श्रीकृष्णांचा पांडवांना इशारा -
युधिष्ठिरासह सर्व पांडव व वृष्णीवंशी लोकांच्या मतानुसार श्रीकृष्ण कौरवांकडे शिष्टाईकरता जाण्य़ास तयार झाले पण त्यांना माहीत होते की दुर्योधन पापाचारी आहे. तेव्हा तो तहाच्या गोष्टी बिलकूल मानणार नाही तेव्हा युद्ध करूनच पांडवांना राज्य मिळावावे लागणार आहे. पण तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण शिष्टाईकरता जाण्यास निघाले. संधीचा प्रयत्न न करताच पांडवांनी सर्व वंशाचा नाश केला असा दोषारोप जगाने भविष्यकाळात करू नये एवढाच त्यांचा या शिष्टाईसाठी जाण्यामागे हेतु होता. पण तरीही जाण्यापूर्वी श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला युद्धावाचून तुला राज्य मिळाणार नाही ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे.
सर्वथा युद्धमेवाहमाशंसामि परै: सह ।
निमित्तानि हि सर्वाणि तथा प्रादुर्भवन्ति मे ॥७३-३८॥
दुर्योधनो न ह्यलमद्य दातुं
जीवंस्तवैतन्नृपते कथंचित् ।
यत्ते पुरस्तादभवत् समृद्धं द्युते
यत्ते पुरस्तादभवत् समृद्धं द्युते
हृतं पाण्डवमुख्यराज्यम् ॥७३-४२॥उद्योगपर्व॥
“हे पांडवप्रवर, मला तर शत्रूंबरोबर युद्ध होण्याचीच संभावना दिसते. मला अशीच लक्षणे दिसत आहेत. आपल्याजवळ प्रथम जे समृद्धशाली राज्य होते व जे आपण द्यूताच्या पटावर घालवलेत, ते सारे राज्य दुर्योधन स्वत: जिवंत असेपर्यंत आपल्याला कधीही परत देणार नाही. तेव्हा आपण युद्धासाठी तयार रहा.” तेव्हा श्रीकृष्ण संधी करून येतील व शांतीने यात काहीतरी तोडगा काढतील अशा भ्रमात युधिष्ठिराने राहू नये हेच त्यांना सांगायचे होते.
संजयाने केलेली शिष्टाई त्यांनी ऐकली होती. त्यावरून कौरव राज्य देण्यास तयार नाहीत हे त्यांना कळून चुकले होते. युधिष्ठिराने संजयाकरवी ‘आपण पाच गावांवर सुद्धा संतुष्ट राहू’ हा जो धृतराष्ट्राला निरोप पाठवला होता, तेही त्यांनी ऐकले होते आणि ती गोष्ट श्रीकृष्णांना मुळीच आवडलेली नव्हती. युधिष्ठिराचे धर्मपूर्वक वागणे, धृतराष्ट्राला पित्याप्रमाणे मान देणे या गोष्टी श्रीकृष्णांनाही भावलेल्या आहेत. पण शेवटी कर्तव्य म्हणूनही काही असतेच. भगवान युधिष्ठिराला म्हणातात, “महाराज, आपण युद्ध न करता जेवढे मिळेल त्यावर संतुष्ट अहात, तेच खूप झाले असे मानता अहात. पण हे क्षत्रियाचे नैष्ठिक कर्म नाही. क्षत्रियाने कधी भीक मागू नये. त्याच्यासाठी युद्धात पराक्रम, हेच कर्तव्य विधात्याने ठरवलेले आहे. रणांगणावर विजय प्राप्त करावा किंवा मृत्यु स्वीकारावा, हाच क्षत्रियाचा स्वधर्म आहे. दीनता व भित्रेपणा ही त्याच्यासाठी प्रशंसनीय गोष्ट नाही. तेव्हा ‘विक्रमस्व महाबाहो जहि शत्रून् परंतप’, महाबाहु युधिष्ठिर, आता पराक्रम दाखवा व शत्रूंचा संहार करा. महाराज, धृतराष्ट्राचे पुत्र लोभी आहेत. तुमच्या वनवासाच्या काळात त्यांनी अनेक मित्रराजांचा संग्रह केलेला आहे. त्यांच्याशी स्नेह वाढवलेला आहे व शक्तीचाही संचय केलेला आहे. द्रोण, भीष्म व कृपाचार्य आपल्या पक्षाला असल्यामुळे ते कौरव स्वत:ला अधिक बलवान समजतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून तुम्हाला अर्धे राज्य देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आपण जोपर्यंत यांच्याशी नरमाईने वागत रहाल तोपर्यंत ते आपले राज्य बळकावयाचाच प्रयत्न करतील. तेव्हा धृतराष्ट्राचे पुत्र आपल्यावर कृपा करून किंवा आपल्याला दुर्बल मानून, किंवा धर्माकडे दृष्टी ठेऊन तुम्हाला राज्य देतील अशा खोट्या भ्रमात राहू नका. त्यांनी तुम्हाला सर्व कुरुवृद्धांच्या देखत द्यूतात फसवले व एका लंगोटीवर दीर्घकाळपर्यंत वनात पाठवले व त्याबद्दल त्यांना काहीही पश्चात्ताप होत नाही किंवा त्यांना त्याबद्दल लाजही वाटत नाही, यावरूनच ते संधी करणार नाहीत हे स्पष्ट होते. तेव्हा अशा कुटिल स्वभावाच्या व अनाचारी दुर्योधनाबद्दल आपण प्रेम दाखवू नका. धृतराष्ट्राचे पुत्र सर्व लोकांसाठीच वध्य आहेत. तेव्हा ते आपल्यासाठी अवध्य कसे काय ठरतील ? कपटद्यूताच्यावेळी त्याने केलेली संभाषणे आठवा. त्यावेळी तुमचे बंधु पराक्रम करण्य़ास समर्थ होते, तरीही तुम्ही धर्मबंधनाच्या निमित्ताने त्यांना अडवलेत. त्यामुळे ते त्यावेळी अन्यायाचा प्रतिकार करू शकले नाहीत. ज्याचे चारित्र्य इतके रसातळाला गेलेले आहे त्याचा वध करणे ही तर सामान्य गोष्ट आहे. तेव्हा आपण उगाचच दुविधेत पडू नका. त्याचा खुशाल वध करा. त्यामुळे कोणतेही पाप लागणार नाही.” असे सांगून संजयाने जे ‘कौरवांचा वध केल्याने पाप लागेल’ हे विष पांडवांच्या मनात पेरले होते त्याचे श्रीकृष्णांनी निराकरण केले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment