Thursday, April 11, 2019

महाभारतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ३०

शल्यवध - 

    महारथी कर्णाचा अर्जुनाने वध केला. कौरवसैन्यातील महत्वाचे सर्व रथी अतिरथी सर्व मृत्युमुखी पडले होते. अजूनही सर्वजण दुर्योधनाला संधी करण्यास सांगत होते. पण दुर्योधन तयार नव्हता. तेव्हा दुर्योधनाने शल्याला अश्वत्थाम्याच्या सांगण्यावरून आपला सेनापति केले. त्यावेळी कौरवांचे अकरा हजार रथ, दहा हजार सातशे हत्ती, दोन लाख घोडे व तीन करोड पैदल सैन्य शिल्लक राहिले होते तर पांडवांच्याकडे सहा हजार रथ, सहा हजार हत्ती, दहा हजार घोडे व दोन करोड पैदल सैनिक एवढी सेना शिल्लक राहिली होती. म्हणजे कौरवांच्या तुलनेत अजूनही पांडवांच्याकडे निम्म्यापेक्षाही कमी सैन्य होते. 

    शल्य सेनापती बनल्यावर श्रीकृष्णांनी शल्याबरोबर युद्ध करण्यास युधिष्ठिराला प्रोत्साहित केले. आपणच या शल्याशी सामना करण्यास योग्य अहात असे सांगून आपले क्षात्रबल व तपोबल रणभूमीवर दाखवून शल्याचा वध करण्य़ास श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले. त्याप्रमाणे शल्य व युधिष्ठिराचे घमासान युद्ध सुरू झाले व युधिष्ठिराने शल्याचा वध केला. शल्याचाही वध झाल्यावर कौरवांची सेना पळून जाऊ लागली. दुर्योधन तिला निकराने रणांगणावर उभी करण्याचा प्रयत्न करत होता. पण तो असफल ठरला. तेव्हा अखेर दुर्योधन रणांगणावरून पळून गेला. अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य दुर्योधनाचा शोध लागत नसल्यामुळे उद्विग्न झाले होते. थोडे घोडदल घेऊन पळून जात असलेल्या दुर्योधनाला पाहून श्रीकृष्णांनी अर्जुनाला त्याचा वध करण्य़ास सांगितले. पुन्हा अर्जुन व दुर्योधनाच्या सैन्यामधे निकराची लढाई सुरु झाली. दुर्योधनाचे ते सर्व सैन्यही मृत्युमुखी पडले. तेव्हा एकटा दुर्योधन गदा घेऊन एका सरोवराच्या दिशेने धावत सुटला.

दुर्योधन वध -  

    संजयाला सुद्धा सात्यकीने कैद केले होते. तो त्याला ठार मारणार होता, इतक्यात तेथे व्यास आले व त्यांनी संजयाला सोडून देण्य़ाची आज्ञा केली. तेव्हा संजय नगराच्या दिशेने निघाला. वाटेत त्याला दुर्योधन एकटाच गदा घेऊन उभा असलेला दिसला. संजयाला पाहून दुर्योधनाच्या डोळ्यात अश्रु आले. संजयाकडून त्याला फक्त अश्वत्थामा, कृतवर्मा व कृपाचार्य हे तीनच वीर जिवंत असल्याचे कळले. बाकी सर्व सेना व त्याचे सर्व भाऊ युद्धात मारले गेले होते. त्याने संजयाबरोबर धृतराष्ट्राला आपण आपले शरीर अतिशय घायाळ झाले असल्यामुळे  एक सरोवरामधे प्रवेश करत असल्याचे कळवले व त्याने मायेने पाणी स्तंभित करून पाण्यात प्रवेश केला. आपल्या पाठोपाठ आलेल्या कृतवर्मा, अश्वत्थामा व कृपाचार्य या तिघांना संजयाने दुर्योधनाच्या सरोवर प्रवेशाची बातमी दिली. नंतर ते तिघे संजयासकट पुन्हा छावणीत परत आले. पांडवांनी दुर्योधनाचा शोध घेतला पण त्यांना दुर्योधनाचा पत्ता लागला नाही.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment