Sunday, April 7, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग २७

कर्णार्जुन युद्ध 
 
    कर्णाने दुर्योधनाजवळ आपला अर्जुनाबरोबर युद्ध करण्याचा मानस बोलून दाखवला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आपण सर्व बाबतीत अर्जुनाच्या तोडीचे आहोत. फक्त श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी आहेत, तेव्हा त्यांच्या तोडीचा सारथी आपल्याला मिळाला तर आपण अर्जुनाला युद्धात हरवू शकू असे त्याला वाटत होते. म्हणून त्याने दुर्योधनाजवळ पांडवांचा मामा शल्य जो त्यांच्या बाजूने लढत होता तो आपल्या रथाचा सारथी व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. शल्याने प्रथम या गोष्टीला विरोध केला, पण शेवटी तयार झाला. आणि कर्णार्जुनांचे ऐतिहासिक युद्धाची पूर्ण तयारी झाली.
    युधिष्ठिरासमोर प्रतिज्ञा करून अर्जुन आपला रथ व सारथी श्रीकृष्ण यांच्यासह मोठ्या उत्साहाने रणभूमीकडे निघाला. जसजशी युद्धभूमी जवळ येऊ लागली तसतशी अर्जुनाला कर्णवधाबाबत चिंता वाटू लागली. अर्जुन थोडाही चिंतामग्न झाले की श्रीकृष्ण त्याला उभारी देत असत. आताही असेच झाले. त्यांनी अर्जुनाला चिंतामग्न पाहिले व त्याचा उत्साह वढवण्यासाठी म्ह्णाले, “अर्जुना, तुझ्य़ासारखा शूर आतापर्यंत कोणी झाला नाही. तू या गांडीव धनुष्याने इंद्राप्रमाणे अनेक श्रेष्ठ शत्रूंना कंठस्नान घातले आहेस. भीष्म, द्रोण, भगदत्त, विंद, अनुविंद इत्यादि अनेक वीरांचा सामना करून सकुशल परत येणे हे तुझासारख्या वीरालाच शक्य होते. तुझ्याकडे दिव्य शस्त्रे आहेत, अस्त्रे चालवण्याचे कौशल्य आहे व सामर्थ्य आहे. युद्धाच्यावेळी तू गडबडून जात नाहीस. लक्ष्य वेधण्याच्या वेळी तू एकाग्र होतोस.” अशाप्रकारे ते अर्जुनाचे मनोबल उंचावत असत. त्याचप्रमाणे त्याला धोक्याच्या सूचनाही देत असत. कर्णाशी युद्ध करतांना सुद्धा अर्जुनाने फाजिल आत्मविश्वासाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी कर्णाच्या बलाचाही विचार त्याच्यासमोर ठेवला. ते म्हणाले, “तू पराक्रमी आहेस हे जरी खरे असले तरी तुझ्या हितासाठी काही सांगणे मला आवश्यक वाटते. हे बघ, दोनतीनदा तुझ्य़ाशी झालेल्या युद्धात कर्ण जरी पराभूत झाला असला तरी तू त्या कर्णाची अवहेलना करू नकोस. कर्ण सुद्धा बलवान्, अभिमानी, अस्त्रविद्येचा विद्वान महारथी, युद्धकुशल व देशकालपरिस्थिती समजणारा आहे. या युद्धात तुझा वध करण्यासाठी तो नक्कीच प्रयत्नशील राहील. तो तेजामधे अग्निप्रमाणे आहे तर वेगामधे वायुप्रमाणे आहे. क्रोधामधे यमराजाप्रमाणे आहे सुदृढ शरीराच्या बाबतीत तो सिंहाप्रमाणे आहे. चांगल्या योद्ध्याचे सर्व गुण त्याच्या ठिकाणी विद्यमान आहेत. तो तुझ्याशिवाय सर्व देवतांना सुद्धा अवध्य आहे. तेव्हा तू आज कर्णाचा वध करण्यात सफल हो. तू आज त्याला काळाच्या आधीन कर. कारण तो सर्व पापांचे मूळ आहे. तेव्हा त्याचा वध करणे हेच श्रेयस्कर आहे. आज सतरा दिवस झाले, तुम्हा योद्ध्यांचे युद्ध चालू आहे. आता तुझ्याकडेही थोडीच सेना शिल्लक उरली आहे. कौरवांकडीलही बहुतेक योद्ध्यांनी वीरमरण प्राप्त केले आहे. अश्वत्थामा, कृतवर्मा, कर्ण, शल्य व कृपाचार्य हे पाचच प्रमुख महारथी शिल्लक राहिलेले आहेत. आता या पाचही महारथींना मारून या पृथ्वीचे राज्य तू युधिष्ठिराच्या पायाशी समर्पित कर. एकवेळ अश्वत्थामा गुरुपुत्र म्हणून, कृतवर्मा माता कुंतीचा नातलग आहे म्हणून, कृपाचार्य हे तुमचे आचार्य होते म्हणून व शल्य नकुलसहदेवांचा मामा आहे म्हणून जरी तुला त्यांच्या बद्दल पूज्य भाव वाटून तू त्यांना यमसदनी नाही पाठवलेस तरी चालेल पण पापबुद्धीने पांडवांकडे पहाणार्‍या या नीच कर्णाला मात्र आपल्या तीक्ष्ण बाणांनी ठार मारच. हे तुझ्यासाठी पुण्यकर्मच आहे. हे कोणी सांगायला नको. मी ही तुला त्याचा वध करण्याची आज्ञा देतो.” असे म्हणून श्रीकृष्णांनी कौरवांनी पूर्वी जी पांडवांच्या विरोधी षडयंत्रे रचली त्याला कारण कर्णच आहे म्हणूनही सांगितले. अभिमन्यूला ज्या सहाजणांनी मिळून ठार मारले त्यातही कर्णच अग्रेसर होता. द्रौपदीला कठोर वचने बोलणारा हा कर्णच होता हे लक्षात ठेव. असे म्हणून त्यांनी कर्णाबद्दलचा अर्जुनाचा क्रोध प्रज्वलित केला व म्हणाले -
 
    एतत् कृत्वा महत् कर्म हत्वा कर्णं महारथम् ।
    कृतार्थ: सफल: पार्थ सूखी भव नरोत्तम ॥७३-१२५॥कर्णपर्व॥
 
“हे पार्था, आता कर्णाला ठार मारून मोठे कार्य संपन्न कर व कृतकृत्य होऊन सुखी हो.”
 
    श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुन चिंतारहित झाला. आपले संरक्षक श्रीकृष्ण असतांना आपला युद्धात विजय नक्की आहे असे त्याला वाटू लागले. श्रीकृष्णांच्या प्रोत्साहनामुळे अर्जुनाला आत्मविश्वास परत मिळाला. त्याने शीघ्र गांडीव धनुष्याचा टणात्कार केला व तो म्हणाला -
 
    त्वत्सहायो ह्यहं कृष्ण त्रीँल्लोकान् वै समागतान् ।
    प्रापयेयं परं लोकं किमु कर्णं महाहवे ॥७४-४॥कर्णपर्व॥
 
    “श्रीकृष्ण, आपले सहाय्य मिळाल्यावर मी युद्धासाठी समोर आलेल्या तिन्ही लोकांना परलोकाचे पथिक बनवू शकतो, मग या महायुद्धात कर्णाला जिंकणे ही कितीशी मोठी गोष्ट आहे ?” त्याला वाटत होते की आता शकुनीला कळेल की आपले बाण हाच द्यूताचा डाव असून गांडीव धनुष्य फासा आहे व रथ हा त्याचा पट आहे. नंतर त्याने घोर प्रतिज्ञा केली -
 
    तत्राहं महासंख्ये संपन्नं युद्धदुर्मदम् ।
    अद्य कर्णमहं घोरं सूदयिष्यामि सायकै: ॥७४-३३॥कर्णपर्व॥
 
“या महासमरामधे शक्तिसंपन्न व भयंकर कर्णाला आज आपल्या बाणांनी मी ठार मारीन.” 
 
    श्रीकृष्णांचे काम झाले होते. अर्जुन क्रोधाविष्ट झाला होता. चिंता कुठल्याकुठे पळून गेली होती व धनुष्याचा टणात्कार करून तो कर्णाशी युद्ध करण्यास मनापासून सिद्ध झाला होता. श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ कर्णाच्या दिशेने वळवला.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment