भगवान श्रीकृष्ण हे महाभरताचे नायक असले तरी महाभरतात १८८ व्या अध्यायात त्यांचा पहिला उल्लेख येतो तो द्रौपदी-स्वयंवराच्या वेळी. द्रौपदीच्या स्वयंवराला देशोदेशीचे राजे जसे आपल्या गळ्यात माळ पडेल या उद्देशाने आलेले होते, तसे काही स्वयंवर पहाण्यासाठीही आलेले होते. त्यात श्रीकृष्ण, कृष्णाचे पुत्र, बलराम, अक्रूर, सात्यकि, उद्धव, कृतवर्मा, उशीनर असे अनेक वृष्णीवंशी सुद्धा आलेले होते. तसेच काही ब्राह्मणमंडळीही आलेली होती. लाक्षागृहातून सुटका करून घेऊन पांडव अज्ञातपणे वनावनातून हिंडत असता द्रौपदीच्या स्वयंवराची हकिकत कळल्यानंतर तेही ब्राह्मणांचा वेश धारण करून ब्राह्मणांच्या समूहात बसलेले होते.
स्वयंवरसभेत पांडवांनी जरी अंगावर भस्माचे पट्टे ओढले होते तरी श्रीकृष्णांनी त्यांना ओळखले होते व बलरामांना त्यांनी ही गोष्ट हळूच निदर्शनासही आणून दिली होती. पांडवांना तेथे पहाताच त्यांना मनोमन आनंद झाला होता. नंतर कौरव पक्षाकडील व इतरही राजांना मस्यवेधाचा पण जिंकता न आल्यामुळे शेवटी ब्राह्मणवेशतील अर्जुन मस्यवेध करण्याकरता रंगमंचावर आला. तेव्हाही त्यांना आता पण जिंकून अर्जुनच द्रौपदीला प्राप्त करणार याची खात्री वाटू लागली व मनोमन आनंदही झाला. द्रौपदीशी पांडवांचा विवाह झाल्यावर जेव्हा धृतराष्ट्राला पांडव जिवंत असल्याचे कळले तेव्हा भीष्म व विदुर यांच्या सल्ल्यावरून पांडवांना त्याने सन्मानपूर्वक बोलावून अर्धे राज्य दिले. त्या अरण्यसदृश राज्याचे श्रीकृष्णांनी इंद्रप्रस्थात रूपातंर करण्य़ास पांडवांना मदतही केली.
पांडवांशी त्यांचे नाते होतेच पण आपली बहिण सुभद्रा हिचा अर्जुनाशी विवाह करून देऊन त्यांनी ते नाते अधिक घट्ट केले.
ज्यावेळी त्यांना कळले की युधिष्ठिर द्यूताच्या पटावर राज्य हरला आहे व आपले बंधु व द्रौपदी यांच्या समवेत वनवासात गेला आहे ते ऐकून त्यांना अतिशय दु:ख झाले व ते अंधक, वृष्णी व भोज वंशातील सर्वांना घेऊन पांडवांना भेटण्याकरता वनात गेले. त्यांच्याबरोबर द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न सुद्धा होता. सर्वजण कौरवांची निंदा करत होते व आता आपण कोणती भूमिका घ्यायची त्याविषयी पांडवांबरोबर चर्चा करत होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले -
दुर्योधनस्य कर्णस्य शकुनेश्च दुरात्मन: ।
दु:शासनस्य चतुर्थानां भूमि: पास्यसि शोणितम् ॥१२-५॥सभापर्व॥
हे राजांनो, मला तर असे वाटते की ही पृथ्वी दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि या चौघांच्या रक्ताचे पान करणार.
यावरूनच लक्षात येते की भावी संधर्ष अटळ आहे असेच श्रीकृष्णांना वाटत होते. ‘निकृत्योपचरन् वध्य एष धर्म: सनातन:’ जो दुसर्यांच्या बरोबर छल-कपट करून किंवा धोका देऊन सुख उपभोगतो त्याला ठारच मारले पाहिजे हाच सनातन धर्म आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. पांडवांच्या अपमानाने ते अत्यंत संतापलेले होते. कपटद्यूताच्या वेळी द्रौपदीचे त्यांनी लज्जारक्षण केलेच होते, पण जेव्हा वनामधे भेटल्यावर द्रौपदीने आपले गार्हाणे त्यांच्यापुढे मांडले, तेव्हा त्यांनी द्रौपदीला वचन दिले की -
रोदिष्यन्ति स्त्रियो ह्येवं येषां क्रुध्यसि भामिनि ।
बीभत्सुशरसंच्छन्नाञ्छोणितौघपरिप्लुतान् ॥ १२-१२८॥
निहतान् वल्लभान् वीक्ष्य शयानान् वसुधातले
यत् समर्थं पाण्डवानां तत् करिष्यामि मा शुच: ॥ १२-१२९॥सभा॥
“भामिनि, तू ज्यांच्यावर क्रुद्ध झाली आहेस त्यांच्या स्त्रिया सुद्धा आपले प्रिय पती अर्जुनाकडून ठार मारलेले गेलेले व रक्ताने माखलेले पाहून असाच शोक करतील. पांडवाच्या हितासाठी जे करणे शक्य आहे ते मी सर्व करीन’ असे त्यांनी द्रौपदीला आश्वासनही दिले आहे. ‘न मे मोघं वचो भवेत्’ माझे वचन व्यर्थ ठरणार नाही अशी त्यांनी तिला ग्वाहीही दिलेली आहे.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment