रावणाने प्रहस्ताच्या पुत्रास जंबुमाळीस हनुमानांचा सामना करण्यास पाठवले. तो धनुष्याचा टणत्कार करित निघाला. त्या धनुष्याच्या प्रचंड टणत्काराने दिशा, उपदिशा आणि आकाशही एकदम दणाणून गेले. महातेजस्वी जंबुमाळीने दरवाजाच्या कमानीखालच्या दोन खांबावरील आडव्या लाकडावर बसलेल्या त्या महाकपि हनुमंतास तीक्ष्ण बाणांनी विंधण्यास आरंभ केला. जंबुमाळीच्या बाणांनी जखमी झाल्याने महाकपि हनुमंतांना अत्यंत क्रोध आला. शेजारीच असलेली प्रचंड लांबरूंद शिळा उपटून बलाढ्य हनुमंतानी अत्यंत वेगाने ती त्या जंबुमाळीवर फेकली. शेवटी रागाने त्यांनी परिघ हातात घेतला व तो जंबुमाळीच्या वक्षस्थळावर फेकला. त्यावेळी जंबुमाळी रथासहित ठार झाला.
मग रावणाने रागाने सात अमात्यपुत्रांना हनुमानांबरोबर युद्ध करण्यास पाठवले. हनुमानांनी त्या सात अमात्य पुत्रांच्या विशाल सेनेला भयभीत केले व सातही अमात्यपुत्रांना ठार मारले. त्यामुळे त्यांची विशाल सेना घाबरून पळून गेली. पुन्हा ते महाकपि दरवाज्यावर जाऊन बसले. आपण पाठवलेल्या वीरांना त्या वानराने सहज ठार मारून टकले हे पाहून रावणाला हनुमान म्हणजे साधासुधा वानर नाही याची खात्री पटली. म्हणून त्याने विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस व भासकर्ण या पाच सेनापतींना हनुमानास पकडून आणण्याची आज्ञा केली. ते पाच सेनापती अशोकवाटिकेकडे आले असता हनुमान त्यांना कसे दिसले याचे वर्णन करतांना वाल्मीकी म्हणतात, “पुढे गेल्यावर तो देदिप्यमान महाकपि त्यांना दिसला. स्वतःचेच ठिकाणी असलेल्या प्रभेने युक्त असल्यामुळे तो वानर उदयाचलावर येत असलेल्या सूर्याप्रमाणे भासत होता. प्रचंड वेग, अनुपम धैर्य, अतर्क्य सामर्थ्य, लोकोत्तर बुद्धि, अद्वितीय उत्साह, अनिर्वचनीय देह आणि अतुल पराक्रम यांनी युक्त असलेला तो वानर दरवाजावर बसलेला होता.” त्या पाच सेनापतींशी त्यांचे घनघोर युद्ध झाले. तेव्हा हनुमानांनी विकट गर्जना करून आपला देह अधिक विशाल केला व विजेचा स्त्रोत एकदम एखाद्या पर्वतावर पडावा त्याप्रमाणे महावेगवान हनुमानांनी आकाशांत एकदम उंच जाऊन एकाएकी दुर्धराच्या रथावर उडी मारली. त्यामुळे त्याच्या रथाचा चुराडा झाला व तो दुर्धर मृत्यु पावला. तसेच त्यांनी इतर सेनापतींचाही सेनेसह वध केला.
नंतर रावणाने आपला पुत्र अक्षकुमार यास पाठवले. युद्धात अक्षकुमाराचा पराक्रम पाहून हनुमान खूष झाले. पण त्याची उपेक्षा करणे योग्य नाही असे वाटून हनुमानांनी त्या राक्षसाचे दोन्ही पाय पकडले व त्याला आकाशात गरगर फिरवून युद्धभूमीवर आपटले. अक्षकुमाराचाही हनुमानांनी वध केला हे ऐकताच रावण खवळला व त्याने बाहुबळाने न तपोबळाने युक्त असा आपला पुत्र इंद्रजित याला हनुमानांबरोबर युद्धास पाठवले. त्याला पहाताच हनुमानांनी मोठ्याने गर्जना केली व आपले शरीर वृद्धिंगत केले आकाशात विचरण करू लागले. इन्द्रजित हनुमानांवर बणांनी प्रहार करत होता. पण हनुमान बाणांच्या पुढे उभे रहात व दोन्ही हात पसरून बघता बघता आकाशात उड्डण करून निघून जात. त्यामुळे इंद्रजिताला हनुमानांवर प्रहार करण्याची संधीच मिळत नव्हती. तसेच हनुमानांनाही त्या वीराला जेरीस आणण्याची संधी मिळत नव्हती. दोघांनाही एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज लागत नव्हता. शेवटी इंद्रजिताने हनुमानांना ब्रह्मास्त्राने बद्ध केले. परंतु ब्रह्मदेवाने हनुमानांना वर दिला होता की माझे अस्त्र तुला एका क्षणात बंधनातून मुक्त करेल.’ ते मनात म्हणाले की ब्रह्मा, इंद्र आणि वायु यांनी माझे रक्षण केले असल्यामुळे या अस्त्राने जरी मी बद्ध झालो आहे तरी मला काहीही भीती नाही. परंतु राक्षसांनी मला बांधून नेले तर राक्षसराज रावणाशी मला बोलतां येईल हा एक मोठाच लाभ होईल यासाठी शत्रु मला खुशाल अस्त्राने बांधून नेऊ देत. याप्रमाणे कोणतेही कार्य विचारपूर्वक करणारे ते शत्रूवीरांचे संहारक हनुमान वरील प्रमाणे मनाचा निश्चय करून तसेच निश्चेष्ट पडून राहिले. तेव्हा तर शत्रूनी जवळ येऊन त्यांच्यावर सर्व बाजूनी हल्ला करून त्यांना धरले आणि ते त्यांची निर्भत्सना करू लागले, त्यावेळी जणु फार कष्ट होत आहेत याप्रकारे हनुमान ओरडू लागले. हनुमान निश्चेष्ट पडले आहेत असे पाहून राक्षसांनी त्यांना तागाच्या दोर्यांनी बांधले. शत्रुपक्षीय वीर राक्षसांनी बलात्काराने केलेले बंधन आणि निर्भत्सना हे त्यावेळी सर्व हनुमंतास आपल्या कार्यासाठी उचित वाटले म्हणून त्यांनी ते सहन केले. त्यांच्या मनात विचार आला की माझा पराक्रम ऐकून आणि माझ्याविषयीच्या कुतूहलामुळे स्वाभाविकच राक्षसराज रावण एकदा तरी मला पहाण्याची इच्छा करेल. त्याप्रमाणे राक्षसांनी त्यांना मारीत मारीत रावणाच्या पुढ्यात उभे केले.
रावणाला हनुमानांनी आपण सुग्रीवाचा मंत्री असून रामांनी पाठवलेला दूत आहोत अशी स्वत:ची ओळख करून दिली. रावणाचे धैर्य, शक्ती, तेज व त्याची राजोचित लक्षणे पाहून हनुमान मोहित झाले. रावणाच्या ठिकाणी अधर्म प्रबळ नसता तर हा राक्षसराज रावण इंद्रासहित संपूर्ण देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता असे त्यांना वाटून गेले. परंतु याच्या लोकनिंदित क्रूर कर्मामुळे दानवांसहित सर्वलोक भयभीत झाले होते.
सौ. मनीषा अभ्यंकर
No comments:
Post a Comment