हनुमान काही वानरसेना घेऊन दक्षिणदिशेला निघाले. तेथे सर्वांनी पर्वतात, गुहांत सीतेचा शोध घेतला. पण त्यांना सीतेचा पत्ता लागला नाही. शोध घेत थकलेले वानर ऋक्षबिल नामक गुहेत शिरले. त्या गुहेत त्यांना सीता काही दिसली नाही. पण ती गुहा फळे, मध यांनी समृद्ध होती. त्या गुहेत स्वयंप्रभा नावाची तापसी रहात होती. तिच्या परवानगीने सर्व वानरांनी तेथील फळा-मुळांचा आस्वाद घेतला. नंतर आपली सर्व कथा सांगून हनुमानांनी तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली व म्हटले की, “देवी, आम्ही भुकेने मरत होतो. तेव्हा आपण आमचे आतिथ्य करून आमचे प्राण वाचवलेत. या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही आपली काय सेवा करु ?” या बोलण्यावरून हनुमानांच्या स्वभावातील मार्दव व कृतज्ञता दिसून येते.
सुग्रीवाने सीताशोधासाठी सर्व वानरांना एक महिन्याची मुदत दिली होती. तेवढी मुदत टळून गेली तरी हनुमानादी वानरांना सीतेचा शोध लागला नाही. आपण सीतेचा शोध न करताच गेलो तर सुग्रीव आपल्याला शिक्षा करेल अशी भीती सर्व वानरांना वाटू लागली. अंगदालाही वाटू लागले की श्रीरामांनी सांगितले असल्यामुळे सुग्रीवाने आपल्याला युवराजपद दिले आहे. पण आपल्या वडिलांना ठार मारणारा सुग्रीव नक्कीच आपल्या वधासाठी निमित्त शोधत असेल. अशा परिस्थितीत त्याने सोपवलेले काम पूर्ण न करताच जर आपण परत गेलो तर आपला कांटा काढण्यासाठी त्याला आयतेच निमित्त मिळेल. तार वगैरे वानरांनाही सुग्रीवाचे म्हणणे पटले व तार नावाच्या वानराने तर त्याला पुन्हा स्वयंप्रभेच्या गुहेतच रहाण्याचा सल्ला दिला.
हनुमानांनी हे सर्व ऐकून विचार केला की काही वानर अंगदाला सामिल झाले आहेत. कदाचित अंगदाचे सामर्थ्य वाढून तो सुग्रीवाला भारी पडेल. तेव्हा सर्वशास्त्रविशारद अशा हनुमानांनी तार वगैरे वानरांच्यापासून अंगदाला फोडण्याचा प्रयत्न केला. ते अंगदाला म्हणाले, “तारानंदन ! तुम्ही युद्धात आपल्या पित्यासमानच अत्यंत शक्तिशाली आहात हे निश्चित रूपाने सर्वांना विदित आहे. ज्याप्रमाणे तुझे पिता वानरांचे राज्य सांभाळत होते, त्या प्रकारे तुम्हीही त्याला दृढतापूर्वक धारण करण्यास समर्थ अहात. परंतु हरिपुंगव ! हे कपिलोक सदाच चञ्चलचित्त असतात. आपल्या स्त्री-पुत्रांपासून अलग राहून तुमच्या आज्ञेचे पालन करणे ह्यांच्यासाठी सहन होणार नाही. मी तुमच्या समक्षच सांगतो की ह्या वानरांतील कोणीही वानर सुग्रीवाशी विरोध करून तुमच्या प्रति अनुरक्त होऊ शकत नाही. जसे हे जांबवान्, नील आणि महाकपि सुहोत्र आहेत त्याच प्रकारे मीही आहे. ‘मी, तसेच हे सर्व लोक साम, दाम आदि उपायांच्या द्वारे सुग्रीवांपासून अलग केले जाऊ शकत नाहीत. तुम्ही दण्डद्वारा आम्हा सर्वांना वानरराजा पासून दूर करू शकाल हेही संभव नाही. दुर्बलाशी विरोध करून बलवान् पुरुष गुपचुप बसून राहील - हे तर संभव आहे. परंतु कोणा बलवानाशी वैर बांधून कुणी दुर्बल पुरुष कोठेही सुखाने राहू शकत नाही; म्हणून आपली सुरक्षा इच्छिणार्या दुर्बल पुरुषाने बलवानाबरोबर कधी विग्रह करता कामा नये - हे नीतिज्ञ पुरुषांचे वचन आहे. तसेच स्वयंप्रभेची गुहा राम व लक्ष्मण यांच्यापासून लपून रहाणारी नाही. राम व लक्ष्मण त्या गुहेला आपल्या बाणांनी सहज विदीर्ण करू शकतील. आमच्या बरोबर येऊन जेव्हा तुम्ही विनीत पुरुषाप्रमाणे त्यांच्या सेवेत उपस्थित व्हाल तेव्हा सुग्रीव क्रमशः आपल्यानंतर तुम्हांलाच राज्यावर बसवतील. तेव्हा तू पुन्हा सुग्रीवाच्या सेवेत उपस्थित रहा.” असा हनुमानांनी अंगदाला सल्ला दिला. अंगद जर पुन्हा सुग्रीवाच्या सेवेत उपस्थित होईल तर सुग्रीव आपल्यानंतर अंगदालाच गादीवर बसवतील याची हनुमानांनी अंगदाला ग्वाही दिली.
दक्षिण दिशेला सुग्रीवाने अंगदाच्या अधिपत्याखाली वानरसेना पाठवली होती. परंतु वेळप्रसंगी आपल्या सेनानायकालाही त्यांनी हिताचा सल्ला दिला व आपल्या राजाचे अहित होणार नाही याचीही खबरदारी घेतली. मंत्र्याने नेहेमी असेच दूरदृष्टीने वागले पाहिजे.
सीतेचा शोध लागत नाही व सुग्रीवाने दिलेली मुदतही संपून गेली. अशा परिस्थितीत आपण सीतेचा शोध न लावताच परत गेलो तर सुग्रीव आपल्याला ठार मारेल अशा विचाराने सर्व वानरांनी प्रायोपवेशन करण्याचे ठरवले. नंतर संपातीकडून त्यांना सीता लंकेत असल्याची बातमी कळली. पण समुद्र ओलांडून लंकेत कसे पोचावे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. तेव्हा जांबवानांनी हनुमानांना त्यांच्या जन्मकथेचे व त्यांच्या सामर्थ्याचे स्मरण करून दिले व त्यांना समुद्र पार करून लंकेत जाण्याची विनंती केली.
सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment