Friday, April 5, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २५

    पांडवसेना सुव्यवस्थित होऊन पुन्हा युद्धास तयार झाल्याचे पाहून दुर्योधनाने अश्वत्थाम्याला पुन्हा नारायणास्त्राचा प्रयोग करण्य़ास सांगितले. पण ते अस्त्र परत फिरत नसे व त्याचा दुसर्‍यांदा प्रयोगही करता येत नसे. व पुन्हा प्रयोग केला तर प्रयोग करणार्‍यावरच ते उलटत असे. त्यामुळे अश्वत्थामा त्य़ा अस्त्राचा पुन्हा प्रयोग करू शकला नाही. श्रीकृष्णांनी या अस्त्राच्या शांतीचा उपाय सांगितला होता त्यामुळेच पांडवांचे रक्षण होऊ शकले. नंतर अश्वत्थाम्याने आग्नेयास्त्र सोडले व त्यामुळे पांडवांची एक अक्षौहिणी सेना नाश पावली पण तरीही श्रीकृष्ण व अर्जुन हे नर-नारायण असल्यामुळे त्या अस्त्राचा त्यांच्यावर काहीही प्रभाव पडला नाही असे व्यासांनी अश्वत्थाम्याला त्याचे कारण सांगितले.

    द्रोणांचा वध झाल्यावर कौरवसेना कर्णाच्या सेनापतित्वाखाली पुन्हा लढण्यास सिद्ध झाली. अश्वत्थामा पुन्हा नव्या जोमाने पांडवांबरोबर युद्ध करू लागला. अश्वत्थाम्याचा आजचा पराक्रम पाहून अर्जुन अचंबितच झाला. त्याच्या पराक्रमापुढे अर्जुनाचा पराक्रम फिका पडू लागला, तसतसा श्रीकृष्णांचा रोष वाढू लागला. ते अर्जुनला म्हणाले, “पार्थ, हा आपल्या गुरूचा पुत्र आहे असे समजून याची उपेक्षा करू नकोस. आज तुझ्यात केवढा बदल मला दिसून येते आहे ! कुठे गेली तुझी ती वीरवृत्ती ? की गांडीव धनुष्यावरची तुझी पकड ढिली पडली आहे ? तुझ्या दोन्ही भुजात पहिल्यासारखा पराक्रम राहिला नाही की काय ?” असे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचा पराक्रम जागा केला ? अर्जुन मधेच असा ढिला पडलेला पाहिला की श्रीकृष्ण त्याला असेच बोलून उर्जा देत असत व त्याचा पराक्रम जागवत असत. कधी कधी युद्धभूमीवरची दृश्ये दाखवून म्हणत असत, ‘अर्जुना, हा या युद्धात तू जो पराक्रम केला आहेस ना तो तुलाच योग्य आहे किंवा स्वर्गात इंद्राला योग्य आहे.’ व असे म्हणून ते त्याचे मनोबल वाढवत असत.

भावाभावांच्या वादाचा निर्णय.

    अठरा दिवस चाललेल्या युद्धात पहिले दहा दिवस कौरवांच्या सेनेचे भीष्म सेनापती झाले होते व नंतर पाच दिवस द्रोण सेनापती होते. द्रोणांच्या मृत्युनंतर कर्णाला सेनापती करून कौरव पुन्हा पांडवांशी युद्ध करण्यास सज्ज झाले होते. दोन्ही सैन्ये पुन्हा एकमेकांवर कुरघोडी करू लागली होती.
    आता कर्ण व अश्वत्थामा हे दोन बलाढ्य वीरांवर दुर्योधनाची विजयाची धुरा होती. त्याप्रमाणे दोघेही पराक्रम गाजवत होते. त्यावेळी युधिष्ठिर नकुल व सहदेवासह कर्णाकडून पराजित झाला व घायाळ झाल्यामुळे आपल्या छावणीत परत आला. तेव्हा अर्जुन अश्वत्थाम्याशी युद्ध करण्य़ात गुंतला होता. अश्वत्थाम्याचा पराभव करून आला तोपर्यंत कर्ण त्याच्या समोर आला. पण युधिष्ठिर रणांगणात कोठे दिसत नसल्यामुळे व त्याचा सामना कर्णाशी झाला असल्याचे कळल्यामुळे भीमाला रणांगण सांभाळण्य़ास सांगून तो युधिष्ठिराला बघायला श्रीकृष्णांसह छावणीत आला. युधिष्ठिराला वाटले की अर्जुन कर्णाचा वध करूनच आला आहे. पण त्याला जेव्हा कळले की अर्जुन भीमाला कर्णाच्या तोंडात देऊन आला आहे तेव्हा युधिष्ठिर संतापला. आधीच तो कर्णाच्या बाणांनी घायाळ झाला होता. त्यात अर्जुन त्याचा वध न करताच आला आहे असे पाहिल्यावर त्याचा संताप पराकोटीला पोचला. त्यात त्याने भीमाला तेथे एकटे सोडले होते. तेव्हा युधिष्ठिर अर्जुनाला खूप अपमानास्पद बोलला व म्हणाला, “तुझे ते गांडीव धनुष्य श्रीकृष्णांना दे व तू स्वत: त्य़ांचा सारथी हो. किंवा ते धनुष्य दुसर्‍या बलशाली राजाला देऊन टाक.”

धिग्गाण्डीवं धिक् च ते बाहुवीर्य- 
    मसङ्ख्येयान् बाणगणांश्च धिक् ते ।
धिक् ते केतुं केसरिणः सुतस्य 
    कृशानुदत्तं च रथं च धिक् ते ॥६८-३०॥कर्णपर्व ॥

“तुझ्या ह्या गांडीव धनुष्याचा धिक्कार आहे, तुझ्य़ा पराक्रमी भुजांचा धिक्कार आहे, तुझ्य़ा त्या असंख्य बाणांचा धिक्कार आहे, त्या तुझ्या ध्वजाचा ज्याच्यावर केसरीनंदन हनुमान आहेत त्याचाही धिक्कार आहे. आणि अग्नीने दिलेल्या ह्या रथाचाही धिक्कार आहे.”

    युधिष्ठिराचे ते बोलणे ऐकून अर्जुन क्रुद्ध झाला व त्याने तलवार उपसली. श्रीकृष्णांनी विचारले, पार्थ, काय झाले ? तलवार कशाला उपसलीस इथे तर कोणी शत्रु नाही. युधिष्ठिर ठीक आहे ना ते पहाण्य़ासाठी तू छावणीत आला होतास. आणि युधिष्ठिर तर कुशल आहेत. मग तलवार कशासाठी उपसलीस ?” अर्जुन उत्तरला, “जो माझ्या ह्या गांडीव धनुष्याचा धिकार करेल व ते दुसर्‍यास दे असे म्हणेल त्याचा मी वध करीन अशी मी मनोमन प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा मी युधिष्ठिराचा वध करण्यास तलवार उपसली आहे.”

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment