Thursday, April 4, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २४

अश्वत्थाम्याने सोडलेले नारायणास्त्र -

    आपल्या पित्याचा वध झाला हे कृपाचार्यांकडून अश्वत्थाम्याला कळले. आणि या सर्व प्रकरणात युधिष्ठिराचे असत्य भाषण कारणीभूत आहे हे कळल्यावर अश्वत्थामा खवळला. तेव्हा त्यानेही दुर्योधनासमोर पांचालांचा वध करण्याची प्रतिज्ञा केली. 

    पूर्वी द्रोणाचार्यांनी भगवान नारायणाला प्रसन्न करून घेऊन नारायणास्त्र मिळवले होते. ते अस्त्र शत्रूचा वध केल्याशिवाय परत फिरत नसे मग तो शत्रु वध्य असो वा अवध्य. आणि जो ह्या अस्त्राने अवध्य मनुष्यास पीडा देईल त्याला स्वत:लाही सर्व प्रकारची पीडा होईल असे म्हणून नारायणाने त्यांना त्या अस्त्राचा सरसकट प्रयोग करू नये असाही उपदेश दिला होता. युद्धभूमीवर रथातून खाली उतरणे, आपली अस्त्रे व शस्त्रे खाली ठेवणे, अभयाची याचना करणे वा शत्रूला शरण जाणे हे चार उपाय नारायणांनी ह्या अस्त्राच्या शांतीकरता सांगितले होते. आणि ह्या अस्त्राचा उपदेश द्रोणांनी फक्त अश्वत्थाम्याला केला होता. ह्या अस्त्राची माहिती पांडवांकडील कोणात्याच योद्ध्याला नव्हती. आपल्या पित्याचा सूड उगवण्याच्या हेतूने अश्वत्थाम्याने ह्याच अस्त्राचा प्रयोग पांडवपक्षावर करण्याचे ठरवले. 

    अश्वत्थाम्याने युधिष्ठिराला त्याची सर्व सेना परत पाठवण्यास सांगितले व पांडव व पांचालांना लक्ष्य करून त्याने नारायणास्त्र प्रगट केले. त्यामुळे आकाशात हजारो बाण प्रगट झाले. त्या बाणांचे अग्रभाग प्रज्वलित झालेले होते व ते बाण सापाच्या आकाराचे होते. थोड्याच वेळात त्या बाणांनी सर्व आकाश व्याप्त केले. नंतर आकाशात तोफा, गदा व ज्याच्या परिघावर सुरे बसवले होते अशी कितीतरी चक्रे आकाशात प्रगट होऊ लागली. पांडव महारथी त्या शस्त्रांचा जसा जसा प्रतिकार  करत होते तसतसा त्या अस्त्रांचा वेग वाढतच होता. युधिष्ठिरासह सर्व पांडवसेना घाबरून गेली. तेव्हा श्रीकृष्ण सर्वांना उद्देशून म्हणाले, “हे योद्ध्यांनो, सर्व अस्त्रे व शस्त्रे खाली टाका व रथातून खाली उतरा. ह्या अस्त्राच्या शांतीचा हाच उपाय आहे. तेव्हा खाली उतरा व या अस्त्राला हात जोडून नमस्कार करा. म्हणजे हे अस्त्र कोणालाही मारणार नाही. पण जो या अस्त्राचा प्रतिकार करेल त्याला मात्र हे अस्त्र निश्चित ठार मारेल. 

    सर्वांनी जसे आपली अस्त्रे व शस्त्रे टाकण्याचा विचार केला तेव्हा भीमाने आपली हत्यारे टाकाण्याची आवश्यकता नाही असे सांगितले. त्याला वाटत होते की आपण या अस्त्राचा सहज प्रतिकार करू. असे म्हणून शंख वाजवून व दंड थोपटून तो एकटाच त्या अस्त्राच्या प्रतिकाराकरता सज्ज झाला. त्याबरोबर भीमासह रथ, घोडे व सारथी यांना त्य़ा बाणांनी लपेटून टाकले. तेव्हा श्रीकृष्ण व अर्जुन वेगाने भीमाजवळ गेले व त्यांनी त्याला जबरदस्तीनेच खाली उतरवले. श्रीकृष्ण त्याला म्हणाले, “कुंतिनंदन, अरे मी युद्ध करू नकोस असे सांगून सुद्धा तू ऐकत नाहीस ? युद्ध करून या अस्त्रावर जर जय मिळवता येत असता तर आम्ही शस्त्रे खाली टाकून का दिली असती ? युद्ध नसते केले ?” श्रीकृष्णांचे डोळे रागाने लाल झाले होते. त्यांनी धुसफुसणार्‍या भीमाला बळेच रथावरून खाली उतरवले व त्याची सर्व शस्त्रे खाली ठेवायला लावली. त्याबरोबर नारायणास्त्र शांत झाले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment