पुढे विदुरांनी तर त्यांना कौरवसभेत शिष्टाईकरता सुद्धा न जाण्याची विनंती केली. कारण श्रीकृष्णांच्या शत्रूंना दुर्योधनाने तेथे एकत्र केलेले होते. श्रीकृष्णांपासून ज्यांना भीती होती असे सर्व राजे दुर्योधनाला शरण गेलेले होते. अशा सर्व विरोधी लोकांच्या सभेत जाणॆ हे प्राणांवर बेतणारेच होते.
विदुरांच्या भावना श्रीकृष्णांना समजत होत्या. श्रीकृष्णांनी त्यांच्या बोलण्याची प्रशंसा केली व आपले तेथे जाणे कसे आवश्यक आहे तेही त्यांना पटवून दिले. श्रीकृष्ण म्हणाले की दुर्योधनाची दुष्टता, त्याने केलेल्या सैन्याची जमवाजमव व त्याचा हट्टीपणा ह्या सर्व गोष्टी मला माहीत आहेत. हे भयंकर संकट कर्ण व दुर्योधनामुळेच उपस्थित झालेले आहे. त्याच्या ह्या हट्टापायी सर्व मानवजात विनाशाच्या मार्गाला लागलेली आहे. आणि सर्व मानवजात जर युद्धामुळे विनष्ट होण्याच्या मार्गावर असेल तर तिला मृत्युपाशातून सोडवणे हा परम धर्म आहे. मी निष्कपट भावाने सर्व क्षत्रियांच्या हिताचा प्रयत्न करेन. भावाभावांमधे फूट पडण्य़ाची वेळ आली असता त्यांच्यात मेळ घडवून आणणारा खरा मित्र आहे. आता या प्रयत्नात मला यश येणारही नाही, पण धर्मकार्य केल्याचे समाधान तरी मला मिळेल. मी असा प्रयत्न नाही केला तर ‘श्रीकृष्ण समर्थ असूनही त्याने युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला नाही’ असे ज्ञातिबांधव मला बोल लावतील. तेव्हा मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. हितकारक वचन ऐकायचे की नाही ते त्याने ठरवायचे आहे. आणि त्याने जर ऐकले व संधी केला तर ते एक मोठे पुण्यकार्य होईल. राहता राहिला माझ्य़ा सुरक्षेचा प्रश्न. पण माझ्या क्रोधापुढे कोणताही राजा टिकाव धरू शकणार नाही याची मला खात्री आहे.”
श्रीकृष्ण-शिष्टाई -
दुसरे दिवशी श्रीकृष्ण कौरवसभेत निघाले. बरोबर सात्यकी, कृतवर्मा वगैरेही मंडळी होती. मोठ्या आदराने कौरवांनी त्यांचे राजसभेत स्वागत केले. तेथे नारदादि ऋषिमंडाळीही राजसभा पहाण्यासाठी उपस्थित होती. श्रीकृष्णांनी आसन ग्रहण केले. सर्व मंडळी मूक झालेली होती. शेवटी श्रीकृष्णांनी आपल्या येण्य़ाचा उद्देश सांगितला. श्रीकृष्ण धृतराष्ट्राला म्हणाले, “मी येथे क्षत्रिय वीरांचा संहार न होता कौरव पांडवांमधे शांती प्रस्थापित करण्य़ासाठी आलो आहे. याव्यतिरिक्त मला दुसरी कोणतीही कल्याणकारक गोष्ट सांगायची नाही. कुरुकुळ हे सर्व राजवंशात श्रेष्ठ कुळ आहे. या कुळात शास्त्र व सदाचाराचे पालन होते. हे कुळ सद्गुणांनी संपन्न आहे. कृपा, अनुकंपा, करुणा, अनृशंसता, सरलता, क्षमा व सत्य हे गुण या कुळात अधिक प्रमाणात दिसून येतात. तेव्हा आपल्या कुळाकडून अनुचित कार्य होता कामा नये. कौरव जर मिथ्या आचरण करत असतील तर आपण त्यांना अडवून सन्मार्गावर आणले पाहिजे. दुर्योधनादि पुत्र क्रूर आचरण करतात. लोभामुळे यांनी मर्यादा तोडली आहे. यावेळी शांती प्रस्थापित करणे ही कठिण गोष्ट नाही ही गोष्ट आपल्या दोघांच्या हातात आहे. मी पांडवांना नियंत्रणात ठेवीन तुम्ही कौरवांना ठेवा. आपल्या मुलांनी आपल्या आज्ञेचे पालन करावे. पांडवांच्या बरोबर विवाद करून चांगला परिणाम होणार नाही. तेव्हा आपण स्वत: संधीसाठी प्रयत्न करावा. कौरव व पांडव एकत्र आले तर सगळ्या जगात अजेय बनतील. पण हे युद्ध झाले तर मोठा संहार घडून येईल. या युद्धात पांडव अथवा कौरव मारले गेले तर तुम्हाला कोणते सुख मिळणार आहे ? या युद्धामुळे दोन्ही बाजूंची हानी होणार आहे. तेव्हा आपणच यापासून रक्षण करा. या सर्व राजांचा सन्मान करून यांना परत पाठवा. आपण पूर्वीसारखेच पांडवांवर प्रेम करा. पांडवांशी वैर करून आपला धर्म व अर्थ दोन्ही नष्ट होऊ देऊ नका. पांडवांनी सांगितले आहे की ‘आम्ही केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे १२ वर्षाचा वनवास व १ वर्षाचा अज्ञात वास मोठ्या कष्टाने व्यतीत केला आहे. आम्ही ही अट कधी तोडलेली नाही. तेव्हा आपणही केलेल्या प्रतिज्ञेवर दृढ रहा व आमचे राज्य आम्हाला परत करा. आम्ही गुरुजनोचित आपल्याशी वागत आलेलो आहोत. आपणही शिष्याशी गुरुजन वागतील तसे वागावे. आम्ही वाईट मार्गाने जात असू तर आम्हाला सन्मार्ग दाखवण्याचे आपले काम आहे.’
पुढे श्रीकृष्ण सांगतात की “पांडवांनी या सभेसाठी सुद्धा संदेश दिला आहे. ‘आपण सर्व सभासदगण धर्माचे ज्ञाते अहात. आपल्या देखत कोणतेही अनुचित कार्य घडू नये. सभासदांच्या देखत जर धर्माचा व सत्याचा गळा घोटला जात असेल तर ते सभासद नष्ट झाल्यातच जमा आहेत. सभासदांनी अधर्माला काट्याप्रमाणे दूर केले नाही तर तो काटा सभासदांनाच विद्ध करतो.”
श्रीकृष्ण म्हणतात की पांडवांची ही मागणी न्यायसंगत आहे. पांडवांना त्यांचे राज्य परत देण्याव्यतिरिक्त दुसरी कोणती गोष्ट उचित आहे याचा आपण व या सभेतील सर्व राजांनी यावर विचार करावा. आपणच युधिष्ठिराला इंद्रप्रस्थाचे राज्य दिले होते. त्याने पराक्रम करून ते वाढवले पण तरीही त्याने कधी आपल्या आज्ञेचे उल्लंघन केलेले नाही. अशा युधिष्ठिराचे राज्य हडप करण्यासाठी शकुनीने कपटद्यूत केले, द्रौपदीला भर सभेत आणले गेले, हे लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा की कुंतीचे पुत्र आपली सेवा करायलाही तयार आहेत व युद्धासाठी सुद्धा समर्थ आहेत. तेव्हा काय निर्णय घ्यायचा तो आपण विचार करून घ्या.”
श्रीकृष्णांनी सभेमधे पांडवांच्या न्याय्य हक्कांचीच मागणी केली, व पांडवाची बाजू कशी बरोबर आहे ते सर्व उपस्थित राजांना ऐकवले. सर्व सभेलाच श्रीकृष्णांचे म्हणणे मान्य झालेले होते.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment