रामांकडे येताच प्रथम हनुमानांनी काय केले असेल तर रामांच्या चरणांवर मस्तक टेकवून सीतेच्या पातिव्रत्याची खात्री दिली व सीतेने दिलेला चूडामणी रामांच्या हातात दिला व सीता कशी तरी जीवन धारण करीत असल्याचे, तसेच राक्षसी तिला देत असलेला त्रास, रावणाने तिला दिलेली दोन महिन्यांची मुदत व तोपर्यंत जर राम आले नाहीत तर सीतेची प्राणत्याग करण्याची तयारी या सर्व गोष्टी सांगितल्या व सीतेचा संदेश ऐकवला. तो चूडामणी पाहून व खुणेची कावळ्याची गोष्ट ऐकून कपिराज सीतेला भेटले असल्याची रामांची खात्री पटली व सीतेच्या आठवणीने ते विलाप करू लागले.
हनुमानांकडून सर्व वृत्तांत ऐकल्यावर रामांनी हनुमानांची प्रशंसा केली. या समयी रामांजवळ प्रिय संदेश ऐकवल्यावर देण्यायोग्य पुरस्काराचा अभाव असल्यामुळे त्यांनी हनुमानांना आलिंगन दिले.
नंतर सर्वानुमते लंकेकडे प्रयाण करण्याचे ठरले. रामांनी हनुमानांना दुर्गम लंकानगरीचे प्रत्यक्ष पहात असल्याप्रमाणे वर्णन करण्यास सांगितले. रावणाची सेना, पुरीचे दरावाजे, लंकेच्या रक्षणाचे उपाय, राक्षसांची भवने या सर्व गोष्टींची माहिती रामांनी विचारल्यावर हनुमानांनी त्यांना सविस्तर माहिती सांगितली. लंका दुर्गम असली तरी आपण तेथील संक्रम, तटबंदी, खंदक राक्षससेनेचा एक चतुर्थांश भाग कसा नष्ट केला आहे तेही सांगितले. समुद्रोल्लंघन केले की लंका जणु जिंकल्यासारखीच झाली अशी त्यांनी रामांना खात्री दिली.
सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment