सभेत श्रीकृष्णांचे विश्वरूपदर्शन -
पुन्हा सभेत आलेल्या दुर्योधनाला श्रीकृष्ण म्हणाले, “अरे दुर्बुद्धी, मी एकटा आहे असे तुला वाटले का ? असे म्हणून त्यांनी आपले विश्वरूप प्रगट केले व म्हणाले, “हे बघ, सर्व पांडव येथेच आहेत, अंधक व वृष्णीवंशातील लोक येथेच आहेत आदित्यगण, रुद्रगण, व वसुगण सुद्धा येथे आहेत. असे म्हणून श्रीकृष्ण अट्टहास करू लागले. त्यांच्या हास्याबरोबर त्यांच्या अंगामधे अंगठ्याएवढ्या असलेल्या विजेसारख्या तेजस्वी देवता आगीच्या ज्वाळा सोडू लागल्या. त्यांच्या कपाळावर ब्रह्मदेव व छातीवर रुद्रदेव विद्यमान होते. सर्व लोकपाल त्यांच्या भुजांमधे होते. आदित्य, साध्य, वसु, दोन्ही अश्विनीकुमार, इंद्रासह मरुद्गण, विश्वेदेव, यक्ष, गंधर्व, नाग व राक्षस हे सर्वजणच त्यांच्या विभिन्न अंगातून प्रगट होऊ लागले. दोन्ही भुजांवर बलराम व अर्जुन प्रगट झाले. भीम, युधिष्ठिर, नकुल सहदेव, पृष्ठभागात स्थित होते तर प्रद्युम्न वगैरे वृष्णीवंशी व अंधवंशी योद्धा हातात विशाल आयुधे धारण करून अग्रभागी प्रगट झालेले दिसले. त्यांच्या नाकातोंडातून अग्नी ज्वाळा प्रगट होत होत्या. शंख, चक्र, गदा, शक्ति, शार्ङ्गधनुष्य, हल व नंदक नावाचे खड्ग त्यांच्या उंचावलेल्या हातात होते.
श्रीकृष्णांचे ते भयानक रूप पाहून सर्व राजांच्या मनात भीती दाटून आली. श्रीकृष्णांचे ते आश्चर्यकारक रूप पाहून देवताही दुदुंभी वाजवू लागल्या व त्यांच्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली. त्यांचे ते दिव्य रूप पहाण्यासाठी धृतराष्ट्राने दृष्टी मागून घेतली. श्रीकृष्णांनी त्याला दृष्टी प्रदान केली. सर्व लोक आश्चर्यचकित झाले. त्य़ावेळी पृथ्वी डगमगू लागली, समुद्रातही खळबळ माजली. नंतर श्रीकृष्णांनी ते रूप आवरून घेतले व शिष्टाईचा काही उपयोग होणार नाही हे जाणून सभेतील ऋषिमंडळींचा निरोप घेऊन सात्यकी व कृतवर्माचा हात पकडून तेथून ते सरळ बाहेर पडले व कुंतीकडे गेले.
कौरवसभेमधे विश्वरूप दाखवून श्रीकृष्ण सभेतून बाहेर पडले व कुंतीकडे आले. कुंतीला नमस्कार करून त्यांनी परत जाण्याची अनुज्ञा मागितली, तेव्हा कुंतीने त्यांच्याजवळ युधिष्ठिरासाठी निरोप दिला की, “वत्स, तुझ्या प्रजापालनरूप धर्माची हानी होत आहे. तू केवळ शांतिधर्माकडेच पहात आहेस. तू क्षत्रिय आहेस हे विसरू नकोस. बाहुबळ हेच क्षत्रियाचे खरे बल आहे. युद्ध हेच क्षत्रियासाठी नियत केलेले आहे. राजाने प्रजेचे रक्षण करायचे असते व प्रजा धर्माने वागली की त्या पुण्यकर्माचा चौथा भाग राजाला प्राप्त होत असतो. स्वधर्मानुसार दंडनीतीचाही उपयोग करावा लागतो. त्याने न्यायाने दंडनीतीचा उपयोग केला तर सत्ययुग अवतरायला वेळ लागणार नाही. ‘राजा कालस्य कारणम्’ राजा हाच कालाला कारण असतो. तोच सत्य, त्रेता व द्वापर युगाचा स्रष्टा असतो. पिता-पितामहांनी ज्या राजधर्माचे पालन केले त्या राजधर्माकडे पहा. तू ज्या धर्माचे आचरण करत आहेस तो राजर्षींचा धर्म नाही. केवळ दयाभावाने प्रजापालनजनित पुण्याची प्राप्ती होत नाही. तू राजधर्मानुसार युद्ध कर. आपल्या बापजाद्यांच्या नावाला कलंक लावू नकोस.” प्रथम भेटीतही कुंती श्रीकृष्णांना म्हणाली होती की ‘यदर्थं क्षत्रिया सूते तस्य कालोऽयमागत:’ (९०-७५). ‘ती म्हणते क्षत्राणी ज्या हेतूने पुत्राला जन्म देते तो काळ आता आला आहे. हीच युद्ध करण्याची वेळ आहे. वेळ आल्यावरही जर तुम्ही युद्ध करणार नसाल तर या नृशंस कर्माबद्दल मी तुमचा त्याग करीन.’ असा त्या तेजस्वी क्षात्रीणीने युधिष्ठिराला युद्ध करण्याविषयी निरोप पाठवला. कुंतीचा निरोप घेऊन भगवान श्रीकृष्ण परत जाण्यास निघाले. युद्ध करावे लागणार हे त्यांना प्रथमपासूनच दिसत होते. फक्त एक शेवटचा प्रयत्न म्हणून ते शिष्टाईसाठी आले होते.
पण या शिष्टाईने एक गोष्ट चांगली झाली होती, ती ही की दुर्योधनाचे आजवरचे पांडवांबरोबरचे वाईट वागणे सार्या जगासमोर आले होते. दुर्योधनाच्या बाजूने जमलेले त्यांच्यातील काही राजे धर्माची साथ देण्याकरता उद्या कदाचित युधिष्ठिराच्या बाजूला येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment