पांडवांच्या म्हणण्याप्रमाणे श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईसाठी निघाले. कार्तिकमासातील रेवती नक्षत्र होते व मैत्र नावाचा मुहूर्त होता. हेमंत ऋतूला सुरवात झालेली होती. कौरव व पांडव पक्षाचे ते जरी समान हितकर्ते असले तरी दुर्योधनाच्या दृष्टीने ते शत्रूच होते. अर्थात शत्रुपक्षाकडे जाण्यास भगवान निघाले. दगा फटका होण्याची शक्यता त्यांनी गृहीत धरलेली होती. म्हणून ते सात्यकीला म्हणाले, ‘युयुधान, माझ्या रथावर शंख, चक्र, गदा, तूणीर, शक्ति तसेच सर्व प्रकारची शस्त्र व अस्त्रे ठेव.’ त्याचे कारण सांगतांना भगवान म्हणतात -
दुर्योधनश्च दुष्टात्मा कर्णच सह सौबल: ।
न च शत्रुरवज्ञेयो दुर्बलोऽपि बलीयसा ॥८३-१३॥उद्योगपर्व॥
“कोणी कितीही बलवान असले तरी त्याने दुर्बल शत्रूची सुद्धा अवहेलना करू नये. मग दुर्योधन, कर्ण व शकुनि तर दुष्टात्मेच आहेत. त्यांच्यापासून सावधान रहाण्याची तर नितांत आवश्यकता आहे.” येथे श्रीकृष्णांची दूरदृष्टी दिसून येते. सेवकांनी सर्व जय्यत तयारी केल्यावर भगवंतांनी सात्यकीला सुद्धा रथावर बसवले व भगवंत कौरवांकडे शिष्टाई करण्यासाठी निघाले. महाभारतात संजय शिष्टाई व श्रीकृष्ण शिष्टाई या दोन शिष्टाई प्रसिद्ध आहेत.
भगवंतांना पोचवण्य़ासाठी कुंतिपुत्र त्या रथाच्या मागून जात होते. द्रुपदादी राजेही त्यांच्याबरोबर होते. युधिष्ठिराने श्रीकृष्णांना आपल्या मातेला भेटण्यास सांगितले व मग सर्व मंडळी थोडे अंतर त्यांच्याबरोबर चालून परत फिरली. भगवंतांच्या रथाने हस्तिनापूरकडे प्रयाण केले.
स्वत: भगवान श्रीकृष्ण शिष्टाईकरता येत आहेत अशी वार्ता कौरवांना कळली. तेव्हा धृतराष्ट्राने वाटेतील त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी सर्व सुखसोयी उपलब्ध करून देण्य़ास दुर्योधनास सांगितले. कारण ते आपल्या सत्काराने संतुष्ट झाले तर आपल्यासाठी सुखदायक होतील व आपण आपले मनोरथ त्यांच्याद्वारे पूर्ण करून घेऊ शकू, असे धृतराष्ट्रास वाटत होते. धृतराष्ट्राच्या आज्ञेप्रमाणे दुर्योधनाने श्रीकृष्णांच्या मार्गावर अनेक विश्रामस्थाने बनवली व सर्व उपभोग सामग्रीची त्याठिकाणी व्यवस्था केली. हेतु एकच होता की श्रीकृष्णांना आपल्याबद्दल प्रेम वाटले पाहिजे. श्रीकृष्णांना आपल्या अनुकूल करून घेण्य़ाचा हा प्रयत्न थोडा हास्यास्पदच होता. श्रीकृष्णांनीही त्या विश्रामस्थानांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यांचा रथ हस्तिनापूरच्या मार्गावर अग्रेसर होतच होता.
त्या सर्व व्यवस्थेमागचा हेतु विदुर जाणतच होते. त्यांनी धृतराष्ट्राला पुन्हा सांगितले, “राजन्, भगवान श्रीकृष्ण येत आहेत. सरळ मार्गाने चाला. मूर्खपणे कुटिलतेचा आश्रय घेऊन आपल्या प्रिय पुत्र, पौत्र व सुहृद् यांचा सर्वनाश करू नका. आपण श्रीकृष्णांना अनेक उत्तमोत्तम वस्तु भेट देऊ म्हणून सांगता अहात पण त्यामागे आपला धर्मपालनाचा अथवा श्रीकृष्णाचे प्रिय करण्याचा उद्देश आहे असे मला वाटत नाही. त्यामागचा वास्तविक अभिप्राय मी जाणतो. ही केवल प्रवंचना आहे. आपण धन देऊन श्रीकृष्णांना पांडवांपासून फोडू शकणार नाही. आपण त्यांना पाय धुण्यासाठी दिलेले पाणी व कुशलप्रश्न यांच्या शिवाय ते तुमच्याकडून कशाचाही स्वीकार करणार नाहीत. तेव्हा श्रीकृष्ण ज्या दोन्ही पक्षांचे कल्याण करण्य़ाच्या हेतूने येथे येत आहेत तेच त्यांना तुम्ही त्यांना उपहारादाखल द्या.” विदुरांना धृतराष्ट्राचा डाव कळलेला होता. म्हणूनच त्यांनी स्पष्ट शब्दात धृतराष्ट्राचा मनातला हेतु सफल होणार नाही असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment