व्यासांनी कौरव-पांडवांच्या युद्धाची कथा सांगणारा ‘जय नावाचा’ इतिहास लिहिला. त्या इतिहासाचे रूपांतर नंतर ‘भारत’ या ग्रंथात झाले व नंतर त्याचे ‘महाभारत’ झाले. ‘व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्’ असे जे म्हटले आहे ते अक्षरश: खरे आहे. जगात असा कोणताही विषय नाही की जो महाभरतात आलेला नाही. वेगवेगळी कथानके, तत्वज्ञानाच्या विविध शाखा, वर्णाश्रमधर्मांचे निरूपण, व्यक्तिचित्रणे वगैरेंनी हा ग्रंथ परिपूर्ण आहे. प्रश्न असा पडतो की या ग्रंथात पात्रांचा इतका भरणा आहे की या ग्रंथाचा नायक कोण असावा ? पांडवांनी मिळवलेल्या जयाचा हा इतिहास आहे म्हणून युधिष्ठिर याचा नायक आहे का ? पण तसेही दिसून येत नाही. कारण आजतागायत भारताच्या राष्ट्रजीवनावर भगवान श्रीकृष्णांचाच प्रभाव पडलेला दिसून येतो. लौकिक जीवनातील मुत्सदी, पराक्रमी, धर्माराज्याचा संस्थापक, तत्वज्ञानाचा द्रष्टा तर आध्यात्मिक जीवनातील पूर्णावतार अशा विविध पैलूंनी त्यांचे जीवन नटलेले आहे. भक्ति असो, राजकारण असो, तत्वज्ञान असो, अध्यात्म असो, असे कोणतेही क्षेत्र नाही की जेथे भगवान श्रीकृष्णांचा प्रभाव पडलेला नाही, ठसा उमटलेला नाही. त्यांच्या इतके विलक्षण गुंतागुंतीचे व गूढ चरित्र आजवर पुन्हा झालेले नाही. त्यामुळे महाभारताचा नायक भगवान श्रीकृष्णच आहेत व महाभरतीय युद्धात विजयाचे माप युधिष्ठिराच्या झोळीत टाकण्यास सर्वस्वी तेच कारणीभूत आहेत.
श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वी जरासंधाचा साम्राज्यवाद, त्याचीच री ओढणारा कंसाचा सत्तावाद बोकाळलेला होता. जरासंधाने आपल्या दोन्ही मुली कंसाला दिल्यामुळे त्याचा कंसाला आश्रय मिळाला होता. त्या बळावर त्याने आपल्या पित्यालाही कैद करून स्वत: शूरसेन देशाचे राज्यपद त्याने बळकावले होते. चारित्र्य व नीतीचा मार्ग त्य़ाने सोडून दिला होता. वसुदेव देवकीची पहिली सहा मुले त्यांनी जन्मल्या जन्मल्या दगडावर आपटून मारली होती. स्वकीयांवर सुद्धा अत्याचार करणार्या त्याला सर्व प्रजा सुद्धा त्रासली होती. आपल्या शासनाला विरोध करणार्या वसुदेव व देवकीलाही त्याने तुरुंगात डांबले होते. ही झाली प्रत्यक्ष यादवराज्याची परिस्थिती. नंतर उत्तरेत हस्तिनापुरामधे पांडवांना प्रथम लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न फसल्यावर कौरवांनी त्यांचे राज्य कपटद्यूतात हिसकावून घेऊन त्यांना १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासात भोगण्यास पाठवले व दुर्योधन स्वत: राजा म्हणून मिरवू लागला होता. एकंदर सगळीकडेच अंदाधुंदी पसरलेली होती. अशा परिस्थितीतच क्रांतीची बीजे दडलेली असतात. श्रीकृष्णांनी प्रथम आपला मामा कंस याला यमसदनी धाडून उग्रसेनाला पुन्हा राज्यावर प्रस्थापित केले. जरासंधासारख्या सामर्थ्यशाली राजास अर्जुन व भीम यांना हाताशी धरून त्यांच्या मदतीने त्याचाही वध केला. आणि पांडवांचा न्याय्य अधिकार मिळवून देण्याच्या निमित्ताने त्यांनी महाभारतीय युद्ध घडवून आणले. व ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे’ ही आपली प्रतिज्ञा त्यांनी खरी केली.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment