कपटद्यूताच्या वेळी भीष्म व द्रोण जे वागले ते श्रीकृष्णांना मुळीच आवडले नाही. ते ज्येष्ठ होते. सर्वांच्या देखत अधर्म चाललेला असतांना ते चित्रवत् ते पहात बसले होते. पणाला लावलेली द्रौपदी जिंकली म्हणून तिला भर सभेत ओढून आणली व हे दोघे ज्येष्ठ ती ‘जिता की अजिता’ याचा धर्मशास्त्रदृष्ट्या काथ्याकूट करत राहिले. पण अगदी सामान्य स्त्रीशीही सभेमधे असे अनीतीने वर्तन करू नये या सामान्य नीतिधर्माचीही त्यांनी जाण ठेवली नाही याचा श्रीकृष्णांना राग आला होता. म्हणून तेव्हा झालेली चूक दुरुस्त करण्याची संधी द्यावी या हेतूने दुर्योधन निघून गेल्यावर श्रीकृष्णांनी भीष्म, द्रोण इत्यादी कुरुवृद्धांना म्हणाले, “आपण या दुर्योधनाला राजपदावर बसवले आहे हीच गोष्ट मोठी अन्यायाची आहे. याच्यावर तुम्ही नियंत्रणही ठेऊ शकत नाही. मी तुम्हाला एक हिताची गोष्ट सांगतो. तुम्हाला पटत असेल तर पहा. राजन् तुम्हीच दुर्योधनाला कैद करा व पांडवांशी संधी करा. असे होऊ नये की तुमच्यामुळे क्षत्रियांचा विनाश झाला.” श्रीकृष्णांनी नंतर सभेपुढे आपले उदाहरण ठेवले. ते म्हणाले की, “उग्रसेनाचा मुलगा कंस अत्यंत अत्याचारी होता. त्याने पित्याला कैद केले व स्वत: राजा बनला. म्हणून सर्व बांधवांच्या इच्छेने मी त्याला ठार मारले व पुन्हा उग्रसेनाला गादीवर बसवले. आता आम्ही सर्व कुटुंबीजन एका कंसाचा त्याग केल्यामुळे अंधक व वृष्णी कुळातले यादव परस्पर संगठित झालो आहोत व उत्तरोत्तर प्रगति करत आहोत. तेव्हा हे भरतवंशीयांनो, तुम्हीही दुर्योधन, कर्ण, शकुनि व दु:शासनाला बंदी बनवून पांडवांच्या हवाली करा.
त्यजेत् कुलार्थे पुरुषं ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।
ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथिवीं त्यजेत् ॥१२८-४९॥उद्योगपर्व॥
“सर्व कुळाच्या भल्याकरता एका पुरुषाचा त्याग करावा, एका गावाच्या हितासाठी कुळाचा त्याग करावा, देशाच्या भल्यासाठी एका गावाचा त्याग करावा व आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा त्याग करावा.”
पण श्रीकृष्णांच्या या पर्यायावर कोणी काही बोलायच्या आधीच धृतराष्ट्राने गांधारीला दुर्योधनाची समजूत काढण्यास बोलावून घेतले. जर तिचेही त्याने ऐकले नाही तर श्रीकृष्णाच्या म्हणण्याचा विचार करता येईल असे म्हणून त्याने ती गोष्ट तात्पुरती तरी टाळली. गांधारीने सभेत आल्यावर धृतराष्ट्रावरच प्रथम दोषारोपण केले. ती म्हणाली, “ आपल्याला आपला पुत्र अतिशय प्रिय आहे. तेव्हा वर्तमान परिस्थितीला आपणच कारणीभूत अहात. त्याचे पापपूर्ण विचार आपण जाणत होतात. तरीही तुम्ही नेहेमी त्याचेच अनुसरण केलेत. आता तो काम व क्रोधाच्या आहारी गेलेला आहे. तेव्हा त्याला आता सन्मार्गावर आणणे कठिण आहे. त्याचे सहायक दुष्ट आहेत. मूढ, लोभी, दुराचारी व अज्ञानी अशा आपल्या मुलावर आपण राज्याचा भार सोपवलात त्य़ाचे फळ आपण पहातच अहात. आता तुमचीच सर्व लोक निंदा करणार आहेत.” नंतर सभेत परत आलेल्या दुर्योधनाची समजूत काढण्याचा तिने व्यर्थ प्रयत्न केला. अर्थात तो ऐकणार नाही हे ती जाणून होती. आणि झालेही तसेच. तिने एक महत्वाचा मुद्दा मांडला. ती दुर्योधनाला म्हणाली, “दुर्योधना, भीष्म, द्रोण व कृपाचार्य आपल्या सर्व ताकदीनिशी तुझ्या बाजूने लढतील असे जे तुला वाटत आहे ती तुझी फार मोठी चूक आहे. त्यांच्या दृष्टीने राज्य तुझ्याकडे किंवा पांडवाकडे राहिले तरी समानच आहे. यांच्या मनात तुम्हा दोघांविषयी सारखेच प्रेम आहे. पण हे धर्माला महत्व देतात. आणि तो धर्म पांडवांजवळ आहे. या राज्याचे अन्न खाल्ले आहे म्हणून ते कदाचित तुझ्या बाजूने लढतीलही, तुझ्यासाठी प्राणांचा त्यागही करतील, पण ते पांडवांच्याकडे वक्र दृष्टीने पाहू शकणार नाहीत. तेव्हा तू पांडवांशी संधी कर.”
श्रीकृष्णांनी आपल्याला कैद करण्याचा सल्ला भीष्मादी कुरुवृद्धांना दिला आहे हे कळताच दुर्योधनाने श्रीकृष्णांनाच कैद करण्याचा निर्णय घेतला. सात्यकीला ही वार्ता कळताच त्याने कृतवर्म्याला सेना सुसज्ज करून सभाद्वारावर हजर रहाण्य़ास सांगितले व स्वत: श्रीकृष्णांना व धृतराष्ट्रादि मंडळीना त्य़ाने सूचना दिली. तेव्हा श्रीकृष्णांनीही आपल्याला बंदी बनवण्याचे धृतराष्ट्राला आव्हान दिले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment