Thursday, November 22, 2018

१४९) अमृतानुभव प्रकरण ३

बागुलाचेनि मरणें । तोषावें की बालपणें ।
 येरा तो नाही मा कोणे । मृत्यु मानावा ॥३-१३॥१५७॥ 

अर्थ - बागुलबुवाच्या मरणामुळे लहानग्या बाळाने आनंदित व्हावे. पण  इतरांच्या दृष्टिकोनातून त्याला अस्तित्वच नसल्यामुळे बागुलबुवाच्या मरण्यात त्यांनी कोणाचा मृत्यु नानून खूष व्हावे ? 

स्पष्टीकरण - मुलांना थोडी भीती दाखवण्यासाठी आई कल्पित बागुलबुवा असल्याचे मुलाला सांगते. ‘तू जेवलास तर बागुलबुवा जाईल, किंवा मी बागुलबुवाला हाकलून लावते’ असे आईने म्हणताच मुलगा जेवतो व आई खोटेखोटेच बागुलबुवाला मारून टाकते. बागुलबुवा गेला म्हणून मुलगा आनंदित होतो. आता हा बागुलबुवा कल्पितच आहे. अज्ञानाने मुलाला तो खरे वाटला व तो मेल्याचा त्याला संतोष वाटला. पणा बाकींच्यावच्या दृष्टिकोनातून मुळात बागुलबुवाच नसतांना त्याच्या असण्याचे दु:ख व त्याच्या मरणाचा आनंद कोणाला वाटणार ? तोच प्रकार बंध व मोक्षाचा आहे. जो बंध खरा मानीत असतो व त्याच्या जाचाने त्रस्त झालेला असतो, त्या अज्ञानी जीवालाच मोक्षही खरा वाटत असतो. ज्याला बंधाचा खोटेपणा कळतो त्याला मोक्षाचाही खोटेपणा कळतो. जो बागुलाला पुरते ओळखतो त्याच्या बाबतीत बागुल आला वा बागुल गेला या दोन्ही वाक्यांना निरर्थकत्व असते, त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या बाबतीत बंध व मोक्ष यांना निरर्थकत्व असते.

No comments:

Post a Comment