श्रीकृष्णांचे संजयाला उत्तर -
यावर इंद्रप्रस्थाचे राज्य परत देणे हा युद्ध टाळण्याचा एकच मार्ग आहे असे युधिष्ठिराने सांगितले व पुढे श्रीकृष्णांना उत्तर देण्य़ास सांगितले. या संजयाच्या शिष्टाईला श्रीकृष्णांनी अगदी योग्य प्रत्युत्तर दिले. श्रीकृष्णांनी प्रथम आपण दोन्ही पक्षांचे हित इच्छितो व या प्रकरणामधे शांततेनेच मार्ग निघावा अशी आपली इच्छा आहे ही गोष्ट स्पष्ट केली. पांडव शांततेच्याच मार्गाने जाणारे आहेत. पण धृतराष्ट्रासह त्याचे पुत्र पांडवांचे राज्य बळकावण्याची इच्छा करत असतांना शांततेने मार्ग कसा काय निघू शकेल ? असा प्रश्न त्यानी विचारला. त्यांनी पुढे सांगितले की युद्ध करणे हे क्षत्रियाचे नियत कर्म असून ते केल्यामुळे पाप लागत नाही किंवा नरकप्राप्तीही होत नाही. आणि राजाने सर्व वर्णाचे लोक आपापल्या वर्णाप्रमाणे वागतात की नाही त्यावर लक्ष ठेवावे. जर कोणी दुसर्याची धनसंपत्ती घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला शासन करावे हा राजाचा धर्म आहे. अशा लोकांचा वध करुन राजाला पुण्यप्राप्तीच होत असते. आणि दुसर्यांचे धन लुटणे हा दोष कौरवांच्या ठिकाणी तीव्ररूपाने प्रगट झाला आहे. कौरवांनी पांडवांचे पैतृक राज्य अपहरण केलेले आहे. त्य़ामुळे चोर-डाकू व त्यांच्यात काहीही फरक नाही. श्रीकृष्ण एवढेच बोलून थांबले नाहीत तर द्यूताच्या वेळी भरसभेत द्रौपदीची झालेली विटंबना, त्यावेळी कर्ण, दु:शासन वगैरेंनी केलेली कडवट संभाषणे, विदुरांव्यतिरिक्त भीष्म-द्रोणादिकांनीही त्या गोष्टीची केलेली उपेक्षा, याकडेही त्यांनी संजयाचे लक्ष वेधले व संजयाला विचारले की ‘द्यूतसभेत झालेला अन्याय तूही पाहिलेला होतास. तो विसरून तू युधिष्ठिराला उपदेश करण्याचे धाडस कसे काय करू शकतोस ?’ तसेच पांडवाच्या सामर्थ्याचीही त्यांनी त्याला कल्पना दिली व अस्त्र शस्त्रांची त्यांच्याकडेही कमतरता नसून भीम व अर्जुन कौरवांचा समाचार घेण्यास समर्थ आहेत असेही त्याला खडसावले.
धृतराष्ट्राची मनस्थिती -
संजयाने युधिष्ठिराचा व श्रीकृष्णांचा निरोप धृतरष्ट्राला सांगितला. आपल्या निरोपाचा फारसा परिणाम पांडवांवर झाला नाही व आता जर राज्य दिले नाही तर युद्ध टळणार नाही हे त्याला कळून चुकले. विदुरानेही धृतराष्ट्राला पांडवांचे राज्य त्यांना परत करण्यात सर्वांचे हित आहे हे सांगितले. तेव्हा धृतराष्ट्रही या तोडग्याला अनिच्छेनेच का होईन पण तयार झाला.
दोन्ही पक्ष संधी करण्याचा प्रयत्न करत होते. आपले इंद्रप्रस्थाचे राज्य जर कौरव परत द्यायला तयार तर असतील युद्ध करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही व शांती प्रस्थापित होईल असे युधिष्ठिराने उत्तर दिलेले होते.
भीष्म, धृतराष्ट्र, विदुर व द्रोण पांडवांना त्यांचे राज्य परत करण्याबद्दल दुर्योधनाला समजावत होते. पण दुर्योधन कोणाचेच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. कारण आपल्याकडे ११ अक्षौहिणी सैन्य व भीष्म, द्रोण, कर्णांसारखे शूरवीर असतांना पांडवांबरोबर आपण निश्चित विजय मिळवू शकू याची त्याला खात्री होती.
दुर्योधन कधीही संधी करायला तयार होणार नाही हे युधिष्ठिराला कळून चुकले होते. धृतराष्ट्रालाही राज्याचा लोभ असल्यामुळे पांडवांचे राज्य न देता संधी कसा होईल त्याचे मार्ग तो शोधत रहाणार आहे हेही तो जाणून होता. तरीही तो संधीचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होता. अविस्थल, वृकस्थल, माकन्दी, वारणावत आणखी एखादे गाव अशी पाच गावे घेऊनही तो विवाद मिटवण्य़ास तयार झाला होता. कारण भरतवंशीयांचा नाश होऊ न देणे एवढे एकच ध्येय त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. परंतु दुर्योधन त्याही गोष्टीला तयार नाही याचे त्याला दु:ख वाटत होते. म्हणून शेवटचा प्रयत्न म्हणून श्रीकृष्ण संधीचा प्रस्ताव मांडण्य़ासाठी कौरवांच्या सभेत जाण्यास तयार झाले.
सौ. मनीषा अभ्यंकर.
No comments:
Post a Comment