दोघांचे गदायुद्ध सुरू झाले. भीम बलशाली होता तर दुर्योधनाने अभ्यास केलेला होता. कोणीच कोणाला हार जात नव्हते. श्रीकृष्णांना कळून चुकले की भीम जर धर्मपूर्वक युद्ध करू लागला तर तो दुर्योधनाला नक्कीच जिंकणार नाही. ते अर्जुनाला म्हणाले, “पूर्वी देवतांनी मायेनेच असुरांवर जय मिळवला होता. इंद्राने मायेनेच विरोचनाचा पराभव केला होता. तेव्हा भीमानेही मायामय पराक्रमाचाच आश्रय घ्यायला हवा. द्यूताच्यावेळी भीमाने प्रतिज्ञाही केली होती की, ‘मी दुर्योधनाच्या दोन्ही मांड्या गदेने तोडून टाकीन. तेव्हा भीमाने ती प्रतिज्ञा खरी करावी तरच जय मिळण्याची आशा आहे. युधिष्ठिराने पुन्हा विरुद्ध परिस्थिती निर्माण केली आहे. ‘धर्मराजापराधेन भयं न: पुनरागतम्’ धर्माराजाच्या अपराधामुळे पुन्हा संकट निर्माण झालेले आहे. सर्व कौरवांना ठार मारून विजय जवळ जवळ मिळाल्यासारखाच झालेला होता. एकाच्या जय-पराजयामुळे सर्वांचा जय-पराजयाची अट ठेऊन त्यांनी पुन्हा युद्ध म्हणजे जुगारच बनवला आहे. हे भयंकर अज्ञान आहे. शुक्राचार्यांनी सांगितले आहे की युद्धामधे वाचलेले लोक पुन्हा युद्धासाठी आले तर त्यांना घाबरून असावे. कारण शेंडी तुटो की पारंबी तुटो’ अशा निश्चयानेच ते आलेले असतात. मृत्यूची त्यांना भीती नसते. जे जीवनाची आशा सोडून धैर्याने युद्धाला आलेले असतात त्यांच्यासमोर इंद्र सुद्धा युद्धासाठी उभा राहू शकत नाही.”
श्रीकृष्णांना युधिष्ठिराने दुर्योधनासमोर ठेवलेल्या अटीची भीषणता जाणवत होती. ते पुन्हा पुन्हा म्हणत होते की युधिष्ठिराने हा भयावह जुगार खेळला आहे.
श्रीकृष्णांचे मत कळल्यावर अर्जुनाने भीमसेनाकडे पाहून आपली डावी मांडी थोपटली. अर्जुनाकडून संकेत मिळताच वेळ साधून भीमाने दुर्योधनाच्या दोन्ही मांड्यांवर गदेने प्रहार केला. व त्याला धराशायी केले. अन्यायाने व अधर्माने वागणार्या सर्व धृतराष्ट्रपुत्रांचा वध झाला होता. आता त्याबद्दल स्वर्ग मिळो किंवा नरक मिळो, भीमाला त्याची पर्वा नव्हती. दोन्ही मांड्या तुटून धराशायी झालेल्या दुर्योधनावर भीमाने आपला इतक्या वर्षांचा साचलेला राग काढला. त्याचे मस्तक त्याने आपल्या पायाने ढकलले व रणांगणात तो बेहोश होऊन नाचू लागला. शेवटी युधिष्ठिराने त्याला भानावर आणले व त्या अनुचित कृत्यापासून त्याला अडवले.
आपल्या दोन्ही शिष्यांचे गदायुद्ध बघण्यास बलराम आले होते. भीमाने दुर्योधनावर नाभीखाली प्रहार केला होता. त्याच्या या कृत्याची त्यांनी निंदा केली. गदायुद्ध नियमबाह्य झाले होते. बलरामांना वाटले की आपलाही या कृत्यामुळे अपमानच झाला आहे. म्हणून ते भीमावर धावून गेले. श्रीकृष्णांनी त्यांना अडवले. त्यांनी त्यांची समजूत घातली. ते बलरामांना म्हणाले, “पांडव आपल्या आत्याचे मुलगे असल्यामुळे आपले बांधव असून सहज मित्र आहेत. कौरव यांच्याशी पूर्वी खूप कपटाने वागलेले आहेत. आणि द्रौपदीला भरसभेत ओढून आणल्यानंतर भीमाने दुर्योधनाच्या मांड्या फोडीन अशी प्रतिज्ञा केली होती. आणि त्या प्रतिज्ञेचे पालन करून भीमाने क्षत्रियधर्माचे पालनच केले आहे. मैत्रेय ऋषींनी सुद्धा त्याला पूर्वी शाप दिला होता की भीम तुझ्या मांड्या फोडेल.’ तेव्हा आपण रागावू नका. पांडवांच्या वृद्धिमुळे आपलीही उन्नति होणार आहे.’ आणि कौरवांनीही युद्धात अधर्मच केला आहे हे अभिमन्यूच्या उदाहरणाने त्यांनी त्यांना पटवायचा प्रयत्न केला. पण बलरामांना पांडवांचे वागणे धर्मसंगत आहे हे श्रीकृष्णांचे वचन पटले नाही. व ते द्वारकेला निघून गेले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment