म्हणाला होतात की ‘यत्र धर्मस्ततो जय:’ ती तुम्ही म्टलेलीच गोष्ट आज सत्य झाली आहे. युधिष्ठिर आजही बंधुजनांच्या वधामुळे दु:खी झाला आहे. तो तुमच्यासमोर येण्याचे धाडस करू शकत नाही.” श्रीकृष्णांनी असे बोलून दोघांनाही धीर दिला व काही आशंका मनात आल्यामुळे ते परत पांडवांकडे परत येण्यास निघाले.

    इकडे दुर्योधन मांड्या तुटलेल्या अवस्थेत रणांगणात पडलेला होता. विलाप करत होता. त्याच्या भोवती अनेक लोक जमलेले होते. त्याने  त्यांना आपल्याला अधर्माने युद्धात कसे ठार मारले ते अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा यांना सांगण्याची विनंती केली. त्यानुसार त्यातील काही दूतांनी ही वार्ता त्या तिघांपर्यंत पोचवली. ती वार्ता कळताच ते तिघेही दुर्योधन जिथे पडलेला होता तिथे आले. त्याची ती अवस्था पाहून तिघांना अतिशय वाईट वाटले. एकेकाळी पृथ्वीचे राज्य भोगणारा हा दुर्योधन आता दयनीय अवस्थेत पडला होता. आपण शत्रूला पाठ दाखवली नाही, क्षत्रियोचित पराक्रम गाजवला आहे व वीरमरण पत्करले आहे याचे त्याला समाधान होते. पण अश्वत्थामा त्याची ती अवस्था पाहून दु:खी झाला होता. त्याने तिथे प्रतिज्ञा केली की, “मी सर्व पांचालाचा वध करीन, तुम्ही मला त्य़ासाठी आज्ञा द्या.” ते ऐकून दुर्योधन प्रसन्न झाला. त्याने कृपाचार्यांकरवी अश्वत्थाम्याचा  सेनापतिपदावर अभिषेक केला. दुर्योधनाचा निरोप घेऊन तिन्ही महारथी वनात विश्रांतीसाठी गेले. तेथे रात्री अश्वत्थाम्याला झोप येत नव्हती. आपण प्रतिज्ञा केली पण हे कार्य कसे पार पाडायचे याची त्याला चिंता लागलेली होती. तेव्हा त्याला रात्री कावळ्यांवर हल्ला करत असलेले एक घुबड दिसले आणि त्याचा विचार पक्का झाला. त्याने कृपाचार्य व कृतवर्म्याला उठवले आणि आपला विचार सांगितला. त्याचा तो कठोर निर्णय ऐकून दोघेही शहारले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment