द्रोणवध -
दुर्योधनाने नंतर द्रोणांना पांडवांबरोबर युद्धासाठी उत्तेजित केले. ‘आता दुर्योधनाच्या विजयाकरता आपल्याला नीच कार्यही जरी करावे लागले तरी ते मी करीन. त्यासाठी मला आता ते लोक जाणत नसले तरी ब्रह्मास्त्रे वगैरे दिव्यास्त्रांचा उपयोग करावा लागेल. पण युद्धात पांचालांचा वध केल्याशिवाय मी कवच उतरवणार नाही’ अशी द्रोणाचार्यांनी प्रतिज्ञा केली. व त्यानुसार ते घमासान युद्ध करू लागले. पांचाल वीरांचा भयंकर आर्तनाद ऐकायला येऊ लागला. युद्धामधे घोडे व योद्धे यांचा विनाश होत असलेला पाहून पांडवांना विजयाची आशा राहिली नाही. पांडव चिंताग्रस्त झालेले पाहून श्रीकृष्ण म्हणाले, “पार्थ, द्रोणाचार्य सर्व धनुर्धार्यांमधे श्रेष्ठ आहेत. जोपर्यंत यांच्या हातात धनुष्य आहे तोपर्यंत इंद्र सुद्धा यांच्या पुढ्यात उभा राहू शकणार नाही. जेव्हा हे शस्त्र खाली ठेवतील तेव्हाच त्यांचा वध करता येईल. म्हणून हे पांडवांनो, ‘गुरूचा वध करणे योग्य नाही; ही धर्माभावना सोडून द्या व त्यांच्यावर जय मिळावण्याचा प्रयत्न करा. अश्वत्थामा मेला असे सांगितल्यावर हे शस्त्र खाली ठेवतील. तेव्हा यांना कोणीतरी ‘अश्वत्थामा मेला’ असे सांगा.” अर्जुन व युधिष्ठिराला श्रीकृष्णांची ही गोष्ट उचित वाटली नाही. पण भीमाने आपल्याच सैन्यातील ‘अश्वत्थामा’ नावाच्या हत्तीला मारले ‘अश्वत्थामा मेला’ असे खोटेच द्रोणाचार्यांना सांगितले. द्रोणाचार्य संतापले व त्यांनी पांडवसेनेचा महान संहार आरंभला. तेव्हा अनेक महर्षी तेथे प्रगट झाले व द्रोणांना म्हणाले, “द्रोण, आता तुम्ही शस्त्रे खाली ठेवा. आतापर्यंत तुम्ही अधर्माने युद्ध केले आहे. जे ब्रह्मास्त्र जाणत नाहीत, त्यांनाही तुम्ही या अस्त्राने दग्ध केले आहे. तुम्ही सत्य धर्मात स्थित रहाणारे ब्राह्मण अहात. हे क्रूर कर्म आपल्याला शोभा देत नाही. आता आणखी पापपूर्ण कृत्ये करू नका. तसेच मनुष्य लोकात रहाण्याचा तुमचा समयही पूर्ण झाला आहे. तेव्हा शस्त्र खाली ठेवा.” तेव्हा द्रोणांनी शस्त्र खाली ठेवण्य़ाचा विचार केला. पण तत्पूर्वी युधिष्ठिर हा सत्यवचनी आहे, तेव्हा त्याला अश्चत्थाम्याविषयीची खरी वार्ता विचारण्याचे ठरवले. तेव्हा श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले - “राजन्, द्रोण जर अर्धा दिवस जरी युद्ध करतील तरी पांडवांच्या सेनेचा सर्वनाश होईल. तेव्हा द्रोणांपासून आम्हाला वाचवा. प्राणरक्षण करण्यासाठी असत्य जरी बोलावे लागले तरी असत्य बोलणार्याला पाप लागत नाही.” भीमानेही आग्रह केल्यावर युधिष्ठिर द्रोणांना म्हणाला -
अश्वत्थामा हत इति शब्दमुच्चैश्चचार ह ।
अव्यक्तमब्रवीद् राजन् हत: कुञ्जर इत्युत ॥१९०-५५॥द्रोणापर्व॥
‘अश्वत्थामा मारला गेला’ हे वाक्य त्याने मोठ्याने म्हटले व हत्तीचा वध झाला आहे हे वाक्य त्याने हळू उच्चारले. युधिष्ठिराच्या मुखातून हे वचन ऐकून द्रोण पुत्रशोकाने संतप्त झाले व त्यांनी शस्त्राचा त्याग केला व नंतर धृष्टद्युम्नाने त्यांचा वध केला. पण तो फक्त वध करूनच थांबला नाही तर त्याने द्रोणाचार्यांचे कापलेले मस्तक कौरवांच्या समोर फेकले. त्यामुळे सर्व कौरव दशदिशांना पळू लागले. युद्धात भीष्मांच्या नंतर द्रोणाचार्यांसारख्या महारथीचाही वध झाला.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment