Thursday, November 22, 2018

१४९) अमृतानुभव प्रकरण ३

बागुलाचेनि मरणें । तोषावें की बालपणें ।
 येरा तो नाही मा कोणे । मृत्यु मानावा ॥३-१३॥१५७॥ 

अर्थ - बागुलबुवाच्या मरणामुळे लहानग्या बाळाने आनंदित व्हावे. पण  इतरांच्या दृष्टिकोनातून त्याला अस्तित्वच नसल्यामुळे बागुलबुवाच्या मरण्यात त्यांनी कोणाचा मृत्यु नानून खूष व्हावे ? 

स्पष्टीकरण - मुलांना थोडी भीती दाखवण्यासाठी आई कल्पित बागुलबुवा असल्याचे मुलाला सांगते. ‘तू जेवलास तर बागुलबुवा जाईल, किंवा मी बागुलबुवाला हाकलून लावते’ असे आईने म्हणताच मुलगा जेवतो व आई खोटेखोटेच बागुलबुवाला मारून टाकते. बागुलबुवा गेला म्हणून मुलगा आनंदित होतो. आता हा बागुलबुवा कल्पितच आहे. अज्ञानाने मुलाला तो खरे वाटला व तो मेल्याचा त्याला संतोष वाटला. पणा बाकींच्यावच्या दृष्टिकोनातून मुळात बागुलबुवाच नसतांना त्याच्या असण्याचे दु:ख व त्याच्या मरणाचा आनंद कोणाला वाटणार ? तोच प्रकार बंध व मोक्षाचा आहे. जो बंध खरा मानीत असतो व त्याच्या जाचाने त्रस्त झालेला असतो, त्या अज्ञानी जीवालाच मोक्षही खरा वाटत असतो. ज्याला बंधाचा खोटेपणा कळतो त्याला मोक्षाचाही खोटेपणा कळतो. जो बागुलाला पुरते ओळखतो त्याच्या बाबतीत बागुल आला वा बागुल गेला या दोन्ही वाक्यांना निरर्थकत्व असते, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत बंध व मोक्ष यांना निरर्थकत्व असते.

सुभाषिते (२)

कुम्भ: परितम्भा: पिबत्यसौ कुलसम्भवोऽम्भोधिम् । 
अतिरिच्यते सुजन्मा कश्चिज्जनकं निजेन चरितेन ॥२३-१०॥ 

अर्थ - कुंभ (मडके) हा मोजकेच पाणी पितो. परंतु कुंभामधून जन्म पावलेल्या अगस्ती ऋषीने सगळा समुद्रच पिऊन टकला. चांगल्या कुळात जन्मास आलेला आपल्या चांगल्या चारित्र्याने आपल्या वडिलांच्यावर ताण करतो.

Wednesday, November 21, 2018

१४८) अमृतानुभव प्रकरण ३

 मोक्षुचि बंधु होये । तरी मोक्ष शब्द का साहे ।
अज्ञाना घरी त्राये । वाउगियाचि ॥३-१२॥१५६॥ 

अर्थ - मोक्षच जर बंध ठरत असेल तर मग मोक्ष या शब्दाला अर्थ तरी काय राहिला ? (अशी जर शंका घेशील तर त्याचे उत्तर असे की) अज्ञानाच्या घरी या मोक्षाची खोटीच प्रतिष्ठा झाली आहे. किंवा त्या संरक्षण मिळाले आहे.        
स्पष्टीकरण - अहंता असणे म्हणजे बंध व अहंता नसणे म्हणजे मोक्ष. जीवोऽहं व शिवोऽहं या दोन्हीमधे अहंकाराची भावना आहे. हा अहंकारच आपल्या स्वरूपावर जबरदस्तीने अंधार पाडतो, आत्म्याचे अस्तित्व लपवतो व प्रथम ‘जीवोऽहं’ म्हणायला लावतो. साधनेने जर मनुष्याला ‘शिवोऽहं’ असे ज्ञान झाले तरी हा अहंकार आपले खरे अस्तित्व लपवून बोध्य-बोधक रूपाने स्वस्वरूपाची जाणीव करून देतो. त्यामुळे नित्यमुक्तता त्याच्यापासून लांबच रहाते. कारण आत्मरूपात बोध्य, बोधक व बोध असे तीन भेद नसूनही ‘शिवोऽहं’ अशा ज्ञानजागृतीतही हा अहंकार हे तीन भेद दाखवतो. फक्त फरक एवढाच की ‘जीवोऽहं’ या भावनेमधे तो दृश्यरूपाने असतो व ‘शिवोऽहं या भावनेमधे तो अदृश्यरूपाने असतो. त्यामुळे या स्थितीलाही मोक्ष न म्हणता बंधच म्हटले पाहिजे असे ज्ञानदेवांचे मत आहे.

सुभाषिते (१)

विश्वानि देव: सवितर्दुरितानि परा सुव । 
यद् भद्रं तन्न आ सुव ॥१-११॥ 
 
अर्थ - हे सूर्यदेवा, आमची समस्त पापे दूर कर. व जे आम्हाला मंगलदायक असेल ते सर्व दे.