श्रीकृष्ण कौरवांच्या सभेतून कुंतीकडे गेले. तिला भेटून त्यांनी तिचा पांडवांच्य़ासाठी असलेला निरोप घेतला व उपप्लव्य नगरात पांडवांच्याकडे जाण्यासाठी निघाले. जातांना त्यांनी कर्णाला रथावर बसवले व ते सात्यकीसह निघाले.
कर्णाचा बुद्धिभेद -
कर्ण जरी दुष्टपणे वागला होता तरी तो दुर्योधनाच्या संगतीचा परिणाम होता. सतत ‘सूतपुत्र’ म्हणून झालेल्या उल्लेखामुळे तो त्रस्त झालेला होता. सूतपुत्रत्वापुढे त्याचा पराक्रम फिका पडलेला होता. पण मुळात त्याचे वागणे धर्मशील होते. तो दानी होता. अर्जुनाकडून पूर्वी झालेल्या दोन तीन युद्धात त्याचा पराभव झाला होता तरी तो शूर होता. ज्याच्या खांद्यावर् दुर्योधनाने युद्धाचे जू ठेवले होते तो खांदाच जर काढून घेतला तर दुर्योधनाची शक्ती निम्मी कमी होईल हे श्रीकृष्ण जाणून होते. म्हणून त्यांनी भेदनीतीचा अवलंब केला.
वाटेत थांबून त्यांनी कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य संगितले व म्हणाले, “तू सुद्धा पांडुपुत्र आहेस, तेव्हा पांडवांच्या पक्षाला सामील हो. पांडव तुला ज्येष्ठ भावाचा मान देतील, तूच राजा होशील व सर्व पांडव तुझी आज्ञा मानतील. युद्ध झाले तर त्यात कौरवांचा नाश होईल. तेव्हा पांडवांच्या पक्षाला सामील होणे हेच तुझ्य़ासाठी कल्याणकारक आहे.” एक कुशल राजकारणी म्हणून श्रीकृष्णांनी अवलंबलेला हा मार्ग योग्यच होता.
परंतु ज्यावेळी ‘सूतपुत्र’ म्हणून त्याची हेटाळणी होत होती, त्यावेळी त्याला दुर्योधनाने आधार दिला होता, राज्य दिले होते. तेव्हा मित्राला गरज असतांना त्याचा विश्वासघात करणे त्याला योग्य वाटत नव्हते. तसेच सतत अर्जुनाशी मनोमन वैर जपलेले होते. आणि आता पुन्हा त्यांच्याच पक्षाला जाऊन मिळणे त्याला प्रशस्तही वाटत नव्हते. त्यामुळे त्याने श्रीकृष्णांच्या विनंतीला नम्रपणे नकार दिला.
कुंतीनेही कर्णाला पांडवांच्या पक्षाला वळवण्याचा प्रयत्न केला. पण तिलाही त्याने उत्तर दिले की “ज्या राधेने व सूत अधिरथाने मला वाढवले त्यांचा सूतपुत्र म्हणवून घेण्यातच मी धन्यता मानीन”. कारण कुंतीला प्रेमाचा पान्हा फुटला तो पांडवांचा विनाश होईल या भीतीने. त्याआधी कधीही तिने तो क्षत्रिय असल्याचे समाजाला उच्चरवाने सांगितले नाही, याचाच त्याला राग होता. पण कुंती आपल्याकडे काही मागायला आलेली आहे असे पाहून त्याने तिला अर्जुन सोडून इतर कोणत्याही पांडवाचा मी वध करणार नाही असे वचन दिले.
धृतराष्ट्राचे दुर्योधनाला समजावणे -
‘यतो धर्मस्ततो जय’ असे म्हणून भीष्म, द्रोण, विदुर, गांधारी इत्यादींनी धर्माचाच जय होतो तेव्हा तू धर्माने वाग असे दुर्योधनाला परोपरीने सांगितले. धृतराष्ट्रानेही आपल्या कुळाचा इतिहास सांगितला. आपणही अंध असल्यामुळे राज्याचा अधिकारी नव्हतो तर तू ह्या राज्याची इच्छा कशी करतोस ? हे राज्य पांडूचे होते व पुढे ते त्याच्या पुत्रांचेच असणार आहे. धृतराष्ट्राने त्याला स्पष्ट शब्दात बजावले, तू राजाचा पुत्र नाहीस. तुझे वागणे सुद्धा दुष्टांप्रमाणेच आहे. तू लोभी आहेस. आपल्या भावांच्या बाबतीत नेहेमी पापपूर्ण विचार करतोस. तेव्हा कमीतकमी अर्धे राज्य तरी पांडवांना दे.” अर्थात धृतराष्ट्राची ही पश्चात् बुद्धि होती. याआधी त्याने सतत दुर्योधनाच्या वागण्याला खतपाणीच घातले होते. आणि दुर्योधनही त्यांचे म्हणणे ऐकायला तयार नव्हता. युद्ध करून राज्य मिळावायचेच असा त्याचा ठाम निश्चय होता.
श्रीकृष्ण-युधिष्ठिर संवाद -
या सर्व प्रकारात जरी श्रीकृष्णांना यश आले नसले तरी त्यांनी एका कुशल दूताची भूमिका व्यवस्थित वठवलेली होती. श्रीकृष्ण पांडवांकडे परत आले. ‘अभीष्ट कार्याच्या सिद्धीकरता आपण तेथे सर्व बांधवांमधे बंधुजनोचित प्रेम टिकून रहावे म्हणून प्रथम सामनीतीचा प्रयोग कसा केला, सामवचनांचा उपयोग झाला नाही त्यामुळे आपण भेदनीतीचा उपयोग कसा केला, दुर्योधनाच्या बाजूला गोळा झालेल्या त्या राजांमधे दुर्योधनाची काळी कारस्थाने सांगून त्यांच्यामधे फूट पाडण्याचा कसा प्रयत्न केला, त्याचाही उपयोग झाला नाही व दुर्योधन आपल्याला कैद करण्याची भाषा बोलू लागल्यावर आपण तिथे विश्वरूपदर्शनासारखे अमानुष कृत्य कसे केले’ तो सर्व वृत्तांत त्यांनी सर्व वृत्तांत युधिष्ठिराला निवेदन केला व म्हणाले ‘दण्डं चतुर्थं पश्यामि तेषु पापेषु नान्यथा’ आता त्या पाप्यांसाठी चौथा दंडाचाच प्रयोग करणे आवश्यक आहे, अन्यथा आता त्यांना सन्मार्गावर आणणे असंभव आहे. शांतीचे सर्व प्रयत्न करून झालेले आहेत त्यामुळे आता धर्माचे ऋणही आपल्यावर नाही ‘धर्मस्य गतमानृण्यम्’ असे सांगून आता एकमेव युद्धच करणे आवश्यक आहे असे सांगितले.
न च भीष्मो न च द्रोणो युक्तं तत्राहतुर्वच: ।
सर्वे तमनुवर्तन्ते ऋते विदुरमयुत ॥१५४-११॥उद्योगपर्व॥
श्रीकृष्ण म्हणतात की, “युधिष्ठिरा, तेथे एक विदुर सोडले तर भीष्म किंवा द्रोण सुद्धा उचित गोष्ट करत नाहीत. ते त्या दुर्योधनाचेच अनुसरण करत आहेत.” ही गोष्ट श्रीकृष्णांना फार खटकली होती. वास्तविक भीष्मांना आपल्या अधिकाराखाली दुर्योधनावर सक्ती करून पांडवांचे राज्य त्यांना परत देता आले असते. श्रीकृष्णांनी तसा प्रस्तावसुद्धा मांडला होता. आणि हीच गोष्ट विदुरांनीही भीष्मांना विचारली होती. विदुर म्हणाले होते -
तन्मे विलपमानस्य वचनं समुपेक्षसे ।
कोऽयं दुर्योधनो नाम कुलेऽस्मिन् कुलपांसन: ॥१४ ८-१९॥
यस्य लोभाभिभूतस्य मतिं समनुवर्तसे ।
मां चैव धृतराष्ट्रं च पूर्वमेव महामते ।
चित्रकार इवालेख्यं कृत्वा स्थापितवानसि ॥१४८-२३॥उद्योगपर्व॥
‘या वंशाचा नाश होत आहे म्हणून मी विलाप करत आहे. तुम्ही माझ्या वचनाची का बरे अवहेलना करत अहात ? हा कुलांगार दुर्योधन या कुळाचा कोण आहे की ज्याच्या लोभाला वश होऊन आपण त्याचेच अनुसरण करत अहात ? हे महामते, चित्रकार जशी चित्रे बनवून एका जागी ठेवतो त्याप्रमाणे मला व धृतराष्ट्राला तुम्ही पहिल्यापासूनच निरुपयोगी करून ठेवले आहे. ”
थोडक्यात भीष्मांनी मनात आणले असते तर हा कुलक्षय थांबवू शकले असते. पण त्यांनीही दुर्योधनावर आपला अधिकार चालवला नाही. वास्तविक अयोग्य व्यक्तीला राज्याधिकार न देण्याची परंपरा त्यांच्या वंशात होती. पण त्याचे पालन केले गेले नाही. व कौरववंशाला शोकांतिकेला सामोरे जावे लागले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment