Wednesday, May 1, 2019

बुद्धिमतां वरिष्ठ: (भाग १३)

सूर्याचा उदय झाल्यावर ज्याप्रमाणे सर्वत्र पसरलेल्या अंधःकाराचे काही चालत नाही, तो निष्फळ होतो, नष्ट होतो त्याप्रमाणे अविवेकी किंवा असावधान दूताच्या हाती पडल्यावर जवळ जवळ पूर्ण होत आलेले कार्यही देश-काळ विरोधी होऊन असफळ, अयशस्वी ठरते. कर्तव्य आणि अकर्तव्य या विषयी निश्चित झालेली स्वामीची बुद्धिही अविवेकी दूतामुळे शोभून दिसत नाही कारण स्वतःला मोठा बुद्धिमान अथवा पण्डित समजणारा दूत आपल्या बेअक्कल वागण्याने कार्याचा नाश करून टाकतो. म्हणून काय केले असता हे कार्य बिघडणार नाही, काय केले असता माझ्याकडून कुठल्याही प्रकारे असावधानी होणार नाही आणि माझे समुद्रोल्लंघनही व्यर्थ ठरणार नाही, कुठल्या प्रकारे सीता माझे सर्व म्हणणे ऐकून तर घेईल पण घाबरणार मात्र नाही - या सर्व गोष्टी संबंधी हनुमान विचार करत होते. तेव्हा त्यांनी ठरवेले की आपण सीतेला रामांचे गुण गाऊन दाखवावेत म्हणजे ती उद्विग्न होणार नाही. येथेच बसून त्यांची सुंदर व धर्मानुकूल वचने तिला ऐकवावीत व श्रीरामांचा संदेश तिला ऐकवावा, म्हणजे तिचा त्या वचनांवर विश्वास बसेल व तिचा सर्व संदेह दूर होईल. असा विचार करून हनुमानांनी सीतेलाच ऐकू जाईल अशा जवळच्या जागेवर बसून श्रीरामकथा गावयास सुरवात केली.  

सर्व रामकथा ऐकवून त्यांनी श्रीरामांनी सीताप्राप्तीसाठी सुग्रीवाशी केलेले सख्यही तिला निवेदन केले व सीतेच्या शोधास सर्वदिशांना वानर रवाना झालेले असून त्यातीलच  आपण एक वानर असून समुद्रोल्लंघन करून येथे आलो असल्याचे त्यांनी तिला सांगितले. 

    आपल्याला कोण रामचरित्र ऐकवत आहे असे वाटून सीतेने आवाजाच्या रोखाने शिंशपावृक्षाकडे नजर टाकली. तेथे तिने वानररूपात हनुमानास पाहिले व ती घाबरून गेली. हा रावण तर वेष बदलूना आला नाही ना असे तिला वाटले. आपण एखादे स्वप्न तर पहात नाही ना असे तिला वाटू लागले. रामगुणांचे वर्णन करून हा आपले चित्त आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असावा असे तिच्या मनात आले. सतत रामांचा विचार करत असल्यामुळेच आपल्याला हे रामचरित्र ऐकावयाला आले असावे असेही तिला वाटले. अशा संभ्रमित अवस्थेत असतांना हनुमान अशोकवृक्षावरून खाली उतरले व हात जोडून विनीतभावाने त्यांनी सीतेस नमस्कार केला. लवकरच तिची रामांशी भेट होईल, राम रावणाचा वध करतील, त्यांनीच आपल्याला येथे पाठवले असून आपला कुशलसमाचार तुला कळवण्यास सांगितला आहे या सर्व गोष्टींवर तिने विश्वास ठेवावा असे त्यांनी तिला सांगितले. दोघांनाही परस्परांच्या भेटीमुळे आनंद झाला. 

    सीतेने विचारले म्हणून हनुमानांनी पुन्हा रामांचे वर्णन करून ते सीतेसाठी कसे व्याकुळ झाले आहेत तिच्या प्राप्तीसाठीच त्यांनी सुग्रीवाशी सख्य कसे केले आहे ते सविस्तर सांगितले व तिचा विश्वास बसावा म्हणून रामनामांकित अंगठी त्यांनी तिला दिली. ती अंगठी पहाताच हनुमानाविषयीची तिची शंका दूर झाली. ‘परंतु काकुत्स्थकुळभूषण श्रीराम जर कुशल आहेत तर प्रलयाग्नीप्रमाणे ते कोपाने ही सर्व समुद्रवलयांकित पृथ्वी दग्ध का बरे करून टाकीत नाहीं ? आपले दु:ख दूर करण्यास ते इतका विलंब का लावतात की आपल्याबाबतीत ते स्नेहहीन झाले आहेत, किंवा त्यांचे मन अन्यत्र गुंतले आहे अशी शंका तिला आली. 

    तेव्हा हनुमानांनी  स्पष्ट केले की रामांना सीता लंकेमधे आहे याची काहीही कल्पना नाही. आपण येथून परत गेल्यावरच रामांनी ही गोष्ट समजणार आहे. त्यावेळी राम नक्कीच विशाल सेना घेऊन येतील व रावणाला ठार मारून सीतेची सुटका करतील अशी ग्वाही दिली. सीता जितकी रामांसाठी व्याकुळ झालेली आहे तसेच श्रीराम सुद्धा जानकीविना शोकाने व्याकुळ झालेले आहेत असे तिला सांगून हनुमानांनी तिला आश्वस्त केले.    
    हनुमानांचे बोलणे ऐकून सीतेने हनुमानांना लंकेत येण्यासाठी त्वरा करण्याचा निरोप दिला. सीता-हरणाला दहा महिने उलटून गेले होते. शेवटची दोन महिन्यांची मुदत देऊन रावण निघून गेला होता. या दोन महिन्यात राम आले नाहीत तर रामांना आपण जिवंत दिसणार नाही असेही तिने त्यांना सांगितले. तेव्हा हनुमानांनी तिला राम वानरांची व अस्वलांची विशाल सेना घेऊन येत आहे असा धीर दिला. आणि त्यातूनही आपणही तिला खांद्यावरून रामांपर्यंत पोचवू शकतो असे अभिवचन दिले. कारण त्यांना रामचंद्राचे लवकर प्रिय करण्याची इच्छा होती. 

    परंतु हनुमानांबरोबर जाणे तिला प्रशस्त वाटले नाही. एकतर अशा परपुरुषाबरोबर जाणे योग्य नव्हते. वायुवेगाने हनुमानाबरोबर जातांना आपल्याला चक्कर येईल, कदाचित आपण समुद्रातही पडू, कदाचित रावणाचे सैनिक पाठलाग करतील, अशा स्थितीत सितेचे संरक्षण व राक्षसांशी युद्ध या दोन्ही गोष्टी हनुमानास कशा जमतील अशी अनेक कारणे सीतेने सांगितली. सगळ्यात महत्वाचे कारण होते की जर राम स्वत: आले नाहीत तर ते त्यांना मानहानिकारक होईल. तेव्हा रामांनीच पराक्रम गाजवून आपल्याला येथून घेऊन गेले पाहिजे असे सीतेचे म्हणणे होते. ते हनुमानांना पटले. कारण ते बोलणे स्त्रीस्वभावाला व पतिव्रतांच्या विनयशीलतेला शोभणारेच होते. हनुमानांनी तिला वचन दिले की तिचे ते उत्तम भाषण आपण रामांच्या कानावर घालू. 

    त्यानंतर हनुमानांनी तिच्याजवळची एखादी वस्तु खूण म्हणून रामांना  देण्यासाठी मागितली. तेव्हा सीतेने त्यांना चित्रकूट पर्वतावर घडलेली कावळ्याची गोष्ट सांगितली. मांस खाण्याच्या उद्देशने एक कावळा सीतेला टोच मारत असतांना श्रीरामांनी  एक दर्भ ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडला. आपले प्राण वाचवण्यासाठी कावळा तिन्ही लोकात फिरून शेवटी रामांनाच शरण आला. पण ब्रह्मास्त्र फुकट जाणारे नव्हते म्हणून त्यांनी त्या कावळ्याच्या संमत्तीनेच त्याचा उजवा डोळा फोडला.  ही कथा सांगून तिने रामांना निरोप दिला की ‘तुम्ही यकश्चित कावळ्याला सुद्धा दंड दिला होतात तर या महान अपराध करणार्‍या रावणाला का बरे शिक्षा करत नाही ?’ असे म्हणून सीता रडू लागली. तेव्हा हनुमानांनी पुन्हा तिची समजूत काढली. ते म्हणाले, “हे देवी ! मी तुला सत्याची शपथ घेऊन सांगतो की श्रीराम तुझ्या विरह-शोकाने पीडित होऊन अन्य सर्व कार्यापासून विमुख झाले आहेत. केवळ तुझेच चिंतन करीत असतात. श्रीराम दुःखी असल्याने लक्ष्मणही सदा अत्यंत चिंताक्रांत झाले आहेत. हे विशाल लोचने ! राघव समरांगणात क्रूरता प्रकट करणार्‍या रावणाला त्याच्या बंधुबांधवांसहित मारून तुला आपल्या पुरीला (अयोध्येला) घेऊन जातील.”
    नंतर सीतेने वस्त्रात बांधलेला चूडामणी बाहेर काढला व रामांना खूण म्हणून देण्यासाठी दिला. तो चूडामणी घेऊन हनुमानांनी सीतेला प्रणाम केला आणि तिला प्रदक्षिणा घालून त्यांनी परत फिरण्याची तयारी केली. जातांना त्यांनी पुन्हा श्रीराम सुग्रीवासह येथे येऊन रावणाला पराजित करून सीतेला सोडवून नेतील असे वचन दिले व त्यांनी उत्तरदिशेला प्रयाण केले.

                       
सौ. मनीषा अभ्यंकर

No comments:

Post a Comment