श्रीकृष्णांची दुर्योधनाला समजावणी -
श्रीकृष्णांनी कौरवसभेपुढे न्याय्य हक्कांची मागणी ठेवली. परंतु धृतराष्ट्राने माझी मुले माझे म्हणणे वा सर्वच गुरुजनांचे म्हणणे ऐकत नाहीत, तेव्हा तूच त्यांना समजाव असे सांगितल्यावर श्रीकृष्ण दुर्योधनाला समजाऊ लागले. एखाद्या लहान मुलाला समजावे तसे श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावत होते. “तू मोठ्या कुळात जन्माला आला आहेस. स्वत:ही शास्त्रज्ञानाने युक्त आहेस. तुझ्यामधे सर्व चांगले गुण आहेत. असे म्हणून त्यांनी त्याला चुचकारले. ‘अरे अधर्मयुक्त कार्य नीच कुळातले लोक करतात, तुझ्यासारखे उच्च कुळात जन्माला आलेले लोक अधर्मयुक्त वागत नाहीत. सध्या तुझ्यात दुष्ट वृत्ती दृगोचर होत आहे. हा दुराग्रह अधर्मयुक्त आहे. तुझ्या वागण्याला योग्य असे कारणही दाखवता येत नाही. तेव्हा दुराग्रह सोडलास तर सर्वांचेच कल्याण होणार आहे असे केलेस म्हणजे अधर्म व अपयश यापासून तुझी सुटका होईल. तेव्हा तू पांडवांशी संधी कर. धृतराष्ट्र, भीष्म, विदूर, द्रोण, अश्वत्थामा, विकर्ण, संजय वगैरे सर्वांनाच ही गोष्ट पटलेली आहे. अरे, माता पिता जे सांगतात ते मुलाच्या कल्याणासाठीच ना सांगतात ? परंतु जे मोहाने हितकर गोष्ट ऐकत नाहीत त्या मनुष्याला शेवटी पश्चात्ताप करायला लागतो. अरे, जो मनुष्य दुष्ट मनुष्यांची संगत करतो व आत्मीयांशी द्वेषपूर्ण वागतो त्याचा पृथ्वी सुद्धा त्याग करते. तू पांडवांशी वैर करतोस व दुसर्या अशिष्ट लोकांकडून रक्षणाची अपेक्षा करतोस. (येथे श्रीकृष्णांनी कर्ण व शकुनी यांची नावे घेतली नसली तरी त्यांचा रोख त्या दोघांकडे आहे.) तुझ्य़ाशिवाय असा दुसरा कोण मनुष्य असेल जो आपल्या बांधवांचा त्याग करून दुसर्यांकडून आपल्या रक्षणाची अपेक्षा करेल ? पांडव धर्मात्मा आहेत आणि तू नेहेमीच त्यांच्याशी कुटिलतेने वागत आलेला आहेस. तरी पांडव तुझ्याशी सद्भावनेनेच वागत आलेले आहेत. आणि तूही आपल्या त्या श्रेष्ठ बांधवांच्या बरोबर तसेच वागले पाहिजेस. क्रोधाच्या आहारी जाऊ नकोस. बुद्धिमान लोक धर्म, अर्थ व काम या तीनही पुरुषार्थांची सिद्धी होईल असेच वागतात. आणि जर यातील एकाचीच निवड करण्याची वेळ आली तर ते धर्माचीच निवड करतात. मध्यमश्रेणीच मनुष्य अर्थाची निवड करतात तर अधम श्रेणीचे लोक कामाची निवड करतात. इंद्रियांना वश होऊन जो धर्माचा त्याग करतो तो मनुष्य नष्ट होतो. ज्याला अर्थ व काम हे पुरुषार्थ मिळवायचे असतील त्याने प्रथम धर्माने वागले पाहिजे. कारण अर्थ व काम कधी धर्मापासून वेगळे होत नाहीत. धर्म हाच त्रिवर्गाच्या प्राप्तीचा एकमात्र उपाय आहे. जो धर्माच्या द्वारे अर्थ व काम मिळवतो त्याची उन्नती होते. पण तू हे विशाल साम्राज्य अनुचित उपायांनी मिळवू पहात आहेस. दुष्ट लोकांबरोबर मेळ करण्यापेक्षा पांडवांबरोबर मेळ करणे तुझ्या अधिक हिताचे आहे. पांडवांवर प्रेम कर, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील. पांडवांनीच स्थापन केलेल्या राज्याचा तू उपभोग घेत आहेस व त्यांचीच अवहेलना करत आहेस. दु:शासन, दुर्विषह, कर्ण, शकुनि यांच्या खांद्यावर तू ऐश्वर्याचा भार ठेवला आहेस. आणि त्यांच्याकडून तू उन्नतीची इच्छा करतोस. ते हे लोक तुला ज्ञान, धर्म व अर्थ यांची प्राप्ती करून देण्यास असमर्थ आहेत व पांडवांबरोबर पराक्रम करण्यासही असमर्थ आहेत. हे सर्व राजांसहित भीमाकडे वक्रदृष्टीने पाहूही शकणार नाहीत. तुझी ही सर्व सेना अर्जुनाचा सामना करू शकणार नाही. अर्जुन सर्व देवता, असुर व गंधर्व यांना सुद्धा अजेय आहे. तेव्हा तू युद्धाचा विचार करू नकोस. यांच्यापैकी कोणता राजा अर्जुनाशी सामना करून सकुशल घरी परत जाऊ शकेल ? या नरसंहाराने तुझा काय लाभ होणार आहे ? अर्जुनाने खांडववनात गंधर्व, यक्ष, असुर व नागांसहित सर्व देवतांना जिंकले होते. विराट नगरातील त्याचा पराक्रम युद्धाचा भावी परिणाम सांगण्यास पुरेसा आहे. त्याने साक्षात महादेवाशी युद्ध करून त्याला युद्धात संतुष्ट केलेले आहे. आणि तू त्याला युद्धात जिंकण्याची इच्छा करतोस ? ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि समजा, हे युद्ध झालेच, तर मी त्याचा सारथी होणार आहे. मग त्याचा कोण बरे पराभव करू शकेल ? युद्धात अर्जुनाला जिंकणे म्हणजे आपल्या दोन हातांनी पृथ्वीला उचलण्यासारखे आहे. हा जर क्रुद्ध झाला तर सर्व प्रजेला दग्ध करू शकेल व देवतांनाही स्वर्गातून खाली यायला भाग पाडेल. तेव्हा दुर्योधना, तुझ्या या सर्व बंधुजनांचा नाश होऊ नये असे तुला वाटत असेल तर ही नष्टबुद्धी सोडून दे. तुझी कुलघातकी अशी कीर्ती होऊ नये. पांडव तुलाच युवराजपद बहाल करतील व धृतराष्ट्रच महारज पदावर स्थित रहातील. राज्यक्ष्मी तुझे दार ठोठावते आहे. तिचा अपमान करू नकोस. कुंतीच्या मुलांना त्याचे अर्धे राज्य देऊन सुखाने संपत्तीचा उपभोग घे. आपल्या सुहृदांची गोष्ट ऐक. पांडवांशी संधी करशील तरच तुझे कल्याण होईल.”
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment