अर्जुनाचे सर्पमुख बाणापासून रक्षण -
कौरव सैन्यातील अनेक वीरांचा पराभव अर्जुनाने केला. रणांगणावर रक्ताची नदी वहात होती. पांडवांच्या बाजूचे सर्वच योद्धे कौरव पक्षातील वीरांशी लढत होते. उत्तमौजाने कर्णपुत्र सुषेणाचा वध केला. सात्यकीने कर्णपुत्र प्रसेनचा वध केला. भीमाने दु:शासनाला ठार मारले व आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने त्याच्या रक्ताचे पान केले. त्याने आणखी दहा धृतराष्ट्राच्या पुत्रांचा वध केला. नंतर अर्जुनाने कर्णपुत्र वृषसेनाचा वध केला. त्यामुळे क्रुद्ध होऊन कर्ण अर्जुनाबरोबर लढण्यास आला. श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धासाठी येत असलेला कर्ण दाखवला व सावध होण्य़ास सांगितले व म्हणाले, ‘सर्वयत्नेन कौन्तेय हन्तुमर्हसि सूतजम्’ ‘अर्जुना, हरप्रयत्नांनी तुला कर्णाला ठार मारावयाचे आहे.’ व आशीर्वाद दिला की ‘श्रेयस्तेऽस्तु सदा पार्थ युद्धे जयमवाप्नुहि’ ‘तुझे नेहेमी कल्याण होवो, तुला युद्धात विजय प्राप्त होईल’. प्रत्यक्ष भगवंताचा आशीर्वाद मिळाल्यावर आता चिंता कसली ? अर्जुनाने मोठ्या उत्साहाने श्रीकृष्णांना आपला रथ कर्णासमोर नेण्यास सांगितले. आणि कर्ण व अर्जुनाचे ‘न भूतो न भविष्यति’ असे युद्ध सुरू झाले. ते युद्ध पहाण्यास आकाशात देव, दानव, गंधर्व, पिशाच, नाग वगैरे सर्व उपस्थित झाले. कोणाचा जय होईल याविषयी त्यांच्यातही मतभेद सुरू झाला. कोणी अर्जुनाच्या बाजूने बोलत होते तर कोणी कर्णाच्या. इंद्र व सूर्य यांच्यामधे सुद्धा कोणाचा पुत्र विजयी होईल याविषयी कलह सुरु झाला. ओज, तेज, हर्ष, पराक्रम वगैरे भाव अर्जुनाच्या हृदयात प्रविष्ट झाले. दोघेही जण एकमेकांच्या सैन्याचा नाश करत होते. शेवटी कर्ण व अर्जुन परस्परांना भिडले. परशुरामांकडून प्राप्त केलेली शत्रुविनाशक अस्त्रे कर्ण अर्जुनावर सोडत होता व अर्जुन ती अस्त्रे आपल्या बाणांनी विफल करत होता. कर्ण हळू हळू अर्जुनापुढे निष्प्रभ ठरू लागला. तेव्हा कर्णाने अर्जुनावर सर्पमुख बाण सोडण्य़ाचे ठरवले. तो बाण त्याने अर्जुनावर सोडण्याकरताच राखून ठेवला होता. कर्णाने सर्पमुख बाण सोडताच आकाश जाज्वल्यमान झाले. पृथ्वीवर शेकडो उल्का पडू लागल्या. तो बाण कर्णाने सोडलेला पहाताच इंद्रासह सर्व लोकपालांनी हाहाकार केला. आता अर्जुनाचा वध होणार असेच सर्वांना वाटले. त्यावेळी श्रीकृष्णांनी अगदी सहज खेळातल्याप्रमाणे रथ पायांनी जोरात दाबला. त्यामुळे त्या रथाच्या चाकांचा काही भाग जमिनीत घुसला. व त्यामुळे रथाचे घोडे सुद्धा खाली वाकले. त्यामुळे कर्णाने सोडलेल्या सर्पमुख बाणाने अर्जुनाचा मस्तकावरील किरीट उडवला व अर्जुनाचे प्राण वाचले. ही गोष्ट श्रीकृष्णांच्या कुशल सारथ्यामुळेच घडली होती.
कर्णाने सोडलेल्या त्या बाणावर असणारा साप हा अर्जुनाशी वैर करणारा महानाग होता. पूर्वी अग्निदेवाला तृप्त करण्यासाठी अर्जुन खांडववन जाळत असता हा नाग आपल्या आईच्या मुखात घुसून आकाशात उडत जात होता. त्यावेळी त्याच्या आईचा वध अर्जुनाकडून झाला होता. त्यामुळे त्याने अर्जुनाशी वैर धरले होते. म्हणून तो अर्जुनाचा बदला घ्यायचा म्हणून कर्णाच्या सर्पमुख बाणावर येऊन बसला होता. कर्णालाही हे माहीत नव्हते. आपल्याला अर्जुनाचा वध करता आला नाही याचे त्या महानागाला वाईट वाटले. म्हणून तो पुन्हा कर्णाकडे गेला व पुन्हा आपल्याला अर्जुनावर सोडण्य़ास सांगितले. पण एकच बाण आपण दोन वेळा मारत नाही व मला अर्जुनाचा वध करण्यास दुसर्याच्या मदतीची अपेक्षाही नाही असे सांगून कर्णाने त्याला नकार दिला. तेव्हा तो महानाग स्वत:च अर्जुनावर चालून आला. तेव्हा त्याची पार्श्वभूमी सांगून श्रीकृष्णांनी त्या नागाला मारण्यास अर्जुनाला सांगितले. अर्जुनाच्या बाणांनी नाग मरून पडला. श्रीकृष्णांनीही जमिनीत घुसलेली रथाची चाके आपल्या दोन भुजांनी बाहेर काढली व ते पुन्हा अर्जुनाला घेऊन युद्धास सज्ज झाले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment