Monday, March 18, 2019

महाभरतीय युद्ध व भगवान श्रीकृष्ण - भाग ७


    नंतर आपण शिष्टाईसाठी जाणार आहोत तर तेथे नेमके काय करणार आहोत तेही सांगितले. श्रीकृष्ण म्हणतात, “दुर्योधनाच्या वागणुकीविषयी जे जे लोक संदेहात पडलेले आहेत, त्याच्या चांगल्या वाईट वागण्याचा जे निर्णय करू शकत नाहीत त्या सर्वांचा संशय मी तेथे जाऊन दूर करीन. तेथे जमलेल्या सर्व राजांच्या देखत मी आपल्या गुणांचे वर्णन व दुर्योधनाचे दोष दाखवून देईन. त्यामुळे तेथे जमलेल्या सर्व राजांची खात्री पटेल की युधिष्ठिर धर्मात्मा व सत्यवादी असून दुर्योधन पांडवाशी लोभामुळे अयोग्य वागला आहे. तेथे जमलेल्या चारही वर्णांच्या आबालवृद्धांसमोर मी दुर्योधनाची निंदा करीन. तसेच शांती साठी याचना करत असतांनाही आपण अधर्माचे भागिदार होणार नाही याचीही काळजी घेईन. तुम्हाला जे इष्ट आहे त्यात कोणत्याही प्रकारची त्रुटी येऊ न देता कौरवांबरोबर संधी करण्याचा आटोकाट प्रयत्न करीन. तसेच त्यांनी केलेल्या युद्धाच्या तयारीचीही माहिती काढून येईन. पण तुम्ही युद्धाला सज्ज रहा.”

    भीम प्रथम पासूनच दुर्योधनाचा बदला घेण्याच्या, त्याला युद्धात ठार मारण्याच्या गोष्टी बोलत असे. पण संजयाच्या शिष्टाईचा त्याच्याही मनावर परिणाम झाला होता. त्यानेही श्रीकृष्णांना कौरवांकडे शांतिदूत बनूनच जायला सांगितले. भीम म्हणतो -

अपि दुर्योधनं कृष्ण सर्वे वयमधश्चरा: ।
नीचैर्भूत्वानुयास्यामो मा स्म नो भरता नशन् ॥७४-२०॥ उद्योगपर्व॥

    “भगवन् आम्ही सर्वजण पायी चालत अत्यंत नम्र होऊन दुर्योधनाचे अनुसरण करत राहू, परंतु आम्हा भरतवंशीयांचा नाश होऊ नये.”

    तेव्हा श्रीकृष्णांनी तेथे हितकर वचन कोमल वाणीत सांगावे. थोडीही उग्रता येता कामा नये की ज्यामुळे दुर्योधन असंतुष्ट होईल व शांतीचा प्रस्ताव फेटाळून लावेल. अशा प्रकारचे भीमाचे ते अभूतपूर्व मृदु वचन ऐकून श्रीकृष्णांना हसूच फुटले. ते भीमाला म्हणाले, “बंधो आजपर्यंत कधी अशी कोमल वाणी मी तुझ्या मुखातून ऐकली नाही. आजपर्यंत तर तू त्या क्रूर धृतराष्ट्राच्या पुत्रांना ठार मारण्याची भाषा बोलत होतास. त्यासाठी रात्रंदिवस अशांत होतास. सतत भुवया चढवलेला व दातओठ खाणारा असाच मी तुला बघत आलो आहे. आणि आज अचानक तू शांतीची भाषा करू लागलास ! मनुष्याच्या विचारात इतका आमूलाग्र बदल होतो ! तुलाही युद्धाची भीती वाटू लागलेली दिसते. तुझ्या या शांतीच्या प्रस्तावाचेच मला अतिशय आश्चर्य वाटत आहे. तेव्हा 

स दृष्ट्वा स्वानि कर्माणि कुले जन्म च भारत ।
उत्तिष्ठस्व विषादं मा कृथा वीर स्थिरो भव ॥७४-२२॥उद्योगपर्व॥

    “भारत, तू आपले कर्म व कुळ याकडे दृष्टी ठेव. विषाद करू नकोस. क्षत्रियोचित कर्माला घट्ट चिकटून रहा.” असे बोलून त्यांनी भीमाला प्रोत्साहित केले. शांतीचे सर्व प्रयत्न आपण करणारच आहोत व त्या प्रयत्नांना यश आले तर सोन्याहून पिवळे. त्यामुळे सर्वांचेच हित होईल. पण शांतीचा प्रस्ताव जर त्यांनी धुडकावून लावला तर युद्धच करावे लागेल याची त्यांनी भीमालाही कल्पना दिली व या युद्धाची संपूर्ण जबाबदारी भीम व अर्जुन यांच्यावरच असल्याची त्याला जाणीवही दिली. 

    अर्जुनालाही त्यांनी सांगितले की दुर्योधन मरेपर्यंत राज्य देऊन संधी करणार नाही. युधिष्ठिराने जो पाच गावांचा प्रस्ताव मांडला होता तोही श्रीकृष्णांना मान्य नाही. कारण दुर्योधन तो प्रस्ताव मान्यच करणार नाही. श्रीकृष्ण व विदूर उपदेश करून  दुर्योधनाला योग्य मार्गावर आणतील असा नकुलाला भरवसा वाटत होता. पण सहदेव मात्र दुर्योधनाबरोबर केलेले युद्ध जरी अधर्म ठरणार असेल तरी सुद्धा युद्धासाठीच प्रयत्नशील रहावे या मताचा होता. द्रौपदीचे सुद्धा मत होते की युद्धच केले पाहिजे. पूर्वी क्रोधाने तडफडणारा भीम सुद्धा शांतीची भाषा बोलू लागल्यावर तर तिला प्राणांतिक यातना झाल्या. तेव्हा एकमेव युद्ध या मतावरच ती ठाम राहिलेली होती. कारण ज्याप्रमाणे निरपराधाचा वध केला की पाप लागते त्याप्रमाणे वध्य माणसाचा वध केला नाही तरी पाप लागते. आणि तरीही जर जर पांडव शांतीच्याच मार्गाने जाऊ इच्छित असतील तर आपले वडील द्रुपद व पाच पुत्र कौरवांशी युद्ध करतील असे तिने स्पष्ट शब्दात बजावले. आणि सर्वांच्या मनाची युद्धासाठी तयारी करून श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईला निघाले.

सौ. मनीषा अभ्यंकर.

No comments:

Post a Comment