कृपाचार्यांनी अश्वत्थाम्याला समजावले. दुर्योधनाचा दुष्ट स्वभावामुळे त्याला हे फळ प्राप्त झाले आहे. आपण त्या पाप्याचेच अनुसरण करत आलो म्हणून ही आपली दशा झाली आहे.
रागात् क्रोधाद् भयाल्लोभाद् योऽर्थानीहति मानव: ।
अनीशश्चावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रिय: ॥२-२४॥सौप्तिकपर्व॥
जो आपल्या मनाला ताब्यात न ठेवता दुसर्यांची अवहेलना करून राग, क्रोध, भय व लोभ यांनी प्रेरित होऊन एखादे कार्य करण्याचा प्रयत्न करतो तो लवकरच आपल्या ऐश्वर्यापासून भ्रष्ट होतो. खूप विचार करूनही कृपाचार्यांची बुद्धी त्यांना काम देत नव्हती. म्हणून त्यांनी सांगितले की आपण हस्तिनापूरला जाऊन धृतराष्ट्र, गांधारी व विदुर यांना हितकारक काय आहे ते विचारून मग निर्णय घेऊ या. परंतु अश्वत्थामा आपल्या निर्णयावर दृढ होता. कृपाचार्यांनी त्याला पुन्हा समजावले की आपण उद्या सकाळी त्यांच्या बरोबर युद्ध करू. पण अश्वत्थामा हट्टाला पेटला होता. आता छावणीत सर्वजण निर्धास्त झोपलेले असतील तेव्हा आताच हल्ला करणे योग्य आहे. असे म्हणून अश्वत्थामा एकटाच रथाला घोडे जोडून निघाला. तेव्हा त्याच्या मागोमाग कृपाचार्य व कृतवर्मा पण निघाले.
त्या दिवशी शिबिरांमधे विजयाचा हर्षोल्लास साजरा करून दमलेले पांडव सैन्य झोपेच्या आधीन झाले होते. श्रीकृष्णांनी त्या रात्री पाच पांडवांना शिबिरात विश्रांती न घेता ओघवती नदीच्या काठी विश्रांती करता घेऊन गेले. व लगेचच युधिष्ठिराच्या सांगण्यावरून हस्तिनापूरला गेले होते. त्याचे सांत्वन केले होते. तेथेच त्यांना अश्वत्थाम्याचा विचार अंतर्ज्ञानाने कळला. म्हणून ते त्याच पावली तेथून परत निघाले.
पाच पांडव नदीकाठीच राहिले होते. अशा परिस्थितीत अश्वत्थामा शिबिरात येऊन पोचला. तेव्हा त्याला द्वारात एक अद्भुत, तेजस्वी, विशालकाय प्राणी उभा असलेला दिसला. अश्वत्थाम्याने त्याच्यावर बाणांचा प्रहार केला. त्याच्याशी युद्ध करतांना त्याची सर्व अस्त्रे व शस्त्रे संपली. तेव्हा त्याने शंकराला शरण जायचे ठरवले. व रथातून उतरून शंकराची स्तुती करण्यास लागला. त्यावेळी त्याच्यासमोर एक सुवर्णमय वेदी प्रगट झाली व त्यात अग्निदेव व शिवाचे अनेक गण प्रगट झाले. तेव्हा तो स्वत:च शिवाला अर्पण होण्याच्या हेतूने त्या वेदीवर चढला व अग्नीमधे बसून राहिला. शंकर त्याला म्हणाले, “श्रीकृष्णांचा सन्मान व तुझी परीक्षा करण्यासाठी म्हणून मी इतकावेळ पांचालांचे रक्षण केले. परंतु आता त्यांचे जीवन संपलेले आहे.” असे म्हणून शंकराने स्वत: त्य़ाच्य़ा शरीरात प्रवेश केला व त्याला एक खड्ग प्रदान केले. शंकराचा आवेश झाल्यामुळे अश्वत्थामा तेजाने प्रज्वलित झाला आणि त्याने शिबिराच्या दिशेने प्रस्थान ठेवले. कृपाचार्य व कृतवर्माही त्याच्या मदतीला आलेच होते. अश्वत्थाम्याने प्रथम झॊपलेल्या धृष्ट्द्य्म्नाला ठार मारले. आणि नंतर तो प्रत्येक शिबिरावर आक्रमण करू लागला. उत्तमौजा, युधामन्यु, द्रौपदीचे पाचही पुत्र, शिखंडी सह सर्व सैन्य कापून काढले. झोपेत असलेल्या त्या सैन्याला प्रतिकाराचा अवधीही मिळाला नाही. कृतवर्मा व कृपाचार्य त्याच्या मदतीला होतेच. सर्वांचा वध केल्यावर हा प्रिय समाचार त्यांनी दुर्योधनाला सांगितला. ते ऐकून दुर्योधनाने प्राण सोडले.
सकाळी हा समाचार कळताच सर्व पांडव दु:खाकूल झाले. तेव्हा द्रौपदीच्या विनवणीवरून भीम अश्वत्थाम्याचा वध करण्यास निघाला. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सचेत केले व भीमाच्या रक्षणाची आवश्यकता सांगितली कारण अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र होते. म्हणून स्वत: श्रीकृष्ण सर्व आयुधांनी संपन्न होऊन रथात युधिष्ठिर व अर्जुनाला घालून भीमाच्या मागोमाग निघाले. अश्वत्थामा गंगाकिनार्यावर बसला होता. भीम व पाठोपाठ आलेल्या श्रीकृष्णांना पाहून तो घाबरला व त्याने ‘हे अस्त्र सर्व पांडवांचा विनाश करो’ असे म्हणून ब्रह्मास्त्राचे चिंतन केले. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपल्या व भावांच्या संरक्षणासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग करण्यास सांगितले. तेव्हा ‘आचार्यपुत्राचे कल्याण होवो व या ब्रह्मास्त्राने शत्रूचे ब्रह्मास्त्र शांत होवो’ असा संकल्प करून ब्राह्मास्त्र सोडले. तेव्हा सर्व प्राण्यांच्या हिताची इच्छा करणारे नारद व व्यास तिथे आले व त्यांनी असा प्रयोग पूर्वी कोणीही मनुष्यावर केला नसल्याचे सांगितले. तेव्हा अर्जुनाने स्वसंरक्षणार्थ हे अस्त्र सोडल्याचे सांगितले. व ते त्याने पुन्हा परत फिरवले. अश्वत्थाम्याने सांगितले की ‘आपण अधर्माने दुर्योधनाचा वध करणार्या भीमाच्या नाशा करता हे अस्त्र सोडले पण ते परत घेण्य़ाचे बळ माझ्याकडे नाही. तेव्हा अस्त्र अभिमन्यू व विराटपुत्री उत्तरा याच्या गर्भस्थ शिशूचा नाश करेल.”
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment