विदुर पुन्हा पुन्हा अर्धे राज्य देण्याचा सल्ला देत आहेत हे दुर्योधनाला आवडले नाही. त्याने पुन्हा सर्वांना निक्षून सांगितले की अशा प्रकारचा संधी होण्याची कोणतीही शक्यता नाही. उलट श्रीकृष्ण येथे आले की मी त्यांना बंदी बनवीन कारण श्रीकृष्णांना कैद केले की सर्व यदुवंशी व पांडव आपल्या आधीन होतील असे त्याला वाटत होते. आणि या बाबतीत त्याने सभासदगणांचा सल्ला विचारला.
दुर्योधनाच्या या बोलण्यावर सर्वच सभासदगण अवाक् झाले. तेव्हा धृतराष्ट्राने समजावले की श्रीकृष्ण यावेळी दूत बनून आपल्याकडे येत आहेत. ते आपले संबधीही आहेत व त्यांनी कौरवांचा कोणताही अपराध केलेला नाही. तेव्हा त्यांना कैद करणे योग्य होणार नाही. भीष्मांनीही त्याच्या या योजनेची कठोर शब्दात निंदा केली.
श्रीकृष्ण आले की त्यांची दु:शासनाच्या महालात रहाण्याची दुर्योधनाने व्यवस्था केली होती. ठरल्याप्रमाणे श्रीकृष्ण हस्तिनापूरला पोचले. दुर्योधन सोडून धृतराष्ट्राचे सर्व पुत्रांसहित भीष्मद्रोणादि श्रीकृष्णांच्या स्वागताकरता गेले. सर्वांच्याकडून स्वागत स्वीकारून श्रीकृष्ण विदुरांच्या घरी गेले. श्रीकृष्णांनी विदुरांना पांडवाची हालहवाल सांगितली. नंतर त्यांनी कुंतीला भेटून तिचे सांत्वन केले.
नंतर ते दुर्योधनाला भेटण्याकरता गेले. त्याच्या महालात दु:शासन, कर्ण व शकुनी आलेले होतेच. सुरवातीला दुर्योधनाच्या वाणीत मृदुता होती. पण शेवटी शठता प्रगट होऊ लागली. दुर्योधनाने त्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. पण श्रीकृष्णांनी ते स्वीकारले नाही. दुर्योधनाने त्यांना यामगचे कारण विचारले. श्रीकृष्णांनी सांगितले की प्रेम असेल व संकट आले असेल तरच कोणाच्या तरी घरी जेवण करता येते. आणि मी कोणत्याही संकटात सापडलेलो नाही व तुझे माझ्यावर प्रेम नाही. पांडव तुझे भाऊ आहेत व सद्गुणांनी संपन्न आहेत तरीही तू त्यांच्याशी अकारण द्वेष करतोस. जो पांडवांचा द्वेषी आहे तो माझाही द्वेषी आहे. मी व पांडव एकरूप आहेत असेच समज. जो काम व क्रोधाच्या आहारी जाऊन गुणवान मनुष्याशी विरोध करतो तो मनुष्य अधम आहे. जो द्वेष करतो त्याचे अन्न खाऊ नयेच पण त्यांना अन्न वाढू सुद्धा नये असे शास्त्र सांगते व तुझे अन्न दुर्भावनेने दूषित झालेले आहे. तेव्हा मी येथे जेवणे योग्य होणार नाही. तेव्हा मी विदुरांच्याकडेच भोजन करेन. असे स्पष्टपणे सांगून श्रीकृष्ण विदुरांकडे गेले.
विदुरानी श्रीकृष्णांना दुर्योधनाचा मनातील भाव सांगितला. विदुर म्हणाले की दुर्योधनाने धर्म व अर्थ या दोन्हींचे उल्लंघन केलेले आहे. तो गुरुजनांचेही ऐकत नाही. धर्मशास्त्रांची आज्ञा मानत नाही. तो भोगात आसक्त आहे, स्वत:ला पंडित समजतो, सर्वांकडेच तो संशयी नजरेने पहातो. स्वत: उपकार करत नाही व दुसर्यांनी केलेले मानत नाही. धर्माचा त्याग करून त्याने असत्याचा स्वीकार केलेला आहे. तो स्वत:ला श्रेष्ठ समजतो. आपल्याबरोबर भीष्म, द्रोण, कृप, कर्ण वगैरे अजेय योद्धे असल्यामुळे आपण युद्धात नक्की विजयी होऊ याची त्याला खात्री आहे. त्यामुळे तो संधी करण्य़ास तयार नाही. त्यामुळे त्याने युद्धासाठी सेना एकत्र केलेली आहे. तेव्हा तुम्ही कितीही समजावलेत तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तो संधी करण्यास तयार होणार नाही. तुम्ही त्याच्या मनात भ्रातृभाव जागवण्याचा प्रयत्न करायला आलेले अहात, पण ते सर्व परिश्रम व्यर्थ जाणार आहेत.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment