हनुमानांच्या बोलण्याची पद्धत पाहून श्रीरामांना वाटले की हनुमानांनी नक्कीच वेदांचा, व्याकरणचा अभ्यास केला असला पाहिजे. त्याशिवाय अशा सुंदर व शुद्ध भाषेत वार्तालाप करणे शक्य नाही. संभषणाच्या वेळी त्यांचे मुख, नेत्र, ललाट, भुवया तसे शरीराची इतर अंगे यातून कोणताही दोष प्रकट झाला नाही. त्यांच्या बोलण्यात कंटाळा येईल असा फापटपसारा नव्हता व ते अतिशय संक्षिप्तही नव्हते की ज्यामुळे त्यांचे बोलणे ऐकून भ्रम निर्माण होईल. संभाषण करतांना त्यांनी घाई केली नाही अथवा विलंब केला नाही. त्यांची वाणी संथही नाही व त्यांनी गडबडीनेही कोणती गोष्ट सांगितली नाही. उलट त्यांचे बोलणे ऐकून शत्रूचे हृदय सुद्धा पाझरले असते. असा दूत ज्या राजाकडे असेल तर त्या राजाचे कार्य निश्चितच सिद्धीस जाईल असे वाटून रामांनी लक्ष्मणास त्यांच्याशी बातचित करण्यास सांगितले.
सुग्रीवाला शोधतच हे दोन वीर येथे आले असून ते सुग्रीवाशी मैत्री करू इच्छितात हे लक्ष्मणाकडून ऐकून हनुमान प्रसन्न झाले.
हनुमान व लक्ष्मण या दोघांनी एकमेकांचा परिचय करून घेतल्यावर लक्ष्मणांना हनुमानांच्या सत्यवचनाची प्रतीती आली.
प्रसन्नमुखवर्णश्च व्यक्तं हृष्टश्च भाषते ।
नानृतं वक्ष्यते वीरो हनुमान पवनात्मज: ॥४-४-३२॥
लक्ष्मण म्हणाला की “यांच्या मुखाची कांती स्पष्टपणे प्रसन्न दिसून येत आहे आणि ते हर्षाने उत्फुल्ल होऊन बोलत आहेत. त्यामुळे मला असा विश्वास वाटतो की पवनपुत्र हनुमान खोटे बोलणार नाहीत.” लक्ष्मणाला हनुमानांच्या सत्यवचनाची प्रतीती आली. एकमेकांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास वाटल्यावरच सुग्रीवाची भेट घेण्याचे नक्की झाले व हनुमान आपले मूळ रूप प्रकट करून राम व लक्ष्मणाला आपल्या खांद्यावर बसवून ते ऋष्य़मूक पर्वतावर गेले.
हनुमानांनी सुग्रीवाला सर्व वृत्तांत निवेदन करून राम व लक्ष्मण यांच्याशी मैत्री करण्यास सांगितले. कारण श्रीरामांच्या मदतीनेच सुग्रीवाला वालीवर विजय मिळवणे शक्य होते. हनुमानाच्या सांगण्यावरून सुग्रीवाने सुद्धा रामांसमोर मैत्रीचा हात पसरला. नंतर हनुमानांनी अग्नी प्रज्वलित करून राम व सुग्रीव यांच्यामधे स्थापन केला व अग्नीच्या साक्षीने त्यांच्यात मैत्री प्रस्थापित केली. सुग्रीवाची पत्नी रुमा व किष्किंधेचे राज्य परत मिळावून देण्यासाठी रामांनी सुग्रीवाला मदत करायची व सीतेचा शोध घेऊन रावणाबरोबर युद्धात सुग्रीवाने रामांना मदत करायची असा दोघांमधे करार झाला.
ठरल्याप्रमाणे रामांनी वालीचा वध केला व सुग्रीवाची पत्नी सुग्रीवास मिळवून दिली व त्याचबरोबर किष्किंधेच्या राज्याचा सुग्रीवावर अभिषेक केला. वालीचा वध झाल्यामुळे वालीची पत्नी तारा अत्यंत शोकाकूल झाली. तेव्हा हनुमानांनी तिची समजूत काढली. या हनुमानांच्या संभाषणात तत्त्वज्ञान ठासून भरले आहे. हनुमान तारेला म्हणतात, “मनुष्य जिवंतपणी जी शुभ अथवा अशुभ कर्मे करतो त्या कर्मांची फळे मनुष्याला मृत्युनंतर अवश्य मिळतात. पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे असणार्या या शरीराच्या बाबतीत शोक तो कसला करावयाचा ? वाली नीतीने राज्यशासन करत होते. साम, दान व क्षमा यांच्यात तत्पर होते. तेव्हा धर्माचरण करणार्या पुरुषाला जी सद्गती मिळते ती त्यांना नक्की मिळाली आहे. म्हणून तू आता वालीचा और्ध्वदेहिक संस्कार कर.” हनुमानांनी तारेची समजूत काढतांना कुठेही वालीची अवहेलना केली नाही हा त्यांच्या संभाषणातील एक विशेष आहे.
वालीचा और्ध्वदेहिक संस्कार पार पडल्यावर सुग्रीवाला राज्याभिषेक करणे हे महत्वाचे कार्य करावयाचे होते. त्यासाठी हनुमानांनी रामांना विनंती केली. त्यावेळचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात की उगवत्या सूर्याप्रमाणे रक्तवर्ण मुख असणारे व सोन्याच्या पर्वताप्रमाणे तेजस्वी हनुमान हात जोडून रामांना म्हणाले, “आपल्या कृपेमुळे हे किष्किंधेचे दुर्लभ राज्य सुग्रीवाला मिळाले आहे. तेव्हा राज्यारोहण केल्यावर सुग्रीव आपली विशेष पूजा करणार आहेत. तेव्हा आपण किष्किंधानगरीत प्रवेश करावा.”
हनुमानांनी रामांना हा प्रस्ताव सुग्रीवाच्या सांगण्यावरून दिलेला नाही. यावरूनच त्यांच्या बुद्धिमत्तेची व अधिकाराची व सुग्रीवाने हनुमानांनाच प्रधान मंत्री म्हणून का नेमले असावे त्याची कल्पना येते. अर्थात पित्याच्या आज्ञेवरून आपण वनात रहात असल्यामुळे आपण गावात येऊ शकत नाही व त्यामुळे सुग्रीवाला राज्याभिषेक व अगंदाची युवराजपदी नियुक्ती ही दोन कामे श्रीरामांनी हनुमानांवरच सोपवली.
सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment